'मुंबई का बुडते? बुडू नये ह्यासाठी काय करावं? : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय

मुंबई का बुडते? बुडू नये ह्यासाठी काय करावं? : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : अॅड. गिरीश राऊत, निमंत्रक : भारतीय पर्यावरण चळवळ / वसुंधरा आंदोलन

===

पावसाने मुंबईकरांचे खुप हाल झाले. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढली व मुंबईपासुन दूर असलेल्यांना देखील याचा फटका बसला.

या दुर्घटनेची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ.

मुंबईच्या सन १९६४ च्या विकास आराखड्यातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल. मात्र मुंबईच्या काँक्रिटीकरणामुळे हे गृहित मोडले गेले आहे.

सन १९९८-९९ सालात आलेला बृहन्मुंबई महानगर पालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० % काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही.

६४ च्या पहिल्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन क्रीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी. परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की,

मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण आता फक्त ०.०३ एकर एव्हढेच उरले आहे. त्यानंतरच्या काळात ते किती कमी झाले असेल त्याची वाचकांनी कल्पना करावी.

मुंबई, सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे याचे कौतुक केले जाते. या प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली. त्याचबरोबर महापूराकडे वाटचाल होत राहिली.

mumbai-marathipizza01
iucn.org

मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनि:स्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या पाणी बाहेर सोडणाऱ्या मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती.

तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पूराच्या दिशेने वाटचाल झाली.

उदा. वांद्रे पूर्व व पश्चिमेच्या सरकारी वसाहती, नरिमन पॉईंट, लोखंडवाला काँम्प्लेक्स, पश्चिम उपनगरांचे भराव, वांद्रे – कुर्ला संकुल, इत्यादी भराव.

यातील शेवटच्या ‘वांद्रे – वरळी’ सागरी पुलाच्या मिठी नदीला गाडणाऱ्या भरावाने व खांबांनी मुंबईसाठी एका मोठ्या दुर्घटनेची व्यवस्था करून ठेवली आहे.

उत्तरेकडील बोरिवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तीनही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासुन ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळपर्यंत,

पूर्वेला घाटकोपरच्या तीन खाडी टेकड्यांपासुन ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज, सांताक्रूझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतुन माहीमच्या खाडीत येते.

या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव (त्यापैकी सुमारे ७०० एकर मॅनग्रोव्ह गाडून) करून नष्ट केली गेली.

तेथून ते माहीम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहीम काॅजवेच्या पुलाखालून पुढे माहीमच्या उपसागरात येणाऱ्या प्रभादेवी, दादर – शिवाजी पार्क, माहीम व वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला सी लिंक प्रकल्प अडवतो.

माहीमची खाडी व माहीमचा उपसागर हे मिठी नदीच्या मुखाचे, मॅनग्रोव्हचे जंगल असलेले शहराच्या गाभ्यातील क्षेत्र हा मुंबईची मूळ बेटे आणि उपनगरे यामधील दुवा आहे. शहराच्या जीवनरेखा असलेल्या तीनही रेल्वे माहीमच्या खाडीच्या खाजण क्षेत्रातून जातात.

पूराच्या दुर्घटनांच्या निवारणाच्या द्रृष्टीने तो अतिशय महत्वाचा आघातशोषक आहे. परंतु याची जाणीव नियोजनकर्त्यांना नाही.

mahim-creek-marathipizza
wikimedia.org

केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे बुडत आहेत. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे.

२६ जुलैला ‘मुंबई’ त्यानंतर २८ ऑगस्टला ‘न्यू ऑर्लीन्स व त्या पाठोपाठ ‘शांघाय’ सन २००५ मध्ये बुडाली.

सध्या अमेरिकेत ‘ह्यूस्टन’ शहरासह पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे ‘हार्वे’ नाव दिलेले अभूतपूर्व अतिवृष्टी करणारे ताशी सुमारे २४० किमी वेगाचे चक्रीवादळ या आठवडाभरात दोनदा आदळले.

अशावेळी खाड्या खाजणे नदीमुखे भरावाखाली गाडण्याची व सागरी रस्ते व भुयारी रेल्वे रस्ते करण्याची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे.

तापमानवाढ अनियंत्रित होत आहे. महासागरांचे पाणी आणि पर्वत व धृव प्रदेशांवरील बर्फाची वाढत्या प्रमाणात वाफ होत आहे. वातावरणातील हजारो वर्षांची रूढ अभिसरण पध्दती मोडली आहे.

प्रचंड प्रमाणावरील वाफेचे अनियमित वितरण होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होताना ऐतिहासिक स्वरूपात अनेक महिने वा वर्षांत होणारा पाऊस एका दिवसात किंवा काही तासांत पडत आहे. त्याला वादळाची साथ मिळाल्यास जणू प्रलय होत आहे.

शहरे ‘उष्णता बेट’ परिणामामुळे कमी दाबाचा पट्टा तयार करून याला आमंत्रण देत आहेत. बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या सागराच्या पातळीतील वाढीमुळे मुंबई न्यूयाॅर्कसह जगातील सर्व किनारपट्ट्या येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत.

आपल्याकडे मात्र तापमानवाढीला आणि वेग देणाऱ्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याच्या चर्चा जोरात चालू आहेत. आमचे उद्योग व वित्तीय क्षेत्र भ्रमात आहे. जणू ते मुंबई नावाच्या एका वेगळ्या ग्रहावर आहेत.

प्रसारमाध्यमे हितसंबंधामुळे किंवा त्यांचा भाग असल्यामुळे याला हातभार लावत आहेत.

आपले हित अर्थव्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानकेंद्री जीवनशैली जपण्यात नसून जीवन जपण्यात आहे, हे या सर्वांनी वेळ न गमावता लक्षात घ्यावे.

मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. नासाने व युनोच्या ‘आय पी सी सी’ ने हे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईचा काँक्रिटीकरणरूपी विकास थांबवायला हवा. मेट्रो प्रकल्प व त्यातही ‘मेट्रो – 3’ हा भुयारी रेल्वे प्रकल्प व ‘सागरी रस्ता’ हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज आहे. माती व मान्सूनपेक्षा मोटारींना महत्व देणे ही चूक आहे.

कारच्या टायरना माती लागू नये म्हणून बहुतेक इमारती व सोसायट्यांमधील जमीन काँक्रीट वा लाद्यांनी आच्छादली जाते. हे संकटाला निमंत्रण आहे.

वांद्रे – कुर्ला संकुल मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वांत खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये म्हणून त्याची व त्यातील रस्त्याची उंची वाढवली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील कलानगर, सरकारी वसाहत इ. भाग खालच्या पातळीला गेले.

तेथील इमारतींच्या तळ मजल्याच्यावर रस्त्याची पातळी आहे. असाच प्रकार सागरी रस्त्यामुळे पूर्ण मुंबईबाबत घडणार आहे. मुंबईतील पाणी बाहेर पडणार नाही. असा रस्ता म्हणजे देखील दुर्घटनेला समजुन उमजून आमंत्रण आहे.

आम्ही वरळी-वांद्रे सागरी पुल प्रकल्पाविरूध्द प्रखर आंदोलन केले. वांद्रे भूशिराच्या अलिकडे समुद्रात क्रेनमधुन टांगलेल्या एक-दोन टन वजनाच्या मोठ्या दगडांखाली सतत आठ-दहा दिवस होड्या व बोटी लावुन भराव थांबवला.

मुंबई वाचवण्यासाठी वांद्रे व वरळी या भूशिरांमधील भागांत भराव करू दिला नाही. माहीम काॅजवेच्या पश्चिमेकडील मिठी नदीला अडवत असलेला भरावाचा काही भाग व सागरी पातमुख प्रकल्पाच्या भिंती काढुन टाकावयास लावल्या.

माहीमच्या खाडीत झोपडपट्ट्या करण्याचे प्रयत्न थांबवले. म्हणून मिठी नदी बर्‍याच प्रमाणात मोकळी झाली व मुंबईची जलसमाधी टळली. २६ जुलै २००५ च्या दुर्घटनेत होणारे लाखो लोकांचे मरण टळले. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.

mumbai-rain-marathipizza
livemint.com

मुंबईला आता doing ची नसून undoing ची गरज आहे. सी लिंक प्रकल्प मुंबईसाठी संकट आहे. तो बंद करून काढून टाकावा. माहीम काॅजवे ते वांद्रे भूशिरापर्यंत केलेला भराव व त्यावरील रस्ता (येथे पूल बांधला नाही) हा मागास व हास्यास्पद आहे.

त्यामुळे भरत्या मुंबईच्या पर्जन्यवाहिन्यांमधुन उलट शहरात शिरतात. पूर्ण वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) मिठी नदीच्या मूळ प्रवाहासह सागराच्या भरती व ओहोटी रेषांमधील क्षेत्राला गाडून उभे आहे.

अशा स्थितीत सर्व नाले, नलिका स्वच्छ आहेत अशी कल्पना केली तरी मुंबई बुडणार आहे. सर्व शहर जलमय झाल्यावर पंप काय कामाचे. साठलेले पाणी एका ठिकाणी उचलून टाकणार कोठे ?

बीकेसी मधील इमारती न बांधलेला भरावाचा भाग तर तातडीने काढून टाकावा. जमिनीच्या किंमतीचा विचार करू नये. कृपया याला नकारात्मक विचार समजू नये.

हा ज्ञानावर आधारित वास्तवाचे भान ठेवणारा, जीवनाची व ते देणाऱ्या पृथ्वीची जपणुक करणारा पूर्ण होकारात्मक विचार आहे. आम्ही सर्व जे काम करतो ते नकारात्मक निराशावादी विचाराचा माणुस करू शकत नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.

तापमानवाढीचे सतत भान हवे. दर वर्षी १/५° से म्हणजे पाच वर्षात १°से अशी इतिहासात कोट्यावधी वर्षांत न झालेली अभूतपूर्व वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत आहे. फक्त येत्या ४-५ वर्षांत सन १७५० च्या तुलनेत २° से ची वाढ होत आहे.

मानवजात वाचविण्यासाठी केलेला ‘पॅरिस करार’ अयशस्वी ठरत आहे. भविष्यातील वादळांची व अतिवृष्टीची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे.

विकासाच्या संमोहनातुन तात्काळ बाहेर पडणे आवश्यक आहे. मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

तरच कार्बनचे उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश थांबेल. तसे केले नाही तर औद्योगिकरण कोसळण्याच्या प्रक्रियेबरोबर जीवनही नष्ट होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?