नांदेडचा निकाल – भाजपची एवढ्यात उलटी गिनती?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक: विकास वाघमारे

===

मोदींचा लाटरुपी अश्व नांदेडात पहिल्यांदा रोखला अशोक चव्हाणांनी आणि आता महानगरपालिकेच्या निमित्तानेही पुन्हा अशोक चव्हाणांनीच. नांदेडमधील कॉंग्रेसचा नेता महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना स्थानिक महानगरपालिका हातात ठेवण्याची इच्छाशक्ती हि वाखाणण्याजोगी आहे. लोकशाहीने दिलेला कौल सगळ्यांनाच मान्य करावा लागेल मात्र विजय, पीछेहाट याची चर्चा होणं महत्वाचं वाटतं.

अशोक चव्हाण हे नेतृत्व या लाटेला थांबवण्यात आजच्या घडीला सक्सेसफुल झालं. मात्र “लगीन लोकाचं अन नाचतंय येड्या डोक्याचं” अशी परिस्थिती शिवसेनेच्या अनेक कार्यकर्ते अन जबाबदार नेत्यांनी निर्माण केली आहे. खरंतर हा विजय केवळ अशोक चव्हाणांचा आहे आणि हार हि केवळ शिवसेनेची आहे.

 

Ashok-Chavhan-marathipizza

एकेकाळी नांदेडचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारा जिल्हा आणि आणि आजही ९ पैकी ४ आमदार शिवसेनचे असणारा जिल्हा अशी ओळख आणि एवढेच नाही तर एकेकाळी हीच आजची कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती हे विसरून चालणार नाही. गेल्या निवडणुकीचा आलेख आणि आजचा आलेख तटस्थपणे पाहणं आणि त्यावर विचारमंथन करणं हि आगामी वाटचालीसाठी गरजेचं आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत १५ जागा शिवसेनेला, २ जागा भाजपाला, ४१ जागा कॉंग्रेसला, ११ जागा MIM अशी स्थिती होती आणि आजची स्थिती मात्र मुळातून परिवर्तन आणि काही प्रमाणात बदलही आहे. १५ जागांवरून थेट १ जागा मिळणं हे कोणत्या विजयाचं लक्षण आहे हेच कळत नाहीय. त्याउलट २ जागेवरून भाजपाने ६ जागांवर कब्जा केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि MIMचा सुफडा साफ करण्यात अशोक चव्हाण यशस्वी झाले.

गेल्या तीन – चार वर्षात कॉंग्रेसची धोबीपछाड करणाऱ्या भाजपाला जनतेने दुसऱ्या क्रमांकावर ठेवले. कॉंग्रेसने ८१ पैकी ७३ जागा मिळवल्या हा विजय पंजाचा नाही तर अशोक चव्हाणांचे नेतृत्व आणि त्यावर असलेला विश्वास कारणीभूत आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि प्रादेशिक स्तरावरही कॉंग्रेस सातत्याने आपले किल्ले गमावत गेले आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे कर्तृत्व आणि दुबळ नेतृत्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाणांनी महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे नेतृत्व म्हणून आपली खुर्ची मजबूत केली आहे. आता हे नेतृत्व कॉंग्रेसने राष्ट्रीय स्तरावर पेश करावं अशी मागणीही जनतेतून समोर येत आहे. हे कितपत प्रत्यक्षात उतरेल हा येणारा काळच ठरवेल. आपले विरोधक कशा पद्धतीने संपवावे हे अशोकरावांकडून शिकण्यासारखं आहे. समस्त कॉंग्रेसियांना हा विजय तरतरी आणणारा आणि मरगळ झटकवणारा आहे.

 

nanded-result-congress-poster-marathipizza

 

मात्र राज्यात सत्तेत राहून भाजपाला पाण्यात पाहणाऱ्या शिवसेनेला मात्र आपली दांडी पार उडून गायब झाल्याचे किंचितही दुखः दिसत नाही. नवरा मेला तरी चालेल मात्र सवत विधवा झाली पाहिजे हेच सुरु आहे.

भाजपाचा धुव्वा उडाला यातच जल्लोष करण्यात शिवसेना मश्गुल आहे. एकेकाळचा आपला गड आणि त्यात आपलेच पानिपत कसे? हे कुणी लक्षात घ्यायला तयारच नाही.

साहेबांच्या धोरणाच्या आशेवर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र कॉंग्रेसचा विजय हाच आमचा विजय म्हणून गोड मानून घेतले. वास्तविक नांदेडमधून राष्ट्रावादी कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही हे नक्कीच महत्वपूर्ण आहे. एवढ्यातच भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याची चर्चा कार्यकर्ते करताहेत. मात्र उलटी गिनती सुरु झाली म्हणताना दोन दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले अपार यश विसरून चालणार नाही. मोदी लाट ओसरली की कॉंग्रेसला अच्छे दिन आले याचे उत्तर येणारा काळ देईलच.

फक्त एवढ्यातच उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग होऊ नये हीच अपेक्षा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?