' रामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८ – InMarathi

रामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : …..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

तुकोबांनी आपले कवित्व इंद्रायणीत बुडविल्याची कथा रामभटांनी अतिशय धीर करून नारायण आणि आबाला सांगितली खरी पण ती सांगताना रामभटांच्या आणि ऐकताना आबा नारायणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. तो दिवस तसाच गेला आणि रामभटांनी पुढील घटना सांगण्यासाठी पुढचा दिवस निवडला.

दुसऱ्या दिवशी रामभट कथा पुढे सांगावयास बसले खरे पण चटकन बोलणे सुरू करेनात. तेव्हा त्यांची मनोवस्था जाणून नारायणाने विचारले,

काका, तिकडे देहूत हा प्रकार झालेला तुम्हाला कधी कळला?

रामभट सांगू लागले,

मी जी कथा तुम्हाला सांगितली ती इतकी विस्तृतपणे पुढे मी प्रथम कान्होबांकडून आणि नंतर अनेकांकडून अनेकदा ऐकली. तुकोबांनी गाथेसह नदीत प्रवेश केला आणि ते मध्यावर जाऊन उभे राहिले. लोक सांगतात, हे सारे इतके वेगात घडले की तुकोबांच्या हातात आता गाथा नाही आणि ते आता हात जोडून उभे आहेत हे लक्षात यायलाही लोकांना वेळ लागला. मात्र, लक्षात येताच काही मुलांनी नदीत पटापट उड्या मारल्या, गाथा शोधण्यासाठी. कुणी म्हणतात नेमके त्याच वेळी पाणी वाढत गेले आणि गाथा हरवली! तुकोबा पाण्यातून बाहेर यायचे नाव घेईनात. तसेच उभे राहिले. निशब्द आणि निश्चल. इकडे काठावर कान्होबा, वहिनीबाई आदी मंडळी दिग्मूढ होऊन पाहात होती. शेवटी कान्होबा पाण्यात उतरले आणि त्यांच्यामागून अजून काही लोक. सर्वांनी तुकोबांना धरून बाहेर आणले आणि उचलून घरी नेले. त्यांच्यासाठी अंथरूण घातले व निजवले. तुकोबांना गाढ निद्रा लागली. इकडे नदीतीरावरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढत चालली. लोकांनी हरिनामाचा गजर सुरूच ठेवला. अर्थात, इकडे वाघोलीत मला तिकडे काय चालले आहे हे लगेच कळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मला मूर्छा आल्याने मी ही अंथरूणावरच होतो आणि काहीतरी अघटित होण्याच्या कल्पनेने अखंड तळमळत होतो. रात्रभर नीटसा डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठलो तेव्हा शरीरभर थकवा जाणवत होता आणि उत्साह तर मुळीच नव्हता. कसेबसे प्रातर्विधी आटोपले, स्नानसंध्या केली आणि माजघरात पडून राहिलो.

 

थोडा वेळ गेला असेल, मला किंचित डोळा लागला असावा. बाहेरून मोठी हांक ऐकू आली –

 

 

राम्याऽऽऽऽऽ

 

मला राम्या म्हणून हांक मारेल असे वडिलधारे आता मला कुणी उरले नव्हते. आवाज एका स्त्रीचा होता. तो ऐकून मी उठलो आणि कपडे करून बाहेर आलो. तोवर माझी पत्नी बाहेर आली होती आणि त्या प्रौढ स्त्रीस आंत येऊन बसा, पाणी घ्या इत्यादी विनंती करीत होती. मला पाहताच त्या बाईचा चेहेरा लाल झाला आणि ती म्हणू लागली,

 

 

राम्याऽ, भटाऽ, तूच का तो? तुझी कायमची दातखीळ बसो! तुझे तोंड काळे पडो!

 

 

ह्यापुढे त्या बाईला संतापाने बोलता येई ना. तिने सोबत आणलेला मुलगा काल कान्होबांबरोबर आलेला होता. त्याला वाटाड्या घेऊन भल्या पहाटे ती बाई देहूहून निघाली होती. आमच्या मंडळींनी पाणी पुढे करताच तिने हात झिरकाडून टाकला आणि खाऊ की गिळू अशा डोळ्यांनी माझ्याकडे पाहात ती तशीच थरथरत उभी राहिली. सोबतच्या मुलामुळे ही दोघे देहूहून आली आहेत हे माझ्या सहज लक्षात आले. मग मी थोडा धीर केला आणि अस्फुट आवाजात विचारले,

 

 

बाई, का रागावलांत? काय झाले?

 

काय झाले? जगबुडी झाली! तीतून तू आता वाचायचा नाहीस. जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील! तुझे जीणे तो अशक्य करील!

 

बाई, आपण काय बोलता आहात ते मला कळत नाही. नेमके काय घडले ते सांगता का? माझे काही चुकले असेल तर मी अवश्य क्षमा मागेन.

 

आता क्षमा मागून काय उपयोग? काल तुझ्याकडे तुका येऊन गेला आणि त्याने त्याचा गाथा इंद्रायणीत की रे बुडविलान्! माझ्या तुक्याचे सारे कवित्व गंगेने आपल्या पोटात की रे घेतले! आणि तसे करायला तूच ना सांगितलेस? खरे सांग! तुक्या बोलायचा बंद झालाय, कान्हा काही सांगत नाही! मला वाटते की तूच तसे सुचविलेस! हा मुलगा हो म्हणत नाही आणि नाहीही म्हणत नाही! अरेरे, काय केलेस रामभटा तू हे? तुझ्यात इतके धैर्य आले कुठून? अरे,

 

जो पांडुरंगाचा अवतार । तयां तू पीडलेसी फार ।।
जगी जो जाहला गुरू । त्यासी दाविलासी अधिकारू ।।
तुकये बुडविले कवित्व । कारण तुझे धर्मतत्त्व ।।
अपराध घडला फार । भूमीस तू ह्या अससी भार ।।
तुज नाही नाही क्षमा । छळिले तुक्या उत्तमा ।।
पाप हे फेडशील । ऐसे कधी न होईल ।।
आहे विठ्ठल पाहणारा । काशी भजेल त्या उदारा ।।

 

असे म्हणून ती बाई आली तशी वेगाने निघूनही गेली! मन चिंती ते वैरीही न चिंती असे म्हणतात ते खरे कसे ते मला कळले! ह्याच घटनेची मी कल्पना केली होती आणि ती घटना प्रत्यक्ष घडली होती! माझ्या पायातले त्राण गेले आणि मी मटकन खाली बसलो. आमच्या मंडळींनी पाणी आणले. ते मला पिववेना. त्या काशीबाईने माझ्या घरचे पाणीही नाकारले होते. माझे मन स्वतःविषयीच्या संतापाने भरून गेले. काय करावे हे सुचेनासे झाले. एका काशीबाईवरून देहूत काय वातावरण असेल याचा अंदाज येत होता. तिकडे जाणे शक्य नव्हते. घरात बसवत नव्हते. पण बाहेर पडण्याचे धैर्यही होईना. कुणाला तोंड दाखवू नये, कुणी आपले तोंड पाहू नये असे वाटू लागले. आडवे पडले तर उभे राहावेसे, उभे राहावे तर चालावे असे वाटू लागले आणि चालताना अशी थरथर सुटू लागली की खाली बसण्याव्यतिरिक्त पर्याय उरू नये. तुझी दातखीळ बसेल असा शाप मला काशीबाईने दिला होता. तो लगेच खरा ठरला होता. मला जसे धड हिंडता फिरता बसता झोपता येईना तसे बोलताही येईनासे झाले. माझी ही अवस्था पाहून मंडळींनी शेजारीपाजारी बोलविले. घरात गर्दी झाली आणि मी मला आतील खणात मला कोंडून घेतले! मनात विचार येऊ लागले ..

 

अरे अरे भटा रामा । लागला तुज हा काळिमा ।।
क्षणभर झाला क्रोध । तये झाला अपराध ।।
नको असे ते चिं घडलें । आतां पुढे काय वाढिलें ।।
धर्मशील म्हणूनी होती ख्याती । दुराभिमाने केली माती ।।
प्रसंग तो बहुत कठीण आला । वाटे नसे अंत ह्या भोगाला ।।

जो जो विचार करावा तो तो मी त्या विषयात अडकू लागलो. जर कान्होबा आदींनी सांगितले की रामभटानेच कवित्व बुडविण्यास सांगितले तर काय होईल ह्याची मला कल्पना करवेना. आजची काशीबाईची भेट थोडी कल्पना येण्यासाठी पुरेशी होती. आज काशीबाई आली, उद्या अवघा देहू गांव येईल. खरे खोटे पाहणार कोण? माझ्या बाजूने उभे राहणार कोण? धर्मसभा? नाही. एकूण वातावरण पाहता धर्मसभा माझ्या बाजूने उभे राहण्याचे टाळणार. ते म्हणणार, आम्ही केवळ माहिती काढण्याचे काम दिले होते, रामभटाने काही आज्ञा केली असेल तर त्याचे उत्तरदायित्व आमच्यावर नाही!

 

काळ आला कठीण । तनमन माझे झाले क्षीण ।।
एकला मी पडिलो आतां । नसे येथे कुणी निवारिता ।।
उठेल कुशंकांचे मोहोळ । युक्तिहीन मी नुरले वाचाबल ।।
तप्त झाला भोंवताल । अवघे गमे अमंगल ।।

 

जसा वेळ जाऊ लागला तसा माझा धीर खचू लागला. दुपारचे जेवण तर मी जेवू शकलोच नाही. त्यात देहूहून वार्ता घेऊन एक मनुष्य आला. म्हणाला, तुकोबांनी गाढ निद्रा केली असून श्वास मंद चालू आहे. देहू गावात तुकोबांची चिंता आणि गाथा बुडल्यामुळे प्रचंड क्षोभ आहे. नदीकिनारी वारकरी जमा होत आहेत. अधूनमधून हरिनामाचा गजर होत आहे तर मध्येच कुणी तुकोबांचे अभंग आठवून त्यावर कीर्तन करीत आहेत. कान्होबांनी हे पाहून कालच एक मनुष्य कागद, लेखणी इत्यादि साधने देऊन पारावर अभंग उतरवून घेण्यास बसविला आहे. ते पाहून आज तशीच तयारी घेऊन लिहायलाही आलेले वाढले आहेत. लोक नदीत एकामागोमाग उड्या मारीत आहेत. परंतु, गाथा हाताला लागत नाहीये. हे ऐकून मी त्यास विचारले,

 

तुकोबांनी गाथा का बुडविली असे लोकांना वाटते?

 

तो मुलगा म्हणाला,

 

मोठ्याने कुणी काही बोलत नाहीत पण एकमेकांच्या कानांत कुजबुजतात!

 

 

काय बोलतात ते?

 

मी अजून विचारले.

 

त्या मुलाने आवंढा गिळला आणि तो म्हणाला,

 

ते एकच शब्द म्हणतात……रामभट!

 

हे ऐकून मी मनाने कोसळलो! म्हटले,

 

तुकयाने बुडविले कवित्व । आटोपले माझे जीवित्व ।।
आता न उरली काही आशा । जी तोडेल ह्या दुष्टपाशां ।।
कोठूनिया गेलो त्या यज्ञा । अन स्वीकारीली ती ब्रह्माज्ञा ।।
धवल चारित्र्याचा झाला नास । रामभटा घे संन्यास ।।

 

असे काहीबाही विचार मनात थैमान घालू लागले आणि मला पुन्हा ग्लानी आली!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?