'मधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक!

मधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडे जात असताना काही दिग्दर्शक आपल्यासमोर त्यांचे काही चित्रपट घेऊन आले. ही नवीन दिग्दर्शकांची फळी भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवीन फिल्म प्रकार रूजवू पाहत होती. या फिल्म्स ना आर्ट फिल्म्स होत्या, ना कमर्शिअल फिल्म्स होत्या. पण या फिल्म्स समाजातील भयानक वास्तव आपल्यासमोर मांडत होत्या. मग यात कधी अति वाटेल असे प्रसंग होते, तर कधी थरकाप उडवणारे प्रसंग होते. पण हा प्रकार प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही आवडत होता हे नक्की.

तर मधुर भांडारकरदेखील याच काही दिग्दर्शकांपैकी एक म्हणता येईल. एक अस्सल मराठी माणूस, जो सुरूवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी काहीही कामं करत होता. तो नंतर एका व्हिडिओ कॅसेट लायब्ररीत काम करण्यापर्यंत येऊन पोहोचला. समोर फिल्म्सचं एक आभासी जग होतं, तर त्याला स्वतःला वास्तवातील चटके सहन करावे लागत होते. अशातच तो पुढे जाऊन एका दिग्दर्शकाचा असिस्टंट बनला आणि इथूनच त्याचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला.

madhur-bhandarkar-marathipizza

1995 दरम्यान राम गोपाल वर्माच्या रंगीलाचं काम चालू होतं. आणि याच सिनेमाकरिता मधुर रामूचा असिस्टंट म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला इंडस्ट्री खुणावत होती हे साहजिकच आहे. अशातच त्याने पुढील काही वर्षात एका चित्रपटावर काम सुरू केलं. आणि 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिशक्ती’मधून त्याने आपलं दिग्दर्शकीय पदार्पण केलं. अर्थातच हा चित्रपट एक मोठा फ्लॉप ठरला. हा चित्रपट मी तर पाहू देखील शकलो नाही. नाही म्हणायला हा एकदा पाहण्यास सुरू केला. पण एक दोन थोर सीन्स पाहून तो तिथेच थांबवला.

पण खरा अर्थाने त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण झालं ते 2001 मधील ‘चांदनी बार’मधून. तब्बू, अतुल कुलकर्णी स्टारर हा चित्रपट क्रिटिकली आणि कमर्शिअली दोन्ही तऱ्हेने हिट ठरला. त्याला या सिनेमाने एक नॅशनल अवाॅर्ड तर मिळवून दिलंच. पण बाॅलिवुडमधील काही मोजक्या आणि उत्तम दिग्दर्शकांमध्ये त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं.

अलीकडेच त्याचा 2003 मधील ‘सत्ता’ नावाचा चित्रपट पाहण्यात आला. हा देखील बराच सुमार होता. पण 2005 मधील ‘पेज थ्री’मधून पुन्हा त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य दिसून आलं. पेज थ्रीमधून पुन्हा एकदा समाजातील आणि मीडियातील एक जीवघेणं आणि भयानक वास्तव त्याने समोर आणलं. कोंकणा सेन, अतुल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, वगैरे कलाकारांकडून त्याने उत्तम काम तर करून घेतलंच, शिवाय या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट चित्रपटान नॅशनल अवॉर्डदेखील मिळवलं.

madhur-bhandarkar-marathipizza01
netdna-cdn.com

2007 मधील ‘ट्रॅफिक सिग्नल’साठीही एक नॅशनल अवाॅर्डदेखील त्यालाच मिळालं. नंतरही त्याने फॅशन, काॅर्पोरेट, कॅलेंडर गर्ल्स, वगैरे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अगदी अजूनही तो कार्यरत आहे आणि चित्रपट दिग्दर्शित करत आहे. पण कुठेतरी तो आपल्याच शैलीमध्ये अडकून पडल्याचे नेहमी जाणवत राहते. म्हणजे सुरूवातीला त्याचा वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न, त्याची दिग्दर्शकीय पकड, पटकथेवरील काम, इत्यादी गोष्टी नावीन्यपूर्ण होत्या. त्याची स्वतःची अशी एक शैली होती. म्हणजे पेज थ्री किंवा फॅशन पाहून आपण सांगू शकतो की हा मधुर भांडारकरचा चित्रपट आहे. पण पुढे हीच शैली त्याला घातक ठरतेय. काॅर्पोरेटमध्ये तो आपलीच शैली काॅपी करतोय असं वाटत राहतं. म्हणजे आधी ज्या गोष्टी त्याच्याकडून नकळत घडत होत्या त्या तो आता जाणूनबुजून आणि ओढाताण करून आपल्यासमोर दाखवतोय.

तो आधी जे कॅमेरा अँगल्स नावीन्य म्हणून वापरायचा, एक प्रयोग म्हणून वापरायचा आज ते मुद्दाम वापरतोय असं वाटतं. त्याची जी पटकथा असायची त्यामध्ये तो जाणूनबुजून एखादे कथानक आणताना दिसत नव्हता. तर त्याला त्या कथानकात ती कथा आपल्याला दाखवण्याची संधी दिसायची आणि याच संधीचे तो सोने करताना दिसायचा. पण आता त्याला ते वास्तव समोर आणण्याऐवजी आपण आधी जे केलंय तेच पुन्हा रिक्रिएट करण्यात जास्त रस आहे, असं वाटत राहतं.

पण बहुतांशी नव्वदच्या दशकातील सगळ्याच दिग्दर्शकांचा हाच प्राॅब्लेम दिसून येतो. मग तो राम गोपाल वर्मा असो की मधुर भांडारकर. पूर्वी त्यांना काहीतरी दाखवण्याची एक इच्छा जणू सतावत राहायची. नाही म्हणायला अजूनही ती आहेच. पण ह्याच इच्छेच्या आड त्यांनीच आधी करून ठेवलेलं काम त्यांच्या आड येतंय. या सर्वांना आता आपलं आधीचं काम विसरण्याची खरी गरज आहे आणि पुन्हा आपली आधीची ती चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती एकवटून काम करण्याची गरज आहे.

मधुर एक अप्रतिम दिग्दर्शक आहे यात शंकाच नाही. पण त्याच्या याच रिक्रिएशनच्या हव्यासापायी अलीकडील त्याचे बहुतेक सर्वच सिनेमे फसलेत. काॅर्पोरेट नंतर तर मधुरचा नवीन सिनेमा पाहिल्याचं मला आठवत नाही. त्यापेक्षा त्याचे ते जुनेच सिनेमे पुन्हा पाहणं मला जास्त सुखकारक ठरतं. अलीकडील ‘इंदू सरकार’देखील मी अजूनही पाहिलेला नाही. जर वेळ काढून पहावासा वाटलाच तर नक्की पाहीन. पण याची शक्यता तशी कमीच आहे.

madhur-bhandarkar-marathipizza03

आज मधुर आठवण्याचं कारण म्हणजे आज त्याचा एकोणपन्नासावा वाढदिवस आहे. लोक म्हणतात त्याचा फाॅर्म हरवत चाललाय. पण मुळात तो स्वतःच्याच फाॅर्ममध्ये अडकत चाललाय. तर आजच्या त्याच्या जन्मदिनी त्याला पुन्हा आधीसारखं काहीतरी तयार करण्याऐवजी पुन्हा एखादा नवीन प्रयोग करण्याची मागणी करतो, इतक्याच शुभेच्छा.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

One thought on “मधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक!

  • August 26, 2017 at 9:06 pm
    Permalink

    इंदु सरकार एकदा बघाच, स्त्रि प्रधान चित्रपट कसे असतात ते पहावयास मिळते. राजकारण तसेच इंदिरा गांधी यांचा समन्वय , अडखळत बोलणारी अभिनेत्री , आणिबाणी ,तत्कालीन स्वार्थ इ.गोष्टींची मांडणी उत्तम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?