' मनसे सरचिटणीसांचा स्वानुभव : बलात्काराचे “असेही” कोवळे आरोपी – InMarathi

मनसे सरचिटणीसांचा स्वानुभव : बलात्काराचे “असेही” कोवळे आरोपी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस

===

१ डिसेंबर २०१७, १२:१५ च्या दरम्यान शिवाजी पार्क पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पो. नि. शाखेत आले व म्हणाले देशपांडे चला तुम्हाला घ्यायला आलोय. “संदीप, जरा पो. स्टेशन ला चहा घ्यायला या,” असे परवलीचे शब्द न वापरता थेट शाखेत आलेत म्हणजे अटकच करायला आले आहेत, हे माझ्या अनुभवी मनाला लगेच समजले.

 

mns sandip deshpande facebook profile inmarathi

हे ही वाचा – कोरोना महामारी : काय आहे “साथरोग नियंत्रण कायदा”? जाणून घ्या

पो. स्टेशन च्या जीप मधून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘तू ते सर्जिकल स्ट्राईक च ट्विट केलं नसतंस तर तुला घेतलं नसतं.’ साहेबांनी आपलं एक पोलिसी निरीक्षण नोंदवलं. ‘मरना ही है, तो छोटा क्यू बडा मरो,’ मी ही त्यांना नाना पाटेकरांच्या “क्रांतिवीर” मधला डायलॉग चिकटवला. सिनिअर साहेबांना मधून-मधून डी.सी.पी. साहेबांचे फोन येत होते. आम्ही कुठपर्यंत पोहचलो आहोत याची माहिती घेत होते.

आम्ही शेवटी कफ परेड पोलीस स्टेशन ला पोहचलो. तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम च्या ताब्यात सुपूर्त करून शिवाजी पार्क पोलीस निरीक्षकांनी निरोप घेतला. मॅडम शी दोन अडीच तास गप्पा झाल्या. जेवण आटोपलं. रवानगी आझाद मैदान पोलीस स्टेशन ला झाली.

रात्री साधारण ९ च्या सुमारास माझे सहकारी संतोष धुरी, योगेश, अभय, दिवाकर वैगरे सर्वांचे अटक फॉर्म भरून घेणे सोपस्कर पार झाले. इथे मला एक निरीक्षण आवर्जून नमूद करावेसे वाटते, ते म्हणजे – पोलीस स्टेशन कुठलंही असो, अटक फॉर्म भरून घेणारे जे पोलीस असतात त्यांचे हस्ताक्षर कमालीचे सुंदर असते. या निरीक्षणाला मला कुठेच अपवाद आढळला नाही.असो.

जेवण वैगरे आटोपल्यानंतर आमची रवानगी आझाद मैदानच्या पोलीस कस्टडीत करण्यात आली. त्यातल्या त्यात मी व संतोष जरा ‘अनुभवी’ असल्यामुळे आम्ही फटाफट वर्तमान पत्रे वगैरे गोळा करायला सुरुवात केला. नाही नाही चुकीचा अर्थ काढताय – वाचायला नाही अंथरायला…!

कारण पोलीस कस्टडीत चादरी, सतरंजी अशा काहीच गोष्टी मिळत नाही. पण आम्ही त्या २०×२०च्या कोठडीत गेलो आणि आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

थंडी असल्यामुळे असेल किंवा काय कारण माहिती नाही, पण कैद्यांना सतरंजी उपलब्ध करून देण्यात आली होती…!

दिवसभराच्या थकव्यामुळे असेल कदाचित, पण अर्ध्या तासात आम्ही त्या सतरंजी वर डोक्याशी बिसलरी च्या बाटल्या घेऊन गाढ झोपी गेलो. मध्येच रात्री कधीतरी, म्हणजे, साधारण दोन अडीच वाजले असतील. “उठो उठो” अशा आरोळ्या ऐकू आल्या आणि जाग आली. कदाचित कुणीतरी मोठे साहेब राउंडला आले होते. आमच्या आठ जणांबरोबर अजून तीन चार कैदी होते.

“कोई तकलीफ है क्या?”

अस्सल पोलिसी आवाजात प्रश्न विचारला. बहुतेकांनी मानेनेच “नाही” असे उत्तर दिले. ते साहेब, आणि पुढचे दोन दिवस आलेले विविध अधिकारी हा प्रश्न मात्र हिंदीतूनच विचारायचे. एरव्ही अटक फॉर्म पासून ते स्टेटमेंड डिमांड (हे सर्व पोलिसी भाषेतील शब्द) मराठी लिहिले जातात किंवा बोलले जातात पण हा प्रश्न मात्र हिंदीतूनच विचारायला जायचा. का? ते त्या पोलिसांनाच ठाऊक. हिंदी भाषिक कैदी जास्त असल्याचा परिणाम असावा…!

दुसऱ्या दिवशी कोर्टात तारखेला गेलो. आम्हाला दोन दिवसांची पोलीस कोठडी झाली. ज्याची मानसिक तयारी माझ्यासकट माझ्या सर्व सहकाऱ्यांची झाली होती. तसेच आम्हाला एकेकाला बाहेर काढून जबाब घेण्याचे काम चालू होते. इतर कैद्यांशी गप्पा चालू होत्या. त्यातल्या एका मुलाने माझं लक्ष वेधून घेतलं.

साधारण १९ वय असलेला मुलगा. त्याची पहिलीच वेळ होती. सावळा अत्यंत बोलके डोळे असलेला, चुणचुणीत त्याला विचारलं, “काय रे कुठल्या केस मध्ये आणलं तुला?” त्याने थोडे संकोचिंतपणे हळू आवाजात उत्तर दिलं, ‘३७६, बलात्काराच्या केसमध्ये’.

 

rape-molestation-women-marathipizza

हे ही वाचा – हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं

त्याचं उत्तर ऐकून मी पार हादरून गेलो. एवढा लहान दिसतो. चांगल्या वातावरणातील दिसतो. ह्याने अस का केलं असावं? कुठल्या क्षणी ह्याच्यातील सैतान जागृत झाला असेल? कोण असेल ती बिचारी दुर्दैवी मुलगी? त्या बिचारीचं काय झालं असेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनाला स्पर्शून गेले.

पण ते माझ्या मनातच राहिले. मी त्याला विचारलेच नाही. त्या २०×२० च्या कोठडीत १५ ते १६ कैद्यांच्या गर्दीतसुद्धा मी त्याला टाळायला लागलो. तो माझे सहकारी विशाल, दिवाकर यांच्याबरोबर गप्पा मारताना हास्यविनोद करताना दिसायला लागला. दिवाकरने मला त्याची पूर्ण हकीकत ऐकवली.

त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. दोघेही वेगळ्या जातीचे असल्यामुळे मुलीच्या घरून प्रेमाला विरोध होता. दोघेही पळून गेले. त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी लग्न केले. मुलीच्या आई वडिलांनी तक्रार केली. पोलिस दोघांना शोधून घेऊन आले. मुलगी १८ वर्षे पूर्ण झालेली नव्हती. फक्त तीन महिने बाकी होते अठरा वर्षे पूर्ण व्हावयास.

दरम्यानच्या काळात त्या दोघांचे शरीर संबंध झालेले होते. त्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. पुढची माहिती पुरवत त्यानी मला सांगितलं. “दादा, ती पोलिसांशी खूप भांडली.”

तिनेही सांगितलं की, ती तिच्या मर्जीने आली होती. आणि तिने तिच्या आई वडिलांबरोबर राहायला नकार दिल्याने तिची रवानगी महिला-सुधार गृहात तर त्या मुलाची रवानगी कोठडीत झाली होती. मी त्याला सहजच एकच प्रश्न केला, ” सैराट कितीवेळा बघितलास?” त्याने उत्तर दिले १६ वेळा.

मी विचार करायला लागलो की, खरंच ह्या मुलाची चुकी आहे का? कायद्याप्रमाणे म्हणाल तर १००% आहे. पण त्याचं किंवा तिचं वय, आजूबाजूची परिस्थिती, सिनेमांमुळे झालेल्या प्रेमकथांचा त्या वयात होणारा परिणाम, इंटरनेट च्या क्रांतीमुळे वयाच्या अगोदर कळणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचा हा परिणाम असेल का? माहिती नाही. पण त्याची एकंदरीत असलेली सगळी केस विचार करायला भाग पडणारी होती हे निश्चित.

मी ह्या सगळ्यांचा विचार करत असताना तो मात्र त्याची प्रेम कहाणी पुढच्या परिणामांचा विचार नं करता सगळ्यांना रंगवून रंगवून सांगत होता आणि तिच्या विचारात हरवत होता.

सोमवारी आमची रवानगी सुदैवाने किंवा दुर्दैवाने आर्थर रोड तुरुंगात झाली. तपासणी, झडती वगैरे सोपस्कार पार पाडून, अधिकाऱ्यांकडे आमची असलेली रोख रक्कम जमा केली. जेणेकरून जेल कॅन्टीन मधून आम्हाला हव्या असलेल्या वस्तू विकत घेता येऊ शकत होत्या. आर्थर रोड तुरुंगाचं वातावरण हे अतिशय भिन्न होतं.

इथे कैद्यांना सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बॅरॅकच्या बाहेर पडवीमध्ये फिरायला, पाय मोकळे करायला परवानगी असते. विविध प्रकारचे कैदी इथे भेटतात. त्यांच्या अनेक कहाण्या असतात.

या तीन दिवसांच्या कारावासात अनेक लोक भेटले. या सगळ्यांच्या कथा मी काय तुम्हाला सांगणार नाही. पण एका मुलाने मला पुन्हा विचार करायला लावला. अनेक कैद्यांना जेलमध्ये अनेक काम करायला देतात. त्यातला हा लिखा-पढी करणारा मुलगा.

त्याची माझी ओळख सकाळी, जेव्हा तो मला, ‘वकील मुलाखत आहे’ – हा निरोप द्यायला आला तेव्हा झाली. आर्थर रोड जेलमधले तमाम कैदी एकमेकांना जो प्रश्न विचारतात, तोच प्रश्न मी ही त्याला विचारला. “काय, कुठली केस?” – “३७६” त्याचं उत्तर. बलात्कार. मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.

“नाही दादा”, त्याने लगेच स्पष्टीकरण दिलं.

“तिचं-माझं प्रेम होतं. ती गरोदर राहिली. मला माहितीच नव्हतं. तिची १८ वर्ष पूर्ण झाली नव्हती. तिच्या आईने तक्रार केली, मी आत आलो. माझी तिची भेट पण होऊ शकली नाही. मी लग्न करायला तयार आहे तिच्या बरोबर.” त्याने मला माहिती दिली. पुन्हा थोडी वेगळी, पण तशीच केस माझ्यासमोर आली.

माझ्या मनात अनेक विचार आले.

आझाद मैदान पो. कस्टडीत भेटलेला तो आणि आर्थर रोड मधला हा? ह्यांचं काय भवितव्य असणार आहे? हा चांगल्या कॉलेज मध्ये शिकणारा विद्यार्थी? त्यांच्या आई-वडिलांना काय वाटत असेल? ह्याची अन त्याची खरंच चूक आहे का?

या दोघांनी खरंच गुन्हा म्हणावा अस काही केलं आहे का? की आजची १७ ते २० वयोगटातील ही तरुण पिढी जरा फास्ट आहे? आणि कायदे जास्त जुने आहेत? या वयात असणारं लैंगिक आकर्षण, एखाद्या क्षणी हळुवार संमतीने घडलेली गोष्ट, हा गुन्हा आहे काय?

हे किती दिवस आत राहतील…यातून सुटतील का? आपल्यामुळे आपला प्रियकर तुरुंगात आहे याची बोचणी त्या मुलींना आयुष्यभर राहील का? आई वडिलांनी बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा हा परिणाम आहे का?

त्यांनी प्रेम केलं हा त्यांचा गुन्हा आहे का? ह्याची चर्चा झाली पाहिजे का? बदलत्या वातावरणानुसार आणि झालेल्या सामाजिक बदलानुसार कायद्यात बदल केला पाहिजे का?

सर्जिकल स्ट्राईक करून तुरुंगात आलेलो आम्ही जाताना मात्र आमच्या मनावर या प्रश्नांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता हे निश्चित!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?