' आईन्स्टाईन जिथे अडखळला - तिथे यशस्वी होणारे "नोबेल" वैज्ञानिक !

आईन्स्टाईन जिथे अडखळला – तिथे यशस्वी होणारे “नोबेल” वैज्ञानिक !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गुरुत्वाकर्षण काय आहे? कुणीही शाळकरी मुलगा सांगेल की, गुरुत्वाकर्षण हे असे बळ आहे ज्याद्वारे पृथ्वी अथवा कोणताही पदार्थ आपापल्या वस्तुमानाच्या प्रमाणात इतर पदार्थांना आपल्याकडे खेचतो.

हे तत्त्व न्यूटनने मांडले. व्यवहारात जरी हे तत्त्व बरोबर असले, तरीही जसजशी भौतिकशास्त्राची प्रगती होत गेली तसतसे आपले गुरुत्वाकर्षणाचे आकलन बदलत गेले.

आईन्स्टाईन म्हणतो की, गुरुत्वाकर्षण हे नुसतेच बळ नाही तर अवकाश (स्पेस) आणि काळ (टाईम) यांच्या वक्रतेचा (कर्व्हेचर) एकत्रित परिणाम आहे! या शोधानंतर गुरुत्वाकर्षणाकडे बघण्याची भौतिकशास्त्राची दृष्टीच बदलून गेली.

 

gravity-marathipizza01
internapcdn.net

हे तत्त्व मांडताना आईन्स्टाईनने आणखी एका विषयावर मत व्यक्त केले होते, ते म्हणजे गुरुत्वीय लहरी (ग्रॅव्हिटेशनल वेव्ज)! १९०५ साली हेन्री पॉईन्केअर या फ्रेंच शास्त्रज्ञाने गुरुत्वीय लहरींची कल्पना सर्वप्रथम मांडली. तिला आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतामुळे शास्त्रीय बळ मिळालं.

गुरुत्वीय लहरी म्हणजे काय, तर गुरुत्वाकर्षण हा जर अवकाश आणि काळाच्या वक्रतेचा परिणाम असेल, तर त्यात पाण्यामध्ये दगड टाकल्यावर जसे वर्तुळाकार तरंग पसरत जातात तसे तरंग पसरतात, हे तरंग म्हणजेच गुरुत्वीय लहरी! यांचे स्वरूप हे काहीसे विद्युच्चुंबकीय (इलेक्ट्रेमॅग्नेटिक) लहरींसारखेच असते. त्यासुद्धा प्रकाशाच्या वेगानेच प्रवास करतात. आईन्स्टाईनने या लहरींचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले.

 

गंमत अशी की, अश्या लहरींच्या अस्तित्वावर स्वत: आईन्स्टाईनलाच शंका होती. कारण, या लहरी जर मोजण्याइतपत असायच्या तर त्यासाठी दोन कृष्णविवरांसारखे (ब्लॅकहोल्स) अतिप्रचंड वस्तुमानाचे पदार्थ एकमेकांवर आदळण्यासारखी घटना घडली पाहिजे.

जिथे कृष्णविवरांच्याच अस्तित्वावर शंका होती, तिथे त्यांच्यापासून निघणाऱ्या लहरी कुठून दिसल्या? सर आर्थर एडिंग्टन या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञाने तर १९२२ साली यावर एक विनोदसुद्धा केला होता, “या लहरी प्रकाशाच्या नाहीत तर विचारांच्या वेगाने प्रवास करत असल्या पाहिजेत”!

या शतकाच्या सुरुवातीला “लेसर इन्टरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव ऑब्जर्व्हेटरी” अर्थात “लिगो”ची स्थापना झाली. या वेधशाळेचं मुख्य काम हे गुरुत्वीय लहरींचे संशोधन, हेच होते. आपल्यापासून सूर्याखेरीज सर्वांत जवळचा तारा आहे प्रॉक्झिमा सेंटोरी (मित्र).

सर्वांत जवळचा म्हणजे तरी किती, तर सव्वाचार प्रकाशवर्षे! अर्थात प्रकाशाच्या वेगाने गेलो तरी मित्रापर्यंत पोहोचायला सव्वाचार वर्षे लागतील आणि प्रकाश एका सेकंदात तीन लाख किलोमीटर जातो.

धरा बोटे करा गणित! तर या मित्र ताऱ्यापर्यंतच्या अवकाशात मानवी केसाइतकी सूक्ष्म लहरदेखील टिपण्याइतकी महाप्रचंड क्षमता आहे या लिगोची. तर १४ सप्टेंबर २०१५ यादिवशी या लिगोला पहिल्यांदाच गुरुत्वीय लहरी सापडल्या! या लहरी दोन भलीमोठी कृष्णविवरे एकमेकांमध्ये सामावण्यातून तयार झाल्या होत्या. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत अशी एकूण चार यशस्वी निरीक्षणे नोंदवली गेली.

 

gravity-marathipizza02
astro.caltech.edu

हा भौतिकशास्त्रातला सर्वार्थाने क्रांतिकारी शोध आहे. इतके दिवस जे केवळ गणिताने ठाऊक होतं, त्याचे प्रत्यक्ष प्रमाणच हाती लागलेय. भौतिकशास्त्राची सबंध दिशाच बदलून जाणार आहे, या शोधामुळे.

यासाठीच यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक या शोधाप्रीत्यर्थ रायनर वाईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना काल घोषित झाले. यांपैकी किप थॉर्न आपल्यापैकी काहींना नोलानच्या “इंटरस्टेलर”पाठचे वैज्ञानिक डोके म्हणून ठाऊक असेल! पण गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही.

या संशोधनामध्ये ज्या अनेक संस्थांनी सहभाग घेतला, त्यातली एक प्रमुख संस्था आहे पुण्याची “आयुका”! याखेरीज “टाटा मूलभूत संशोधन केंद्रा”चाही यात महत्त्वपूर्ण सहभाग आहे. ही खऱ्या अर्थाने भारताची मान जगभरात अभिमानाने उंचावणारी बाब आहे!!

गंमत कशी आहे ना, पॉईनकेअर अथवा आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या संकल्पनेला प्रत्यक्ष प्रमाण मिळण्यासाठी तब्बल एक शतक उलटावे लागले. कोणत्याही शास्त्राचे असेच असते.

अनेक दशकांच्या आणि अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांनंतर कुठेतरी कणभर प्रगती होत असते, मात्र ती कणभरच प्रगती सबंध जग बदलून टाकायला पुरेशी असते. हेच तर कोणत्याही मूलभूत विज्ञानशाखेचे सौंदर्य आहे!

 

gravity-marathipizza013
qz.com

अर्थातच हे काही अंतिम यश नाही. प्रगती सुरूच राहाणार आहे, किंबहूना सुरू राहिलीच पाहिजे. तरच जग पुढे जाईल. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, हे यश केव्हा मिळाले, तर अनेक देशांनी येऊन एकत्रितरित्या प्रयत्न केले तेव्हा.

जेव्हा आपण जात, पंथ, रंग, सीमा वगैरे फालतू गोष्टींच्या पलिकडे जाऊन एकत्रितपणे काहीतरी करतो तेव्हाच सबंध जगाच्या विकासात योगदान देऊ शकतो. मला वाटतं, यावेळच्या नोबेल पारितोषिकांचा हाच धडा आहे! परंतु, हा धडा शिकण्याइतके तुम्ही-आम्ही परिपक्व झालो आहोत का?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?