' संघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत! – InMarathi

संघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

माझे एक संघ स्वयंसेवक परिचीत आहेत. वेगवेगळ्या चर्चे दरम्यान त्यांनी व्यक्त केलेली २ मतं बघा…

१) हिंदू हा धर्म आहे, रिलीजन नाही. भारताला आपला देश मानणारे मुस्लिम, ख्रिश्चन इ सुद्धा हिंदू होत.
२) अयोध्या राम मंदिर व्हावं ही समस्त हिंदूंची इच्छा आहे.

पहिल्या मतानुसार जर भारतीय मुस्लिम हिंदू मानले, तर दुसऱ्या मतानुसार भारतीय मुसलमानांचीसुद्धा अयोध्या राम मंदिराला अनुमती आहे असा हास्यास्पद अर्थ होतो. सहाजिक आहे, दुसऱ्या विधानात हिंदू म्हणजे “फक्त हिंदू” आहेत! ह्याहून अधिक आक्षेपार्ह गोष्ट आहे- ती म्हणजे दुसऱ्या विधानात गृहीत धरलेलं संपूर्ण हिंदू समाजाचं स्वयंघोषित नेतृत्व. संघाला कुणी सांगितलं की बहुतांश हिंदूंना मंदिर हवंय? कधी घेतली ही मत-चाचणी? कुणातर्फे घेतली? उत्तर नाही. उत्तर मिळणं शक्यच नाही. संघाची भूमिका किती गुंतागुंतीची आहे, ह्याचं हे एक उदाहरण.

rss-marathipizzza01
i0.wp.com

संघ नेमका काय आहे, हे कित्येक संघ समर्थकांना आणि संघ विरोधकांनासुद्धा माहित नाही असं गूढ वलय संघाभोवती आहे. संघाने मोठ्या कौशल्याने हे वलय उभं केलंय आणि हे गूढ वलय असणं ही संघाची strength आणि weakness दोन्हीही आहे. अनेक समाजोपयोगी कामं शांतपणे करत रहाणं, मधाळ वाणी असलेले हजारो स्वयंसेवक उभे करणं आणि त्याच बरोबर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ह्या कट्टर संघटनांचं मातृत्व अशी ही परस्पर विरोधी कामगिरी संघाने मोठ्या धीराने पार पाडली आहे. ही कामगिरी पार पाडण्यात आली, ह्याचं कारण संघाने विणलेल्या अतिशय किचकट अश्या philosophy मागे आहे.

‘हिंदुराष्ट्र’ आणि ‘भारतीय = हिंदू’ नावाचं गौडबंगाल

धर्माधिष्ठीत राष्ट्राबद्दल, त्यांच्या कट्टर धार्मिक विचारांबद्दल संघाला नेहेमी प्रश्न विचारले जातात. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संघ, विहिंप आणि इतर संघटना ठरलेली दोन साचेबद्ध उत्तरं देतात.

एक – ‘हिंदुनी कधीही कुणावर अत्याचार केले नाहीत, आमची संस्कृती आक्रमकांची/हिंसेची कधीच नव्हती आणि आजही नाही, आम्ही नेहेमीच सर्वसमावेशक होतो आणि राहू’ हा युक्तिवाद. हे संघातर्फे सांगण्यामागे हेतू, ‘आमचं हिंदुराष्ट्रदेखील असंच असेल’ हे पटवून देणं हा असतो.

मुळात जर खरंच हिंदू नेहेमीच सहिष्णू होते आणि पुढेही राहणार असतील तर मग आजच्या भारतात, घटनेनुसार बांधल्या गेलेल्या सवर्समावेशकतेच्या चौकटीत राहायला काय हरकत आहे? त्यावर एक जोरकस उत्तर येतं – भारतात सेक्युलरिझमच्या नावाखाली सुरु असलेला देशविघातक शक्तींना लपवण्याचा प्रघात. पण, सध्या भारतात अस्तित्वात असलेले स्युडो-सेक्युलरीझमचे अंग हे काही भारतीय राज्यघटनेचा दोष नाहीत. व्यवस्थेतले कच्चे दुवे ओळखून राज्यकर्त्यांनी पोसलेले ते प्रश्न आहेत. ते केवळ नावापुरतं ‘हिंदूराष्ट्र’ उभारल्याने कसे सुटतील? हिंदू धर्माच्या समर्थनाच्या नावाखाली देशविघातक कृत्य होणार नाहीत ह्याची शाश्वती आहे का? मुळात, सगळेच्या सगळे हिंदू फार देशप्रेमी आहेत काय?

पुढे, आम आदमीच्या पोटापाण्याच्या समस्या भारतात आहेत तश्याच हिंदूराष्ट्रात राहणार नाहीत हे कशावरून? हिंदूराष्ट्रचा नेमका कुठला ठोस फायदा भारतीयांना मिळणार आहे? असल्या कुठल्याच प्रश्नांना ठोस उत्तर न देता ‘आपण सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली तर देश आणि राष्ट्र सशक्त होतील’ अशी गोलमटोल उत्तरं दिली जातात. मग परत आपापली जबाबदारी पार पाडायला भारतात कुणी अडवलंय? हिंदुराष्ट्र कशासाठी हवंय? हे प्रश्न निर्माण होतातच. ह्या लेखाचा उद्देश ‘हिंदुराष्ट्र’ नाहीये त्यामुळे ह्यावर अधिक खोलात नं जाता इतकंच नमूद करायला हवं की, सरतेशेवटी ह्या सगळ्या संकल्पना कट्टरवादावर म्हणजेच हिंदूधर्मियांच्या वर्चस्वाला प्रस्थापित करण्यावरच येऊन थांबतात.

दुसरं उत्तर आहे – ‘आमच्या लेखी भारतीय हाच हिंदू आहे’. ही एक अत्यंत उत्कृष्ट खेळी आहे. जर आमच्या भाष्य, लेखन, कृती कश्यावरही प्रश्न विचारले गेले, धार्मिक कट्टरपंथीय असल्याचा आरोप झाला तर लगेचच – इथे धर्माचा नसून राष्ट्रीयत्वाचा संबंध आहे असं म्हणायचं. किंवा फारच झालं तर ‘रिलीजन आणि धर्म ह्यात फरक आहे. क्रिश्चन, इस्लाम हे रिलीजन आहेत. सनातन हिंदू हा धर्म आहे’ असलं काहीतरी गूढ ज्ञान समोर आणायचं. ह्यावरून, भारताला/हिंदुस्थानला पुण्यभू, पितृभू, मातृभू समजणारे सगळे हिंदूच हे सांगायचं. मग तुम्ही कितीही पापभीरु असा, कायद्याला मानणारे असा – हा हिंदुस्थान वंदनीय आहे असं माना – तसं नसेल तर तुम्ही हिंदू नाहीत. तसं नसेल तर इथल्या मातीशी, संस्कृतीशी तुमची बांधिलकी नाही. जेव्हा जेव्हा संघ, विहिंप इ वर धर्मांधतेचे आरोप होतात तेव्हा तेव्हा हेच उत्तर दिलं जातं आणि मग ‘आम्हाला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचं नाहीये’ असं म्हणायचा हिंदू राष्ट्रवासियांचा अधिकार संपुष्टात येतो. कारण तुमचं रिलीजन कुठलं का असेना – आम्ही तुम्हाला हिंदूधर्मीय म्हटलं आहे! तुम्हाला ह्यावर इच्छा प्रदर्शित करायचा हक्क नाहीये. धर्म आणि रिलीजन ह्या गोष्टी भिन्न आहेत हे आम्हीच ठरवलंय. इस्लाम, क्रिश्चन हे साधे ‘पंथ’ म्हणजेच रिलीजन आहेत आणि हिंदू हा एक विशाल महान धर्म आहे हेही आम्हीच ठरवलं आहे.

rss-marathipizzza02
img.etimg.com

तुम्ही काहीही बोला…आम्ही असंच समजणार!

मूळ गोम इथे आहे – नागरिकाला स्वतःचं रिलीजन की धर्म की आणखी काय ठरवण्याचा अधिकारच इथे अदृश्य होतो. तेही बेमालूमपणे! आणि म्हणूनच गांधींचा खरा सर्वसमावेशक हिंदूधर्म कट्टर भगवा होऊन जातो.
पण प्रश्न हा आहे की–

हिंदुना “असा” देश हवा आहे काय?

इथे संघाचं अपयश सिद्ध होतं. असा कट्टर देश हिंदुना नेहेमी नकोच होता. आजही नकोच आहे आणि ह्यापुढेही नकोच असेल. दुर्दैवाने हिंदुना असा देश नको असूनही भाजपला बहुमत द्यावं लागलं. ज्याच्या तीन प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे – ‘हिंदुत्ववादाच्या विरोधकांची राजकीय दिवाळखोरी’. दुसरं कारण आहे – सेक्युलरीझमच्या नावाखाली चाललेला धार्मिक राज्यकारभार आणि तिसरं आहे – केवळ सदोष शासन यंत्रणेमुळे मोठे होत असलेले आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न. ह्या शेवटच्या दोन कारणांमुळेच हिंदुत्ववादाच्या विचाराची मूळं भारतात रुजली. तरुण हिंदू कट्टर होत गेले. सर्वसमावेशकतेपासून दूर हटले.

हिंदुत्व का रुजलं?

संघ आणि संघाच्या पुत्रसंघटना अनेक समाजोपयोगी कार्य करतात. देशासमोर उभी राहिलेली कुठलीही आपत्ती असो – संघ तिथे सर्वप्रथम पोहोचतो आणि हे सगळं अगदी बिनबोभाट होतं. पण संघ ओळखला गेला, ओळखला जातो आणि रुजतो – तो ‘हिंदुत्व’ ह्या मुद्द्यावर. अनेक तरुण आजूबाजूच्या समस्यांचा डोंगर बघत लहानाचे मोठे होतात. जात-धर्मच्या आधारावर चालू असलेलं शासन बघतात आणि त्याचवेळी पाकिस्तान, भारतात होत असलेले आतंकवादी कृत्य, ISIS सारखा मधेच उभा राहणारा आंतरराष्ट्रीय राक्षस बघतात. शिवाय वाढत असलेला क्रिश्चनधर्म, मिशनरी संस्थांकडून धर्मार्थ कार्याच्या जोडीने होणारा धर्मप्रसार, केरळसारख्या राज्यात दर २००-३०० मीटरवर दिसणारे चर्च, एका आदिवासी देवतेचा मदर मेरीसारखा केला जाणारा पेहराव…ह्याने देखील बिचकतात. माहिती तंत्रज्ञानामुळे जगभरात घडत असलेल्या घटना – घटनांची पार्श्वभूमी सहज कळायला लागली आहे. त्यामुळे “भारताचं पुढे कसं होणार?” हा प्रश्न आम्हा तरुणांना खूप सतावतोय. बांगलादेशी घुसखोर इथे येतात काय, बस्तान बसवतात काय, इथल्या हिंसक कृत्यांमध्ये सहभाग घेतात काय…सगळंच भयावह. वास्तविक पाहता ह्या समस्या सरकार सोडवू शकतं. यंत्रणा सक्षम करून देश सुरक्षित आणि शांत केला जाऊ शकतो. धर्मप्रचाराच्या आडून इतर धर्मांवर वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतील – किंवा असे प्रयत्न होत आहेत असा आभास निर्माण केल्या जात असेल, तर त्यावर लगाम लावता येऊ शकतो. पण सरकार हे करत नाहीये. त्यामुळे जखम चिघळत जाते आणि मग हताश मन कट्टर बनतं. कट्टर हिंदुत्व असं रुजतं. देशाला संघ, हिंदुत्व आवश्यक आहे की नाही, ह्या संघटना, ही तत्व योग्य आहेत की नाहीत – हे चर्चेचे आणि वादाचे विषय ठरू शकतात. पण धर्मांधता – मग हिंदूंची असो की इतर कुणाची – ती ह्या देशात रुजू नये – ह्यावर एकमत व्हावं आणि विचारी, सुसंस्कृत नागरिकांनी योग्य तो मार्ग निवडावा. हाच उद्याचा सुदृढ, सशक्त आणि सर्वसमावेशक भारत बांधण्याचा मार्ग आहे.

rss-marathipizzza03
i.ytimg.com

संघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत…

संघाचा हिंदुत्वचा अजेंडा, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण संघाकडून सर्वसमावेशक भारताच्या बांधणी आणि उभारणीची, एक सामाजिक भान असलेला तरुण म्हणून मी अपेक्षा करतो. संघाच्या सामाजिक बांधिलकीबद्दल विश्वास वृद्धिंगत करणारी अनेक उदाहरणं चहूकडे दिसतात. पण संघाच्या long term हेतूबद्दल प्रचंड शंका निर्माण होतील अश्याही घटना सतत घडत असतात. दुर्दैवाने अश्या नकारात्मक घटनांना दूर ठेवणं सहज शक्य असूनही संघ ते टाळतो.

ज्या समस्त हिंदूंच्या भल्यासाठी संघ उभा आहे, त्या सामान्य भारतीयांच्या पोटापाण्याच्या प्रश्नांवर संघाचं काम दिसून येत नाही. हिंदू एकतेसाठी धडपडणाऱ्या संघाच्या डोळ्यादेखत संभाजी ब्रिगेड मोठी झाली, तिला संघ रोखू शकला नाही. गाईसाठी रस्त्यावर उतरण्यास तयार असलेले संघाच्या पुत्र संघटनेचे लोक, आमच्या माता-भगिनींच्या सुरक्षा, पाणी प्रश्न अश्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत नाहीत. राम मंदिर ह्या भावनिक मुद्द्यावर वर्षो न वर्ष चर्चा घडवून आणणारा संघ – शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, महागाई ह्या विषयांवर चर्चा घडवून आणत नाही. समस्त हिंदूंची/भारतीयांची एक-मूठ करण्याची इच्छा बाळगणारा संघ, कुठल्या ना कुठल्या प्रकारे चातुर्वण्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करतच असतो. आंबेडकरी चळवळ फुटकळ जातीय मेंदूंनी संघाच्या डोळ्यादेखत अपहृत केली, पण संघाला हे रोखता आलं नाही. अर्थात, संघाच्या अनेक संघटना विविध समस्यांवर काम करत आहेतच. पण संघाकडून आवाज कोणत्या प्रश्नावर होतो? संघ समर्थक ऑनलाईन-ऑफलाईन कोणत्या प्रश्नांवर चर्चा करतात? सरकारला मागणी करताना कोणते विषय असतात? गाय, इतिहास, अखंड हिंदुस्थान. ह्यावरून संघाची प्राथमिकता दिसते.

ह्या सर्व मुद्द्यांचा तरुण कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी विचार करायलाच हवा. हा विचार करून, योग्य ते बदल घडून येणं ही संघाची आणि भारताची – सर्वांचीच गरज आहे.

(साप्ताहिक विवेकमध्ये पूर्वप्रसिद्ध.)

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?