आपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : तुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

गोविंदभट पंक्तीस असल्याने रामभट जरा मन लावून जेवले. शेवटी कुणीतरी आपले मन जाणणारा भेटल्याशिवाय मन हलके होत नाही हेच खरे. माझी दुःखे मीच वाहीन हा दुराभिमान प्रत्येकाला असतो आणि प्रत्येकाला तो नडतो. बोलल्याने दुःख संताप प्रत्येक वेळी कमी होत नसले तरी वाहते होतात आणि सुखदुःखांचे नवे प्रवाह त्यास येऊन मिळू लागतात. असे न झाले, तर मन आणि बुद्धी कशी कुंठीत होतात याचा अनुभव रामभट गेले काही दिवस घेत होते.
भोजन होऊन जराशी वामकुक्षी झाली आणि गोविंदभट म्हणाले,

ह्या ज्ञानोबांच्या ओव्या बघ.

 

जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें ।

मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया ॥

तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती ।

देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥

येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें ।

तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥

ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।

कां परापेक्षा अळंकार । व्यक्ति कनकीं ॥

तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।

जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटळ ॥

तैसें आदीचि जें नाहीं । तयालागी तूं रुदसि कायी ।

तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥

जयाची आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत ।

जयालागीं विरक्त । वनवासिये ॥

दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।

मुनीश्वर तपातें आचरताती ॥

एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ ।

विसरले सकळ । संसारजात ॥

एकां गुणानुवाद करितां । उपरति होऊनि चित्ता ।

निरवधि तल्लीनता । निरंतर ॥

एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले ।

एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥

जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत ।

परी माघौते न समात । परतले नाहीं ॥

तैसिया योगेश्वरांचिया मती । मिळणीं सवे एकवटती ।

परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥

सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।

तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥

रामभट पुढे म्हणाले,

ह्या ओव्यांचा अर्थ मी सांगत बसत नाही, तू बुद्धिमान आहेस, तुला सहज कळेल. आता तुकारामाचे दोन तीन अभंग ऐकवितो म्हणजे ज्ञानोबांनी जो आशय सांगितला तोच तुकारामाने आपल्या पद्धतीने कसा व्यक्त केला ते तुझ्या लक्षात येईल.

 

अज्ञान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥
ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरी पाहिली ज्ञानज्योती ॥
तुका ह्मणे चित्त स्वरूपीं राहिलें । देह विसावले तुझ्या पायीं ॥
पय दधि धृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥
कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥
मृत्तिकेचे घट जाले नानापरी । मृत्तिका अवधारी एकपणें ॥
तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥

 

रामा, हा सारा अद्वैत वेदान्त आहे रे! आणि तुझ्यापासून काही कोसांवर राहणारा तुकाराम नावाचा नवा साधुपुरूष तो सांगतो आहे. कल्पना करवत नाही की अशी वाणी प्रसविणारी त्याची साधना किती असेल? तो स्वतःला आलेले अनुभवही सांगतो. त्याची एक रचना ऐक. तुकारामाने स्वतःची सांगितलेली ही कहाणी आहे. यातील त्याची कहाणी तर तू ऐकच पण प्राकृत आणि संस्कृत दोहोंवरील त्याचा अधिकारही पाहा.

 

प्रवृत्तीनिवृतीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥
ज्ञानाग्नीहुताशीं कडशिले बोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥
ब्रह्मीं ब्रह्मरस शीघ्र जाला पाक । घेतला रूचक प्रतीतीमुखें ॥
स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥
अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगे ॥

 

रामा, गोविंदभट विस्तारून सांगू लागले, हा तुकाराम म्हणतो, ह्या देहाचा बोजा मी आत्मसिद्धीच्या कार्यार्थ लावला. त्या यज्ञातील होमासाठी ज्ञानाचा अग्नी प्रज्ज्वलित केला आणि स्वतःस अक्षरशः कढवून काढले. अशा प्रयत्नांमुळे माझे अंतर्बाह्य एक झाले. माझ्या सर्व वृत्तींचा पाक बनला आणि ब्रह्मात ब्रह्मरस मिसळला. तो पाक रूचकर होता हे मी माझ्या मुखानेच त्याची प्रतीती घेतली म्हणून सांगतो. ह्या स्वतःचा शोध घेण्याच्या प्रयोगात प्रवृतीमार्ग की निवृत्तीमार्ग हा वाद नष्ट झाला आणि विचार शुद्ध चांगला झाला, जसे म्हणा की एक रसायनच. असे झाल्याने तुकारामाची अष्टांगे आरोग्य पावली आणि तो आत्मरंगी रंगता जाहला! रामा, ज्ञानोबांना काही आपण पाहिले नाही पण आपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे!

हे सारे ऐकून रामभटांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. झाल्या प्रसंगाचा विषय मुख्य होता. ते कारण होते. पण त्याने आता शारीरिक स्वास्थ्यही बिघडले होते. मनाचा रोग शरीराचा झाला होता. गोविंदभट गेल्यावर अंगाचा दाह वाढणार होता कारण, तो कमी व्हायला कोणत्याही वैद्याकडे उत्तर असणार नव्हते आणि सामाजिक विषय पेलणार नव्हता. रामभटाची ही मनस्थिती लक्षात येऊन गोविंदभट थोडावेळ शांत बसले. तेव्हा रामभटाने विचारले,

आता ह्या साऱ्यातून मी बाहेर कसा पडू?

गोविंदभट म्हणाले,

सोडी अभिमान । करी आठवण । जाऊनी शरण । ज्ञानोबांसी ॥
तो चिं एक गुरु । करील तुज पारु । सहजी हा सागरु । भवभ्रमाचा ॥
काय मी करावे । कैसे मी वागावे । कैसे हे निस्तरावे । पूस तयांसी ॥
ना मी लाजेन । सांगितले करीन । ऐसे विनवून । पुन्हा पुन्हा ॥
करावी प्रतिक्षा । न सोडिता आशा । तोडेन ह्या पाशा । मनी ह्मणावे ॥

असे विविध प्रकारे बोलून गोविंदभटांनी रामभटांची समजूत घालायचा प्रयत्न केला. आणि शेवटी म्हणाले,

आता खूप उशीर झाला, मला निघायला हवे.

रामभटाने व त्यांच्या पत्नीने गोविंदभटांस नारळ दक्षिणा देऊन नमस्कार केला व आपली पडशी घेऊन गोविंदभट मार्गस्थ झाले.

रामभट पुन्हा एकाकी झाले. त्यांचा चेहेरा बघून त्यांच्या पत्नीने म्हटले,

आता विश्रांती करावी व मनोमन गोविंदबुवा म्हणाले तशी ज्ञानोबांची करूणा भाकावी. ज्येष्ठांचे शब्द वायां जायचे नाहीत.

रामभटांनी आपली खोली धरली व गोविंदभटाचे सांगणे ऐकण्यासाठी त्यांनी ज्ञानोबांचा धावा आरंभला.

धांव धांव ज्ञानराया । पोळतसे माझी काया ॥
काय झाला अपराध । जीवनासी आला बाध ॥
काय सांगसी उपाय । जो निवारील हे भय ॥
सर्वथा मी आचरीन । देतो तुजसी हे वचन ॥

******

तिकडे देहूत असाच काहींसा धावा कान्होबांनी तुकोबांचा चालविला होता. ती आर्त हांक केवळ एका बंधुची नव्हती. तो बंधु पांडुरंगाचा नव्हे तर आपल्यास सर्वार्थाने ज्येष्ठ अशा तुकारामाचा भक्त होता, शिष्यही होता. आणि आता तर तो तुकोबांच्या सर्व भक्तांचा प्रतिनिधीही होता. त्याची हांक त्याच्या देवार्यंत पोहोचणार नाही असे होणार नव्हते – त्यामुळेच – गेले पांच दिवस निद्रा केलेल्या तुकोबांनी डोळे उघडले की!

कान्होबांनी मोठ्याने हांक मारली,

वहिनी….वहिनी….आधी देवापुढे साखर ठेवा….

कान्होबांना आनंदाचे भरते आले. पण त्यांनी स्वतःस सावरले आणि तुकोबांना उठवून बसविले. तितक्यांत दुधाचा पेला घेऊन कान्होबांच्या वहिनीबाई आल्या, सारे घर जमले. तुकोबांनी दुधाचा पेला बाजूस ठेवला व विचारले,

काय चालू आहे?

कान्होबांनी थोडक्यात सारी हकीगत सांगितली. जेथे आपण वह्या बुडविल्या तेथे मोठी गर्दी अजूनही जमलेली असून गाथा पुन्हा तयार होते आहे हे ऐकून तुकोबांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. आपण ह्या जनता जनार्दनाला कष्ट दिले असे वाटून त्यांच्या मनास वेदना होऊ लागल्या.

ते कान्होबांना म्हणाले,

काय हे लोकांचे प्रेम, याचा उतराई मी कसा होणार? माझी काळजी करण्यास आता मी समर्थ नाही. ह्या जगात पांडुरंग आहे ह्यावर माझा दृढ विश्वास आहे. त्यानेच आता मला पुढचा मार्ग दाखवावा. जोपर्यंत त्याच्याकडून काही खूण येत नाही तोवर मी हे आसन सोडणार नाही. अन्नपाणी ग्रहण करणार नाही. तुम्हीही मला तसा आग्रह करू नका. हे जे मी बोललो त्यात बदल होणे नाही!

दीर्घनिद्रेतून तुकोबा उठले ही वार्ता चहूंकडे वेळ तो कितीसा लागणार? नदीवरची गर्दी मोठा गजर करीत तुकोबांच्या घरी येऊ लागली तेव्हा कान्होबांनी तुकोबांना भिंतीस टेकून बसविले व आपण गर्दीस सामोरे गेले. युक्तीने सर्वांस पुनश्च नदीकिनारी घेऊन गेले. कान्होबांना पाहून पुन्हा मोठा गजर उठला –

जय जय रामकृष्ण हरि । रामकृष्णहरि । पंढरीनाथ महाराज की जय । ज्ञानराज माऊली की जय ॥

कान्होबांनी सर्व घटना सविस्तर सांगितली व समजाविले की,

सर्वांच्या भावना एकत्र झाल्यानेच अर्धे संकट टळले आहे. तेव्हा आपले प्रयत्न चालूच ठेवू, गाथा लिहून पूर्ण करू आणि पुढे जे होईल त्याचा कर्ताकरविता पांडुरंग असल्याचे जाणून शांतता पाळू.

हे सारे ऐकून तेथे काही क्षण खरेच मोठी शांतता पसरली. तुकोबांनी गाथा बुडवून आधी स्वतःचे जीवनच पणाला लावले होते. आता तर त्यांनी जीवही पणाला लावला आहे. हे ध्यानी घेऊन एक वारकरी उभा राहिला व म्हणाला,

ते तुकोबा आहेत आन् आम्ही त्यांचे भक्त आहो. त्यांची सर आम्हाला यायची नाही. ते उपोषणास बसले म्हणून त्यांच्यासंग आम्हीही बसू हे काही खरं नाही. पण मी म्हणतो, मी उपोषण सुरु करतो, जमेल तेवढा काळ करीन. मग माझ्या जागी दुसऱ्याने बसावे.

सर्वांना ही कल्पना पटली, आवडली आणि देहू गावात इंद्रायणीच्या काठावर एका चक्री उपोषणाची सुरुवात झाली!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?