झाडांना मेंदू असतो का, काय सांगते नुकतेच समोर आलेले संशोधन ?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखिका : अनुत्तमा कुलकर्णी

===

काय असतो मेंदू ? एक मऊ नाजूक अवयव, ज्याला टणक हाडांचे संरक्षण लागते. या अवयवाचे काम असते आपल्याला हुशार बनवणे. तो आपल्याला प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतो. प्रश्नांची उत्तरं शोधायला भाग पडतो. तो आपल्याला परिस्थिती ओळखून तिला सुयोग्य असे वागायला लावतो. बऱ्या वाईट अनुभवांतून शिकायला लावतो. आनंद, दुःख, विस्मय, राग अशा वेगवेगळ्या भावना अनुभवायला शिकवतो. चांगल्या आणि वाईटाचा अंदाज बांधतो. स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही भावनांचा आदर करायला शिकवतो. आपल्या मेंदूची ही क्षमता खूपच खास आहे बरं!

माणसाप्रमाणेच इतर प्राणिमात्रांकडे देखील थोड्या फार फरकाने आपल्या मेंदू सारखाच दिसणारा एक मेंदू आहे. ते एकमेकांशी संवाद साधतात. हालचाल करतात. आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. मासे, पक्षी, कुत्रे, माकडे या साऱ्यांच्या मेंदूची क्षमता आणि त्याजोरावर ते पूर्ण करू शकतात ती कामं यात वैविध्य आहे. या साऱ्यांना मेंदू आहे की, नाही हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही.

पण मग झाडांचे काय ? ते सजीव आहेत. अर्थातच होय. ते हालचाल करतात ? अर्थातच नाही. ते बोलतात का ? हम्म, नाहीच की ! त्यांना संवेदना आहेत ? वाटत तरी नाही. त्यांना मेंदू आहे का ? जसा प्राण्यांचा मेंदू दिसतो तसा दिसणारा कुठलाच अवयव कुठल्याच वनस्पतीला नाही. तरीही हा प्रश्न अजून का चर्चेत असतो ? का असं वाटत राहतं की झाडांना काहीतरी कळतं. जर मेंदू नाही तर बियाण्याला कसं कळतं की कुठे रुजून यावं ? का लाजाळूचं झाड स्पर्श केल्यावर पान मिटून घेतं ?

Brain-Tree-marathipizza01
everything-pr.com

एक छोटी उजळणी घेऊयात मेंदू काम कसा करतो याची. आपल्या मेंदूमध्ये खूपच खास पेशी (cells) असतात. त्यांना मराठीत चेतापेशी आणि इंग्लिश मध्ये न्यूरॉन (neuron) असं म्हणतात. यांच वैशिष्ट्य हे की, त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडून मिळालेला सिग्नल दूर अंतरापर्यंत नेऊन पोचवू शकतात. या न्यूरॉन्सच्या सीमा कधी-कधी तारेसारख्या एक एक मीटर लांब खेचल्या गेलेल्या असतात. योग्य वेळ आल्यावर त्या एकमेकांशी सिनॅपस (synapse) नावाच्या जंक्शनद्वारे जोडल्या जातात. न्यूरॉन-अ या जंक्शनमध्ये एक माहितीची पुडी सोडतो. ही माहिती म्हणजे जैव रसायने (bio-chemicals) असतात. त्यांना न्यूरोट्रान्समीटर्स (neurotransmitters) असं म्हणतात. न्यूरॉन ब जंक्शन मधून ही माहिती उचलतो. अगदी योग्य तर्हेने आत्मसात करतो. न्यूरॉन ब हा एखाद्या स्नायूशी निगडित असेल तर मग तो त्या स्नायू कडून न्यूरॉन अ ने सांगितलेले काम करून घेतो. जर न्यूरॉन ब न्यूरॉन क शी जंक्शन करत असेल तर तो न्यूरॉन अ चा निरोप न्यूरोन क ला देतो. सिनॅप्स पर्यंत पोचेस्तोवर कुठल्याही न्यूरॉनमध्ये सिग्नल हा विद्युत लहरींच्या रूपात पसरत असतो. हे न्यूरॉनचे जाळे, जे आपल्या शरीराचे सर्व निर्णय घेते ते असले की जीवशास्त्रात म्हणतात – मेंदू आहे !

Brain-Tree-marathipizza02
qbi.uq.edu.au

आता परत येउऊयात वनस्स्पतींकडे. त्यांच्याकडे न्यूरॉन्स नाहीत. रूढार्थाने मेंदू नाही. पण तरीही झाडं निर्णय घेतात. त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कुठे आणि कधी रुजून यावं. पाणी कमी आहे, तापमान अधिक आहे, स्थैर्य नाही मिळालं तर बी वाऱ्याबरोबर , प्राण्याच्या विष्ठेबरोबर, प्रवास करत राहतं. पण रुजून यायचा वायफळ प्रयत्न सुरु करत नाही. नुकत्याच समोर आलेल्या बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या संशोधनात हे दाखवून देण्यात आलं आहे की, वनस्पतींच्या मुळांच्या टोकाशी काही अशा खास पेशींचे दोन गट असतात जे बी रुजावं का नाही याचा निर्णय घेतात. अनुकूल वातावरणात ‘पुढे व्हा’ आणि प्रतिकूल वातावरणात ‘थांबा’ असा सिग्नल देणारे हार्मोन्स (हार्मोन्स हे एक प्रकारचे जैव रसायन असते) या खास पेशी स्त्रवतात. मुळांच्या टोकाशी असलेल्या या पेशींच्या गटाला बियाणांचा निर्णय घेणारा अवयव – म्हणजेच मेंदू याची उपमा देता येऊ शकते. अंतिम निर्णय घेण्यासाठी या दोन्ही गटांनी ‘पुढे व्हा’ म्हणणं गरजेचं असतं.

झाडं काही प्रमाणात अनुभवातून शिकू देखील शकतात. इटली येथील संशोधकांनी २०१५ मध्ये एका सहज आणि सोप्या प्रयोगातून हे दाखवून दिले आहे.आपल्याला लाजाळूचे झाड माहिती असेलच. त्याला इंग्लिश मध्ये touch me not (मला स्पर्श करू नका) असे म्हणतात. या झाडाची दोन्ही नावे अगदी समर्पक आहेत. कुठल्याही धोक्याची/स्पर्शाची जाणीव होताच लाजाळू आपली पाने मिटून घेते. या वनस्पतितंज्ञांनी लाजाळूचे झाड एका मशीनच्या साहाय्याने जमिनिवर पुन्हा पुन्हा साठ वेळेस आदळले. असे करताना झाडाला मुळीच इजा होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. सुरुवातीस आदळल्याच्या धक्क्याने लाजाळू पाने मिटून घेते. पण एकदा तिच्या लक्षात आले, यात काहीच धोका नाही – की त्यानंतर ती स्वतःच्या प्रतिक्रेयेत कायम स्वरूपी बदल करते. हा मशीनचा धक्का तिला पाने मिटून घेण्यासाठी भाग पडू शकत नाही. याला काय म्हणावे ? लाजाळूचे झाड शिकले ! या शिकण्यात पेशी आणि जैव रासायनिक पातळीवर नेमके काय बदल होतात ? इतर वनस्पती इतर गोष्टीदेखील अशा तर्हेने ‘शिकू’ शकतील का ? कोणती घटना घडली हे झाडाला आठवते का ? या व अशा अनेक प्रश्नांची पूर्ण उत्तरं आज आपल्याकडे नाहीत.

Brain-Tree-marathipizza03
duat.wdfiles.com

परंतु झाडाला मेंदू नसला तरी आपला मेंदू करतो त्यातील काही कामं झाडे देखील करतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे समांतर उपाययोजना आहे हे मात्र नक्की !

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?