' स्त्री-पुरुष समानतेची जबाबदारी “फक्त पुरुषांची”च? – InMarathi

स्त्री-पुरुष समानतेची जबाबदारी “फक्त पुरुषांची”च?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – रोहन नामजोशी 

===

पिंक चित्रपटाच्या निमित्ताने, आपला समाज, लोकांची कुजलेली मानसिकता या सगळ्यांचा प्रत्यय आला होता. “स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही” हे पुन्हा एकदा समाज मनावर ठसविण्यात ही कलाकृती यशस्वी ठरली. तसेच स्त्री पुरूष समानता ही काळाची गरज आहे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली.

पण…!

या चित्रपटाने पुरूषांच्या सामाजिक स्थानावर देखील अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. स्त्री-पुरूष समानतेचे वारे जोराने वाहत आहेत. ही समानता फक्त पुरूषांनीच प्रस्थापित करायला पाहिजे, त्यांनी स्त्रियांवर अजिबात अन्याय होऊ देऊ नये अशा अपेक्षा आहेत.

“कारण पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये त्यांच्यावर फार अन्याय झाला आहे.” अर्थात, हे मान्यच आहे. पण “समानता” प्रस्थापित करण्याची जबाबदारी फक्त पुरुषांचीच का बरं हे कळत नाही. स्त्रिया काय प्रयत्न करताहेत ही बाब सुद्धा तपासून बघायला हवी.

आणि नेमकी हीच बाजू दुर्लक्षित रहातीये.

 

pink-amitabh-taapsee-marathipizza

 

पिंक प्रकरण आपल्या आसपास, नात्यात घडलं असतं तर स्त्रियांनीतरी अश्या मुलींना मदत केली असती का – हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.

“आम्ही मदत केलीच असती” वगैरे बोलणं सोपं आहे, पण करणं फार कठीण आहे. ‘तोकडे कपडे घालून जावेच कशाला’ किंवा ‘पर-पुरूषासोबत दारू प्यायला लाज-शरम कशी वाटत नाही’ असे प्रश्न स्त्रियांकडूनच विचारले गेले असते.

अश्या घटनांविरोधात, आपण सर्वांनीच सोशल मिडियावर खूप काही बोलेलं असेल. पण प्रत्यक्ष कृतीच्या प्रसंगी कसे विचार मनात येतात/येऊ शकतात – ह्याचं आत्मपरीक्षण करायला हवं.

अर्थात, PINK च्या निमित्ताने, अनेक पुरुष देखील “मुलींना स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे” वगैरे म्हणत आहेतच. पण आपली बहीण, गर्लफ्रेंड, बायको अशी पर-पुरुषांबरोबर, काही तासांची ओळख असताना दारू प्यायला गेली तर हेच लोक कसे react होतील, सांगता येत नाही.

म्हणूनच PINK च्या निमित्ताने स्त्री स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता – ह्या विषयांचा एका वेगळ्या, मोठ्या canvas वर विचार करायला हवा.

“स्त्रिया अनेक क्षेत्रात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत” वगैरे वाक्य चावून चोथा झाले आहेत.

गरज आहे त्यापलीकडे जाऊन बघण्याची.

स्त्री ही देवतेसमान असते. तिचा आदर केला पाहिजे, तिला घरात, घराबाहेर मानाने वागवायला हवे सगळं ठीक आहे. पण याचा अर्थ पुरूषांना काहीच आदर द्यायला नको असाही होत नाही.

कोणताही लिंगभेद नं ठेवता पुरूष आणि स्त्री – यांना एकाच पातळीवर वागवले पाहिजे अशी स्त्रियांची प्रमाणिक अपेक्षा असते. मानववंशाच्या दोन जाती आहेत, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यांना तसे जगू द्यावे हे अतिशय साधे तत्व याविचारामागे आहे. परंतु स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत हे तत्व प्रामाणिकपणे पाळल जातंय का?

 

stri-purush-samanta-marathipizza

 

आता एक साधं उदाहरण बघा. हल्ली लग्न ठरवताना “घरकामं वाटून घेऊ” ही चर्चा होते. म्हणजे, मुलांनी स्वयंपाकाला थोडा हातभार लावावा, घरकामांत मदत करावी अशा स्वरुपाचे ते निर्णय असतात. अपेक्षा, अर्थात, योग्यच आहे. पण मग “मुलीला स्वयंपाक येतो का?” हा प्रश्न विचारल्यावर मुलींचा इगो का दुखावतो? यावर त्यांचं एक हमखास उत्तर असतं “आमचं करिअर आहे!”.

थोडं पुढे जाऊन बघूया. मुलीला जर वीस हजार पगार असेल तर तिच्या भावी नवऱ्याचा पगार किती अपेक्षित असतो? वीस हजारपेक्षा कितीतरी “अधिक”च. लग्न ठरताना CCD मधे भेट झाली तर बिल देण्याची अघोषित जबाबदारी कुणाची असते? लग्न झाल्यानंतरही, घरखर्चात मुलींचा सहभाग असला तरी मुख्य भार कुणी उचलणं अपेक्षित असतं?

इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की “खर्च कुणी करायचा” ह्या क्षुल्लक विषयावर हा काथ्याकुट नाही. मुद्दा हा आहे की स्वतःचं करिअर, पगार हे “समानते”चे शस्त्र असल्यासारखं जर वापरलं जात असेल तर वरील उदाहरणांमध्ये पुरुषांकडून गृहीत असलेली ‘आर्थिक superiority’ मोकळेपणाने मान्य केली जाते का? जर अशी superiority नको असेल तर तसं स्त्रियांच्या वागण्यातून दिसतं का?

हे प्रश्न सार्वजनिक ठिकाणं, बसेस मधील आरक्षित सीट्स अश्या अनेक संबंधांत विचारले जाऊ शकतात. समानतेची इच्छा-अपेक्षा व्यक्त केली जात असताना ह्या असमतोल विचार आणि वागणुकीचा विचार व्हायला हवा.

पिंकमधे ज्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे – ते प्रश्न ह्याच असमतोल विचार आणि वागणुकीतून निर्माण होत आहेत.

त्यामुळे “समानता”वादी पुरुषांनी, त्याहून अधिक स्त्रियांनी – ह्या बाजूने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?