' मॉडेल्सना ही लाजवेल असं सौंदर्य असणाऱ्या ह्या ७ स्त्रियांचं कार्यक्षेत्र मात्र अगदीच वेगळं आहे… – InMarathi

मॉडेल्सना ही लाजवेल असं सौंदर्य असणाऱ्या ह्या ७ स्त्रियांचं कार्यक्षेत्र मात्र अगदीच वेगळं आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जगभरामध्ये आपल्याला विविध राजकारणी पाहायला मिळतात. राजकारणामध्ये बुद्धीमत्तेबरोबरच अनुभव असणे देखील खूप गरजेचे आहे.

जेवढा राजकारणातील अनुभव जास्त, तेवढेच राजकारणाचे डावपेच खेळणे सोप्पे जाते असे म्हणतात. सर्वांना आपलेसे करुन आपले काम करून घेणे, याच अनुभवातून माणूस शिकतो.

पण हा राजकारणातील अनुभव मिळेपर्यंत लोकांचे वय सरते, त्यामुळे आपल्याला राजकारणामध्ये तरूण पिढी जास्त दिसून येत नाही. राजकारणात मोठमोठ्या पदांवर बसलेले लोक हे जास्तकरून वृद्धच असतात.

राजकारणात स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त दिसून येतात, कारण स्त्रियांचे राजकारणामध्ये काहीच काम नाही असे त्यांना वाटते.

तरीदेखील त्यांना न जुमानता काही स्त्रिया राजकारणात यशस्वीपूर्ण घोडदौड करत आहेत.

आज आम्ही तुम्हाला जगभरातील अश्या राजकारणी स्त्रियांबद्दल सांगणार आहोत, ज्या तरुण तर आहेतच…पण दिसायला इतक्या सुंदर आणि ग्लॅमरस आहेत की, त्यांच्यासमोर अभिनेत्री आणि मॉडेल देखील फिक्या पडतील.

चला तर पाहूया या राजकारणी स्त्रिया नक्की कोण आहेत आणि त्यांनी आतापर्यंत त्यांनी काय केले आहे..

१. ल्युसियाना लिऑन (Luciana Leon) – पेरू

 

Luciana inmarathi

सौंदर्याचा किंवा ग्लॅमरचा राजकारणातील यशात किती वाटा आहे, हा वादाचा मुद्दा ठरू शकेल.

परंतु, पेरू देशातील संसद सदस्या असलेल्या ल्युसियाना लिऑन यांना आतापर्यंतची सर्वांत ग्लॅमरस आणि सुंदर राजकारणी महिला असं निर्विवादपणे म्हटलं जातं.

ल्युसियाना ही एका राजकारणात कार्यरत असलेल्या कुटुंबातली मुलगी. ती उच्चशिक्षितही आहे.

लिमा विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि सॅन मार्टिन दे पोरेस या विद्यापीठातून तिने मास्टर ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी ही पदवीही घेतली आहे.

ल्युसियना वयाच्या ३१ व्या वर्षी पेरूच्या संसदेत निवडून आली आणि पेरूवियन संसदेतील सर्वांत तरूण सदस्य ठरली. ती पेरूचे प्रसिद्ध नेता रोमोलु लिऑनची मुलगी आहे.

तिचा जन्म ३० जून १९७८ रोजी झाला आणि तिचे सध्याचे वय ३९ वर्ष आहे.

२. अँजेला गेरेकोउ (Angela Garekou )– ग्रीस

 

Angela Garekou InMarathi

ग्रीसच्या अँजेला गेरे कोऊ हिची कारकीर्द एक यशस्वी फिल्म अभिनेत्री म्हणून सुरू होती. आयोनियन समुद्रातील कोर्फू बेटांवरची ही सुंदरी १९८० च्या दशकात रुपेरी पडद्यावर आली.

अभिनेत्री म्हणून तिने फार काळ काम केले नाही. तिने रोममध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर ती राजकारणात आली.

सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयात तिने सहाय्यक मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आणि तिची जन्मभूमी असलेल्या कोर्फू आयलंडची ती खासदारही झाली.

अँजेलाने स्वत: मनोरंजनाचे क्षेत्र सोडून दिले असले, तरी तिने त्याच क्षेत्रातील जोडीदार पसंत केला आहे. ग्रीक अॅक्टर आणि गायक टोलिस वोस्कोपोलस हा तिचा पती आहे.

तिचा जन्म १५ एप्रिल १९५९ मध्ये झाला, तिचे सध्याचे वय ५८ वर्ष आहे.

३. बेलिडां स्ट्रोनाच (Belinda Stronach ) – कॅनडा

 

Belinda-Stronach Inmarathi

कॅनेडियन पोलिटिशयन बेलिडां स्ट्रोनाच हे एक बहुमुखी व्यक्तिमत्व आहे. ती एक यशस्वी उद्योजिका आहे, समाजसेविका आहे, राजकारणपटू आहे आणि कौटुंबिक जीवनात दोन मुलांची आईदेखील आहे.

या सर्व भूमिकांमध्ये ती कॅनेडियन संसदेची सदस्य म्हणून सर्वाधिक परिचित आहे.

सोनेरी केसांची ही स्त्री २००४ नंतर चार वर्षे कॅनेडियन संसदेत खासदार होती. सुरुवातीला ती कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सदस्य होती. नंतर काही वर्षांनी तिने पक्ष बदलून लिबरल्स पार्टीचे सदस्त्व घेतले.

बेलिडां स्ट्रोनाच हिचा जन्म २ मे १९६६ रोजी झाला, तिचे सध्याचे वय ५१ वर्ष आहे.

४. व्हेरा लिश्का (Vera lischka) – ऑस्ट्रिया

 

Vera lischka InMarathi

व्हेरा लिश्का हीदेखील अन्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानंतर राजकारणात आलेली आहे.

ती ऑस्ट्रियाची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होती. जॉर्जियाच्या अटलांटा शहरात पार पडलेल्या सन १९६९ च्या समर ऑलिंपिकमध्ये तिने तिच्या देशाचे प्रतिनिधीत्व केले होते.

२०१७ च्या युरोपियन एससी चँपियनशिप स्पर्धेत व्हेराने ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदकही पटकावले होते.

खेळाडू म्हणून अशी कामगिरी पार पाडल्यानंतर व्हेरा लिश्काने सन २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तिने मेंबर ऑफ लॅण्डअॅग ऑफ ओबेरोस्टेरिक हे पदही भूषवले.

व्हेरा लिश्का हिचा जन्म १ मे १९७७ रोजी झाला, तिचे सध्याचे वय ४० वर्ष आहे.

५. सारा पॉलिन (Sarah Palin ) – यूएसए

 

Sarah Palin InMarathi

सारा पॉलिन यांना राजकारणातील सर्वांची आवडती व्यक्ती म्हणणं कदाचित धाडसाचं ठरेल. परंतु, त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे, हे नाकारून चालणार नाही.

रिपब्लिकन पक्षाची सदस्य असलेल्या सारा पॉलिन यांनी त्यांचा शाळेपासूनचा प्रेमिक टॉड पॉलिन याच्याशी विवाह करण्यापूर्वी क्रीडा समालोचक आणि क्रीडा पत्रकार म्हणून काम केलं होतं.

वॅसिला सिटी काउन्सिलची मेंबर म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर महापौरपद आणि पुढे अलास्का प्रांताची पहिली महिला गव्हर्नर होण्याचा मानही त्यांनी मिळवला.

त्यानंतर मात्र २००८ च्या निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत त्यांना हार पत्करावी लागली होती.

सारा पॉलिन हिचा जन्म ११ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला, तिचे सध्याचे वय ५३ वर्ष आहे.

६. ऑर्ली लेव्ही (orly levy) – इस्राईल

 

orly levy inmarathi

इस्राईल या देशाची आताची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सर्वार्थाने अस्थिर आणि अराजकतेची म्हणावी अशी आहे. तरीही या देशात जगातील काही सर्वांत देखण्या राजकीय व्यक्ती आहेत. त्या

त ऑर्ली लेव्ही यांचचं नाव घ्यावं लागेल. त्या सध्या इस्राईलच्या संसदेच्या सदस्य आहेत. ही संसद नेसेट म्हणून ओळखली जाते.

आज ४१ वर्षांच्या असणाऱ्या ऑर्ली या एका राजकीय कुटुंबातच जन्माला आल्या होत्या. त्यांचे वडील हे देशाचे परराष्ट्रमंत्री होते आणि त्यांच्या भावानेही महापौरपद मिळवले होते.

तरीही राजकारणात येण्यापूर्वी ऑर्ली यांनी मॉडेल आणि टीव्ही शोची होस्ट म्हणून तुरळक कामे केली होती. ऑर्ली लेव्ही हिचा जन्म ११ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला, तिचा सध्याचे वय ४३ वर्ष आहे.

७. ज्युलिया बॉन्क (julia bonk) – जर्मनी

 

Julia-bonk-Germany InMarathi

या यादीत स्थान पटकावणारी ही जर्मनीतील दुसरी महिला राजकारणी आहे. ज्युलिया बॉन्क हिने पहिली निवडणूक वयाच्या १८ व्या वर्षी जिंकली होती.

वयाच्या २९ व्या वर्षी ती जर्मन पार्लमेंटची सर्वांत तरूण सदस्य ठरली. लॅण्डटॅग ऑफ सॅक्सनी या सभागृहाची ती डाव्या विचारसरणीची नेता मानली जाते.

ज्युलियाने शाळकरी वयातच आपल्या राजकीय कारकिर्दीचीही सुरुवात केली होती.

वयाच्या चौदाच्या वर्षी ती डेरस्डेन सिटी स्टुडंट काउन्सिलची सदस्य बनली आणि दोनच वर्षांनी ती सॅक्सनी राज्या स्टुडंट काउंन्सिलची स्पीकर बनली होती.

ज्युलिया बॉन्क हिचा जन्म २९ एप्रिल १९८६ रोजी झाला, तिचे सध्याचे वय ३१ वर्ष आहे.

एकंदरीत, रुक्ष आणि गुंतागुंतीच्या राजकीय पटलावर जरा देखणी रंगत आणल्याबद्दल ह्या ७ स्त्रियांचे मानावे तेवढे आभार कमीच, नाही का? 🙂

थँक यु लेडीज!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?