' युरोप च्या मुंबई ची डोळे दिपवणारी सफर

युरोप च्या मुंबई ची डोळे दिपवणारी सफर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

फ्रॅंकफर्ट अतिशय सुंदर शहर आहे. कोणी विश्वास ठेवणार नाही पण दुसऱ्या महायुद्धात अक्षरशः या शहराची राख झाली होती. फ्रॅंकफर्टने या महायुध्दात सगळ्यात जास्त मार खाल्ला. फ्रॅंकफर्ट म्हणजे युरोपचे मुंबईच. आर्थिक राजधानी आणि मित्र सैन्यांनी या शहराला संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. आजचे फ्रॅंकफर्ट मात्र परत त्याच दिमाखात उभे आहे आणि नुसते उभे आहे असे नाही तर आपल्याबरोबर जर्मन अर्थव्यवस्थेला घेऊन धावते आहे.

 

Frankfurt & Roma-inmarathi05

 

पार बेचिराख झालेले हे शहर फ्रॅंकफर्ट वासियांनी स्व-कष्टानी परत उभे केले. १९४४ च्या म्हणाल तर मोजून ५० इमारती शिल्लक आहेत. पण आजचे फ्रॅंकफर्ट अख्या युरोपची शान बनले आहे. शहराच्या मधोमध असलेले रेल्वे स्टेशन, त्यालाच लागून असलेला सहा पदरी रस्ता. या रस्त्यातच बस, कार, ट्राम, पादचारी आणि सायकल या सगळ्यांसाठी असलेले तराविक मार्ग. एकूण सार्वजनिक वाहतुकीमध्ये शंभर पैकी शंभर गुण जर्मन अभियंत्यांनी मिळवले आहेत. युरोपमध्ये पहिल्यांदा आयुष्यात मल्टी स्टोरी रेल्वे स्टेशन्स बघितली पण फ्रॅंकफर्टच्या स्टेशनची गोष्टच निराळी. अतिशय सहज, सोपे आणि सुंदर.

 

Frankfurt & Roma-inmarathi04

 

मध्यवर्ती चौकात काही जुन्या इमारती शिल्लक आहेत आणि त्याच्याच बाजूला आता जर्मन्स तसेच्या तसे त्या काळातले फ्रॅंकफर्ट उभे करते आहे. लाखो चौरस फुटाचे बांधकाम चालू आहे पण कुठेही वाहतुकीस अडथळा नाही. टावर चौकाची शान तर नजरबंदी व्हावी अशी. मला खरी गम्मत वाटली ती स्वच्छ रस्त्यांची. प्रचंड वाहतूक असून रस्ते स्वच्छ कसे याचे उत्तर मात्र रात्री एक वाजता मिळाले. बाहेर हलका आवाज काय होतो आहे म्हणून मी दिवा लावला आणि हॉटेलची खिडकी उघडली तर एक गाडी रस्ते स्वच्छ करत होती. मला खिडकीत बघून त्या भल्या माणसांनी माझी झोपमोड झाल्याबद्दल माझी माफी देखील मागितली.

 

Frankfurt & Roma-inmarathi03

 

मुळात जर्मन माणूस हाडाचा कष्टाळु आणि मित्र सैन्यांनी दिलेले घाव त्यांच्या मर्मी लागले. नाझीवादाचा सरळ आणि स्पष्ट शब्दात विरोध जर्मन्स आज पण करतात. कितीतरी जर्मन तरुण नाझींविरुद्ध मित्र सैन्न्यांकडून लढले आहेत. जगानी आपल्याला बेचिराख केले याचा त्यांना मनापासून राग. पण या रागाचे रुपांतर जर्मन्सनी शक्तीत केले आणि सर्व जगाला दखल घ्यावी लागेल असा देश फक्त पंचवीस वर्षात उभा करून दाखवला. जर्मन माणसाला जर्मन अभियांत्रिकीवर प्रचंड विश्वास. हा एक असा देश मी बघितला जेथे जपानी कार्स नाही तर युरोपिअन कार्स आणि त्यात ही जर्मन कार्स रस्त्यावर सगळ्यात जास्त दिसतात.

 

Frankfurt & Roma-inmarathi07

 

रोम म्हणायचे सोडून रोमा का ? कारण रोमा हेच खरे नाव आहे. आणि सर्वसाधारणपणे इटालियन लोक रोमाच वापरतात. रोम हे इंग्रजी वापरणाऱ्या लोकांनी केलंय. असो, पण रोम काय किंवा रोमा सुंदर आहे आणि इटलीनी रोमाला अगदी पोटाच्या लेकराप्रमाणे सांभाळले आहे. रोमन काळामधली सापडलेली एकूण एक वीट या लोकांनी सांभाळून ठेवली आहे. इटलीनी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याची अनेक अविस्मरणीय संग्रहालये तयार केली आणि मग जगाला आमंत्रण दिले ते त्यांचा जवळपास पाच हजार वर्षांचा इतिहास बघण्याचे. माणुस थक्क होऊन जाईल आणि आयुष्यभर रोमाला विसरणार नाही याची पुरेपूर काळजी या लोकंनी घेतली आहे. रोमाच्या लोकांना याचा अभिमान पण आहे आणि गर्व पण.

 

Frankfurt & Roma-inmarathi01

 

शहर भटकंतीला सुरवात केली ती कोलोसो पासुन. जवळपास पन्नास हजार लोकांची बसायची व्यवस्था असलेले हे पुरातन स्टेडीयम म्हणजे रोमन वास्तुशात्राच्या शिरपेचातले अमुल्य रत्नच. संपूर्ण स्टेडीयम काही शाबूत नाही पण जेवढे आहे ते याच्या भव्यतेची कल्पना करून देते. गोलाकार आकारातल्या या स्टेडीयमची भव्यता आता गेल्यावर आपल्याला थक्क सोडते. अनेक लेवेल्स वर असलेली बसण्याची व्यवस्था, सगळ्यांना बघता येईल अशी बांधणी, सरदार आणि त्यांच्या परिवारासाठी वेगळी सोय, राजासाठी असलेली मध्यवर्ती बसण्याची सोय, सगळे कसेच अतिभव्य. काळाच्या ओघात बरीच सारी पडझड झाली आहे पण मुळची भव्यता आणि अप्रतिम वास्तुकला मात्र आजही त्या काळात आपल्याला आपसूकच घेवून जाते. सांज प्रकाशी एकदा का रोषणाई सुरु झाली की कोलोसोची भव्यता अजूनच खास दिसायला लागते.

 

Frankfurt & Roma-inmarathi

 

एकंदर मी तीन वेळा गेलो कोलोसोला पण मन काही भरल नाही. कोलोसोच्या जवळच सिर्कॉसो आहे. हा रोमन काळाचा आखाडा. सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांना छळण्याचे मैदानच. खेळाची सुरुवात ख्रिस्ती लोकांना हिस्त्र जानावारांसमोर टाकून त्यांचा आक्रोश बघण्यानी व्हायची. आता इथे फक्त खंडर उरले आहे.

 

Frankfurt & Roma-inmarathi06

 

कोलोसोच्या बाजूलाच रोमन फोरम आहे. जुन्या काळच्या या वस्तीमध्ये रोमन कला, शौर्य, व्यापार फुलला. अनेक वर्ष ही जागा रोमाची मुख्य बाजारपेठ ही होती. रोमन समृद्धीची जननी असलेले रोमन फोरम मात्र आज भग्न अवस्थेत उभे आहे. खर तर काहीच उरले नाही आहे असे म्हंटले तरी चालेल पण इटलीनी याची पण जपणूक केली आहे आणि १५ युरोचे तिकीट पण लावले आहे. त्या जुन्या पुराण्या बोळीमधून फिरतांना मजा पण येते आणि त्या काळील लोकांनी उपसलेल्या कष्टांची कल्पना देखील.

 

Frankfurt & Roma-inmarathi08

 

रोमाला गेल्यावर फौनतैन दि ट्रेवी न बघणे म्हणजे बनारसला जाऊन गंगास्नान न करणे. अतिशय सुंदर असलेल्या या वास्तूची रचना निकोला सल्विनि केली आहे आणि निकोलाचे हे स्वप्न अस्तित्वात आणले ते पिएत्रो ब्राच्चीनि. २४ तास वाहणारे पाणी आणि रोज भेट देणारे हजारो लोक. असा म्हणतात की नाण फेकून जर काही मागितलं तर ती इच्छा येथे नक्की पूर्ण होते. खरेखोटे माहित नाही पण एक युरोचा कलदार फेकायची माझी काही हिम्मत झाली नाही.

 

Frankfurt & Roma-inmarathi09

 

सेंट अन्जेलो कॅसल काही भव्य नाही पण अतिशय मोक्याच्या ठिकाणी बांधला आहे. गोलाकार स्वरूप असलेल्या या इमारतीतून जे व्हटीकनचे दर्शन होते त्याला तोड नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले अनेक पुतळे त्या जमान्याच्या कलेची ग्वाही देतात. सैनिक किल्ला झाला आणि या वास्तूची पार दैना उडाली. किल्ल्याच्या छतावरून पण जे रोमाचे दर्शन होते त्याला तोड नाही.

युरोपच्या या दोन शहरात आपल्याला बेफाट शिकायला मिळते, मुद्दा फक्त इतका असेल की आपण काही शिकणार का !!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?