' नितांत सुंदर प्रवासाची गोष्ट : हायवे - एक सेल्फी आरपार

नितांत सुंदर प्रवासाची गोष्ट : हायवे – एक सेल्फी आरपार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

तसं पहायला गेल्यास, तीन चार महिन्यांत एकदा तरी माझा नगर पुणे प्रवास होत असतो. त्यात मी माणूसघाणा किंवा तुटक वागणारा वगैरे प्रकारातील इसम असल्याने मी शक्यतो तरी एसटीतून, कानात हेडफोन घालून प्रवास करतो. अगदी कधीतरीच आणि क्वचित का होईना पण प्रायव्हेट गाडीनेही प्रवास होतोच. मग अशा वेळी मला हेडफोन न घालता, गाडीत बसलेल्या इतर लोकांचा संवाद ऐकायला आवडतं. म्हणजे या संवादात अगदी काहीही गोष्टी असतात. कुणीतरी आपल्या जीवनातील काहीतरी प्रसंग सांगतोय, कुणीतरी फोनवर बोलतोय, हायवेवर एखादा अचानक समोर आल्यावर ड्रायव्हर शिव्या देतोय, वगैरे. एखादा म्हणेल यातून काय मिळतं? यातून तसं काहीच मिळत नाही किंवा काही मिळणं हा इथे उद्देशच नसतो. हटकून का होईना, पण आपल्याला काही गोष्टी कळतात. शेजारी बसलेल्या व्यक्तीविषयी प्रश्न पडतात. कधी त्याची उत्तरं मिळतात तर कधी नाही आणि उत्तरं शोधूनही काहीच मिळणार नसतं. कारण, आपल्याला ना तो व्यक्ती लक्षात राहणार असतो ना त्याची व्यथा. पण कधीतरी तितक्या एका क्षणापुरता का होईना, आपल्याला त्याच्या आयुष्यात रस निर्माण होतो, हे नक्की.

थोडक्यात दोन वेगवेगळ्या शहरांना जोडणारा हा कित्येकांच्या प्रवास आयुष्यातील दोन निराळी टोकं जोडतो. कारण, कधी जे विचार मनात असताना प्रवास सुरू होतो त्याच्या उलट भावना मनात असताना शेवट होतो, तर कधी याहून वेगळे काहीतरी होते. असा प्रवास प्रत्येकाच्याच जीवनात कधी ना कधी घडत असतो आणि हा प्रवास आपल्या प्रत्येकाच्याच जगण्यातील एक अटळ हिस्सा असतो. ज्यात कितीतरी किस्से, घटना, विचार, वगैरेंची सरमिसळ असते. हा प्रवास प्रत्येकाला एक वेगळंच आणि नवं काहीतरी देऊन जातो.

आणि अशाच नितांत सुंदर प्रवासाची गोष्ट म्हणजे उमेश आणि गिरीश या कुलकर्णी द्वयीचा हायवे.

highway-marathi-movie-marrathipizza01
madaboutmoviez.files.wordpress.com

तसं पहायला गेल्यास, हायवे – एक सेल्फी आरपार या चित्रपटाची कथा फार सोपी आहे. म्हणजे काही लोक अदमासे एकाच वेळी मुंबई-पुणे प्रवासाला निघाली आहेत. अर्थात ही सगळी माणसं एकाच गाडीत आहेत, असंही नाही. तर प्रत्येक जण वेगवेगळ्या वाहनातून जातोय. पण त्यांचा प्रवास एकाच दिशेने चालू आहे.

तर या प्रवासात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या खऱ्या हायवेवर जशी अनेक वळणं येतात, अनेक लहान मोठी गावं जोडली जातात, तसंच या हायवेबाबत होतं. म्हणजे सुरूवातीला आपल्याला काही मेजर म्हणता येतील अशी पात्रं एकापाठोपाठ एक दिसून जातात. पहिली काही मिनिटं तर वेगवेगळ्या ठिकाणी असलेली ही माणसं दाखवण्यातच जातात.

मुळात यात पात्र इतकी आहेत की, प्रत्येकाविषयी लिहीत बसलं तरी अर्ध्याहून अधिक लेख तयार होईल. त्यामुळे अगदी थोडक्यात त्यातील मेजर म्हणता येतील अशा पात्रांबद्दल बोलू. या पात्रांमधील एक एन. आर. आय. (गिरीश कुलकर्णी) जोडली आपले वडील आजारी असल्याने त्यांना भेटायला हाॅस्पिटलमध्ये चालला आहे. जुनाट विचारांच्या, सतत देव देव करणाऱ्या गरोदर पत्नीवर (वृषाली कुलकर्णी) वैतागलेला कॉर्पोरेट एक्झिक्युटीव (सुनील बर्वे) आहे. ज्याच्या नोकरीतील आयुष्य आणि धावपळीचा आणि सततच्या चिंतेचा त्याच्यावर इतका प्रभाव आहे की, तो आपलं वैयक्तिक आयुष्य जणू विसरून गेलाय. राजकारण्यांच्या फन्ड रेझरमधे सहभागी व्हायला चाललेली टिव्ही तारका (हुमा कुरेशी) आपल्या व्यवसायात ती कितीही यशस्वी असली, तरी वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड देत आहे. वेश्याव्यवसायातल्या एका युवतीला (मुक्ता बर्वे) आपल्या आधीच्या उद्ध्वस्त आयुष्यातून बाहेर पडायचंय. उच्चभ्रू वर्गातील एका श्रीमतीचं (टिस्का चोप्रा) सेक्स लाईफ डिस्टर्ब आहे आणि ती या सगळ्यातून वाट शोधत, आपल्या एकटेपणाला दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

शिवाय, पुढील कथानकात येणार्‍या अपघाताच्या पार्टनंतर एन. आर. आय.च्या गाडीत जबरदस्तीने बसवून दिलेलं जोडपं आहे. ज्यातील पतीच्या (विद्याधर जोशी) पायाला बरंच लागलं आहे आणि तो सतत बडबड करतोय. तर याउलट त्याची पत्नी (किशोरी शहाणे) बरीच शांत आहे आणि सगळं काही सहन करतेय. याशिवाय पुढे कथानकात इतरही अनेक पात्रं इन्ट्रोड्यूस होत राहतात.

highway-marathi-movie-marrathipizza02
i1.wp.com

नंतर या प्रत्येकाच्या प्रवासामागील काही ना काही उद्देश समोर येतो, तर काही ठिकाणी त्या माणसाविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टींची उकल होते. शिवाय, आपल्याला प्रत्येकाच्या स्वभावाविषयी अगदी लहानसहान गोष्टींमधून सांगण्यात येते. म्हणजे अगदी सुरूवातीलाच आपली बायको लिफ्टमध्ये अडकल्यानंतर आधी खूप सेन्सिबल वाटणारा, तिच्या काळजीनं वाॅचमॅनवर ओरडणारा ”नंतर ती बाहेर आल्यावर मात्र फोनवर ऑफिसच्या कामाबद्दल बोलत बसतो. यातून त्याच्या स्वभावाविषयी थोडी पण महत्त्वाची माहिती कळते. हेच इतर पात्रांबाबत होते. आपल्याला फक्त काही घटनांमधून पात्राकडे ड्राइव्ह केलं जातं. त्याच्याबद्दल काहीतरी सजेस्ट केलं जातं. थोडक्यात, इथे आपणही या कथानकाचा एक भाग बनून जातो. आणि निव्वळ एकतर्फी संवाद न होता कुठेतरी आपणही या प्रोसेसचा एक भाग बनतो.

या सबंध हायवेच्या कथानकात अगदी बारीक पाहत बसलं तर अकरा वेगवेगळे सबप्लाॅट्स आहेत आणि याहून कितीतरी जास्त पात्र आहेत. मग या पात्रांविषयी लेखक आपल्याला दरवेळी काहीतरी सांगतोच असे नाही. कधी सांगतो तर कधी सांगत नाही. पण याने तसं पाहिल्यास काहीसा फरक पडतो. कारण, आपल्याला त्या पात्राविषयी जे सांगायचं आहे ते तर सांगण्यात आलेलचं असतं. मग अगदी त्याच्या भूतकाळात डोकावण्याची गरज पडत नाही. तर अगदी लहानशा सजेशनमधूनही सांगण्यात येतं.

चित्रपटातील फर्स्ट हाफमधील बहुतांशी भाग याच पात्रांचं इन्ट्रोडक्शन आणि कथानकात त्यांना सामील करून घेण्यातच जातो. नंतर हळूहळू यातील सबप्लाॅट्स उलगडत जातात. एकेक कहाणी आपल्यासमोर मांडण्यात येते. त्यात आपल्यालाही सामील करून घेतलं जातं. आपण या प्रवासाचा एक भाग बनतो. कधी आपल्याला त्या पात्राविषयी अजून काहीतरी जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण होते, कधी आपण त्यातील एखाद्या पात्राला रिलेट होतो तर कधी आपल्याला त्यातील एखादी घटना रिलेट होते.

शिवाय, यातील प्रत्येक पात्र मग ते अगदी लहान असो की मोठं, ते चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश आणि एक्स्प्लोर झालेले आहेत. मग ते नागराज मंजुळेचं लहानसं पण महत्त्वाचं असलेलं पात्र असो किंवा किशोर चौगुलेचं पात्र असो. शिवाय, प्रत्येक पात्र संवाद, संभाषण शैली हे त्याच्या आयुष्याबद्दल जास्त काहीतरी सांगून जातात. मग ही गोष्ट श्रीकांत यादवच्या राजकीय कार्यकर्त्याच्या पात्राबाबत जास्त प्रकर्षाने जाणवते. त्याच्या संवादातून कधी त्याची घालमेल स्पष्ट होते तर कधी त्याचा वरिष्ठांवरील राग व्यक्त होतो. अगदी ट्रॅफिक पोलिस म्हणून पाचेक मिनिटांकरिता येणारा प्रवीण तरडेही ज्या कमालीचा लिहिलाय आणि साकारलाय की त्याविषयी बोलणेच नको. शिवाय, कधीकधी तर प्रत्येक पात्र हे निव्वळ रिअर व्ह्यू मिररमध्ये दिसणाऱ्या नजरेच्या एका कटाक्षातून बोलून जाते. मग ड्रायव्हर सीटवर बसलेलं उमेश जगतापचं पात्र असो की दुसर्‍या एका गाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेलं निपुण धर्माधिकारीचं पात्र असो.

मुळात या व्यक्तिरेखा लिखाणातच इतक्या सहजतेने आणि ताकदीने उतरल्या आहेत की विचारणेच नको आणि त्यात पुन्हा यातील कलाकारांनी समरसून केलेलं काम म्हणजे ती व्यक्तिरेखा जिवंत करण्यात त्यांना आलेलं यश आहे. यातील जवळपास प्रत्येक पात्र हे ‘दि गाय नेक्स्ट डोअर’ (The guy next door) या संकल्पनेला पुरेपूर न्याय देतं.

highway-marathi-movie-marrathipizza03
cloudfront.net

मध्यांतर होईपर्यंत बहुतेक सर्व पात्र आपल्यासमोर आलेली असतात. प्रत्येक पात्राची बॅकस्टोरी आपल्यासमोर मांडलेली असते. त्यांच्या पुढील प्रवासाबद्दल आणि एकूणच आयुष्यातील ध्येयाबद्दल आपल्याला कळालेलं असतं. प्रत्येक उपकथानकामुळे आपल्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात. आपण कुठेतरी या सगळ्या पात्रांमधील समान दुवा शोधत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच वेळी, एकाच कथेतून दाखवल्या जात आहेत म्हणजे नक्की कुठेतरी या जोडलेल्या असणार, असे विचार आपल्या मनात चालू असतात. त्यामुळेच, ही सगळी पात्रं एकत्र येणार का? किंवा आली तरी कशी येणार? वगैरेंबद्दलही आपण विचार करत असतो.

या सगळ्या प्रश्नांविषयी आपल्याला मध्यांतरानंतर कळायला लागतं. हळूहळू काय होतंय ते उलगडायला लागतं. चित्रपटाचा प्रवास कुठे चालू आहे ते कळायला लागतं. यात एखाद्या ‘हॅप्पी एंडिंग’ चित्रपटाप्रमाणे सगळी पात्रं एकत्र येण्याची शक्यता हळूहळू कमी होत जाते आणि आपण शेवटाकडे कूच करू लागतो.

मध्यांतरापूर्वी आपल्याला पडलेले प्रश्न हळूहळू शिथिल होत जातात. कारण एका पाॅइंटला येऊन आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधणं थांबवतो. आपण फक्त समरस होऊन, समोरील पात्रांचा प्रवास पाहत राहतो. आपण त्यांचा प्रवास अनुभवत राहतो आणि त्याचाच एक भाग बनून जातो. मध्यंतरानंतरचा बहुतेक भाग तसा एका ट्रॅफिक जॅमचा भाग आहे. त्यामुळे यातील गुंतागुंत, पहिल्या भागाच्या सुरूवातीला असलेले एकदम पटापट होणारे कट्स, फास्ट पेस्ड कथानक, वगैरे गोष्टी शिथिल होत जातात.

जर ‘हायवे’ जीवनाचं रूपक मानला तर एखाद्या गोष्टीमुळे जीवनात येणारा संथपणा आणि एक हलकासा पाॅज आपल्याला या ट्रॅफिक जॅमच्या रूपाने दिसतो. पण या जॅममध्ये यातील सबप्लाॅट्स अधिकच खुलत जातात आणि क्लायमॅक्सच्या दिशेने प्रवास सुरू होतो.

शेवटी तसं पहायला गेल्यास आपल्याला आणि यातील पात्रांना आधी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतातही आणि नाहीही. पण ते इथे महत्त्वाचं ठरत नाही. कारण, इथे महत्त्वाचा ठरतो तो हा प्रवास आणि या प्रवासातील काळात घडणाऱ्या घटना. मग त्या घटना अगदी प्रत्येक व्यक्तिरेखेचं आयुष्य बदलवून टाकतील अशा नाहीत, किंवा अगदीच महत्त्वाच्या नाहीत असंही नाही. प्रत्येक घटना फक्त त्या प्रवासाचा आणि त्या पात्राच्या आयुष्याचा भाग आहे. मग त्यावर प्रत्यक्ष प्रभाव पडो अथवा अप्रत्यक्ष. ती घटना या प्रवासात आहे, हे महत्त्वाचं.

क्लायमॅक्स आणि एकूणच चित्रपट हा तसं पाहिला तर संथ आणि तरल आहे, पण तो तितकाच फास्ट पेस्ड आहे. मग तो कथानकाबाबत असो की, सुरवातीला आपल्याला पडद्यावर दिसणाऱ्या उत्तम आणि जलद कट्सबाबत. हायवे हा चित्रपट त्याच्या नावातच सगळं काही सांगून जातो. हा चित्रपट त्याच्या नावाला आणि ‘एक सेल्फी आरपार’ या टॅगलाइनला पुरेपूर जस्टिफाय करतो.

याचा शेवट या कथानकाला एक पूर्णत्व आणतो. तो कुठेही तोकडा पडत नाही. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचं चित्रपटात असणं, या गोष्टीलाही न्याय देतो. शिवाय त्या व्यक्तिरेखेच्या बॅकस्टोरीलाही न्याय देतो.

यातील पात्रांचा प्रवास सुरूच राहणार असतो. पण आयुष्यातील हे जे स्थित्यंतर येतं ना ते स्थित्यंतर महत्त्वाचं, ही गोष्ट पुन्हा अधोरेखित होते. त्यांचा प्रवास थांबत नाही. कारण ते शक्य नाहीच. पण यातील शेवटाला पोहोचल्यावर त्यांना कुठेतरी एक विसावा मिळतो आणि हा विसावा इथे महत्त्वाचा ठरतो.

highway-marathi-movie-marrathipizza04
justmarathi.com

हा चित्रपट अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये मोडतो, की ज्याचा ट्रेलर चित्रपट पाहून झाल्यावरही आवर्जून पहावा असा आहे. कारण याच्या ट्रेलरमध्ये काही सुंदर संकल्पना मांडलेल्या आहेत. ज्या आपल्याला चित्रपटाविषयी आणि आशयाविषयी थोडंसं सूचित करतात. पण आपल्याला चित्रपट पाहिल्यावर खऱ्या अर्थाने त्या संकल्पनांचा खरा अर्थ लक्षात येतो. मग यात जर्नी ऑफ लाइज (Journey of lies), जर्नी ऑफ हॅपिनेस (Happiness), वगैरे गोष्टी येतात, ज्या ट्रेलरमध्ये हिंटम्हणून वापरल्या गेल्या आहेत. चित्रपट पाहून त्या उलगडतातच. पण त्याहून अधिक एक्स्प्लोर होतात. आपल्याला या गोष्टी सहज सापडत नाहीत. आपण त्या शोधतो, त्यांच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्या हाती जे लागतं ते आपल्यादा फक्त एक कलाकृती पाहण्याहून जास्त काहीतरी समाधान देतं, ते आपल्याला तिचा भाग बनवून टाकतं.

हायवे तसं पहायला गेल्यास फिलाॅसाॅफिकल वळणाचा आहे. यात अनेक रूपकं दडलेली आहेत. अर्थातच ती लगेच कळतात असंही नाही. दरवेळी पाहताना आपल्यालाच ती जाणवतात, लक्षात येतात. थोडक्यात, दरवेळी हा चित्रपट आपल्याला काहीतरी देऊन जातो आणि दरवेळी हे वेगळं काहीतरी देऊन जाण्यातच तर हायवेचं वेगळेपण दडलेलं आहे. तसंही एक दर्जेदार कलाकृती या बिरूदाला न्याय देण्यासाठी याहून वेगळी व्याख्या ती काय करता येईल?

MarathiPizza.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?