' गुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण – InMarathi

गुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

उत्तरायण म्हणजेच संक्रांत हा सण गुजरातमध्ये जल्लोषात साजरा केला जातो. २२ डिसेंबरपासून उत्तर गोलार्धात रात्र छोटी होत जात असली तरी संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो असा विश्वास आहे. संक्रांतीच्या आठवड्यात गुजरातमध्ये कुठेही जा, आकाशात शेकडो पतंग उडताना उडताना दिसतात. अनेक ठिकाणी लोक दोन-तीन दिवस गच्चीतच राहून पतंगबाजी करतात. कापलेल्या पतंगांच्या धारदार मांजामुळे पक्षांसोबत रस्त्यातील माणसांचे गळेदेखील कापले जातात. यावर्षी विधानसभा निवडणुकांमुळे दोन महिने आधीपासूनच राज्यात पतंगबाजीला ऊत आला असून सोमवार १८ डिसेंबरला कोणाची उत्तरेकडे वाटचाल सुरू होणार, कोणाचे पतंग कापले जाणार आणि कोणावर संक्रांत येणार याचा फैसला होणार आहे.

 

modi-rahul-inmarathi04

कॉंग्रेस, भाजपा आणि एकूणच देशाच्या राजकारणासाठी गुजरातचे निकाल एक स्थित्यंतर आणणारे ठरतील. वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांतून एव्हाना स्पष्ट झाले आहे की, गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजपा विजयी होणार आहे. बऱ्याचशा चाचण्यांनी भाजपाला गेल्या खेपेपेक्षा पाच-दहा जागा कमी म्हणजे ११० ते ११५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी दुसरीकडे अनेक अभ्यासकांना असेही वाटते की, एकतर भाजपा कसाबसा १०० चा आकडा पार करून काठावर पास होईल किंवा मग १३० चा आकडा पार करून घवघवीत यश मिळवेल. मतदानाचा वाढलेला टक्का पाहाता दुसरी शक्यता अधिक वाटत असली तरी हे मान्य करायलाच हवे की, निवडणुका घोषित झाल्या तेव्हा भाजपा अत्यंत निसरड्या विकेटवर होता. सगल दोन दशकं असलेल्या सत्तेमुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या पिढीला कॉंग्रेसची सत्ता कशी असते हेच माहिती नव्हते.

१६ डिसेंबरला राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. सक्रीय राजकारणात ते गेली १५ वर्षं असले आणि गेली १० वर्षं युथ कॉंग्रेसचे नेतृत्त्वं करत असले तरी गुजरात निवडणूकीत पहिल्यांदाच त्यांना सूर गवसल्यासारखे वाटले. गुजरातमधील जवळपास दोन डझन मंदिरांना दिलेल्या भेटी, मनगटाला बांधलेले गंडेदोरे आणि गळ्यातील रूद्राक्षाच्या माळा थट्टेचा विषय ठरल्या असल्या तरी त्यामुळे पहिल्यांदाच हिंदुत्त्वाच्या मुद्यावर गुजरातमध्ये भाजपासाठी पर्याय निर्माण झालेला दिसला.

समाज माध्यमांवर राहुल गांधींची वाढलेली सक्रीयता, वेड्या झालेल्या विकासाचा त्यांनी लावून धरलेला मुद्दा आणि गुजरातमधील प्रमुख जाती-गटांतून हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांना पुढे आणल्यामुळे अनेक वर्षांत पहिल्यांदाच गुजरात भाजपाच्या हातून निसटतो का अशी भीती वाटू लागली होती. पण दुसरीकडे निवडणूक लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं बूथ पातळीवरील संघटन, आर्थिक संसाधनं आणि प्रादेशिक नेत्यांचा अभाव कॉंग्रेसला प्रकर्षाने जाणवला. कॉंग्रेसमधील ढुढ्ढाचार्यांना टीम राहुलने बाजूला सारल्यामुळे त्यांनीही आपली नाकं कापून अपशकुन करण्याचे वेळोवेळी प्रयत्न केले, जे भाजपाच्या पथ्यावर पडले.

तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचे दिल्लीकडे प्रस्थान झाल्यानंतर भाजपा गुजरातमध्ये गाफिल राहिली. आनंदीबेन पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातची घडी विस्कटली. विजय रूपाणींनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या वर्षभरातील नोटबंदी, जीएसटी आणि रेरा यांचा राज्यातील छोट्या-मध्यम व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला. जागतिक बाजारपेठांमध्ये नगदी पिकांचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांतही असंतोष निर्माण झाला होता. अशा परिस्थितीमुळे हिंदुत्त्वाच्या प्रयोगशाळेत जातीय अस्मिता आणि न्यायाच्या राजकारणाने फणा वर काढला होता.

मोदी सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा देशासाठी आवश्यक असल्या आणि त्यांच्यामुळे ओढवलेली परिस्थिती सुधारणार असली तरी निराशाजनक परिस्थितीत मतदार भावनिक मुद्यांकडे आकर्षित होऊन विरोधात मतदान करण्याची भीती असते. नरेंद्र मोदी पंतप्रधान, अमित शहा भाजपा अध्यक्ष आणि राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर गुजरातमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुका, अपेक्षेप्रमाणे अत्यंत प्रतिष्ठेच्या झाल्या.

 

Gujarat-Elections-2017-inmarathi
deshgujarat.com

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आपला सारा अनुभव या निवडणुकांत पणाला लावला. प्रचाराचा रोख विकासाच्या मुद्यावरून हिंदुत्त्व, गुजराती अस्मिता, पाकिस्तान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर वळवून प्रचाराच्या शेवटच्या टप्यात तो पुन्हा विकासाच्या मुद्यावर आणण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी कसलेल्या सेनापतीप्रमाणे स्वतःला निवडणुकांच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळे शेवटच्या टप्यात इतर कोणत्याही विषयापेक्षा मोदी हवेत का नकोत या एकाच मुद्यावर मतदान करायला जनतेला उद्युक्त केले गेले.

मतदानाच्या टक्क्याकडे बघितल्यास नाराज कार्यकर्त्यांना घराबाहेर पडून मतदान करायला लावण्यात ते यशस्वी झाले. कुठलाही शास्त्रीय आधार आणि अभ्यासाशिवाय केवळ बाह्य निरिक्षणावर भाजपाला गुजरातमध्ये मोठा विजय मिळेल असे वाटते.

भाजपाचा विजय निश्चित वाटत असला तरी कॉंग्रेसला किती जागा मिळतील यावर देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. माझ्या मते, कॉंग्रेसने २०१२ तील निवडणुकीत मिळवलेल्या ६१ जागांहून एक जागा जरी जास्त मिळवली तर ते राहुल गांधींचे यश मानले जाईल. जर कॉंग्रेसला ६५ ते ७२च्या मध्ये आणि भाजपाला ११०-११७ जागा मिळाल्यास माध्यमांकडून सामना अनिर्णित राहिल्याचे चित्र निर्माण करण्यात येऊन कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रक्रीयेला प्रारंभ होईल.

जर कॉंग्रेसने ७२चा आकडा पार केला तर मात्र राहुल गांधी केवळ कॉंग्रेसचेच नव्हे तर युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर येण्याची दाट शक्यता आहे. भाजपाला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्यास तो भाजपाचा पराभव समजला जाईल आणि कदाचित पुढील दीड वर्षं सरकार इतर कोणत्याही आर्थिक किंवा धोरणात्मक सुधारणांपेक्षा येणाऱ्या लोकसभा निवडणुकींचा विचार करेल.

आधी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे भाजपाला १३० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास भाजपा नेतृत्त्व आणि कार्यकर्त्यांच्या मनात नवीन उत्साह संचारून २०१८च्या शेवटी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या जोडीला लोकसभा निवडणुका घेऊन ज्या भाजपाशासित राज्यांनी ३ वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांनाही या महानिवडणूकीत सहभागी करून घेण्याचा जुगार भाजपा खेळू शकेल. कॉंग्रेसला मिळणाऱ्या जागांचा आकडा थोडा खालती येऊन २०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असलेल्या कॉंग्रेस सदस्य संख्येच्या म्हणजे ५१च्या – त्यातीलही काही मतं फुटली होती – खालती राहिल्यास कॉंग्रेसचे भाट राहुल गांधी यशस्वी झाल्याचा दावा करतील. पण जर तो ५१च्या खालती आला तर मात्र ती कॉंग्रेस पक्षासाठी काळजीत टाकणारी गोष्टं असेल.

गुजरात निवडणूकीत आडगळीत सारण्यात आलेल्या ढुढ्ढाचार्यांमध्ये दुसऱ्या एखाद्या तरूण नेत्याला हाताशी धरून राहुल गांधींविरोधात बंड करण्याची शक्ती नसली तरी ते सोनिया गांधींकडे आर्जव करून दरबारी राजकारणातले आपले स्थान कायम राखण्याचा प्रयत्न करतील. सोनिया कॉंग्रेसच्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या असल्या तरी केवळ त्यांच्याच नेतृत्त्वाखाली युपीए उभा राहू शकत असल्याचे सांगून त्यांना लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची गळ घालण्यात येईल. यात तथ्यही आहे कारण कॉंग्रेसला ५१ पेक्षा कमी जागा मिळाल्यास ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, शरद पवार आणि कदाचित नितिश कुमारही विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्त्व करायला पुढे सरसावतील. कदाचित अण्णा हजारेंच्या आगामी आंदोलनाला लोकशाही वाचचण्याच्या लढ्याचे व्यापक स्वरूप देऊन त्याआडून भाजपावर शरसंधान केले जाईल. कॉंग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर आडून बसली प्रादेशिक पक्षांपैकी काही भाजपासोबत जातील, काही युपीएत राहून भाजपाशी संधान साधतील तर तृणमूल, तेलंगणा राष्ट्र समिती, बसपा आणि द्रमुकसारखे पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.

गुजरात विधानसभा निवडणूकांच्या निकालांमुळे देशात एक महिना आधीच उत्तरायणाला सुरूवात होणार आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?