' राहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार?

राहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : सुधन्वा कुलकर्णी

===

२००१ च्या ९/११ ला अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवर्सवर हल्ला झाला. जगाच्या इतिहासाला एक जबरदस्त धक्का आणि कलाटणी मिळाली आणि या वर्षी नेमके ९/११ लाच, पुन्हा अमेरिकेतल्याच कॅलिफोर्निया येथे, जगासाठी नव्हे मात्र भारतासाठी महत्वपूर्ण ठरू शकेल अशी घटना घडणार आहे. राहुल गांधी तेथील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

rahul-gandhi-marathipizza01
opindia.com

तसे पाहता अश्या कॉन्फरन्सेस आणि भाषणे जगात सर्वत्र चालू असतात. त्यात काही खास उल्लेखनीय असण्याचे कारण नाही. मात्र एक पूर्णवेळ राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या, तरुण भारतीय नेत्याने, परदेशात जाऊन टेक्नॉलॉजी संदर्भातील एका अतिविशेष क्षेत्रासंबंधी, त्याची टिपणे मांडणे, ही विशेष बाब आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कॉंग्रेस पक्षाची सद्यस्थिती, यांचा विचार करता तर या घटनेचे मुल्य जाड अक्षरांत अधोरेखित होते.

पक्षाची अवस्था गलितगात्र असणे हे आपण समजू शकतो. राजकीय पक्षांच्या जीवनात असे क्षण येतात आणि जातातही. पण पराभवाच्या पलीकडे जाऊन राहुल गांधी यांची जी वैयक्तिक प्रतिमा देशात तयार झाली आहे, ती शोचनीय आहे. त्या प्रतिमेचे वर्णन करणे हा या पोस्टचा हेतू नाही. कारण ती सर्वज्ञात आहे. मात्र त्यासाठी मिडीया व विरोधी पक्षांना जबाबदार ठरवणे कॉंग्रेस समर्थकांसाठी सोपे तंत्र असले तरी ती आत्मवंचना ठरेल. आपल्या सततच्या वर्तणुकीने या प्रतिमेचे संवर्धन करण्याचे सर्वाधिक पातक श्रीमान राहुल गांधी यांच्याच माथी जाते.

पण त्याचवेळी असे काही क्षण राजकीय नेत्यांच्या आयुष्यात येतात की ज्यांना आपण ‘गेम चेंजर’ म्हणतो. ११ सप्टेंबरचे राहुल गांधींचे भाषण हे असेच गेम चेंजर ठरू शकते. नितीशकुमार पुरते निष्प्रभ केल्याने आता पुन्हा एकदा राहुल गांधी हेच २०१९ साठी मोदींच्या समोर उभे ठाकणार यात शंका नाही. त्यामुळे जगाला जरी काही पडलेली नसली, तरी संपूर्ण भारताचे लक्ष या भाषणाकडे वळलेले असेल. तुम्हाला आवडोत वा नावडोत, राहुल गांधी काय बोलतात याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकणार नाही. राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्यासाठी का होईना, लाखो मोदीसमर्थक तरुण हे भाषण ऐकणारच.

rahul-gandhi-marathipizza03
userscontent2.emaze.com

आणि म्हणूनच पुढील चार दिवसात या भाषणाला कमालीची प्रसिद्धी मिळेल अशी वातावरण निर्मिती कॉंग्रेसने केली पाहिजे. जी कॉंग्रेसचे अध्वर्यू करतील असा अंदाज आहे. तरुणांना भावणारा, त्यांच्या भविष्याची मांडणी असणारा हा टेक्नॉलॉजिकल विषय जर राहुल गांधी मुद्देसूद, स्पष्ट, न अडखळता, प्रभावीपणे मांडू शकले, तर या एका भाषणात त्यांची संपूर्ण प्रतिमा बदलवण्याचे सामर्थ्य असेल. तिथे अमेरिकेत टेकगुरु सॅम पित्रोदा हे राहुलच्या मदतीला आहेतच. त्यामुळे भाषणाचे परफेक्ट ड्राफ्टींग करणे त्यांचे काम असेल. राहुल गांधींना ते फक्त उत्तम प्रकारे सादर करायचे आहे, इतकेच.

मला कल्पना आहे, या एका भाषणाने लगेच राहुल गांधी नरेंद्र मोदींना भारी पडणार नाहीयेत. या एका भाषणामुळे २०१९ साली ते निवडणूक जिंकणार नाहीयेत. पण जर पाय जमिनीत रोवून ठामपणे मोदींच्या समोर उभे ठाकायचे असेल तर त्याची ही सुरुवात असेल. त्यासाठी आवश्यक असलेली प्रतिमानिर्मिती करण्याचे काम हे भाषण नक्की करू शकेल. हा कदाचित आपल्या राष्ट्रीय न्युनगंडाचा भाग आहे, मात्र विवेकानंदांना जाऊन शंभर वर्षे होवून गेली तरी, अजूनही भारतीयांना जागतिक व्यासपीठांवर, विशेषतः अमेरिकेत जाऊन झेंडे लावणाऱ्याचे फार आकर्षण आहे आणि म्हणूनच हे भाषण महत्वाचे ठरते.

आता, ते तसे महत्वाचे मानायचे अथवा नाही, या संधीचे सोने करायचे अथवा नाही, करायचे असल्यास त्यासाठी कशी तयारी करायची, इ. इ. सर्वस्वी राहुल गांधींच्या इच्छेवर आणि क्षमतेवर अवलंबून आहे. २०१९ नसेल तर किमान २०२४ ची पायाभरणी म्हणून या भाषणाकडे त्यांनी पाहावे यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा.

rahul-gandhi-marathipizza04
ganeshaspeaks.com

बासू चटर्जीच्या ‘ छोटीसी बात ’ या सिनेमात बुळचट अमोल पालेकरला उद्द्येशून अशोककुमार म्हणतो,

जिंदगी को एक जबरदस्त घुमाव देना है….

तसा घुमाव देण्याचं पोटेंशियल या घटनेत आहे असं वाटतं….आगे भगवान मालिक..

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

One thought on “राहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार?

  • September 12, 2017 at 8:59 pm
    Permalink

    Jagatle sarvart ghanerade, khalchya pataliche, deshaschya abru chi laktare bhashan Rahul Gandhi ne Americat kele. Sarvat nindaniya gosht.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?