रडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
तुम्हाला एनाबेला या बाहुलीची कहाणी तर माहित असणारच. त्यावर चित्रपट देखील बनविण्यात आला होता, जो अतिशय भयानक होता. भलेही आपण भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसलो
तरी भूतकाळातील अश्या अनेक घटना प्रचलित आहेत ज्या या अदृश्य शक्ती असल्याचे संकेत देतात. असो… भूत असतात किंवा नसतात हा एक वेगळा विषय आहे.
पण आज आम्ही तुम्हाला एनाबेला प्रमाणेच एका पेंटिंगची कहाणी सांगणार आहोत… एक अशी पेंटिंग जिला शापित मानलं जायचं.
आता तुम्ही विचार करत असाल की, एका पेंटिंग ने काय होईल बरं.. पण या पेंटिंग बद्दल असे सांगितल्या जाते की,
ही पेंटिंग जिथेही लावण्यात आली तिथे विनाश झाला.
आता यावर किती विश्वास ठेवायचा तो आपल्यावर आहे, पण आम्ही असल्या कुठल्याही अंधविश्वासाला पाठींबा देत नाही आहोत. आम्ही तर तुम्हाला केवळ एक प्रचलित कहाणी सांगत आहोत.

ही पेंटिंग कुठल्या साधारण चित्रकाराने नाही तर इटलीच्या प्रसिद्ध चित्रकार जीयोवनी ब्रागोलिन यांनी बनविली होती.
ही पेंटिंग एका रडणाऱ्या लहान मुलाची होती. या पेंटिंगचे नावच ‘दि क्राइंग बॉय’ असे होते. या पेंटिंगला जीयोवनी ब्रागोलिन यांनी १९८५ साली बनविले होते. त्यांनी केवळ ही एकच पेंटिंग बनविली नव्हती तर त्यांनी या पेंटिंग्जची एक सिरीज बनविली होती.
काही काळातच या पेंटिंग्जची सिरीज प्रसिद्ध झाली. त्यामुळे या खास पेंटिंग च्या ५० हजार प्रत बनविण्यात आल्या.
या पेंटिंगने जीयोवनी ब्रागोलिन यांना खूप प्रसिद्धी आणि तेवढेच पैसे ही मिळवून दिले. पण त्यासोबतच त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली ती म्हणजे बदनामी…
लोकांनी या पेंटिंगला मोठ्या संख्येने विकत घेतले आणि आपल्या घराच्या भिंतींवर सजवले. पण त्यानंतर या घरांमध्ये अपघातांच्या घटना व्हायला लागल्या.
अनेक वृत्तपत्रांनी सदर चित्र आणि त्याबद्दल जोडल्या गेलेल्या अपघातांची दखल घेतली. एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने असा दावा केला की,
‘तो जवळपास १५ घरांमध्ये आग लागल्यावर आपल्या टीमसोबत तिथे गेला. ज्याही घरात तो आग विझवायला जायचा त्या घरात ही ‘दि क्राइंग बॉय’ ची पेंटीग दिसायची. त्याने हे देखील सांगितले की,
घरातील सर्व सामान जळून जायचे पण ही ‘दि क्राइंग बॉय’ पेंटिंग कधीच जळाली नाही.’
याप्रकारच्या घटना वारंवार घडत चालल्या होत्या, त्यामुळे लोकांनी आपल्या घरात ही पेंटिंग ठेवणे बंद केले आणि या पेंटिंगला शापित घोषित करण्यात आले.
एवढेच नाही तर एका वृत्तपत्रानुसार हॅलोविनला बोन फायरमध्ये या पेंटिंगच्या शेकडो प्रतिमा जाळण्यात आल्या.
संयोगवश यानंतर अश्या अपघाती घटना कमी झाल्या आणि लोकांनी असे मानून घेतले की, ही पेंटिंग शापित आहे. त्यानंतर लोकांनी ही पेंटिंग त्यांच्या घरात न लावण्यातच सुरक्षितता मानली.
पण आजही काही लोकांजवळ ही शापित मानल्या गेलेली पेंटिंग आहे आणि ते लोकं सुखरूप आहेत…
स्त्रोत : जागरण
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.