' मोदींचं तथाकथित "१५ लाख रूपये" चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी

मोदींचं तथाकथित “१५ लाख रूपये” चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पुन्हा एकदा मोदींचे पंधरा लाख चर्चेत आलेत!

गेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी १५ लाख रुपयांचा विषय काढला. सोशल मीडियात एकमेकांची टांग खिचाई करण्यासाठी काढले जाणारे विषय राजकीय पक्ष प्रमुखांनी भर सभेत काढू नयेत. खासकरून तेव्हा जेव्हा त्या आक्षेपांत तथ्य नसतं.

त्या ऐवजी तथ्य असणाऱ्या, महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं.

राज ठाकरेंनी काल इतर काही चांगले मुद्दे हाताळले, जे ऐकून बरं वाटलं. सध्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे चा आक्रमक पावित्रा लक्षणीयच आहे.

असो. मुद्द्याकडे येऊ या.

तर, पंधरा लाख. तुमचे आमचे हक्काचे. मोदींनी प्रॉमिस केलेले.

पण मोदींनी खरंच असं काही वचन दिलं होतं का?

मोदी नेमकं काय म्हणाले होते? मोदी हे म्हणाले :

“हा परदेशात जेवढा पैसा साठलाय ना…तो इतका मोठा आहे…की (दुसरं काही नं करता फक्त) तो पैसा परत आणला तर भारतातील प्रत्येक गरीबाला १५-२० लाख सहज मिळतील!”

इच्छुकांनी स्वतः व्हिडीओ पहावा :

 

 

इथे “आम्ही सर्वांना अमुक पैसे देऊ” चं कोणतंही वचन नाही. मोदींनी फक्त गणित सोपं करून सांगितलं होतं. समस्येचं गांभीर्य कळावं, एकूण किती मोठी रक्कम आहे ह्याची सामान्यांना कल्पना यावी असं उदाहरण दिलं होतं

आपल्या स्वातंत्र्य संग्राम काळातील गोष्ट आहे. इंग्रज किती वाईट आहेत, किती लुटताहेत हे समजावून सांगताना – इंग्रज रोज किती संपत्ती बाहेर घेऊन जातात हे समजावून सांगताना – कुणीतरी (नक्की कोण आठवत नाही) –

“रेल्वेच्या एका डब्ब्यात खचाखच चांदी भरली” तर जेवढी संपत्ती होते तेवढे रूपये रोजच्या रोज भारतातून इंग्लडला नेले जातात!

– असं उदाहरण दिलं होतं. ह्याचा अर्थ रोज एक डबा भरून चांदी जायची काय? नाही ना? तसंच मोदींनी जे उदाहरण दिलंय त्याचा “सरकार सर्वांना १५ लाख रूपये देईल” असा अर्थ लागत नाही.

एवढंच नाही – मोदींनी आणखी एक उदाहरण दिलं होतं –

ये काला धन वापस आ जाए, तो जहाँ जाओ वहा रेल्वे लाईन होगी!

हे पहा :

 

 

म्हणजेच…१५-२० लाख देण्याचं वचन मोदींनी दिलं नव्हतं. मोदींनी कोणतं वचन दिलं होतं?

दिलेलं वचन हे होतं –

ज्या दिवशी भाजप सरकारला संधी मिळेल त्या दिवशी एक एक पैसा परत आणला जाईल आणि देशाच्या गरिबांसाठी वापरला जाईल…!

हे वचन मात्र स्पष्टपणे दिलेलंय! तुम्हीच पहा :

 

 

आता ह्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा उपस्थित होतो की राज ठाकरे आणि/किंवा इतर विरोधकांनी “१५ लाख अकाऊंट मध्ये जमा करा” चा थिल्लरपणा करायचा की वरील वचनावर जोर द्यायचा?

सोशल मीडियावर शोभणारी टोमणेगिरी, राजकारण्यांनी उचलून धरली आणि संपूर्ण काळा पैसा प्रकरणातील गांभीर्यच काढून टाकलं.

मोदींनी साडे तीन वर्षात देश बाहेरील काळा पैसा आणून देशातील गरिबांसाठी वापरायचा सोडून देशातीलच नोटांवर वक्र दृष्टी का फिरवली?

नोटबंदी, त्याचे होणारे – आपण आता भोगतोय ते साईड इफेक्टस हा  विषय!

पण परदेशातील काळ्या पैश्यांचं काय झालं? मॉरिशियस बरोबर करार केल्याच्या बातम्या आल्या. त्यानुसार मोठमोठ्या याद्या मिळाल्याची माहिती मिळावी.

काय झालं पुढे? कधी येणार हा पैसा परत? कधी वापरला जाणार देशासाठी?

खिश्यात होत्या त्या नोटा रद्द केल्यात…आणि बाहेरून आणण्याची वचनं पूर्ण करत नाही आहात…!

असं का बरं?

हे प्रश्न विरोधकांनी विचारायला हवे होते. अजूनही विचारायला हवेत…! पण भारतात विरोधक नावाची जमात कधीच डोकं वापरत नाही असं वाटतं. आपल्याकडे नेहेमीच विरोधकांनी सर्वच महत्वाच्या प्रश्नांवर असाच थिल्लरपणा केलाय.

लोकशाहीत विरोधकांचं फार्फार महत्व आहे” असं आपण आपलं आपापसात म्हणत रहातो. हे महत्व आहे म्हणजे नेमकं काय? शेलक्या टोमण्यांसाठी विरोधक हवेत का? नाही. सरकारवर वचक ठेवण्यासाठी हवेत. मुद्देसूद प्रश्न विचारण्यासाठी हवेत.

कुठे चुकताय हे सांगण्यासाठी आणि – चुका दुरूस्त करण्याचे मार्ग सुचवण्यासाठी – विरोधक हवे असतात.

दुर्दैवाने कोणताही राजकीय पक्ष हे भान बाळगलेला आढळत नाही. भारतीय जनता पक्षसुद्धा विरोधात होता तेव्हा असाच वागत होता…आजचे विरोधक अगदी तसेच वागताहेत. राजकीय पक्ष जाऊ देत. आपले प्रस्थापित पत्रकार, विचारवंतसुद्धा अश्या प्रचारात पडून रहातात.

एकदा “आमचा पक्ष विरोधी पक्ष!” हे एकदा ठरवून टाकलं की उठसुठ कश्यावरही कुत्सित टीका करत रहाणे हा आपद्धर्म समजला जातो. आणि त्याचा अभिमान वाटायला लागतो.

एकीकडे राजकीय पक्ष (सत्ताधारी आणि विरोधक…सर्वच!) आपली राजकीय गणितं सांभाळण्यात गुंग…दुसरीकडे वैचारिक लोक आपापले गंड जपत पोकळ टोमण्यांमध्ये व्यस्त…मधल्यामध्ये भारतातील जनता असहाय, निपचित पडलेली…असं हे विचारक चित्र आहे.

मोदींवर टीका करण्याच्या इतर कितीतरी उत्तम मुद्द्यांकडे विरोधक दुर्लक्ष करत आहेत. मग तो मोदींच्या “हर घर बिजली” च्या फसव्या आकड्यांचा असो (ह्यावरील दीर्घ लेख इथे क्लिक करून वाचा ) वा मोदींच्या अनेक आश्वासनांचं नं केलं जाणारं पालन असो (ह्यावरील लेख इथे क्लिक करून वाचू शकता).

परंतु विरोधकांना हे विषय जाणवत नाहीत. का, ते त्यांनाच माहित.

जाता जाता एक मजेशीर निरीक्षण :

शेअर केलेला व्हिडीओ कुणा मोदी समर्थकाने तयार केलेला आहे. युट्युबवर वरील तुकडा फक्त ह्याच व्हिडिओचा असल्याने तोच शेअर करावा लागला.

गंमत बघा, मूळ स्पिचमध्ये मोदींवर आक्रमक करण्याजोगे अनेक मुद्दे आहेत. जे वर नमूद केलेले आहेत. ह्याच मुद्द्यांना जसंच्या तसं ठेवून मोदी समर्थकाने वरील व्हिडीओ तयार केलाय! पण उत्तर फक्त “१५ कोटीचं वचन” आणि  “१०० दिवसांची डेड लाईन” वर दिलंय!

कारण विरोधकांनीच हे मुद्दे उचललेत! तर ह्यापुढेही “साडे तीन वर्षांत काळ्या पैश्यांवर काय कार्यवाही झाली” हे विचारणारे प्रस्थापित विरोधक पुढे आले नाही…तर हे असं समर्थन खपवून घ्यावं लागेल, ह्याची सर्वांनीच नोंद घ्यावी!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 170 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “मोदींचं तथाकथित “१५ लाख रूपये” चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी

 • October 30, 2017 at 2:23 pm
  Permalink

  व्वा ! ओंकार ! अत्यंत समर्पक !

  Reply
 • October 30, 2017 at 6:03 pm
  Permalink

  “पंधरा लाख” हे विधान मला समजले ते असे …
  १. परदेशातील कला पैसा परत आणू
  …….(पैसा येण्याची वाट पाहतो आहे )
  २. मंत्री -संत्री यांचा काळा पैसा बाहेर काढू
  …….. लोक पैशा साठी लाईनीत उभे राहत होते आणि RBIच्या मागच्या दारातून ट्रक भर पैसे निकट वर्तीयांकडे जात होते
  (RBI कडे कोणत्या नंबरच्या नोटा कोणत्या बँकेकडे गेल्या याची नोंद नाही.)
  ३ . उद्योग पतीचा काळ्या व्यवहारावर वाचक बसवू
  ……..GST लाऊन वाचक उद्योगपती वर नाही सामान्य माणसावर बसवला
  ४. सरकारी कार्यालयातील टेबला खालून केलेला व्यवहार बंद करू
  ……. सरकारी कार्यालया तील व्यवहाराबद्दल तर काही केलेच नाही

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?