' पांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२ – InMarathi

पांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : आपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

 

इकडे रामभटांना वेगळे, ठरवून असे उपोषण करावे लागले नाही. ते आपोआपच घडले. गोविंदभट येऊन गेल्यावर रामभटाने ज्ञानोबांचा धावा आरंभिला खरा पण शरीर आणि मन खचायचे थांबेना. अंगाचा दाह वाढत चालला. गोविंदभटांनी तुकोबांना ज्ञानदेवांच्या पंक्तीत नेऊन बसविले होते. ते आठवून आठवून रामभटाला सुधरेनासे झाले. इतक्या उच्च कोटीच्या पुरुषास आपण बोलावणे धाडले हीच आपली पहिली चूक झाली ह्याबद्दल त्यांना आता शंका उरली नाही.
चटकन उठून देहूस जावे असे कितींदा मनात येऊन गेले. पण देहूहून येणाऱ्या वार्ता घाबरवणाऱ्या होत्या. वास्तविक, देहूत गर्दी वाढत चालली असली तरी रामभटाचे नांवही कुणी घेत नव्हता. सुरुवातीस काही चर्चा झाली पण कान्होबांनी तो विषय अतिशय कौशल्याने हाताळल्याने तुकोबांनी गाथा बुडविली आणि ती आता आपल्याला लवकरात लवकर पुन्हा उभी करायची आहे हेच सर्वदूर झाले. ठिकठिकाणहून लोक येऊ लागले, दिवसभर कीर्तने होऊ लागली आणि अनेक अभंग जमा होत होत वह्या भरू लागल्या.

सुरुवातीचे पांच दिवस तुकोबांनी निद्रा केली त्या काळजीत गेले आणि आता तर त्यांनी उपोषणच आरंभले. त्यांना कोण समजावणार? कान्होबांना तर ते ह्या विषयावर बोलूच देत नव्हते. काशीबाई एकदा येऊन थयथयाट करून केली. तो प्रयत्न वायां गेला. असेच किती आले आणि किती गेले, तुकोबांचा निश्चय ढळे ना.

असे होता होता बारा दिवस गेल्यावर दिवस उतरून सांजवात झाली तसा आवलीबाईंनी मनाशी काही निश्चय केला आणि त्या तुकोबांजवळ जाऊन बसल्या.
म्हणाल्या,

आता मी काय बोलू? आपण सर्वांनाच टाकलेत. मी म्हणते, कवित्व करणे हेच आपले कार्य ना? मग असे काय करावे बरे? बारा दिवस संपले, नदीवर सगळे जमलेत. किती लांबून लांबून लोक आलेत. त्यांचा काय बरे दोष? त्यांनी काय करावे? किती दिवस तुमची वाट पहावी? आपणच म्हणता ना –

 

 

मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥

म्या तो पसरिला हात । करी आपुलें उचित ॥

आह्मी घ्यावें नाम । तुह्मां समाधान काम ॥

तुका ह्मणे देवराजा । वाद खंडी तुझा माझा ॥

यांत जे गाऱ्हाणे आपण पांडुरंगाला घातलेत तेच ही आपली मंडळी त्यांच्या पांडुरंगाला मनातल्या मनात घालीत आहेत. आपणच त्यांचे पांडुरंग आहा. म्हणून समजा की ते आपल्याच जणू म्हणत आहेत,

आम्ही याचक आहो, तुम्ही दाता आहात. काय सत्य ते तुम्हीच जाणावे. आम्ही आपल्यासमोर हात पसरला आहे आता काय उचित असेल ते तुम्हीच करावे. आमचा भरवंसा आपल्यावर, म्हणून आम्ही आपले नाम घेतो. आता तुमचे काम इतकेच की आमचे समाधान करावे.

मी म्हणते की,

हे तुमचे भक्त काही तुमच्याशी वाद करीत नाहीत, परंतु आपण समजावे की तुम्हां उभयतांमधील हे अंतर दुसरा कोण नष्ट करू शकेल? त्यांनी नदीकिनाऱ्यावर बारा बारा दिवस थांबावे आणि आपल्या देवाचे ओझे आपल्या अंगावर घ्यावे हे बरें का?

आवलीबाई अशा भक्तांच्या बाजूने बोलत असता तुकोबा तितकेच शांत होते. ते पाहून आवलीबाई पुढे म्हणाल्या,

मला आपले आणि आपल्या भक्तांचे हे हाल बघवत नाहीत. माझी खात्री आहे, पांडुरंग आपला अंकीत आहे, तो आपल्या मनी असेल ते करीलच. पण ह्या भक्तांच्या पांडुरंगानेही त्यांच्यासाठी काही केले पाहिजे. आपण उपोषण करावे, भक्तांनी उपोषण करावे असे कुठवर चालावे?

आपलेच शब्द घेऊन म्हणते-

जोडोनिया कर । उभी राहिलें समोर ॥

हें चि माझे भांडवल । जाणे कारण विठ्ठल ॥

भाकितों करूणा । आतां नुपेक्षावें दीना ॥

आवडी ह्मणे डोई । ठेवीं वेळोवेळां पायी ॥

आणि असे ह्मणत आवलीबाईंनी खरेच, नदीवर जमलेल्या जनताजनार्दनासाठी आपल्या पतीच्या पायीं डोई ठेविली!
मात्र, त्याक्षणी जगाची आई झालेली ती आवली त्या देहामासांच्या पांडुरंगाला पाझर काही फोडू शकली नाही. पतीचे चरण तिने आपल्या अश्रूंनी भिजविले, ते त्याला म्हणा की जाणवलेच नाहीत. स्फुंदत स्फुंदत, तोंडाला पदर लावलेल्या त्या तुकोबांच्या खोलीबाहेर आल्या तेव्हा तिथे कान्होबा उभे होते. झाला प्रकार त्यांनी वहिनींकडे पाहून ताडला व ते म्हणाले,

वहिनी, आता काय करायचे हो?

 

वाट पाहायची. देहातला पांडुरंग जागा होत नाही तर तो दगडाचा काय होणार? लोक म्हणतात, हे ज्ञानोबांचे अवतार आहेत. तसे असेल तर मी त्यांची बायको नव्हे तर बहीण असायला हवी होते.

मग ती म्हणाली तसे मला म्हणता आले असते –

योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥

विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥

शब्द शस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ॥

विश्वपट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

वरी भगवा झाला नामे । अंतरी वश्य केला कामे ॥

त्याला म्हणू नये साधू । जगी विटंबना बाधू ॥

आप आपणा शोधूनि घ्यावे । विवेक नांदे त्यांच्यासवे ॥

आशादंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

शुद्ध ज्याचा भाव झाला । दूरी नाही देव त्याला ॥

अवघी साधने हातवटी । मोले मिळत नाही हाटी ॥

अहो आपण तैसे व्हावे । अवघे अनुमानुनि घ्यावे ॥

ऐसे केले सद्गुरूनाथे । बापरखुमादेवी कांते ॥

तेथे कोणी शिकवावे । सार साधुनिया घ्यावे ॥

लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्दल ठायीच्या ठायी ॥

तुम्ही तरून विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

 

हे ऐकून मात्र आंत तुकोबांच्या मनात खळबळ माजली व ते उठून बाहेर आले,

 

“आई, तू सांगशील तसे करतो! आता अजून बोलू नका!!”

 

एक क्षण हे ऐकून आवलीबाईंना मोठा धक्का बसला पण त्या सावरल्या व पुढच्याच क्षणी म्हणाल्या,

 

“उदईक सकाळी आपण नदीवर जावे, लोकांना दर्शन द्यावे, त्यांचे काही सांत्वन करावे आणि ते आपापल्या घरी जातील असे पाहावे. त्यांची किती कामे खोळंबली असतील? त्यांना मोकळे करावे. बाकी काही म्हणत नाही मी.”

 

“बरे माय, तसेच करीन.”

तुकोबा इतके म्हणून परत आपल्या खोलीत जात आहेत तोच ती काशीबाई हातात एक दिवा धरून एका स्त्रीला घेऊन घरात शिरली. ती स्त्री म्हणजे रामभटाची पत्नी होती! आपल्या नवऱ्याची असहाय अवस्था पाहून आधी तिने गोविंदभटास पाचारण केले होते. ज्ञानोबांचा धावा कर असे सांगून गोविंदभट गेले त्याचा उचित परिणाम झाला होता. काल ज्ञानोबा रामभटांच्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मनात कोणताही किंतु न धरता तुकोबांस शरण जावे असा उपदेश रामभटास केला होता. रामभटांनी यायची तयारीही केली होती परंतु, अंगचा दाह आणि अन्नपाणी नसल्याने पाय लटपटू लागलेले. अशा स्थितीत त्यांनी तुकोबांस एक पत्र लिहिले व एक विद्यार्थी सवे देऊन आपल्या पत्नीस काशीबाईकडे धाडले. आता अंधार झाला होता तरी काशीबाई तिला घेऊन म्हणूनच तुकोबांच्या घरी आली होती.

आवलीबाईंनी त्या दोघींस बाहेर बसविले, विचारपूस केली व आत जाऊन तुकोबांस त्या दोघी आल्याचे सांगितले. रामभटाची पत्नी येथवर आली हे ऐकताच तुकोबा बाहेर आले. त्यांना पाहताच रामभटाच्या पत्नीने त्यांच्या पायावर लोळणच घेतली व आपल्या पतीस वाचवा, त्यांची चूक झाली वगैरे बोलून रामभटांचे पत्र तुकोबांच्या हाती दिले. तुकोबा वाचू लागले –

जय जय श्री तुकोबाराया । माझा दंडवत घालाया ।

पातली असे निजभार्या । आपुले चरणी ॥

अपराध खास झाला । जंव विवेक माझा हरपला ।

ह्मणौनी आपणांस मी नोळखिला । पाहतां क्षणी ॥

आपण तो शांतमूर्ती । पुरवाया विश्वाची आर्ती ।

अवतरला इये जगती । निश्चयेकरूनी ॥

परंतु हे कोणा कळावे । विद्वानां कसे उमगावे ।

अवतारा कुणी जाणावे ॥ ज्ञानोबांच्या ॥

असो माझी चूक झाली । गोविंदभटे विस्तारूनी कथिली ।

ज्ञानोबांची करूणा भाकिली । तये उपदेशे ॥

आठां दिशीं स्वप्नामाजी । येऊनिया माझे काजी ।

बोलिले झणी त्यजी । अभिमान सकळ ॥

त्वरित जावे शरण । तुकयासी भावे अनन्य ।

धरावे तयाचे चरण । क्षमेकरितां ॥

 

ह्मणौनी हे ऐसे लिहितसे । काही मजप्रति करावे ऐसे ।

जेणे करूनी शमेल जे । देहमनताप ॥

उचित तो मी चि तेथ येणे । आपुले चरणकमल धरणे ।

आपणांसी स्वये विनवणे । प्रायश्चित्तार्थ ॥

परि हा देह चि पहा अडला । पाऊल ना पुढे टाकिता जाहला ।

मनासंगे अवघा भंगला । रामभट हा ॥

तरी आता करावी कृपा । विनवितो माझ्या बापा ।

शिष्य जैसा मज मापा । आजपासौनी ॥

माझी चूक झाली, गोविंदभटांमुळे मला कळली, ज्ञानोबांचे ऐकून आपल्यापाशी आलो, आता मला शिष्य म्हणून स्वीकारा, मजवर कृपा करा ही रामभटाची विनंती तुकोबांपर्यंत पोहोचली.

रामभटांच्या पत्नीस ते इतकेच म्हणाले,

“ज्ञानोबांना का त्रास दिलात हो?”

इतके म्हणून त्यांनी कान्होबांस आत बोलाविले व रामभटास उत्तर लिहिले –

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥

विष तें अमृत आघात ते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥

दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥

आवडेल जीवां जीवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥

तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणिजेते येणें अनुभवे ॥

 

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?