'कवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही!

कवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

आज (30 ऑगस्ट) शंकरलाल केसरीदासचा जन्मदिन. तर हा शंकरलाल केसरीदास म्हणजे आपला गीतकार शैलेंद्र. तोही बऱ्याच जणांना माहित नसण्याची शक्यता आहेच. तसा शैलेंद्र जरा उपेक्षितच राहिला. मजरूह सुल्तानपुरीला बाॅलिवुडमधील पेईंग गेस्ट म्हणतात. पण, शैलेंद्र खरा पेईंग गेस्ट. तसं पहायला गेल्यास, तो तुमच्या आमच्या का लक्षात रहावा? तो गुलजार, जावेद अख्तर, वगैरे कुठे होता.

kesaridas-marathipizza01
dnaindia.com

मुळात त्याचा जन्म रावळपिंडीला झाला. काॅलेजमधील काळापासूनच तो कविता करू लागला. 1941 मधील ‘साधना’मध्ये त्याची एक कविता प्रसिद्ध झाली. यानंतर बऱ्याचशा नियतकालिकांतून त्याच्या कविता प्रकाशित होऊ लागल्या. त्याच्या या कविता स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याने, त्या अर्थातच ब्रिटिश सरकारविषयीच्या त्याच्या मनातील भावना, देशप्रेम, इत्यादींनी ओतप्रोत होत्या.

पुढे 1947 मध्ये तो मुंबईत आला. या काळात त्याने भारतीय रेल्वेत कामाला सुरुवात केली. याच काळात त्याला कामगार, त्यांचे होणारे शोषण, इत्यादी गोष्टी छळू लागल्या. हेच विचार त्याच्या कवितांमध्ये दिसू लागले. याच काळात त्याची ओळख साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी झाली. तो ‘इप्टा’ या सांस्कृतिक संस्थेचा सदस्य झाला. त्याच्या कविता तो ‘इप्टा’च्या मंचावरून ऐकवू लागला. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले पण फाळणीच्या झळा सर्वांना बसत होत्याच. यावरील कवितांमधून शैलेंद्र अप्रतिमरित्या व्यक्त होत होता. याच काळात त्याने ‘जलता है पंजाब साथियों’ यासारख्या अनेक कविता लिहिल्या. याच काळात त्याची कविता फिल्म इंडस्ट्रीला खुणावत होती.

त्याला मिळालेली पहिली ऑफरही नाट्यपूर्ण वाटावी अशीच आहे. ती साधारण अशी-

1947 च्या दरम्यान शैलेंद्र एका मुशायऱ्यामध्ये ‘जलता है पंजाब’ ही कविता ऐकवत होता. ती कविता राज कपूरला आवडली. मग, त्याने ती कविता त्याच्या 1948 मधील ‘आग’साठी पाहिजे असल्याचं कळवलं. म्हणेल ती किंमत देण्याची तयारी दर्शविली. पण, तो शैलेंद्र होता. त्याने ‘राज कपूर’ला नकार दिला! पण, काही दिवसांनी त्याच्या पत्नीच्या प्रेग्नन्सीमुळे त्याला पैशांची गरज भासली. तो राज कपूरकडे गेला व पैशांची मागणी केली. राजने त्याला 500 रूपये राॅयल्टी देऊन, 1949 मधील ‘बरसात’साठी दोन गाणी लिहून घेतली. ती होती – ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ आणि ‘बरसात में हमसे मिले तुम…’. हिंदीतील एक उत्तम गीतकार इंडस्ट्रीत आला होता, पण त्यामागील कारण असं नसतं तर चांगलं झालं असतं, असं वारंवार वाटत होतं. पण, ज्या गोष्टी शैलेंद्र नाकारायचा त्याच त्याच्या आयुष्यात फिरून फिरून यायच्या, हे दरवेळी व्हायचं. हेदेखील त्यापैकीच एक.

kesaridas-marathipizza02
hobbyshobby.com

‘बरसात’ला शंकर जयकिशनने संगीत दिलं होतं. शिवाय, राज कपूर आणि शंकर-जयकिशन यांची जोडी प्रसिद्ध होतीच. यातच शैलेंद्रचं काम आवडल्यानं 1951 मधील ‘आवारा’साठीही गाणी लिहिण्याची संधी त्यालाच मिळाली. शैलेंद्रने या संधीचं सोनं तर केलंच. शिवाय, आवारा आणि त्याची गाणी दोन्ही हिट झाले.

या काळात बऱ्याचदा संगीतकारच गीतकार ठरवत असत. त्यामुळे शंकर-जयकिशन यांनी शैलेंद्रची शिफारस करण्याचं वचन त्याला दिलं होतं. पण पुढे जाऊन ते ही गोष्ट विसरले. अशातच शैलेंद्रने त्यांना ”छोटी सी यह दुनिया, पहचाने रास्ते है, कही तो मिलेंगे, तो पूछेंगे हाल” अशा ओळी लिहून पाठवल्या. त्यांना त्यातील अर्थ कळाला आणि त्याला त्यांनी पुढील ‘रंगोली’ चित्रपटाच्या गाणी लिहिण्याची संधी मिळवून दिली. यानंतर त्याची गाडी बऱ्यापैकी रूळावर आली.

त्याने राज कपूरसोबतच बिमल राॅय, देव आनंद, इत्यादींसाठी काही अप्रतिम गाणी दिली. शिवाय, एस्. डी. बर्मन, रवी शंकर, इत्यादी संगीतकारांसोबत काम केले. त्याची – प्यार हुआ इकरार हुआ, मेरा जूता है जापानी (श्री 420), आज फिर जीने की तमन्ना है, गाता रहे मेरा दिल, पिया तोसे नैना लागे रे, क्या से क्या हो गया (गाईड), दोस्त दोस्त ना रहा (संगम), किसी की मुस्कुराहटों पे (अनारी), खोया खोया चाँद (काला बाजार), ही आणि अशी कित्येक गाणी खूप प्रसिद्ध झाली. तरीही तसं पहायला गेल्यास, तो या चित्रपटसृष्टीत जरा उपेक्षितच राहिला. अनेक हिट गाणी मिळूनही आर्थिक दारिद्र्य शेवटपर्यंत त्याच्या माथी मारलं गेल्यासारखं त्याचा पिच्छा पुरवत होतं.

काही दिवसांपूर्वीच त्याच्या शेवटच्या दिवसांबद्दल नव्हे तर वर्षांबद्दल बरंच काही ह्रदय हेलावून टाकणारं ऐकलं होतं. त्याचे संदर्भ आता आठवत नाहीत. पण, 1961 मध्ये त्याने ‘तीसरी कसम’मध्ये बरीच गुंतवणूक केली. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नको तितका लांबला. अखेर तो 1966 ला प्रदर्शित झाला. त्याला नॅशनल अवाॅर्ड मिळालं. मात्र, तो व्यावसायिकरित्या सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे शैलेंद्रचं नुकसान झालंच. शिवाय तो मद्याच्या आहारी गेला आणि वयाच्या पंचेचाळीशी आतच,14 डिसेंबर 1966 ला त्याचं निधन झालं.

मुळात शैलेंद्रला प्रसिद्धी आणि पैसा या दोन्हींचा हव्यास नव्हता. त्यामुळे त्याला कशाचीच चिंता नव्हती. तो फक्त त्याच्या लेखणीतून त्याचे शब्द उतरवणे इतकंच आपलं कर्तव्य म्हणा किंवा आवड म्हणा, तो हीच गोष्ट जपत होता. त्याच्याकडील सर्वांत मौल्यवान गोष्ट म्हणून त्याच्या प्रसिद्धीच्या काळातही निव्वळ त्याची लेखणी आणि शब्द इतकेच काय ते सापडले असते.

kesaridas-marathipizza03
songsofshailendra.files.wordpress.com

शिवाय, त्याच्यामध्ये एक प्रतिभाशाली कवी दडलेला होताच. अफाट शब्दसंपदा, आणि काव्यरचनेसाठी तो प्रसिद्ध होताच. शिवाय, कमीत कमी गाणी लिहूनही सर्वांत जास्त प्रसिद्ध असलेल्या मोजक्या गीतकारांपैकी तो एक आहे. शिवाय तो विद्रोही, क्रांतिकारी कवितांसाठी प्रसिद्ध होताच. अशाच कवितेमुळे तर तो बाॅलिवुडमध्ये आला. पण त्याच्या या विद्रोहात, त्याच्या या बंडात एक तळमळ होती. सोबतच उद्यासाठीची एक आशा होती. त्याच्या बहुतांशी कविता आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. गीतकार असो वा कवी, दोन्ही म्हणून तो अप्रतिम असूनही जरा उपेक्षितच राहिला.

तीन फिल्मफेअर वगळता या इंडस्ट्रीने त्याला इतर काही दिल्याचे कळत नाही. आज त्याची सगळी गाणी जरी आपल्या तोंडावर असली तरी ती लिहिणारा मात्र आपल्याला माहित असेलच असं नाही. आज नेमका याच ‘शैलेंद्र’चा जन्मदिन. त्यामुळेच या काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलाकाराला कुठेतरी आठवण्याचा हा एक प्रयत्न.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

2 thoughts on “कवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही!

  • March 7, 2019 at 1:33 pm
    Permalink

    खरंच,शैलेंद्र हे खूप संवेदनशील निर्मळ मनाचे गीतकार होते!! त्यांची जी काही गाणी आज आहेत, जी आपण आवडीने ऐकतो त्या “शैलेंद्र” बद्द्ल वरील लेख वाचुन काळीज हेलावून गेले . यावरून हे सिद्ध होते की, माणूस हा परिस्थितीच्या हातातलं कळसुत्री बाहुलं असतो. ती वाचवेल, तसं त्याला नाचावं लागतं !!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?