' पडद्यावर प्रेमाचं सुंदर चित्र रंगविणारी पण पडद्यामागे खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेली सौंदर्यवती! – InMarathi

पडद्यावर प्रेमाचं सुंदर चित्र रंगविणारी पण पडद्यामागे खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेली सौंदर्यवती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक – अनिरुद्ध प्रभु

मरीनड्राईव्हला पूर्वी राणीचा गळ्यातला हार अर्थात Queens Necklace म्हणत असत. त्याच कट्ट्यावर बसून ही गमतीनं म्हणायची की, ती राणी म्हणजे मीच…हे सगळ जे आहे तेही माझंच…अन मनमुराद हसायची.या निखळ हसण्यावरच तर दुनिया फिदा होती.

कधी मूड झालाच तर रात्रीच्या वेळी बसण्यासाठीची तिची ही सगळ्यात आवडती जागा…या जागेबरोबर अजून एक तिला प्रचंड आवडायचं…ते म्हणजे बाबुलालची पाणीपुरी…

त्याकाळी वरळी सीफेसला हा बाबूलाल आणि त्याचा मुलगा भेळ-शेवपुरी-पाणीपुरी वगैरे विकत असत. त्याची पाणीपुरी म्हणजे हिचा जीव की प्राण. अगदी शेवटच्या दोन दिवसातही तिनं ही पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती…

या बाबुलालच्या मुलाला बापाच्या धंद्यात काही रस नव्हता… पण फक्त बाबूलालासाठी तिनं त्याला टाटा समुहात चिकटवल….अशी होती ती…

 

madhubala-marathipizza01
ndtv.com

 

आजही जेव्हा जेव्हा मी मरीन वर जातो तेव्हा हटकून सगळ्यात पहिल्यांदा तरी तीच आठवते. जत्रेतल्या मोठ्या चक्रात…पाळण्यात बसायला तिला खूप आवडत असे.. विशेषत: वहिदाजीं बरोबर….

जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची..

वहिदाजीनी सांगितलं होतं एकदा… आपण या देशातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहोत याचा जराही अभिमान नव्हता तिला. वक्तशीरपणा हा तिचा अजून एक गुण… अस म्हणतात की, तिच्या जाण्या-येण्याच्या वेळेवरून स्टुडिओत लोक घड्याळ लावत असत…

 

madhubala InMarathi

 

अतिशयोक्ती असेल कदाचित पण पूर्ण खोटी मुळीच नाही… या कारणावरून तिनं एकदा देवानंदलाही सुनावलं होत… ती सेटवर आली की, समजायचं ९ वाजलेत अन जाण्याची तयारी करू लागली की, ६ ठोका होईल इतक्यात…

इतकी वक्तशीर की, एकदा सेटवरच्या कुणीतरी म्हटलं की, आज ती लवकर गेली बहुतेक, तेव्हा देव म्हणाला होता,

मिया अपनी घडी देखलो एक बार, छह बज चुके है.

तिचा जन्म १४ फेब्रुवारीचा… म्हणजेच व्हॅलेन्टाइन डेचा… प्रेमाचा दिवस. अन तीच एकंदर आयुष्य बघता या दिवशी तिला कुणी साध गुलाबही  प्रेमानं दिला असेल का याची शंकाच येते…

अवघ्या तेराव्या वर्षी ‘महल’ या चित्रपटामधून अशोककुमार बरोबर जी चित्रपटसृष्टीत आली ती आजपर्यंत आहे… भले ती गेले असेल छत्तीसाव्या वर्षी निघून… दुसऱ्या जगात… पण आजूनही करोडो लोकांच्या हृदयांवर तीच राज्य आहे हे खोट नक्कीच नाही…

 

madhubala 1 InMarathi

 

हावडा ब्रिजमध्ये हसून नटखटपणे “आईयेए ए ए ए ए…….मेहेरबाँ” म्हणणारी ती कोण कशी विसरेल! चलती का नाम गाडीमध्ये किशोरला खुन्नस देणारी अन साडीचा पदर पिळणारी ‘एक लडकी भिगी भागी सी’ मधली ती किंवा मग त्यालाच चिडवत ‘हाल कैसा है जनाब का’ म्हणणारी ती कोण कशी विसरेल..

देवला चिडवत, त्याच्या खोड्या काढत ‘अच्छा जी मै हारी चलो मान जो ना ‘सांगणारी. .अन तिच्या कारकीर्दीचा सर्वोच्च कळस म्हणजे मुघल-ए-आझम… तो तरी विसरू शकू का आपण??

‘मोहे पंघट मे..’ मध्ये हळूच घुंघट उचलणारी अन सलीमला त्याच्या बापासमोर, ‘प्यार किया तो डरना क्या..’ असं खडसावणारी अनारकली विसरू शकतो का आपण?? कितीही ठरवलं तरी नाही.. मुळीच नाही…!!

 

madhubala 2 InMarathi

 

ती अप्रतिम अदाकारा होती… अगदी रंभा-उर्वशीलाही लाजवेल अशी सौंदर्यकाराही होती. ती तशीच राहिली आठवणीत… तिच्या चिरतारुण्याच रहस्य हे तिच्या अकाली जाण्यात आहे…

लहानपणी म्हणे कुणा पिरानं तिच्या बापाला दिल्लीत असताना सांगितलं होतं… ये लडकी है तो लाजवाब, बहुत नाम कमायेगी पर….’ या परवर अताउल्ला पठाणानं त्याला थांबवलं होतं… पण ते सत्य ठरलं. ती गेलीच..

 

madhubala 3 InMarathi

 

अखेरच्या दिवसात एकटी होती. लग्न केलच तिनं पण प्रेम नाही मिळवू शकली… शेवटच्या दिवसात सतत ती स्पुलवर लताची गाणी ऐकत असे… एकदा तर तिनं लताबाईंना बोलावून देखील घेतलं होत. त्यांचा हात हातात घेऊन मनसोक्त रडली होती…हळूहळू तिला भेटणारेही विरळ होत गेले…

 

madhubala 4 InMarathi

 

ती गेली तेव्हा देव न टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलय…

Her smile was veritable celebration of living. She was the beautiful fountain of laughter. She was robust, full of life and energy. One could never conceive that she was ill. She enjoyed her work. She was always laughing. Then out of the blue one day, she disappeared..!

तिला जाऊन आता जवळपास पन्नास वर्ष होत आली.. ती कुठे गेली आहे पण मनाच्या पडद्यावरनं? आजही ती तिथेच आहे की…भले तिचा तो अरेबिअन विला आम्हाला नाही टिकवता आला… भले आम्ही तीची कबरसुद्धा नाहीशी केली पण ती आहेच की आपल्याबरोबर…नेहमीच..!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?