' दी विंड जर्नीज आणि सिरो ग्वेरा – InMarathi

दी विंड जर्नीज आणि सिरो ग्वेरा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मध्यंतरी सिरो ग्वेरा या अवलियाच्या, अद्भुत अशा कामाची जवळून ओळख झाली. सिरो ग्वेरा कोलम्बियन दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. २००४ साली, वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, सिरोने Wondering Shadows नावाचा सिनेमा बनवला. आयुष्यात अपयशी ठरलेल्या दोन व्यक्ती, त्यांच्या अपयशाची कारणे, त्यांच्या सभोवतालची परिस्थिती, काही विचित्र रहस्ये, ती उघड होत असतानाची काही वैश्विक सत्ये, याचा धांडोळा Wondering Shadows घेतो.

 

The Wind Journeys-inmratahi

 

The Wind Journeys (२००९) हा सिरोचा दुसरा चित्रपट. एक वाद्यवादक (इग्नाशिओ कॅरीलो), एक लहान मुलगा (फर्मिन) आणि एक अपशकुनी असणारं अॅकॉर्डियन नावाचं वाद्य. ही आणि एवढीच प्रमुख पात्रयोजना असणारा विंड जर्नीज एक वेगळा अनुभव आहे. जेव्हा जेव्हा हे वाद्य वाजवलं जातं, तेव्हा, काही न काही अपशकुन घडतो. आजूबाजूच्या लोकांना, होणाऱ्या घटनेचा त्रास होतो. वादकाला तर फारच! खूप वेळा असे अनुभव घेतल्यामुळे, वादकाची खात्री झालेली असते की आपल्याकडचं हे वाद्य खरोखरच अपशकुनी आहे.

 

The Wind JournThe Wind Journeys-inmratahi06eys-inmratahi06

 

बायकोच्या मृत्यूनंतर, हे अपशकुनी अॅकॉर्डियन, खूप दूरवर असलेल्या एका गावात, वाद्याच्या मूळ मालकाकडे जाऊन सुपूर्द करावं आणि वादन कायमचं थांबवावं, हे इग्नाशिओ मनोमन ठरवतो. या वाद्याचा मालक म्हणजे इग्नशिओचा गुरु असतो. इग्नाशिओ खूप लांबवरच्या प्रवासाला एका खेचरावर बसून निघतो. या आगळ्यावेगळ्या प्रवासात त्याला साथ करायला एक लहान मुलगा तयार होतो (आईच्या सांगण्यावरून आणि अॅकॉर्डियन शिकायचंय म्हणून !). या प्रवासात, अपशकुनी अशा अॅकॉर्डियनमुळे बऱ्याच वैचित्र्यपूर्ण घटना घडतात. या घटनांचा परिणाम हा दरवेळी खूप वेगवेगळा असतो.

 

The-Wind-Journeys-inmratahi03

 

प्रत्येक सिनेमाच्या कथेला, काहीतरी अजब का होईना, पण लॉजिक असतं. तसं ‘दी विंड जर्नीज’ चं ही आहे. सिरोचा, हे सगळं दाखवण्यामागे काय उद्देश्य आहे , याचा प्रेक्षकाला किंचितही अंदाज येत नाही. पडद्यावर घडणाऱ्या घटना, बराचशी सरळसोट असणारी पटकथा , लांबलचक आणि संथगतीने चालणारे प्रसंग, याचा क्वचित कंटाळा येतो. मधूनच काही रंजक गोष्टी,धक्कादायक घटना,मुख्य पात्रांकडून अगदीच अनपेक्षित असणारे संवाद किंवा कृती, हे सर्व माफक प्रमाणात घडून, परत संथगती प्रवास सुरु होतो. पण, हा प्रवास कुठेही एकसुरी होणार नाही याची दिग्दर्शक काळजी घेतो. सिरोचे सिनेमे हे खूपच खऱ्याखुऱ्या आयुष्याप्रमाणे असतात. कदाचित यामुळेच ते मनाला भिडतात. खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या अथवा घडू शकतील अशा घटना, सुंदर ध्वनी आरेखन, दिग्दर्शनाची अत्यंत अनोखी पद्धत, अप्रतिम असं पार्श्वसंगीत,एखाद्या चित्राप्रमाणे दिसणाऱ्या फ्रेम्स, उत्कृष्ट छायालेखन, कधीकधी अतिशयच संथगतीने चालणारी दृष्ये, ही त्याच्या सिनेमाची प्रमुख वैशिष्ट्ये.

 

The Wind Journeys-inmratahi01

 

प्रवासाला निघताना , कुठल्या गावाहून कुठे जायला निघायचं आहे, मार्ग कसा असेल, वेळ किती लागेल, कुठल्या वाहनाने जायचं , तिथे जाऊन काय निष्पन्न होणार ? इत्यादी मूलभूत प्रश्न गुंडाळून ठेऊन, ही आगळीवेगळी अशी ‘विंड जर्नी’ सुरु होते. अतिशय सुंदर पर्वतरांगा, डोंगरमाथा, तिथे राहायच्या वैचित्र्यपूर्ण किंवा आश्चर्यजनक अशा जागा, बर्फाळ, गवताळ प्रदेश, मधे भेटणारी चांगली-वाईट लोकं, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे हावभाव, चित्रविचित्र तऱ्हा या सगळ्याचं दर्शन ‘दी विंड जर्नीज’  घडवतो. सुरवात, शेवट आणि अंतिम परिणाम काय ? याची चौकशी अथवा विचार करत न बसता, प्रेक्षकांनी पडद्यावर दिसणाऱ्या प्रवासाचा आनंद घ्यावा, ही सिरोची अपेक्षा असावी. एक प्रवास, त्यायोगे दिसणारा मानवी भावभावनांचा कोलाज, काहीसा गूढ पण तर्कसुसंगत शेवट – अशी ‘दी विंड जर्नीज’  ची मांडणी आहे. हे सर्व आपण पाहिलं- त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा, दिग्दर्शकाचा उद्देश्य काय असावा? असे प्रश्न आपल्याला विंड जर्नी पाहिल्यावर पडतात. ‘दी विंड जर्नीज’ कान चित्रपट महोत्सवात निवडला गेला होता. कोलंबिया देशातर्फे ८२ व्या अॅकॅडमी पुरस्कार सोहळ्याकरता ‘सर्वात चांगला परकीय भाषेतला चित्रपट’ या विभागात पाठवला गेला होता. उत्तर कोलंबिया मधल्या जवळपास ऐंशी ठिकाणी याचं चित्रण केलं गेलं.

 

The-Wind-Journeys-inmratahi02

 

‘आयुष्य’ ही संकल्पना म्हणजे नक्की काय आहे? याचं उत्तर, ‘दी विंड जर्नीज’ हा चित्रपट द्यायचा प्रयत्न करतो. पडद्यावर दिसणारा प्रवास हे एकप्रकारे आयुष्याचं रूपक आहे. दिग्दर्शक सिरो ग्वेरा च्या कलाकृती आपल्याला अंतर्मुख करतात. आयुष्याचा (आपल्या आणि इतरांच्या) मागोवा घ्यायला प्रवृत्त करतात. हे चित्रपट, ‘मनुष्य’ हे वरवर साधं वाटणारं पण प्रत्यक्षात अत्यंत गुंतागुंतीचं रसायन असल्याची ग्वाही देतात. ३५ वर्षीय सिरो ग्वेराची, दिग्दर्शक म्हणून चित्रपट माध्यमावरची ताकद, त्याची समज थक्क करणारी आहे. सिरोच्या कलाकृतींची मांडणी, ‘आउट ऑफ बॉक्स’ पद्धतीची असते. अशी ही आगळीवेगळी मांडणी असणारा आणि आयुष्यावर, आपल्या प्रभावी चित्रभाषेतून भाष्य करणारा ‘द विंड जर्नीज’ जरूर अनुभवा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?