' देह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८) – InMarathi

देह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)

  • आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : तुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६

===

jave-tujave-tjave-tukobanchya-gaava-marathipizza01ukobanchya-gaava-marathipizza01kobanchya-gaava-marathipizza01

 

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।।
आवडी आवडी कळिवराकळीवरी । वरिली अंतरी ताळी पडे ।।
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ।।
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरे आहाचाचे आहाच ।।

(ह्या अभंगाचा अर्थ सांगणे सुरू आहे…)

पुढील दिवसाच्या अभ्यासाची सुरुवात नारायणाने केली. तो म्हणाला, “काका, अभंगाचा तुम्ही सांगितला तो अर्थ मनात घोळवायचा मी सारखा प्रयत्न केला आणि उरलेल्या ओळींचा अर्थही लावता येतो का ते पाहिले. कळिवर म्हणजे आत्मा आणि कळीवर म्हणजे देह हे लक्षात आले. तरी ‘आवडी आवडी कळिवराकळीवरी’ यातील आवडी आवडी ह्या द्विरूक्तीचे कारण कळले नाही. तसेच एकदाच आवडी जर घेतले तर आत्माला देहाची आवड असते असा अर्थ निघू लागला.

काका, ज्याला कशाची आवड नसते तो आत्मा ना? मग आत्म्याला देहाची आवड असते असे तुकोबा का बरे म्हणाले असतील?”

यावर रामभट सांगू लागले –

नारायणा, आत्म्याला देहाची आवड असते हा तुला लागलेला अर्थ बरोबर आहे. तुकोबांनी आवडी शब्दाची द्विरुक्ती का केली आहे ते तुझ्या सांगितल्यावर लगेच लक्षात येईल.

आत्माला देहाची आणि देहाला आत्म्याची आवड असते असा त्या ओळीचा अर्थ आहे.

आवड असणे म्हणजे ओढ वाटणे. ओढ असणे म्हणजे दुरावा नकोसा वाटणे. येथे अर्थ असा की देह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत, ते एकमेकांपासून कधीही विलग होत नाहीत. विलग होत नाहीत म्हणजे ते सदोदित एकत्रच असतात. ते इतके एकत्र असतात की त्यांच्यातील भेदाभेदाचे आकलन आपल्याला सहजी होत नाही. अमृतानुभवाच्या सुरुवातीसच श्री ज्ञानदेव काय म्हणतात पाहा –

जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरीं ।
चारुस्थळीं येकाहारी । एकांगाची ॥
आवडीचेनि वेगें । येकयेकातें गिळिती अंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥
जे एकचि नव्हे एकसरें । दोघां दोनीपण नाहीं पुरें ।
काइ नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥
कैसी स्वसुखाचि आळुकी । जे दोनीपण मिळोनि येकीं ।
नेदितीचि कवतिकीं । एकपण फुटों ॥
हा ठाववरी वियोगभेडें । जें बाळ जगायेव्हढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥

ह्यात ज्ञानदेवांनी ब्रह्माला प्रियु वा प्रियकर म्हटले आहे आणि मायेला त्याची प्राणेश्वरी. येथेही ‘आवडी’ हा शब्द ओढ ह्या अर्थानेच आलेला आहे. त्या दोघांना एकमेकांची इतकी ओढ असते की एकमेकांना जणू गिळूनच असतात आणि आपले हे एकत्रित जीवन तुटणार नाही ह्याची ते सदैव काळजी करतात. यांच्या ह्या अशा समागमातून ती माया ह्या जगाएवढे बाळ वियाली तरीही त्यांची एकमेकांची ती ओढ जराही कमी होत नाही असा अर्थ आहे.

असे म्हणा की हे जग वा ही सृष्टी म्हणजे एकमेकांना धरून असलेल्या त्या दोघांचे सगुण साकार रूप आहे. ते सत्य आहे म्हणावे तर त्याचे स्वरूप क्षणोक्षणी पालटते आहे आणि म्हणून ते नाही असे म्हणावे तर ते असल्याचा अनुभव नित्य येत आहे. ह्या ‘असण्या नसण्या’ च्या ह्या खेळामुळेच तुकोबा म्हणतात –

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ॥

देव ह्या शब्दाचा अर्थ, तुम्ही, आबा, काहीतरी करून दाखविणारा कर्ता असा घेतला आहे. चूक तुमची नाही. सामान्यांची तशीच समजूत असते. पण, आपण अभ्यासक आहो. आपण कर्ता देव ही कल्पना मनातून आधी काढूनच टाकली पाहिजे. लोकांच्या मनात सगुण परमेश्वराची कल्पना असते, ती अद्वैती कधी मान्य करणार नाहीत.

ह्या जगात ‘करणारा’ असा कुणी नाही हे जोवर मनात पक्के होत नाही तोवर ज्ञानबातुकोबांच्या सांगण्याचा अर्थ नीट लागणारच नाही. ही सृष्टी ब्रह्मामुळे अस्तित्वात आली आहे आणि तिच्या रूपात सतत बदल होत आहे. हा सतत होणारा बदल ब्रह्माच्या प्रकृतीमुळे वा मायेमुळे होतो. अशा स्थितीत ती दोघे कधी वेगळी होणार नाहीत हे स्पष्ट आहे.

स्थैर्य आणि बदल ही दोन विरुद्ध तत्त्वे एकत्र नांदत असतात म्हणून देव आहे – स्थैर्य आहे, अस्तित्व आहे असे म्हणता येते आणि त्याचबरोबर बदल घडत असल्याने – स्थैर्य नाही हे ही अनुभवता येते…

तुकोबा म्हणतात..

देव आहे असे म्हणावे – ज्याच्यामुळे आपण आहोत तो आहे असे म्हणावे – तशी वाणी वदवावी –

परंतु जो बदल घडत असतो ती माया असते – तिचे दृष्य स्वरूप आपल्याला जाणवत असते – तो देव नाही याचा अनुभव घ्यावा – पडताळा घ्यावा….

हा पडताळा कसा घ्यावा तर आपल्या देहाचेच उदाहरण मनात धरून घ्यावा.

हा देह सतत बदलत आहे आणि तरी आपले अस्तित्व तसेच आहे. हे तसेच असणे हे स्थैर्य आहे – तो देव जाणावा आणि तो आहे अशी आपली वाणी असावी.

हा देह असला तरी त्याचे स्वरूप दर क्षणाला पालटते असल्याने – हा देह म्हणजे देव नव्हे हे उमजून तो विचार मनात सतत जागृत ठेवावा – तसा मनोमन अनुभव घ्यावा.

हा विचार पक्का करण्यासाठी हे लक्षात ठेवावे की देहाला आत्माची आणि आत्म्याला देहाची आवड – म्हणजेच ओढ असल्याने ते एकमेकाला कधीही सोडणार नाहीत. देह हे देवाचे बाह्य स्वरूप आहे आणि त्याच देहाच्या अंतरी आत्मरूपी देव वसलेला आहे. बाह्यरूप आणि अंतरंग यांच्या नात्याचा पडताळा घ्यायचा असेल तर जे आहे ते आहे आणि जे बदलते आहे ते नाही असा विचार पक्का केला पाहिजे. तो पक्का होण्यासाठी देव आहे – स्थैर्य आहे असे म्हणावे आणि रूप स्थिर नाही ह्याचा अनुभव मनात करावा.

हे ऐकून आबा म्हणतो, “आता माला काय कळलं त्ये बर्बर हाय का त्ये सांगा.”

म्यां समजत हुतो की ह्ये जग चालविनारा कुनी हाये. तसा कुनी न्हाई. पन ह्ये जग हायेच. मंजी त्ये जग हुतंच आनी असनार बी. त्ये का हुतं आनी का आसनार त्येचं कारन ज्ये ते द्येव हाय. त्येलाच द्येव म्हनावं आन तसं तोंडानं बोलत बी ऱ्हावं.

पन आपन कसं म्हनतो, द्येवानं ह्ये आसं केलं, तसं केलं – ती भाषा चूक हाय. द्येव काही बी करीत नसतुया. जग बदलत असतुया. त्ये बदलनं म्हंजी देवाची करनी नव्हं ह्यो अनुभव मनात करावा – मंजी काय हुतं? तर माजा जाला तसा गोंधळ हुत न्हाई!”

आबाचे हे बोलणे ऐकून रामभटांना एकाच वेळी समाधान झाले आणि हसूं ही आले. ते म्हणाले, “फार छान बोललात आबा. मला सांगायला इतका वेळ लागला ते तुम्ही थोडक्यात छान सांगितलेत.”

हे झाल्यावर नारायणाने विचारले, “काका, तुमच्या आणि आबांच्या बोलण्याने बराचसा अभंग सुटला. पण तरी एक कडवे राहिले. तुकोबा म्हणत आहेत –

अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥

ह्याचा अर्थ काय?”

ह्यावर रामभट म्हणाले, “नारायणा, तुला काय अर्थ लागला ते आधी सांग. चूक वाटला तर सुधारणा करतो.”

नारायणाने अर्थ सांगितला –

मातापुत्राची जेव्हा भेट होते तो क्षण अपूर्वाईचा असतो. आनंदाचा असतो. एक प्रकारचा तो हर्षयोगच असतो. पण जेव्हा काही कारणाने ते दोघे एकमेकांपासून दूर जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुटीच्या कल्पनेने रडू येते.

रामभट म्हणाले, “नाही, असा अर्थ नाही त्याचा. तू ह्या अभंगातील मुख्य सूत्रच विसरलास, मग अर्थ बरोबर लागेल कसा?

तुका ह्मणे एके कळते दुसरे हे मुख्य सूत्र आहे. तुझ्या सांगण्याचा आणि ह्याचा संबंध लागत नाही. आता ऐका.

मातापुत्रांच्या ‘अपूर्व’ भेटीचा हा प्रसंग आहे. अपूर्व म्हणजे पूर्वी कधीही न झालेली अशी ही गोष्ट आहे. असा क्षण फक्त अपत्यजन्माच्या वेळीच येतो. प्रसूतीनंतर माता जेव्हा आपल्या बाळाला पाहते तेव्हा तिच्यासाठी ते ‘अपूर्व’ दर्शन असते. स्वाभाविक आहे, ती प्रथमच आपले बाळ प्रत्यक्ष पाहात असते.

आता बाळाची गोष्ट काय आहे? तर ह्या हर्षाच्या प्रसंगी ते रडत आहे! का बरे? कारण त्याची आणि मातेची आता ताटातूट होत आहे! वास्तविक पाहिले तर त्याच्यासाठीही हा हर्षाचाच प्रसंग आहे कारण स्वेच्छेनेच ते मातेपासून स्वतंत्र होत आहे व त्याचे मातेवरील अवलंबित्व नष्ट होऊन, बंधमुक्त होऊन आता ते स्वातंत्र्याचा अनुभव करीत आहे. तरीही मातेच्या तुटीमुळे दुःख होऊन त्या हर्षाच्या प्रसंगी ते रडतही आहे! रडणे आणि हसणे ह्याचा असा ‘योग’ ह्यावेळी त्या बाळाच्या जीवनात आलेला आहे.

स्वातंत्र्यामुळे बंधनाचे आणि बंधनामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व कळते. बाळ पोटात होते तेव्हा त्याला बाहेर यायचे होते आणि आता बाहेर आल्यावर तुटल्याचे दुःख करून ते रडते आहे! बंधनात केलेली स्वातंत्र्याची कल्पना प्रत्यक्षात आली तेव्हा त्या बाळाने सुख आणि दुःख एकाच वेळी अनुभविले! तुका ह्मणे एके कळते दुसरे ते असे!

आपल्याला हा देह आहे, पिंड आहे तर विश्वाला त्याचा अजस्त्र देह आहे, ब्रह्मांड आहे. पण त्याचे आपल्याला दिसणारे स्वरूप सतत बदलते आहे. ते सत्य मानू नये – तसा विचार व अनुभवही मनोमन करावा. आणि असे असले तरी ह्या देहाच्या आणि ह्या विश्वाच्या अंतरंगी काहीतरी अविनाशी तत्त्व आहे – त्याला देव म्हणावे व असा तो देव आहे, देव आहे अशी वाणी वदवावी असे तुकोबांचे आपल्याला ह्या अभंगातून सांगणे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?