' रोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास – InMarathi

रोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

इन्कम टॅक्स अर्थात आयकर! आपण जे काही उत्पन्न कमावतो त्यावर प्रशासनातर्फे आकाराला जाणारा हा कर होय. इन्कम टॅक्स भरणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची महत्त्वाची जबाबदारी असते, कारण त्यातून मिळणारा पैसा हा देशाच्याच भल्यासाठी वापरला जातो. पण काय ओ, तुम्हाला माहित आहे का इन्कम टॅक्सची सुरुवात कशी झाली? नाही माहित? चला तर आज ह्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया…

इतिहासात जर आपण इन्कमटॅक्सचा मागोवा घेत गेलो तर आपण थेट पोहोचतो प्राचीन काळात. इन्कम टॅक्सचा उगम हा प्राचीन काळातील आहे.

रोमन आणि इजिप्तशियन संस्कृतीमध्ये त्याकाळी कर आकारणी ही एखाद्याची संपत्ती किती आणि तो कशी जीवनशैली जगतो त्यानुसार केली जायची. उदाहरणार्थ, रोम मध्ये श्रीमंतांना त्यांच्या संपत्तीच्या १% कर द्यावा लागायचा, तोच कर युद्धकाळात ३% पर्यंत वाढवला जायचा. ज्याच्याकडे जेवढे जास्त गुलाम, पैसा, प्राणी, वैयक्तिक मालमत्ता, आणि स्थावर मालमत्ता असायची तेवढे त्या व्यक्तीला जास्त श्रीमंत म्हटले जायचे.

 

tax-inmarathi01
i.pinimg.com

आधुनिक काळातील इन्कम टॅक्सची सुरुवात १७९८ साली युनायटेड किंगडम मध्ये झाली.

इन्कम टॅक्स आकारण्याचा मुख्य उद्देश होता राष्ट्राच्या अर्थसंकल्पाला हातभार लावणे.

तत्कालीन प्रधानमंत्री विल्यम पिट जुनियर यांनी फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ढासळलेला आर्थिक पाया सुधारणेच्या हेतूने कर आकारण्याची गरज बोलून दाखवली. त्यानुसार असा आदेश काढण्यात आला की, कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांकडून २० पेन्स (त्या काळातील चलन) आणि श्रीमंत गटातील व्यक्तींकडून त्यांच्या उत्पन्नाच्या २० टक्के कर आकारण्यात येईल. पण ही कर प्रणाली १७९९ ते १८०२ अशी केवळ ३ वर्षेच टिकली. पुन्हा १८०३ साली तत्कालीन प्रधानमंत्री हेन्री हॅडिंगटन यांनी युनायटेड किंगडम मध्ये नव्याने करप्रणाली राबवण्याची घोषणा केली. पण ही नवीन करप्रणाली देखील वाटेरलुच्या युद्धानंतर संपुष्टात आली. हे ते ऐतिहासिक युद्ध होय ज्यात जगजेत्त्या नेपोलीयनला पराभव स्वीकारावा लागला होता.

म्हणजेच १७ व्या आणि १८ व्या शतकात जे काही इन्कम टॅक्स आकारले गेले ते युद्धकाळात देशाची आर्थिक व्यवस्था ढासळू नये म्हणून. २६ वर्षानंतर मात्र तत्कालीन प्रधानमंत्री सर रॉबर्ट यांनी पुन्हा एकदा नवी करप्रणाली रचण्याचा घाट घातला. पण ह्यावेळेस मात्र देशाच्या विकासासाठी लागणारा अधिकचा खर्च भरून काढण्यासाठी किमान १५० युरो कामावणाऱ्या प्रत्येक नागरीकाला इन्कम टॅक्स भरण्याची सक्ती करण्यात आली. तेव्हा पासून आजपर्यंत युनायटेड किंगडम मध्ये इन्कम टॅक्स प्रणाली सुरु आहे.

 

tax-marathipizza02
nytimes.com

मग पुढे इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करत होते तेव्हा १८६० साली जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स लादला. पण इन्कम टॅक्सचा हा कायदा १८६५ साली बंद पाडण्यात आला आणि १८८६ मध्ये इन्कम टॅक्सचे नवे रूप भारतातील नागरिकांसमोर सादर करण्यात आले. पुढे काही बदल करून भारतीय आयकर कायदा १९२२ साली इंग्रजांनी अंमलात आणला, जो भारत स्वतंत्र झाल्यानंतरही १९६१ सालापर्यंत वापरात होता. १९६१ च्या एप्रिल महिन्यात इंग्रजांचा हा आयकर कायदा रद्द करून भारताचा नवा आयकर कायदा अस्तित्वात आणण्यासाठी लोकसभेमध्ये इन्कम टॅक्सचे विधेयक सादर करण्यात आले. १३ सप्टेंबर १९६१ रोजी ह्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि अश्याप्रकारे भारतीय संविधानाच्या आधारावर निर्माण झालेला इन्कम टॅक्स कायदा भारतात रूढ झाला.

 

tax-marathipizza03
jansatta.com

आज जगभरातील तब्बल २६ कोटी लोक न चुकता इन्कम टॅक्स भरतात. अनेक देशांच्या सरकारांसाठी इन्कम टॅक्स हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. तर जगात असेही काही देश आहेत जे आपल्या नागरिकांकडून अजिबात इन्कम टॅक्स आकारात नाहीत. उदा. सौदी अरेबिया, कुवेत, कतार इत्यादी! कारण त्यांचा राज्यकारभार तेलविक्रीतून चालतो!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?