' तुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया – InMarathi

तुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: पवन गंगावणे

आपण रोजच्या आयुष्यात सद्सद्विवेक बुद्धीने वागतो. लहानपणापासूनच आपल्याला चांगलं वाईट यातला फरक शिकवला जातो आणि चांगल्या वाईटपैकी चांगल्याचा, सत्य असत्यापैकी सत्याचा, देव-दानवापैकी देवाची निवड करायला शिकवलं जातं.

चांगल्या, योग्य, सत्यावर एवढा भर का? आणि काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे ठरवणार कोण? आणि जर कोणी ठरवणारच असेल तर ते सर्वमान्य असेल का? जर मला तुमची योग्यतेची व्याख्याच पटत नसेल तर? जे तुमच्यासाठी अयोग्य आहे ते कदाचित कोणा दुसऱ्यासाठी योग्य ही असू शकेल.

तर हे योग्य-अयोग्य, चूक-बरोबर हे ठरवून देण्यासाठी एक संस्था कायम काम करत असते. या संस्थेचा कुठलाही चेहरा नाही. याच्या बॉडीत कोण काम करतं हे ही नक्की सांगता येत नाही. पण हो, या संस्थेचं एक नाव आहे आणि ते म्हणजे समाज.

 

society marathipizza
mycotox-society.org

 

कित्येक शतकांपासून समाजाने आपल्यावर काही नियम, काही अलिखित कायदे घालून दिलेत. ज्यांच्या आधारे समाजातील घटकांना चांगल्या आणि वाईटाची जाण करून देता येते.

हे नियम मदत करतात समाजाचा समतोल राखण्यात. हे नियम रोखतात तुम्हाला एक अदृश्य लाईन क्रॉस करण्यापासून – जी चांगल्या आणि वाईटात फरक करते. जर कोणी ही लाईन क्रॉस केली तर तो समाजात राहण्यासाठी अपात्र बनतो. अश्या व्यक्ती मग जेलमध्ये किंवा एखाद्या मनोरुग्णांच्या इस्पितळात दिसतात.

आता विचार करा – जर हा समाज नसता तर? जर हे नियम-कायदे, सिस्टम, पोलीस, कोर्ट-कचेऱ्या हा मॉरल कोड ऑफ कंडक्ट नसता तर? आपण हे अलिखित नियम-कायदे मानतो कारण त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये.

जर हे नियम नाही पाळले तर आपल्याला समाजातून बाहेर फेकलं जाईल. पण जर संपूर्ण समाजानेच हे नियम मानण्यास नकार दिला तर? तेव्हा कोणाला समाजातून बाहेर फेकले जाईल?

आपण चांगले बनून राहतो, कारण वाईट बनण्याची अनुमती नाहीये…! जर ती असती, तर कोणी नियम मानले असते का? म्हणजे आपला सभ्यपणा एका प्रकारचं थोतांडच झालं ना…!?

जर समाजात आणि पर्यायाने, आपल्या मनात, चांगल्या-वाईटाच्या व्याख्याच नसत्या तर? तर कदाचित काहीच बरोबर आणि काहीच चुकीचं नसतं. तेव्हा “सर्वांनाच काहीही करण्याची अनुमती राहिली असती”. यालाच स्वातंत्र्य म्हणावं का?

जोकर आणि बॅटमॅनमध्ये एक खूप विचित्र सिमीलारिटी आहे. दोघांचेही आयुष्य एका वाईट दिवसामुळे पूर्णपणे बदलून गेले.

ब्रूसचे आई-वडील मेले आणि त्याने गोथममध्ये बदल आणण्याचं ठरवलं आणि तो बॅटमॅन बनला. जोकरची बायको मेलेली असताना त्याला रॉबरीला जावं लागलं आणि तिथे त्याला बॅटमॅन दिसला. तो केमिकलमध्ये पडून त्याचा जोकर झाला.

 

batman joker marathipizza
https://www.youtube.com/watch?v=7zlqR0FP3yU

 

बॅटमॅनच तत्व आहे टोटल कंट्रोल. तो न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या शहरावर नेहमी न्यायाचचअधिपत्य राहील या हेतूने तो काम करतो. तो जरी एक व्हिजिलांटी असला तरी तो स्वतःला न्यायव्यवस्थेच्या वर समजत नाही.

तो गुन्हेगारांना कधीही जीवानिशी मारत नाही. कारण त्याच्यामते शिक्षा देणं हे त्याचं काम नाही. ते काम फक्त न्यायालयाचं आहे. जोकर याहून पूर्ण उलट. तो “टोटल केओस” म्हणजे “संपूर्ण अराजक”वादी आहे. जर एखादा नियम असेल, तर तो जरूर मोडावा – एवढी माफक जोकरची इच्छा…! आपण आणि समाज, अनेक नियमांनी बांधलेलो आहोत. पण जोकर स्वतःचे नियम स्वतः बनवतो. आणि त्याचा एकच नियम आहे – की – कुठलाही नियम नाहीये.

बॅटमॅननेच जोकरला खऱ्या अर्थाने जोकर बनवलं होतं, म्हणून सूड घेण्यासाठी जोकर बॅटमॅनच्या मागे तर लागतोच – पण त्यांच्या वैराच याहून प्रमुख कारण आहे – त्यांचे वैचारिक मतभेद.

जोकरचं मत असं आहे की –

चांगलं बनणं” कम्पलसरी नसल्यास जगात कोणीच व्यक्ती चांगला बनून राहणार नाही. आपण सगळे चांगुलपणाचा फक्त मुखवटा ओढतो. आपल्या आतही कुठे ना कुठे एक चोर, एक गुन्हेगार किंवा कमीतकमी एक खोटारडा माणूस तर आहेच…जो आपण लपवतो…कारण तो सगळ्यांच्या डोळ्यात खुपतो…!

एखाद्या जोडप्याप्रमाणे बॅटमॅन आणि जोकर हेदोघं सतत एकमेकांशी लढत आलेले आहेत. किंबहुना त्यांच्या विचारधारा लढत आलेल्या आहेत. दोघेही एकमेकांच्या अस्तित्वाची कारणे बनलेली आहेत. जोकर तो पुश आहे ज्याला बॅटमॅन नावाची फोर्स ऑफ ग्रेव्हीटी बॅलन्स करू शकते. जोकरला नेहमी बॅलन्स खराब करण्यात रस राहिला आहे.

 

batman joker killing joke marathipizza
dccomics.com

 

“किलिंग जोक” मध्ये जोकर ठरवतो की, एका वाईट दिवसाने जसा त्याच्या आयुष्याचा संपूर्ण तोल बिघडला, तसंच तो जीम गॉर्डन सोबतही करेल आणि त्यालाही पागल करेल. गॉर्डनचं उदाहरण देऊन जोकरला हे सिद्ध करायचं असतं की –

प्रत्येक जण बाय चॉईस नव्हे, तर बाय फोर्स चांगला बनून आहे. आणि जर परिस्थती विपरित होत गेली, प्रेशर वाढतच गेलं – तर कोणीही व्यक्ती त्याच्या ब्रेकिंग पॉईंटवर येऊन उभा रहातो आणि लगेच कोसळतो.

जग सभ्यपणाचा मुखवटा घालतं पण मुळात चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं. चांगल्यांच्या जगात त्यांची नियमं नं पाळणारा वाईट असतो. पण तो वाईट व्यक्तीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे, कारण तो कोणतेही नियम पाळत नाही. किंवा त्याला समाजाकडून “चांगलं” म्हणवून घेण्यातही रस नाही…!

आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी जोकर गॉर्डनच्या मुलीला पॅरालाईज करून टाकतो. गॉर्डनला एका बंद अम्युजमेन्ट पार्कमध्ये नेऊन छळतो. पण हे सगळं काही केल्यानंतरही गॉर्डन आपलं संतुलन सांभाळतो आणि बॅटमॅनला सांगतो की जोकरला ‘By the book’ च पकडायचं. इथेच हे सिद्ध होतं की, “एक वाईट दिवस” तुमचं भविष्य नाही ठरवू शकत नाही. तुम्ही त्या दिवसाला कसं tackle करता यावरून तुमचं character ठरतं. त्याच एका वाईट दिवसापायी ब्रूसने आजन्म अन्यायाशी लढण्याचा ध्यास घेतला, गॉर्डन त्याचे तत्व नाही विसरला – पण जोकर मात्र वाट चुकून गुन्हेगारीला लागला.

बॅटमॅनला सतत हा प्रश्न पडत राहिलेला आहे की, जे दोघे एकमेकाला ओळखत सुद्धा नाहीत ते एकमेकांचा इतका तिरस्कार कसा करू शकतात?!! सरतेशेवटी बॅटमॅन जोकरला म्हणतो की, “याचा अंत आपल्या दोघांपैकी एकाच्या मृत्यूत होईल. अजूनही वेळ आहे, तू यातून बाहेर निघू शकतोस. हे सगळं अस संपण्याची गरज नाही.”

बॅटमॅन जे काही सांगत असतो ते कुठे ना कुठे जोकरलाही पटत असेल. पण तो बॅटमॅनला म्हणतो की, आता खूप उशीर झालेला आहे. आता मी नाही परतू शकत. इथेच जोकर किलिंग जोक सांगतो…ज्यात एका अंधाऱ्या रात्री दोन मनोरुग्ण वेड्यांच्या इस्पितळातून पळून जात असतात…

एक कैदी पार होतो, दुसऱ्याची मात्र हिम्मत होत नाही. पहिला कैदी म्हणतो की मी फ्लॅशलाईट चालवतो, तू प्रकाशात बीमवरून चालत ये. पण दुसरा कैदी म्हणतो, मला मूर्ख समजतोस का? मी नेमका अर्ध्या रस्त्यात आल्यावर तू टॉर्च बंद करशील…!

पहिला कैदी म्हणजे अर्थातच बॅटमॅन. जो त्या एका वाईट दिवसाच्या जेलमधून मुक्त झाला. आणि अडकला तो जोकर…जो त्या कैदेतून इच्छा असूनही सुटू शकत नाही. कारण तिथे राहण्याची निवड त्याने जाणीवपूर्वक केलेली आहे. इथे बॅटमॅन, सुरुवातीलाच, “बॅटमॅन-जोकरची दुष्मनी ही एंडलेस सायकल आहे” असं जे बोलला होता ते तंतोतंत खर झाल्याचं खुद्द बॅटमॅनला जाणवतं. तो ही ह्या जोकवर खदखदून हसतो. कारण त्याला कळून चुकतं की, जोकर सुधारला जाऊ शकत नाही.

वेडेपणा हीच त्याची रिऍलिटी आहे आणि हा वेडेपणा संपवणं बॅटमॅनसाठी काळाची गरज आहे.आणि मग येतात या कॉमिकची ती शेवटची तीन पॅनेल…ज्यात प्रकाशासोबतच जोकरचं हास्यही संपतं.

ह्या जगात, प्रत्येक जण दुहेरी जीवन जगतोय. तोंडावर एक बोलतो आणि मनात दुसरंच काहीतरी ठेवतो. सोशली एक्सेप्टेबल होण्यासाठी सभ्यतेचा दिखावा करतो. जोकरने मात्र निवड केलीये पागलपणाची. त्याने सगळं नियम फाट्यावर बसवले आणि तेच केलं, जे त्याला रुचलं, त्याला पटलं.

तो पार झाला. आपण अडकलोय समाजाच्या झमेल्यात. चांगल्या-वाईटाच्या फरकात. तो दूर उभा आपल्या समतोल राखण्याच्या, आपला मुखवटा सांभाळण्याच्या प्रयत्नांवर हसतोय आणि आपण मात्र त्यालाच वेडा डिक्लेर करून मोकळे झालोय…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?