'"उरी"वरील हल्ला : आपण ह्यातून कधी शिकणार?

“उरी”वरील हल्ला : आपण ह्यातून कधी शिकणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“आम्ही उरीच्या संरक्षणाची तेवढी व्यवस्था केली व आमच्यावर आक्रमण करण्याचे काम शत्रूकडे देऊन टाकले…” हे 1947-48 साली कश्मीरात लढणाऱ्या, भारतीय सैन्याचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या Military operations in J&K पुस्तकातील ‘To Uri, but not on to Domel’ या प्रकरणात  लिहलंय.

उरीच्या संरक्षणासाठी उरीच्या पलीकडचा  काही भाग ताब्यात ठेवणे अत्यावश्यक होते. परंतु तो तेव्हा घेऊ देण्यात आलेला नसल्यामुळेच उरी येथे आपण नेहमी बचावात्मक पावित्र्यात तर राहतोच त्याचबरोबर उरीला सतत आक्रमकाच्या छाये खालीही रहावे लागते. इथून पाकिस्तानी सीमा फक्त 46 मैल दूर असल्यामुळे हे शहर पाकिस्तानी सैन्य किंवा दहशतवादी यांच्यासाठी सोपे व अतिशय सुलभ लक्ष्य आहे. इथे झालेला थोडासाही गलथानपणा आपल्याला परवडणारा नाही अन्यथा त्याची किती मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते याची कल्पना उरीवरील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैन्याच्या संख्येवरून सहज लक्षात येईल.

uri-map_marathi-pizza

27 वर्षे झाली कश्मीरात दहशवाद सुरू होऊन, पण यापूर्वी कधीही  एवढ्या मोठ्या संख्येत भारतीय जवान हुतात्मा झालेले नाहीत यावरून स्थितीची गंभिरता आपल्या लक्षात यायला हरकत नाही. काश्मिरी जनतेचा विश्वास जिंकणं किती आवश्यक आहे, हे ह्या निमित्ताने समजून घ्यायला यावं. तुम्ही बंदूक, गोळी यांनी लोकांना आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडू शकणार नाहीत. यासाठी तुम्हाला चर्चा किंवा प्रेम याचाच आधार घ्यावा लागेल. गोळ्यांनी जखमेवर तात्पुरती मलमपट्टी जरूर होते पण त्याचबरोबर जखम चिघळतही जाते. आपण त्यांच्या राजकीय समस्या address करण्यासाठी जितका उशीर करू तितके ते आपल्यालाच त्रासदायक ठरणार आहे. येणारी प्रत्येक पिढी ही तिच्या आधीच्या पिढीपेक्षा तुलनेने अधिक कट्टर होत जाणार आहे. हे होणे रोखायचे असेल तर तुम्हाला राजकीय प्रक्रिया सुरू करावी लागेल. सैन्याच्या बळावर तुम्ही एका मोठ्या जनसमुहास फार काळ दबावाखाली ठेवून घेऊ शकत नाहीत. ही वास्तविकता इथल्या राष्ट्रवाद्यांनी आधी समजून घेतली पाहिजे.

uri-attack_marathi-pizza
कश्मीरात भुगोल तर आपल्याला अनुकूल नाहीच तसेच लोकसंख्याही नाही. कश्मीर घाटीचे तोंड पाकिस्तानी बाजूला उघडते. स्वातंत्र्य मिळण्याआगोदर कश्मीरात जाणारे सर्व रस्ते हे आताच्या पाकिस्तानातून जात असत. सध्याच्या गुरूदासपुर जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याचा भाग आपल्याला मिळाला म्हणून आपला कश्मीरशी जमीनीद्वारे संपर्क प्रस्थापित होऊ शकला होता – हा इतिहास आहे. एखाद्या भागावर अधिकार वा ताबा राखायच असेल तर तेथील इतिहास, भुगोल,लोकसंख्या ही आपल्याला अनुकूल असावी लागते – यातील एखादाही घटक आपल्या विरोधात असेल तर कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. इथे तर दोन घटक आपल्याला प्रतिकूल आहेत…!

कश्मीरात आपण जमीनीवरील ताब्याबरोबरच धार्मिक लढाई ही लढत आहोत. हिंदू आणि इस्लाम यांच्यातील बफर झोन म्हणूनही कश्मीरचा उल्लेख करता येईलच. पश्चिमेकडून येणाऱ्या दहशतवाद नामक इस्लामी धोक्याला भारताच्या मुख्य भुमीपर्यंत येण्यापूर्वीच रोखण्यासाठी आपल्याला कश्मीरवर अपला ताबा कुठल्याही परिस्थितीत राखावाच लागेल. कश्मीरात चाललेल्या या लढाईत या धार्मिक किनाऱ्यानेही परिस्थिती बिकट बनवलेली आहे. तिथे भारत पराभूत झाला तर उर्वरित भारतातील इस्लामी मुलतत्ववादी शक्ती पर एकदा डोके वर काढून देशाची अखंडता धोक्यात आणू शकतात.त्यामुळेच कश्मीरात भारतीय ताबा हा असलाच पाहिजे. भारतीय मुख्यभुमीच्या संरक्षणासाठी हे जरूरीच ठरते.

kashmir_marathi-pizza

तसे तर कश्मीरबाबतीत सर्वपक्षांचे एकच मत आहे पण या मुद्यावर राजकारण करायला मात्र कुणीही मागे नाही . कश्मीरात अशांतता संपणार नाही याची या कोडग्यांना चांगली कल्पना असूनही विरोधात असताना हे विनाकारण लोकांच्या भावना भडकवत असतात. कश्मीर व पाकिस्तान यांच्या बाबतीत काहीही करण्यापूर्वी बऱ्याचशा व्यावहारिक व राजकीय मर्यादा असतात याची कल्पना असूनही आपले राजकीय पक्ष राजकीय फायद्यासाठी पाकिस्तान व कश्मीरी विरोधातील द्वेषाला व रागाला जाणीवपूर्वक हवा देत असतात. यामुळे एखादा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान बाबतीत भारत सरकार समोर छवीविषयी संकट निर्माण होत असते. उरीवरील हल्यांनंतर आलेल्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर ह्या मुद्याची साक्ष पटेल. विरोधात असताना केलेल्या बेताल बडबडीमुळेच मग कुठलाही हल्ला झाला की सत्य समोर येण्याआधीच तो पाकिस्ताननेच केलाय असे लोक समजू लागतातच, पण त्याचबरोबर सरकारला व त्याच्या संबंधित जबाबदार संस्थांयांनाही आपला गलथानपणा या सबबीआड दडवता येतो. याचमुळे आपले सरकारही मग ते सद्य असो किंवा पूर्वीचे – बऱ्याचदा झाला हल्ला की त्याची जबाबदारी पाकिस्तानवर टाकून आपल्याला जबाबदार मुक्त करताना दिसते. याचा अर्थ पाकिस्तान यासाठी जबाबदार नाही असे सिद्ध करणे नसून – आपण या होणारच म्हणून माहिती असलेल्या हल्ल्यां बाबतीत कितपत तयारीत असतो – हे जाणून घेणे असा आहे.

“सुरक्षा संस्थांना शंभर पैकी शंभर वेळा यश मिळवायचे असते तर दहशतवादी यांना फक्त एकदाच” असे म्हणतात. आपण कितीही सजग राहिलो तरी हल्ले थांबणारच नाहीत पण या सजगतेमुळे आपण त्यांना कमीतकमी हानी करणारे किंवा निष्क्रिय मात्र जरूर बनवू शकू.

युद्धाचे बकवास हाकारे देऊन मतलब नाहीच. युद्ध हा काही या समस्येवरील उपाय नाहीच. तसेच सरकारने दोन्हीकडील उथळ बडबडीच्या दबावात येण्याची गरजही नाही. पाकिस्तानला त्याच्या स्वतःच्या लोकांनकडूनच पराभूत करणे हेच आपले धोरण असले पाहिजे. बलुचिस्तान, कराची व खैबर येथे असे अनेक पाकिस्तानी आहेत जे आपल्याला या कामी मदत करू शकतात. जेव्हा तुम्ही अघोषीत युद्ध लढता तेव्हा हानी तर होणारच असते त्यामुळे लगेचच विचलित होऊन जाऊन “असंयमी” होण्याची गरज नाही. हानी सहन करण्याची सहनशिलता आपण अंगी बाणवली पाहिजे.

अर्थात, आजच्या या उन्मादात हे कुणालाही पटणार नाही.

Image Source : Fast-Mateo , Quora.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?