'तेजस एक्स्प्रेस: नथीपेक्षा मोती जड!

तेजस एक्स्प्रेस: नथीपेक्षा मोती जड!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यापासून रेल्वेत बरेच नवीन बदल झाले. काही मूलभूत सेवा सुधारणा तर काही नवीन ट्रेन्स असे या बदलांचे स्वरूप होते. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या महामना, हमसफर इत्यादि नवीन ट्रेन्सच्या मांदियाळीतले एक नाव म्हणजे मुंबई- करमळी तेजस एक्स्प्रेस होय. ट्रेनबद्दल यापूर्वीही मी लिहिलं होतं पण प्रत्यक्षात प्रवासाचा योग काही आला नव्हता. नुकताच या ट्रेनने प्रवास केला; माझं वस्तुनिष्ठ निरीक्षण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.

पिवळ्या धमक रंगात रंगलेली तेजस दिमाखदार आहे. पावसाळी वेळापत्रकात करमळीहून सकाळी नऊ वाजता सुटणारी ही गाडी बऱ्याचदा अर्धा तास उशिराने सुटत असल्याचे कळले. मी प्रवास केला तेव्हाही गाडीने करमळी स्थानक ९.३० ला सोडले. प्रत्येक आसनावर टाईम्स ऑफ इंडियाचा अंक स्वागतासाठी हजर होता. मात्र बहुतेकांनी एकतर त्याकडे दुर्लक्ष केले किंवा नंतर चक्क खाण्याच्या गोष्टी मांडण्यासाठी वापर केला. मुळात टीव्ही स्क्रीनसारखे मनोरंजनाचे साधन असताना पेपर कोण वाचणार? हा साधा विचार रेल्वे प्रशासनाच्या मनात येवू नये हे दुर्दैव आहे.

tejas-express-Inmarathi

 

या गाडीचे स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादींची प्रसारमाध्यमांत पूर्वीपासून चर्चा होतीच. मात्र सुविधांचा विचार करता; सामान ठेवण्यास प्रशस्त जागा ही एक जमेची बाजू आहे. सामानाच्या बर्थलाच हुक्सदेखील दिलेले असल्यामुळे बॅगपॅक्स, पिशव्या यांच्यासाठी बरीच जागा मिळते. 3 X 2 ची आसनव्यवस्था असल्याने गँगवेमध्येही जनशताब्दीच्या तुलनेत बरीच जागा आहे. मात्र जी गोष्ट पेपरच्या बाबतीत आहे तीच इथे विमानाच्या धर्तीवर दिलेल्या ‘reading light’s बद्दलही आहे. या लाईट्सचा वापर कोणीही करत नाही; आणि सीटसाठी तर हा दिवा पूर्णतः निरुपयोगी आहे.

tejas express reality-inmarathi04

मनोरंजनासाठी प्रत्येक आसनांमागे बसवलेल्या स्क्रीन हा अत्यंत यशस्वी प्रयोग ठरेल. मात्र त्यांतील चित्रपट, गाणी इत्यादींमध्ये बरेच पर्याय द्यायला हवेत. कोकणाबद्दल, भारतीय रेल्वेबद्दल तयार केलेले व्हिडीओ हे मराठीसहच इंग्लिश भाषेतही घालणे गरजेचे आहे. तेजसमध्ये WiFi ची सोय आहे असे सांगितले जात असले तरी ते अर्धसत्य आहे. ही सोय केवळ एक्झिक्युटिव्ह क्लाससाठीच आहे; तीदेखील धड सुरू नाही असे काही सहप्रवाशांनी सांगितले. ट्रेनमध्ये बायोटॉयलेट्स आहेत. मात्र त्यातील कित्येक टॉयलेट्स ब्लॉक होती. ही बाब ट्रेनच्या सफाई कामगारांच्या लक्षात आणून द्यावी लागते हे दुर्दैव आहे. आठवड्यातून केवळ तीन दिवस एका बाजूने चालणाऱ्या गाडीकडे हे अक्षम्य दुर्लक्ष आहे. गाडीतील टॉयलेट्सची व एकंदरच स्वच्छता ही असमाधानकारक असून सुधारणेला बराच वाव आहे.

 

खाण्यापिण्याच्या बाबतीत या ट्रेनला बऱ्यापैकी समाधानकारक म्हणता येईल. सकाळचा नाश्ता म्हणून मफिन, ब्रेड बटर, कटलेट, चहा आणि जूसचा टेट्रापॅक मिळतो. जेवणापूर्वी टॉमेटो सूप तर शाकाहारी जेवणात एक भाजी, चार चपात्या आणि दाल राईस, सोलकढी असा मेन्यू होता. संध्याकाळच्या चहासोबत बिस्कीट पुडा आणि फरसाण होते. गिरनारचे चहा पाऊच हे रेल्वेत एरव्ही मिळणाऱ्या चहापेक्षा नक्कीच चांगले आहेत. रत्नागिरीतल्या स्थानिक उत्पादकांकडून घेतली जाणारी सोलकढीदेखील उत्तम होती. मात्र ज्यूस आणि सोलकढी या गोष्टी थंड तर दूर; चक्क गरम असल्याने त्यांची मजा लुटता आली नाही हा भाग निराळा. या संपूर्ण खाण्यासाठी मिळून सहाशे रुपये मोजावे लागतात. ही किंमत घटवणे शक्य आहे.

tejas express reality-inmarathi03

 

आता काही महत्त्वाचे मुद्दे; मुंबई- गोवा मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून तेजसची जाहिरात करण्यात आली. हे अंतर केवळ आठ तासांत कापले जाईल अशी केलेली घोषणा सत्यात उतरवण्यासाठी ही ट्रेन मडगावपर्यंत न सोडता त्या अलीकडे करमळीपर्यंतच धावते. थोड्क्यात; बारा तासांचे अंतर आठ तासांत पार करण्यात येत नसून ही एक भूलथाप आहे.

इतर गाड्यांचा वेळ वाढतो तो करमळी, वेरणा आणि माजोर्डा या स्टेशन्सवर सायडिंगला लागल्यामुळे. यावर शक्कल लढवत करमळीपुढे गाडीच न्यायची नाही हा टोप्या घालण्याचा प्रकार आहे. त्यातही प्रत्यक्षात; काही अपवाद वगळता ही गाडी पाऊस नसतानाही प्रवास पूर्ण करण्यास जवळपास दहा तास वेळ घेत आहे. मुळात हा उशीर का होतो; याचे कारण कोकण रेल्वेचा बहुतांश भाग हा एकाच ट्रॅकवर आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे हे आवश्यक असून ते पूर्ण झाल्यावर तेजससारखी गाडी चालवली असती तर अशा थापा माराव्या लागल्या नसत्या. पण लक्षात कोण घेतो?

करमळी हे पणजीपासून जवळ आहे. मात्र आडरस्त्यावर असल्याने तिथे पोहचण्यास पर्याय सहजी उपलब्ध नाहीत. अशा स्थानकापासून सुरू होत असल्याने बहुतेक पर्यटक अगदीच नाईलाज असेल तरच या ट्रेनचा पर्याय निवडतात. मडगाव- करमळी हे अंतर २० किमीहून अधिक असल्याने दक्षिण गोव्यातले पर्यटक वा रहिवासी यांना ही गाडी मुळीच सोयीची नाही. त्यातच गाडीचे तिकीट तुलनेत महाग आहे. अर्थात; सुविधा हव्या तर भाडे वाढणार हे योग्यच असले तरी त्यावर पुनर्विचार गरजेचा आहे. थोडे नियोजन केल्यास कॉस्ट कटिंग करणे सहज शक्य आहे. तसे झाल्यास व मडगावपर्यंत गाडी नेल्यास अधिक प्रवासी या गाडीने प्रवास करू शकतील.

tejas express reality-inmarathi02

सध्या तरी ही गाडी जेमतेम एक चतुर्थांशच भरते आहे. ही गाडी कोकण रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात भर घालेल अशी अपेक्षा होती; सध्या तरी आठवड्यातून तीनच फेऱ्या असूनही ही गाडी कोकण रेल्वेला आर्थिक फटका देत आहे. नवीन वेळापत्रकानुसार गाडी रोज धावू लागल्यावर या तोट्यात भर पडण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वीही मुंबई गोवा डबलडेकर ट्रेनमुळे असाच फटका कोकण रेल्वेने खाल्ला आहे. तरीही पुन्हा तीच चूक केली जाते याला कारणीभूत चुकीची धोरणे, दिखावा की बाबू लोकांची मनमानी? हा अनुत्तरित प्रश्न आहे.

tejas express reality-inmarathi04

एकंदर आढावा घेता; तेजस एक्स्प्रेस देखणी आहे. मात्र प्राथमिकता आणि उपयोगिता या मूलभूत तत्वांचा विसर पडल्याने नथीपेक्षा मोती जड झाला आहे. ज्याप्रमाणे आधी गाजावाजा करून सुरू केलेली डबलडेकर नंतर तोटा परवडत नसल्याने वेगळ्या स्वरूपात आणि कमी फेऱ्या ठेवून चालवण्याची जी तडजोड कोकण रेल्वेला करावी लागली ती तेजस एक्स्प्रेसच्या बाबतही करावी लागू नये ही सदिच्छा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?