'“आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४

“आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : चित्त शुद्ध केले तर हे शत्रू मित्र होतील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४३

===

 

 

गेले काही दिवस ही कथा रामभट सांगत होते आणि नारायण व आबा पाटील ती मन लावून ऐकत होते. आबा पाटील मौनाचा अभ्यास करीत असल्याने काही बोलत नसे. त्याचा गुण लागून नारायणाचेही बोलणे कमी होत गेले होते, इतके की ही कथा त्याने जवळजवळ न बोलताच ऐकली होती.

तुकोबांची गाथा वर आल्याची गोष्ट ऐकल्यावर मात्र आबाचे ओठ चुरचुरू लागले. खरे तर शब्दच बाहेर पडायचा तोंडून पण आबाला भान होते, ओठ हलून थांबले. ते पाहून रामभट हसले आणि म्हणाले, “आबा, तुमचा मौनाचा अभ्यास छान झाला, आता बोला तुम्ही.”

तरी आबा बोलेना. तेव्हा रामभट म्हणाले,

“अहो, खरेच बोला आता. किती दिवस मौन चालवणार? एकेका अभ्यासाचा काही काळ असतो. मौन जीवनभर का धरून ठेवायचे आहे? आपण मौन करू शकतो, न बोलल्याशिवाय जगू शकतो हे तुम्हाला कळले आणि असे मौन केल्याने आपली एकाग्रता वाढते, आपल्याच अंतरंगात आपल्याला अधिक सहज डोकावता येते हे तुम्हाला कळले. ती साधना तुम्ही उत्तम केलीत. आता बोला. गाथा वर आली हा प्रसंग मी सांगत होतो, तो क्षण मौनाची सांगता करायला छान आहे!”

आबाने रामभटांच्या पायावर डोके ठेवले व म्हणाला,

“गुरुजी, आपन म्हनला म्यां मौन क्येलं. आता सोडा सांगताय तवा सोडतू. लय चांगलं दिस ग्येले माजे. काई बोलायचं नाय, काई इचारायचं न्हाय. शांतता हुती. मनात प्रश्नच येत नवता. पन माजा बी स्वभाव हायेच की. ह्ये गाथेचं आईकलं आन् मनात आलंच काईतरी.”

“तेच विचारा म्हणतोय मी. मनात इतकं अनावर काय आलं ते सांगून टाका.” रामभट म्हणाले.

“ह्यो गाथा वर आली, गाथा वर आली म्यां लय आईकलं. तुकोबांनी गाथा बुडवली नव्हं. मग ती वर कशी यील? वस्तु कधी वर येती का? खरं काय जालं त्ये ऐकायचं हाय.”

रामभट हसले. म्हणाले,

“काय एका प्रसंगाची क्षमता असते पाहा. त्या प्रसंगाने तुम्हाला बोलते केले! तुमचा नियमभंग करू पाहिला! वस्तू वर येत नसते, ती खालीच जाते हा नियम सामान्य आहे. तो कसा बदलेल?

नेमका काय प्रकार घडला तो कळणे कठीण आहे. मी तिथेच होतो तरी धड काही कळले नाही. ती मुले गाथा घेऊन आली आणि ओरडत होती की गाथा सापडली, गाथा वर आणली, गाथा वर आली, गाथा मिळाली…..लोकही ओरडू लागले, नाचू लागले, एकमेकाला मिठ्या मारू लागले, कुणी गजर चालू केला, टाळचिपळ्यांचा एकच नाद झाला.

नेमके काय झाले हे कळणे कुणालाच नको होते. बुडवलेली गाथा पुन्हा सापडली म्हणजे ती वर आली असेच सगळे समजले. गाथा बुडवली गेली होती हे सर्वांच्या मनात जसे ठसले होते तसेच ती वर येणे शक्यच नाही हा निश्चयही पक्का झाला होता. गाथा वर येईल असे कुणाच्या स्वप्नातही येणे शक्य नव्हते.

खरे तर, कान्होबांनी ती गाथा पुन्हा निर्माण होईल असा घाट घातला होता आणि तेरा दिवसांत बरेचसे अभंग लिहूनही झाले होते. त्या अर्थाने गाथेचा पुनर्जन्मच झाला होता. त्याचाच खरे तर सोहोळा होईल, ती गाथा पाहून तुकोबा पहिल्यासारखे होतील अशी आशा सर्वांनी धरली होती. पण घडले ते वेगळेच! मूळ गाथाच त्या मुलांनी आणून दाखविली!

आबा, अनपेक्षित वा अतर्क्य घडले की त्याला चमत्कार म्हणतात. मूळ गाथा सापडणे हा सगळे म्हणूनच चमत्कार समजतात. नेमके काय घडले हे कुणालाच ऐकायचे नसल्याने त्या गर्दीचा उत्सव झाला, कान्होबांनी तुकोबांना घरी नेले. घराघरांत गुढ्या उभारल्या गेल्या, गांव शृंगारले गेले, घरोघरी पुरणपोळ्या झाल्या. बाहेरून आलेल्या मंडळींना देहूकरांनी भोजन करून गेल्याशिवाय सोडले नाही. जे उपोषणाला बसले होते त्यांना कान्होबांनी घरी नेले आणि आवलीवहिनींनी स्वत: रांधून सर्वांना आग्रहाने जेवू घातले.

इकडे मला उत्सुकता होती की नेमके काय झाले, गाथा हाती लागलीच कशी? ती मुले कुठे गेली कुणास ठाऊक? आली तशी गेली. कान्होबांनी नंतर खूप शोधले, सापडली नाहीत. बाहेरगांवची असणार. विचारता विचारता मला कळलेली हकिगत अशी की जेव्हा तुकोबा गाथा बुडवायला वाकले तेव्हा पाण्याचा मोठा लोंढा आला आणि गाथा केवळ खालीच नव्हे तर वेगात पुढेही गेली. पुढे गेली ती पुढच्याच वळणावर एका झाडाच्या बेचक्यात अडकली. पाणी अचानक आले तसे कमीही झाले, गाथा वरच राहिली. लोकांनी खूप शोधूनही दिसली नाही पण तेराव्या दिवशी ती त्या मुलांना सापडली. हे बरेच पटते तरी हेच सत्य असे मी ही म्हणू शकत नाही.

आबा, हा प्रश्न तुम्हाला पडला तसा अनेकांना पडतो. आता सगळे म्हणतात, गाथा तरंगत तरंगत वर आली. तसे काही झाले नाही हे माहीत असूनही मी प्रतिवाद करीत नाही. होय म्हणतो. झाला तो चमत्कारच होता आणि चमत्काराची मीमांसा फार करू नये. आपले मन त्यात गुंतवू नये. त्या दिवशी आधीचा रामभट संपूर्ण संपला. ज्याचे कार्य अमर होते त्या माणसाला दैवी पुरुष म्हणतात. तुकोबा दैवी पुरुष असल्याखेरीज हे असे घडले नसते. लोकांच्या मुखांत अभंग आणि इंद्रायणीच्या कडेवर अभंग असा तो तेरा दिवसांचा सोहळा होता. मी शेवटचा दिवस पाहिला, धन्य झालो. संध्याकाळी तुकोबा कीर्तनाला उभे राहिले त्या दिवशी त्यांचे शिष्यत्व स्वीकारलेला हा रामभट त्यांच्यामागे टाळ धरून उभा असलेला सर्वांनी पाहिला.”

त्या दिवशीच्या कीर्तनाला अलोट गर्दी झाली होती. लोक केव्हाचे येऊन बसले होते. नेहेमीप्रमाणे नमन होऊन तुकोबांनी नवा अभंग सुरु केला –

थोर अन्याय म्यां केला तुझा अंत म्यां पाहिला ।
जनाचिया बोलासाठी चित्त क्षोभविले ॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन ।
झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥
अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें साकडें ।
योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥
उदकी राखिले कागद चुकविले जनवाद ।
तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥

देवा, मी माझे पाण्यात बुडविलेले कागद राखलेस आणि आपले ब्रीदही राखलेस! त्यामुळे एक मोठा जनवाद टळला. जर तू हे केले नसतेस तर तुलाच उणेपणा आला असता!

पण मला वाईट वाटते की त्यासाठी मी तुझा अंत पाहिला. तुझ्यावर अन्यायच केला. लोक काही म्हणतात म्हणून मी माझे चित्त क्षोभविले आणि तुला मोठे कोडे घालून सोडवायला लावले. त्यासाठी उपोषण करून मी तुला तहानभुकेचे सांकडे घातले. डोळे बंद करून तेरा दिवस उगी राहिलो.

हे असे करून मी अधम आहे हेच सिद्ध केले. माझ्या भाग्यात तू आहेस त्याचे सुख मी अधम असल्यानेच भोगले.

नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी ।
तो म्यां केला हरीं एवढा तुम्हां आकांत ॥
बांटिलासी दोही ठायीं मजपाशीं आणि डोहीं ।
लागों दिला नाही येथे तेथे आघात ॥
जीव घेती मायबापे थोड्या अन्यायाच्या कोपे ।
हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥
तुका ह्मणे कृपावंता तुज ऐसा नाही दाता ।
काय वाणूं आतां वाणी माझी कुंठली ॥

वास्तविक देवा, माझ्या काही जिवावर बेतले नव्हते. माझ्या मानेवर सुरी चालविण्यास कोणीही आले नव्हते किंवा पाठीवर घांव पडतोय अशीही परिस्थिती नव्हती तरी मी तुझ्यासमोर केवढा आकांत मांडला!

तुलाही माझे किती पाहावे लागले! इकडे माझी आणि तिकडे डोहात कागदांची तू काळजी केलीस. आणि खरेच, दोन्हीकडील रक्षण असे केलेस की काही आघात झाल्याची खूणही राहू नये!

अशी कुणी चूक केली तर संतापाच्या भराने त्याचे आईबापही ती सहन करीत नसतात. तू सहन केलेस ते सोपे नव्हे, जो सहन करील तोच ते जाणू शकेल, दुसरा नाही.

देवा, तू कृपावंत आहेस आणि मोठा दाताही आहेस. तुझे गुणवर्णन आता मी काय करणार ? कसे करणार ? माझी वाचाच आता खुंटली आहे!

त्या दिवशीच्या कीर्तनात पांडुरंगाचे आभार मानता मानता तुकोबा असे स्वतःलाच खूप कठोर बोलले. कीर्तन फार काळ झाले नाही. सगळेच दमले होते. कीर्तन आटोपले तशी तुकोबांच्या दर्शनाला रांग लागली आणि बऱ्याच वेळाने मंदिर रिते झाले.

तुकोबांच्या मागे हात बांधून, मान खाली घालून रामभट उभे होते. तुकोबांनी त्यांना जवळ घेतले व विचारले, “रामराया, जेवलात का आज?” रामभटांनी खाली घातलेली मान वर केली नाही की हलवली नाही. आज देहू गावात उपाशी राहिलेला हा एकमेव मनुष्य असावा.

त्यांना घेऊन तुकोबा घरी आले व जेवण वाढण्यास सांगितले. आवलीबाईंना आश्चर्य झाले. एक ब्राह्मण आपल्या घरी जेवायला आणला? तुकोबांनी सांगितले, “आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत.”

आवलीबाईंनी चुलीवर तवा टाकला, समोर पाने मांडली आणि पहिली पुरणपोळी रामभटाच्या पानात वाढली. तिचा पहिला घास तुकोबांनी भटाला भरविला आणि त्याला पूर्ण आपला करून टाकला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?