' दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके फोडण्याची खरंच गरज असते का? वाचाच… – InMarathi

दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके फोडण्याची खरंच गरज असते का? वाचाच…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दोन दिवसांपासून सगळीकडचे वातावरणच बदलून गेले आहे, सर्व काही सध्या झगमगीत झाले आहे. बाजारामध्ये नवीन कपडे घेण्यासाठी लोकांची रेलचेल दिसून येत आहे, कारण आता दिवाळी आली आहे.

दिवाळी हा हिंदू धर्मातील लोकांचा खूप जवळचा सण आहे. गणेशोत्सवानंतर जर हिंदू धर्मातील लोक कोणत्या सणाची वाट पाहत असतील, तो सण म्हणजे दिवाळी.

दिवाळी हा सण लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच जवळचा आहे. एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे, एकमेकांच्या घरी फराळ खाण्यासाठी जाणे, नवीन कपडे घेणे हे सर्व आपण दिवाळीमध्ये करतो.

या दिवाळीच्या चार ते पाच दिवसांमध्ये लोकांमध्ये फार उत्साह दिसून येतो. यंदा सुद्धा कोरोनाचा धोका असूनही लोकांचा उत्साह फारसा कमी झालेला दिसत नाही.

 

Diwali-faraal03-marathipizza

 

 

या दिवाळीत अजून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे फटाके वाजवण्याचा. माननीय मुख्यमंत्र्यांनी यंदा फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

हे आवाहन योग्यच आहे. कारण कुठल्याही दिवाळीत फटाके फोडण्याने फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसानच सहन करावे लागते.

फटाके फोडताना लहान मुलांबरोबर झालेल्या अपघाताच्या बातम्या आपण गेल्या काही वर्षामध्ये खूप ऐकल्या आहेत. तसेच, हे फटाके प्रदूषण करण्यासाठी देखील तेवढेच कारणीभूत असतात.

काहींना तर या फटाक्यांमुळे कायमचे अंधत्व आले आहे आणि त्यांचे संपूर्ण जीवन अंधारमय झाले आहे.

दिवाळीचा आणि फटाक्यांचा तसे म्हणायला गेलो, तर काही जवळचा संबंध नाही. फटाके हे फक्त दिवाळीतच फोडले जातात असे देखील नाही.

कुठल्याही आनंदाच्या क्षणी आपला आनंद दर्शवण्यासाठी लोक फटाके फोडतात. पण असे केल्याने दुसऱ्यांना त्याचा किती त्रास होतो, याचा आपण कधीही विचार करत नाही.

 

 

diwali02-marathipizza

 

फटाके बनविण्यासाठी कोळसे, गंधक व बंदुकीच्या दारूचे मिश्रण वापरून फटाक्यांची निर्मिती सुरु झाली. त्यानंतर त्यात सुधारणा होऊन बांबूमध्ये बंदुकीची दारू भरून फटाके निर्मित केली गेली. हे मिश्रण फोडल्याने मोठा आवाज होत असे.

चीनमध्ये असा एक समज आहे की, भूतांना आणि मनातील वाईट विचारांना घालविण्यासाठी तसेच त्यांना दूर ठेवण्यासाठी नवीन वर्षांच्या संध्याकाळी फटाके फोडले जावेत.

दिवाळी म्हणजे फटाके आणि आवाज हे एक समीकरणच झाले आहे. मोठमोठया फटाक्यांच्या माळा, सुतळीबॉम्ब फोडणे म्हणजे अनेक सणा-उत्सवांचे, आनंद व्यक्त करण्याचे, जल्लोष करण्याचा स्टेटस सिम्बॉलच झाले आहे.

तेव्हाचे फटाके आणि आताचे फटाके यात थोडासा बदल झाला असेल. पण त्यात काही सुधारणा करून अधिक रंगीत, आकर्षक आणि कमी धुराचे आणि प्रदूषण मुक्त फटाके तयार करत असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.

पण फटाके फोडल्यानंतर फटाक्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेतून विषारी धूर आणि कानठळ्या बसण्याइतका आवाज बाहेर पडतोच ना, हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे.

 

 

crackers inmarathi

 

या फटाक्यांमुळे लोकांच्या सुरक्षिततेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते. वायू प्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण करून सण साजरा करण्यामध्ये काय मज्जा आहे, हेच मुळी समजत नाही.

फटक्याने पैश्यांचा चुराडा तर होतोच, पण वायू आणि ध्वनीप्रदूषणाने बऱ्याच समस्या निर्माण होत आहेत. फटाक्याच्या आवाजाने प्राणी-पक्षी घाबरतात सैरावैरा पळत सुटतात त्यात त्यांना अपघात होण्याची शक्यता असते.

तसेच घाबरण्याने हृदयाची धडधड वाढून पक्षाघात होण्याची शक्यता बळावते. त्यांच्या शरीरांतर्गत बरेच बदल होऊन त्यांची जननक्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते याने एखाद्या पक्षाची जात नष्ट होण्याच्या पातळीवर येऊ शकते.

दिवाळीमध्ये फटाके लावले नाहीत, तर ती साजरी करताच येणार नाही, असे तर नाही ना. या फटाक्यांच्या आवाजाने लहान मुले झोपेमध्ये दचकतात.

फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मनुष्याला शारीरिक आणि मानसिक विकार होण्याची खूप भीती असते. यंदा तर कोरोना  संसर्गाचा धोका असल्यामुळे, ही समस्या अधिक गंभीर आहे.

फटाक्यांच्या या आवाजामुळे पूल, घरे, इमारती यांसारख्या निर्जीव वस्तू देखील हादरतात. एखाद्या माणसाच्या एकदम जवळ फटका फुटल्यास त्याला बहिरेपणा येऊ शकतो. लहान मुलांना या फटाक्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो.

 

diwali-inmarathi

 

 

दिवाळी सण एकत्र येऊन नातेसंबंध वाढवण्याचा सण आहे, कोणतेही वायूप्रदूषण किंवा ध्वनीप्रदूषण करण्याचा सण नाही आहे. आपण फटाके फोडून स्वत: आनंद व्यक्त करू शकतो.

पण तोच दुसऱ्या व्यक्तीचा, पक्षांचा, लहान बाळांचा, जेष्ठ नागरिकांचा, आजारी माणसांचा आनंद हिरावून घेऊन पापाचे धनी होतो हे विसरतो.

आपण सर्व एकत्र यावे, यासाठी या सणाची निर्मिती केली आहे. पण असे फटाके फोडून जर आपण दुसऱ्यांच्या जीवाशी खेळलो, तर ते योग्य ठरेल का?

त्यामुळे या फटाक्यांवर हजारो रुपये घालण्यापेक्षा त्याच्यातील काही रुपये समाज कल्याणासाठी वापरा, ज्यामुळे जे गरजू लोक आहेत त्यांची दिवाळी देखील चांगली जाईल.

चला मग आजपासून निश्चय करा की, ही आणि याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दिवाळीमध्ये आम्ही फटाके वाजवून प्रदूषण करणार नाही, तर सर्व एकत्रित येऊन बंधुभाव वाढवून फराळाची मज्जा घेत दिवाळी साजरी करू आणि इतरांची मदत करू.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?