' इंग्रजीच्या आक्रमणात अडकलेल्या मराठीची काळजी वाटणाऱ्यांना अभिमानास्पद वाटेल असं काहीतरी…! – InMarathi

इंग्रजीच्या आक्रमणात अडकलेल्या मराठीची काळजी वाटणाऱ्यांना अभिमानास्पद वाटेल असं काहीतरी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : आदित्य कोरडे

===

माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मराठी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा “नाच क्लास” (हा तिचाच शब्द ) काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे हिडसवून-तिडसवून (म्हणजे तुम्हाला वाटेल ‘हिडीस फिडीस करून’ नाही ह्याचा अर्थ आहे जोर जोरात हलवून दोन किंवा दोन पेक्षा अधिक गोष्टी एकमेकात “मिक्षळणे”), पाडवणे, मस्करी खाणेअसले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात.

पोळी-पाव कशाला ही मस्का लावला की त्याची मस्करी होते त्यामुळे तुम्ही कुणाची “मस्करी करता” ह्याचा अर्थ आता आमच्या घरात बदलला आहे आणि तिला काही हवे असेल तर ती बाबाची किंवा आईची मस्करी करते (बहुधा). तिचे हे मराठी ऐकून आताशा शहारणे मी सोडून दिलेय. हे असेच होणार हो! भाषा माणसाकरता असते माणूस भाषेकरता नाही.

 

english-to-marathi-marathipizza01
languageservicesbureau.com

सध्या मात्र आपल्या भारतवर्षात भाषिक अस्मितेचे एक नवे पर्व जन्माला येऊ घातले आहे की काय असे वाटू लागले आहे. विविध भाषिक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांवर होणाऱ्या देशी आणि परदेशी भाषांच्या आक्रमणाबाबत जास्तच जागरूक होताना दिसताहेत. आपापली बोली बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची त्यात फार सरमिसळ होते असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो.

ठीक आहे, आपण जर मराठीचेच उदाहरण घेतले तर आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षांपूर्वी वापरात होती काय आणि १०० वर्षांपूर्वी..? तेव्हा काय होतं?

आज किती जणांच्या बायका पंजाबीसूट किंवा ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख घालतात. साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते? आपण मोटार सायकल/बाईक वरून नाहीतर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? त्याशिवाय स्पार्कप्लग बदलणे, पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय? जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धामराठी नसतात. पगार, बंब, इस्त्री, चावी, जबाब, जबाबदारी, हरकत हे शब्द काय मराठी आहेत की संस्कृत, पण ते वापरताना आपल्याला उष्टावल्यासारखे वाटत नाही.

मोबाईल, सीडी, पेन ड्राईव यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. (ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज आहे असेही नाही.) फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात त्या इंग्रजीच्या सोवळेपणाबद्दल काय?  दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५०० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले  फार थोडे इंग्रजी असतात.  साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे.

स्वभाषेवर अतिक्रमण(!) करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो तितका इतर कुठल्याही भाषेचा केला जात नाही-मराठीत तरी. जणू मराठीवर अतिक्रमण फक्त इंग्रजीचेच झालेले आहे.

बटाटा, टोमाटो, पगार, चावी, हरकत, इस्त्री, आजार इ. शब्द इंग्रजी नाहीत आणि ते संस्कृत किंवा मराठीही नाहीत. मुळात इंग्रजी हा शब्दच इंग्रजी नाही तर फारसी आहे. गेल्या १००-१५० वर्षात मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचा इंग्रजीशी संबंध आला म्हणून मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होते असा समज रूढ झाला आहे. कोणत्याही दोन भाषांचा संनिकर्ष अनेक प्रकारांनी होतो.

इंग्रज जगभरात अनेक ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या भाषा, संकल्पना शब्द त्यांनी आपल्या भाषेत सामावून घेतले आणि ती भाषा समृद्ध केली आज त्याच्या भाषेतले बहुतांश शब्द परकीय आहेत पण त्यामुळे इंग्रजी मृतप्राय न होता उलट अधिक समृद्ध झाली आहे.

तर आज एक वेगळाच विषय म्हणून म्हणा किंवा फक्त मनोरंजन म्हणून म्हणा ह्या इंग्रजीला आपण बहाल केलेले काही शब्द पाहू. ह्यातले काही फारसीही आहेत. कारण राज्यव्यवहाराची भाषा म्हणून फारसी भाषा अनेक वर्षे प्रचलित असल्याने सर्वच भारतीय भाषांवर फारसीचा प्रभाव होता. हे शब्द सामावून घेताना जे आपले गुलाम आहेत त्यांच्या भाषेतले शब्द आपल्या श्रेष्ठतर भाषेत कसे घ्यायचे असा विचार इंग्रजांनी केला नाही (अर्थात त्यांच्या मध्येही नाक मुरडणारे होतेच…)

शर्करा हा मूळ संस्कृत शब्द अनेक रुपात फिरून शुगर म्हणून इंग्रजीत स्थिरावला. (शक्कर-फारशी, झुकेर-इटालियन, त्सुकर-जर्मन इ.) अल किंवा एल अशा तुकड्यांनी सुरु होणारे बरेच इंग्रजी शब्द मूळचे फारसी किंवा भारतातून फारसीत जाऊन मग इंग्रजीत गेले आहेत. राम बाण उपाय ह्या अर्थाने वापरला अक्सीर इलाज मधला अक्सीर हा इंग्रजीत Elixir म्हणजे अमृत म्हणून वापरला जातो.

रसायन शास्त्र पूर्वी भारतात प्रचलित होते, जादू सारख्या वाटणाऱ्या ह्या क्रियांना सामान्य लोक किमया समजत तीच अरबांनी अल(दैवी) किमया केली आणि इंग्रजीत त्याची Alchemy झाली. पूर्वी व्यापार करताना इकडून तिकडे नेताना बराचसा माल खराब होत असे अशावेळी चांगला राहिलेला माल आणि खराब झालेला माल ह्यांची सरासरी काढून दर ठरवत.

खराब माल म्हणजे आवारा माल त्याची आणि उरलेल्या चांगल्या मालाची  सरासरी म्हणजे avearage. बंगला म्हणजे बैठे घर, हा भारतीय शब्द पण इंग्रजीत  two storeyed bunglow कुणी चूक मानत नाही. शोरबा म्हणजे काढा किंवा अर्क त्यावरून syrup आला तर चंपी वरून shampoo. Tamarind म्हणजे चिंच, व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या अरबांना त्यांच्या खजूर आणि आपल्या चिंचेत काय साम्य जाणवले कुणास ठावूक पण भारताचा खजूर असे तिचे त्यांनी तमार-इ-हिंद असे नामकरण केले. त्याची इंग्रजीत Tamarind झाली. कापूर (Camphor), चंदन(Sandal), पिप्पली-मल्याळी(Pepper), इंजीयर-मल्याळी(Ginger), असे कितीतरी इंग्रजी शब्द मूळ भारतीय आहेत.

बनिया, शिपाई, गुरु, बझार,कुली असे शब्द तर जसे च्या तसे इंग्रजीत वापरले जातात. आपण भारतीय म्हणून आपल्याला हे माहित आहे पण  Window, porch, portico, mango हे शब्द मूळचे पोर्तुगीज आहेत हे आपल्याला फारसे माहिती नसते. एव्हढच कशाला, आपण एखाद्या गोष्टीला काडीचीही किंमत देत नाही ह्या अर्थी इंग्रजी मध्ये I care a damn  असे जे म्हणतो त्यातील damn हा चक्क भारतीय मराठी शब्द आहे. दाम हे पूर्वी अत्यंत हलके नाणे किंवा चलन होते. छदाम म्हणजे ६ दाम म्हणजेच अर्धा पैसा इतके हलके, तेवढीही किंमत आपण कशाला देत नाही ह्या अर्थी तो  I care a damn वापरला जातो.

Rice म्हणजे तांदूळ हाही असाच भारतीय शब्द.

संस्कृत मध्ये व्रीही म्हणजे तांदूळ त्यालाच पुढे वरिसी नाव पडले. हा वरिसी सिकंदराच्या काळातच oryza म्हणून तिकडे गेलेला होता त्याचाच पुढे rice झाला. काही शब्द तर इतके बेमालूमपणे इंग्रजीत सामावले गेले की ते आज आपणा भारतीयांना देखील मुलाचे आपलेच आहेत हे समजणार नाही उदा. लाख(म्हणजे पत्र, लिफाफे बंद करायला वापरायचे ती लाख बरका ), लुट, डाकू किंवा डकैत, जंगल, बाझार, ई.काही शब्द मात्र आपल्याकडून उचलले गेले हे अगदी शेंबडा पोरगा ही (भारतीय)सांगेल उदा. शिपाई, महाल, पंडित, महाराजा, राज, राजा.

 

english-to-marathi-marathipizza02jpg
india.com

इंग्रज यायच्या आधी ही भारतातून उत्तम प्रतीचे कापडचोपड पश्चिमेला जात असे. केरळ मधील कालिकत बंदारावारून जहाजे च्या जहाजे भरून येणारे हे कापड म्हणून कालीको (Calico)म्हणून प्रसुद्ध झाले. पुढे इंग्रजांनी भारताला गुलाम बनवल्यावर आणि भारतातला कापड उद्योग नष्ट केल्यावर ह्या Calico नावाचा अर्थही बदलला आणि भेसळ असलेले, कमी दर्जाचे ते Calico असा अर्थ त्याला प्राप्त झाला.

भाषेला ही कसे वाईट दिवस येतात पहा.

इंग्रज भारतात आले तेव्हा मोगल साम्राज्य ऐश्वर्याच्या कळसावर होते साहजिक मोगल शब्द हा ऐश्वर्य व सर्व सत्ताधीश, ताकतवान अशा अर्थी वापरला जाऊ लागला आजही Movie Mogul म्हणजे चित्रपट सृष्टीतले मोठे किंवा  Media Mogul असे शब्द आपण सर्रास वापरतो. मोहरम हा शिया मुस्लीमांकाराता  महत्वाचा महिना. त्यांचा नेता हुसेन करबालाच्या लढाईत मारला गेला म्हणून ते हाय हुसेन!  या हुसेन ! असा आक्रोश करतात. ही पद्धत फक्त भारतातच होती ती सुरु केली तैमुर लंगाने (तो शिया होता).त्यांच्या त्या मोहरमच्या जत्रेतल्या  हाय हुसेन!  या हुसेन ! असा हैदोस धुल्ला(हा आपला मराठी शब्द) ऐकून गडबड गोंगाट ह्या अर्थी Hobson Jobson असा शब्द इंग्रजीत आला.

पुरीची रथयात्रा जगप्रसिद्ध . पुर्वी भाविक लोक त्या प्रचंड रथा खाली स्वत:ला झोकून देत, मुक्ती मिळावी ह्या हेतूने. अनेक लोक पाय घसरूनही पडत पण तो रथ काही थांबत वगैरे नसे. त्यामुळे रणगाड्या सारखा किंवा वरवंटया सारखा समोर येईल ते चिरडीत सतत फिरत राहणारा जगन्नाथाचा रथ ह्यावरून Jaggernaut  हा शब्द आला.

आपण सगळे घरात विशेषत: दिवाणखान्यात Teapoy वापरतो. अमेरिकन बिच्चारे CoffeeTable वापरतात. पण ह्या Teapoyचा चहाशी काहीही संबंध नाही बरका! तीन पायाचे छोटे मेज म्हणजे तिपाई त्यावरून Teapoy पुढे पाय चार झाले तरी शब्द तोच राहिला आणि अर्थ प्राप्त झाला चहा ठेवायचे मेज. चहा फराळ झाला किंवा जेवण झाले की पान सुपारी खायचा हा खास भारतीय शिरस्ता. ह्या नागवेलीच्या पानांना माल्याळीत बीटल म्हणतात त्यापानाबरोबर खायचे फळ म्हणजे बीटल नट म्हणजेच सुपारी.

ही यादी बरीच मोठी आहे. पण उदाहरणादाखल ही काही मासलेवाईक उदाहरणे.

असो, भाषाशुद्धी आणि भाषिक अभिनिवेशाने भारलेल्या सध्याच्या काळात हा निबंध (हल्ली ह्याला लेख म्हणतात) लिहिलेला असल्याने भाषाशुद्धी बद्दल इथे काही थोडे लिहिले तर ते अगदीच अप्रस्तुत होणार नाही.

मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षात फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्य छोटी झाली, ‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाल शब्दांचे श्रीवर्धनी रोठे फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही. नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्य आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राट ही गेले. लोक खरं खरं अभिनय वगैरे करू लागले. (काय हा अत्याचार!) एकदा रेडियो मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडियो चॅनेल ऐकताना RJ म्हणाला “हेल्लो पुनेकर, पुण्यात (SORRY, पुन्यात) चिल आउट करायला सोयीचा स्पॉट शोधताय. लेट अवर शाम का साथी डू इट फॉर यु.” ह्या मराठी सारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला.

पण नंतर विचार केला, तरुणाईला (घरच्या आया कमी वात आणायच्या म्हणून आता ह्या नव्या आया आल्यात छळायला, हिरवाई, निळाई आणि सगळ्यात फेमस आणि डेंजरस तरुणाई) ह्याच्या सारखीच भाषा (परत sorry, लँग्वेज) आवडते त्याला ते तरी काय करणार?

आता बघा मी सुद्धा बोलताना ‘फ्युज उडाला’ रेडियो चॅनेल, डेंजरस असे शब्द वापरलेच कि नाही. कोण वाचतय? हे जसं महत्वाच तसच जास्तीतजास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं बोलण लिहिणं महत्वाच.(त्यालाच साहित्य असे म्हणतात मामू!) मराठी साहित्य आणि भाषा ह्याबद्दल बोलताना एक वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की बोली म्हणून मराठी खूप जुनी भाषा खचितच आहे.

मराठी साहित्यालाही अगदी प्राचीन म्हणावा असा इतिहास आहे. पण अनेक शतकं मराठी भाषा बहुतकरून पारमार्थिक स्वरूपाचे साहित्यच प्रसवत होती.

पेशवाई बुडाल्यानंतर जसा जसा इंग्रजांचा आणि त्यांच्या इंग्रजीचा प्रादुर्भाव(!) वाढला तसा कथा, लघुकथा, निबंध, स्फुट, कादंबऱ्या, नवकविता वगैरे इतर साहित्य प्रकार मराठीत येऊ लागले. अर्वाचीन साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठीला वैभव आणले हे खरे पण ही परंपरा २००-२२५ वर्षांपेक्षा जुनी नाही.

भाषाशुद्धीच्या नावाने ओरड जशी मराठीत चालू आहे तशी इंग्रजीतही झाली. तो सगळा इतिहास मोठा रंजक आहे. जिज्ञासूंनी यु ट्यूबवर बीबीसी ने ह्याविषयावर केलेली ८ भागांची प्रदीर्घ documentary आवर्जून पहावी. खाली लिंक दिलेली आहे

 

 

मराठी भाषाशुद्धीचे प्रयत्न सावरकरांनीही केले, महापौर, स्थानक, दिनांक असे अनेक पर्यायी शब्द त्यांनी रूढ केले पण चावट लोकांनी जड लांबलचक संस्कृत प्रचुर शब्द मुद्दाम वापरून त्याची हुर्यो केली आणि तो एकूण उपक्रमच हास्यास्पद झाला.

आजमितीला साधारण १२ कोटी लोक मराठी भाषक आहेत, त्यातले ८०% किमान साक्षर तरी आहेतच. मराठी भाषा समजणारे, बोलणारे लोक जगभर पसरले आहेत. मराठीच्या ज्ञात अशा ४२ बोली आहेत, दर १२ कोसावर आपला पोत लहेजा बदलणारी ही भाषा जवळपास सव्वा दोन हजार वर्ष जुनी आहे.

इंग्रजी पेक्षा ८०० वर्षे जुनी. पण ह्यासृष्टीतला आश्चर्य आणि विलोभनियतेने नटलेला खजिना त्यापेक्षा खूप खूप मोठा आहे. त्याला गवसणी घालण्याचे, ते सौंदर्य आपल्यात व्यक्त करण्याचे सामर्थ्य ह्या भाषेत नक्कीच आहे आणि इतर लोक जे हा प्रयत्न करताहेत त्याचा, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्या.

मनावरची आणि बुद्धीवरची मरगळ जरा झटकली जाईल.

मराठी भाषेचा आणि साहित्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ देदीप्यमान तर आहेच पण भविष्यकाळ ही उज्वलच आहे.

काळजी नसावी. लोभ मात्र असावा…भरपूर! हेची विज्ञापना…

कळावे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?