'"क्राईम मास्टर गोगो" मागचा मेहनती, गुणी - शक्ती कपूर

“क्राईम मास्टर गोगो” मागचा मेहनती, गुणी – शक्ती कपूर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

नसीरूद्दीन शाह, परेश रावल, गोविंदा, संजय दत्त, इत्यादी लोक थोड्याफार फरकाने समकालीन म्हणता येतात. पण त्यांच्यात तसं फारसं साम्य आढळत नाही. मग तो त्यांचा करिअर ग्राफ असो, अभिनय असो वा इतर गोष्टी. या सर्वांनाच समकालीन असलेला असाच अर्थाअर्थी काहीच आणखी एक अभिनेता म्हणजे शक्ती कपूर.

शक्ती कपूर तसा नसिर, परेश, वगैरेंसारखा अॅक्टर म्हणून खूप मानला जात नसला तरी तो आणि नसीरूद्दीन शाह ‘एफटीआयआय’मध्ये एकाच बॅचचे विद्यार्थी होते. त्यांच्या बॅचमध्ये अकरा मुलं आणि दहा मुली होत्या, असे तो आजही सांगतो. पण त्यातील फक्त नसिर आणि तो स्वतः, अशी दोघेच चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकले आणि टिकूही शकले. थोडक्यात, स्ट्रगलबाबत खरोखर या लोकांची उदाहरणं अभ्यासण्यालायक आहेत. असो… तो विषय आणखी वेगळा आणि इथे न मावण्यासारखा आहे.

shakti-kapoor-marathipizza-00

एफटीआयआयमधून बाहेर पडल्यानंतर यांचा खरा प्रवास सुरू होतो. मग पदार्पणासाठीचा प्रयत्न, पहिली भूमिका, वगैरे गोष्टींचा शोध सुरू होतो. पण काहीच लोकांना बरेच प्रयत्न केल्यावर चांगली भूमिका मिळते आणि त्याहून कमी लोकं त्या भूमिकेचे सोनं करून दाखवतात आणि याहून कमी लोकं शेवटपर्यंत इंडस्ट्रीत तग धरून राहतात. शक्ती कपूरदेखील अशाच मिळालेल्या पहिल्या भूमिकेचे सोनं करून, शेवटपर्यंत इंडस्ट्रीत टिकून राहिला.

त्याचा जन्म 3 सप्टेंबर 1958 मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय शिवणकाम करणाऱ्या माणसाच्या घरातील आणि त्याचं खरं नाव ‘सुनिल सिकंदरलाल कपूर’. मग त्याचं नाव बदललं कसं?

तर झालं असं की, ‘एफटीआयआय’मधून बाहेर पडल्यावर तो काम शोधत होता. तसं पाहिलं तर त्याला दोन जासूस, दरवाजा, संगम वगैरे चित्रपटांमध्ये लहानसहान रोल मिळाले होते. पण ते फारच लहान होते. अगदी 1979 च्या ‘जानी दुश्मन’ मध्येही तो होता. पण त्याच्या भूमिकेचं स्क्रिप्टमधील नाव होतं – ‘नववधूला घोड्यावरून घेऊन जाणारा नवरा मुलगा’. त्यामुळे त्याला अशा रोलमध्ये कुणी नोटिस केलं असेल असं दिसत नाही. त्यामुळे इंडस्ट्रीत पाचेक वर्षं काम करूनही तो फारसा कुणाला माहित नव्हता.

पण 1980 च्या आसपास सुनिल दत्त त्याच्या मुलाला म्हणजे संजय दत्तला लाँच करायच्या तयारीत होता. त्या रोलमध्ये नेमकी याच सुनिल सिकंदरलाल कपूरची निवड झाली. पण नेमका यातील सुनिलचा रोल निगेटिव्ह आणि व्हिलनचा होता. त्यामुळे त्याला स्क्रीन नेम म्हणून सुनिल कपूर हे नाव शोभणार नाही, असं सुनिल दत्तला वाटलं आणि मग याचं नामकरण शक्ती कपूर करण्यात आलं ते कायमचचं.

याच दरम्यान त्याचा अजून एक चित्रपट येत होता, तो म्हणजे फिरोज खानचा ‘कुर्बानी’. यातही त्याचा निगेटिव्ह रोल असल्याने यातही त्याने शक्ती कपूर हेच नाव लावलं आणि हा चित्रपट राॅकीच्या आधी प्रदर्शित झाला. असा हा शक्ती कपूरचा उदय झाला. आणि आधीपासूनच इंडस्ट्रीत असलेल्या या अभिनेत्याचं हे दमदार पदार्पण झालं.

शिवाय, राॅकीच्या आधी मनमोहन देसाईचा नसीब, वगैरे काही चित्रपटही आलेच होते. पण शक्ती कपूर इंडस्ट्रीला आणि प्रेक्षकांना खरा माहित झाला तो कुर्बानी आणि राॅकीमधूनच.

यानंतर त्याला कधी मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही.

1980 ते नंतरही दोनेक दशकं त्याने किती रोल केले हे त्याला स्वतःला ही सांगता येणार नाही. यात हरतऱ्हेचे रोल होते. मग मुख्य खलनायक, खलनायकाचा मुलगा, वगैरे सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या लांबीचे रोल त्याने केले. काही चित्रपट चालले, काही जोरदार आपटले. पण शक्ती कपूर तसाच तग धरून राहिला. त्याने सगळे नायक पाहिले, सगळ्या नायकांसोबत काम केलं. अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं.

अगदी शत्रुघ्न सिन्हा ते मिथुन चक्रवर्ती सर्व लोक त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना त्यांच्यासोबतही काम केलं. शिवाय, ही सगळी लोकं पुढे जाऊन ऱ्हास होऊन मागे पडली. तरीही त्यांचाच समकालीन असलेला शक्ती कपूर चित्रपटांमधून दिसतच होता. कारण त्याला इंडस्ट्रीत होणार्‍या बदलांची नाही म्हटलं तरी जाण होतीच.

म्हणूनच तर आधी इतके खलनायकी स्वरूपाचे रोल केलेल्या शक्तीने पुढे जाॅनर चेंज केला आणि तो नाइन्टीजनंतर डेव्हिड धवनच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांमधून दिसू लागला. इतकंच काय तर एरवी व्हिलन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याला पहिलं फिल्मफेअर नाॅमिनेशन मिळालं ते विनोदी भूमिकेकरिता आणि त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला तो डेव्हिड धवनच्या ‘राजा बाबू’मधील ‘नंदू’ या विनोदी भूमिकेसाठीच.

आताही तो थोड्याफार फरकाने अशाच विनोदी आणि गेस्ट अपिअरन्स असलेल्या भूमिकांमधून दिसतो. डेव्हिड धवननंतर त्याची ज्याच्याशी खास मैत्री झाली त्या प्रियदर्शनच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये तो हमखास असतो म्हणजे असतोच. आज शक्तीच्या नावावर ज्ञात अज्ञात, उपलब्ध असलेले आणि नसलेले असे सातशेपेक्षा जास्त चित्रपट आहेत. यात प्रत्येक छटा असलेली भूमिका त्याने केली आहे, यात शंकाच नाही. मग तो अगदीच लहान दुय्यम भूमिका असो, की मोठमोठ्या अभिनेत्यांसमोर साकारलेला तगडा व्हिलन असो, वा कारस्थानी मुलगा आणि भाऊ असो. त्याच्या नावावर इतकं सगळं काही असूनही फारसं कुणी त्याविषयी लिहिलेलं आढळत नाही, हे नवलच आहे. कारण त्याच्या नुसत्या चित्रपटांचा जरी उल्लेख केला तरी हजारेक ओळी सहज भरतील.

shakti-kapoor-marathipizza-03

पण बालपणापासून ‘आऊ…’ म्हणणारा ‘अंदाज अपना अपना’मधील ‘क्राइम मास्टर गोगो’ ते ‘नंदू सब का बंधू’ म्हणत ‘राजा बाबू’मधून हसवणारा ‘नंदू’ आणि व्हिलन म्हणून संजय दत्त पासून ते जितेंद्र आणि जॅकी श्राॅफसमोर उभा ठाकणाऱ्या ‘शक्ती कपूर’विषयी थोडं फार का होईना, पण लिहिणं या गोष्टीला मी माझं कर्तव्य नाही तर एका चाहत्याने दिलेलं ट्रिब्यूट समजतो आणि त्यासाठी आजच्या त्याच्या एकोणसाठाव्या वाढदिवसाहून चांगला दिवस कोणता असेल.

पण ही चंदेरी दुनिया, हा रूपेरी पडदा मात्र असा आहे की, काही गुणी हिरे दुर्लक्षित रहातात. काही लोकांचं जन्म झाल्यापासून कौतुक केलं जातं तर काही लोक कधी या रूपेरी पडद्यापासून दूर गेली आणि काही तर थेट काळाच्या पडद्याआड गेली तरी त्यांची दखल घेतली जात नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

One thought on ““क्राईम मास्टर गोगो” मागचा मेहनती, गुणी – शक्ती कपूर

  • September 3, 2017 at 11:13 pm
    Permalink

    Sorry, ha sanaki anti-Maharashtrian & Baikan na ‘upbhogachi vastu’ samjnara aahe.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?