' "उरी" घाव - मस्तकी बलुचिस्तान

“उरी” घाव – मस्तकी बलुचिस्तान

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

उरीमधील लष्करी छावणीवरील हल्ल्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर बघू शकलो नसलो तरी त्याचा घाव उरात खोलवर घुसला आहे.

भारतीय सैन्यावरील गेल्या २६ वर्षांतील सर्वात भयानक हल्ल्यात २०हून अधिक जवान हौतात्म्य पत्करतात आणि त्यातील ३ वीरपुत्र आपल्या महाराष्ट्राचे असतात. चारही अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घातले असले तरी झालेले नुकसान त्यातून भरून निघणार नाही. यावेळी एक गोष्टं वेगळी जाणवली ती म्हणजे इंटरनेटवरील भाजपा समर्थकांनीही सरकारच्या, त्यातही गृहमंत्री राजनाथ सिंह, रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि या सगळ्यांचे कॅप्टन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हात आखडता न घेता समाज माध्यमांतून अत्यंत बोचरी टीका केली आहे.

आजवर फक्त विरोधक नरेंद्र मोदींच्या ५६ इंची छातीची खिल्ली उडवायचे पण आता भक्तदेखील “कुठे गेली ती ५६ इंची छाती?” असा सवाल करू लागले आहेत. सरकारसाठी हा धोक्याचा इशारा आहे. सरकारं बदलली तरी कोणीही यावे, टपली मारून जावे ही आपली परिस्थिती काही सुधारत नाही.

 

modi-uri-marathipizza

हल्ल्याची जखम एकवेळ परवडली पण हल्ल्यानंतर राजकीय नेत्यांची आणि टीव्ही पत्रकारांची तोंड पाटिलकी बघून तळपायाची आग मस्तकात जाते. “हल्यांना जबाबदार असलेल्यांना शिक्षा केल्याशिवार रहाणार नाही”… “एक दात पाडला तर बत्तिशी तोडू”…”पाकिस्तानला जगात एकटं पाडू” अशा राजकीय नेत्यांच्या वल्गना; नाहीतर अमेरिकेने, फ्रान्सने, ब्रिटनने किंवा संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी हल्ल्यांचा निषेध केला म्हणजे पाकिस्तानला जशी काही शिक्षाच झाली असा टीव्हीवरील आंतरराष्ट्रीय तज्ञांनी सूर लावणे यातील तोचतोचपणाला लोक विटले आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये किंवा पाकिस्तानच्या आंतर्गत भागात – या हल्ल्यांना जबाबदार व्यक्तींविरूद्ध सूडाने कारवाई केली तरी त्याची काही उघडपणे जाहिरात करता येत नसल्याने, त्याबद्दल छाती बडवून काय साध्य होणार आहे?

आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, असा हल्ला झाल्यानंतर भारताकडून सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करण्यात येते. सीमेपलिकडून होणाऱ्या तोफा आणि गोळीबाराला तितक्याच तीव्रतेने उत्तर देण्यात येते. पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि सचिव तसेच अन्य महत्त्वाच्या मंत्र्यांचे पाक दौरे किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांतील पाकिस्तानी नेत्यांशी बैठका रद्द करण्यात येतात. क्रिकेटचे सामने – जर होणार असतील तर – स्थगित करण्यात येतात, पाकिस्तानी नागरिकांसाठी विसाचे नियम अधिक कडक करण्यात येतात. अशा रितीने काही महिने उलटले; लोकांचा राग सौम्य झाला की, पुन्हा या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि सुरू राहतात पुढील हल्ल्या होईस्तोवर.
पाकिस्तान, आयएसआय आणि त्यांनी पोसलेले विविध दहशतवादी गट “दुष्ट” आहेत असे जरी गृहित धरले तरी या हल्ल्यांमागचे प्रयोजन काय होते याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

हा हल्ला जम्मू-काश्मीर धुमसत ठेवण्याच्या विस्तृत योजनेचा भाग आहे हा तर्क पटण्यासारखा असला तरी – उरी हल्याच्या मागे काश्मीरपेक्षा बलुचिस्तान फॅक्टर अधिक जबाबदार आहे.

१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा ओझरता उल्लेख केल्याबरोबर १६ ऑगस्टला श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. तीनच दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर भारत महत्त्वाच्या बलुच नेत्यांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यात असल्याची बातमी प्रसारित झाली. असे झाल्यास १९५०चुआ दशकात दलाई लामांसह तिबेटी शरणार्थ्यांना दिलेल्या राजकीय आश्रयानंतरची अशा प्रकारची ही सगळ्यात मोठी घटना ठरणार आहे. पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीरपेक्षा बलुचिस्तान, गिलगिट आणि बाल्टिस्तान अधिक संवेदनशील विषय आहेत हे स्पष्ट होते. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आजवर राखलेले मौन तोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा विषय काढला हे अत्यंत योग्य केले.

पण बलुचिस्तानबाबत आपली रणनीती काय आहे? बलुचिस्तानचा विषय आपण फक्त पाकिस्तानला चिथवायलाच काढणार आहोत का प्रत्यक्ष जमिनीवर काही कृती देखील करणार आहोत? जर कृती करणार असू तर त्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानकडून लष्करावर किंवा नागरी ठिकाणांवर होऊ शकणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी आपण सज्ज आहोत का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

kashmir_marathi-pizza

बलुचिस्तानबाबत कृती म्हणजे काही तेथील स्वातंत्र्य सैनिकांना तसेच जनतेला पाकविरूद्ध सशस्र्र बंडाळीसाठी आर्थिक तसेच लष्करी मदत करणे असा त्याचा अर्थ होत नाही. भारतीय गुप्तचर यंत्रणा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर जे काही करत असतील ते वगळता लोकनियुक्त सरकारने उघडपणे किंवा परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून बलुचिस्तान किंवा अन्यत्र कुठेही सशस्त्र बंडाळीला पाठिंबा द्यावा असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण शांततामय मार्गाने आणि पाकिस्तान व चीनला पोटशूळ उठेल या हेतुनेही अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्यात बलुचिस्तान आणि पाकिस्तानमधील अन्य वादग्रस्त प्रांतातील संस्कृतीचे भारतीय संस्कृतीशी साधर्म्य असणारे कार्यक्रम करणे, अशा कार्यकर्त्यांना विविध परिषदांचे निमंत्रण पाठवणे, संयुक्त राष्ट्रांत अशा भागात होणाऱ्या मानवाधिकारांच्या हननाबद्दल ठोस भूमिका घेणे अशा अनेक गोष्टी करता येतील. कदाचित सरकारमधील धुरिणांच्या मनात ते असेलही. पण सरकारवरील लोकांचा ढासळता विश्वास पाहता याबाबत अधिक स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे.

बलुचिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्तानला चिमटे काढताना प्रत्येक चिमट्याच्या बदल्यात पाकिस्तान थप्पड मारण्याचा प्रयत्न करेल. ती थप्पड बसल्यावर दोन थपडा मारायच्या धमक्या देण्यापेक्षा पाकिस्तानकडून येणारी प्रत्येक थप्पड कशाप्रकारे चुकवता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. दुर्दैवाने याबाबत आपण कमी पडतो. असे करण्यासाठी रक्षा मंत्रालय (सैन्यदलं), गृह विभाग (पोलिस, सीमा सुरक्षा दलं तसेच अन्य राखीव दलं), परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय (जिथून बलुचिस्तानबाबत आपली भूमिका स्पष्ट होणार आहे) यांच्यात अधिक चांगला ताळमेळ हवा. त्याचप्रमाणे सर्व सशस्त्रदलाच्या आधुनिकीकरणाकडे आणि ती अधिकाधिक फूल-प्रूफ कशी होतील याकडे लक्ष द्यायला हवे.

दुर्दैवाने याबाबतीत आपल्याला दहशतवादाला बळी पडलेल्या जगातील इतर देशांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

पंतप्रधान मोदींकडून तसेच रक्षा मंत्र्यांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारला सत्तेवर येऊन अडीच वर्षं झाली आहेत. युपीए १च्या काळात झाले त्याप्रमाणे देशात विविध भागात नित्यनियमाने होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यात सरकारला यश आले असले तरी सीमा भागात ज्या सहजतेने पाक-पुरस्कृत दहशतवादी हल्ले करतात ते पाहता, सरकारच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उरी हल्याचा बदला घेताना, सरकार थंड डोक्याने विचार करून कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या नाहीत तरी फारसे नुकसान होणार नाही. पण उरी हल्ल्यासारख्या हल्यांचे प्रयत्न भविष्यात निष्फळ ठरले नाहीत तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम होतील. सरकारला हा निर्वाणीचा इशारा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?