'वाचा - बाबा राम रहीमला ज्या निनावी पत्रामुळे शिक्षा झाली - ते संपूर्ण पत्र

वाचा – बाबा राम रहीमला ज्या निनावी पत्रामुळे शिक्षा झाली – ते संपूर्ण पत्र

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गुरमीत राम रहिम सिंग – म्हणजेच बाबा राम रहिम. कालपासून देशभर चर्चेत असलेलं नाव. ह्या माणसावर अनेक स्त्रीयांचा बलात्कार केल्याचा आरोप आहे. ह्या आरोपांची सुरूवात झाली एका निनावी पत्राने. हे पत्र एका बलात्कार पिडीतीने २००२ साली पंतप्रधानांना लिहिले होते. त्या पत्राचं भाषांतर पुढे देत आहोत. पत्र वाचताना एकीकडे अंगावर काटा उभा राहील आणि तळपायाची आग मस्तकाला जाईल.

गुरमीत राम रहीम याने ज्या साध्वीचे लैंगिक शोषण केले होते त्या साध्वीने आपली कैफियत मांडताना खालील पत्र हे भारताच्या पंतप्रधानांना लिहीले होते. हे पत्र २५ सप्टेंबर २००२ रोजी ‘देश सेवक’ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. डेरा मध्ये राहणाऱ्या महिलांची कश्या प्रकारे विटंबना करण्यात येते याची कल्पना हे पत्र वाचल्यावर येते.

gurmeet-ram-rahim-singh-marathipizza
deccanchronicle.com

===

श्री. अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान, नवी दिल्ली

मी पंजाब स्थित तरुणी आहे. गेल्या ५ वर्षांपासून सिर्सा (हरयाणा) येथील ‘डेरा सच्चा सौदा’ मध्ये मी एक साध्वी म्हणून सेवा करत आहे. माझ्या व्यतिरिक्त येथे अश्या अजून शेकडो तरुणी आहेत ज्या दरोरोज १८ तास सेवा करतात.

पण येथे आमचे लैंगिक शोषण केले जाते. डेरा महाराज गुरमीत सिंग डेरा मधील तरुणींवर बलात्कार करतात. मी पदवीधर आहे. माझ्या कुटुंबाची महाराजांवर (गुरमीत सिंग) अपार आणि आंधळी श्रद्धा आहे. मी साध्वी व्हावं ही माझ्या कुटुंबाची इच्छा होती. साध्वी झाल्याच्या २ वर्षानंतर रात्री १० च्या सुमारास महाराज गुरमीत सिंग यांच्या निकटची एक महिला शिष्या माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, महाराजांनी मला त्यांच्या खोलीमध्ये येण्याचा आदेश धाडला आहे. मला समाधान वाटले, की महाराजांनी मला स्वत:हून बोलावणे धाडले आहे.

मी पहिल्यांदाच त्यांच्या समोर जाणार होते. पायऱ्या चढून त्यांच्या खोलीत शिरल्यावर मी पाहिले कि त्यांच्या हातात एक रिमोट होता आणि ते टीव्हीवर अश्लील चित्रफित पाहत होते. त्यांच्या उशीजवळ बेडवरच एक रिव्हॉल्व्हर देखील मला आढळली. हा सर्व प्रकार पाहिल्यावर मी पुरती घाबरून गेले आणि मला चिंता वाटू लागली. मी कल्पनाही करू शकत नव्हते की महाराजांचे खरे रूप असे असेल. मला पाहिल्यावर महाराजांनी टीव्ही बंद केला आणि मला आपल्या बाजूला बसवून घेतले. त्यांनी मला पाणी प्यायला दिले आणि सांगितले की –

मी तुला येथे बोलावले आहे कारण मी तुला माझ्या जवळची समजतो.

हा माझा पहिला अनुभव होता. महाराजांनी मला मिठी मारली आणि म्हणाले कि ते माझ्यावर मनापासून प्रेम करतात. ते असंही म्हणाले की, त्यांना माझ्यासोबत संबंध ठेवायचे आहेत. ते मला म्हणाले की त्यांची शिष्या झाल्यापासून मी माझी संपत्ती, शरीर आणि आत्मा त्यांना अर्पण केला आहे आणि त्यांनी माझ्या या भेटीचा स्वीकार केला आहे. जेव्हा मी या गोष्टीवर आक्षेप घेतला, तेव्हा ते म्हणाले की, “मनात कोणतीही शंका ठेवू नकोस मीच परमेश्वर आहे.” जेव्हा मी त्यांना प्रतीप्रश्न केला की, परमेश्वराला अश्या गोष्टी करणं शोभतं का, तेव्हा त्यांनी मला उत्तर दिले:

श्री कृष्ण देखील परमेश्वर होता आणि त्याच्या तब्बल ३०६ गोपिका होत्या ज्यांच्या सोबत तो रासलीला रंगवायचा. तरीही लोक त्याला देव म्हणून पुजतातच ना. त्यामुळे या गोष्टी पाहून चकित होण्यासारखं काहीच नाही.

पुढे ते म्हणाले –

विरोध केलास तर मी आता या रिव्हॉल्वर ने तुझा जीव घेऊन तुला गाडून टाकू शकतो.

तुझ्या कुटुंबातील सदस्य माझे मोठे अनुयायी आहेत आणि ते माझ्यावर अपार श्रद्धा ठेवतात. आणि तुला देखील हि गोष्ट चांगली माहित आहे की तुझ्या घरचे सदस्य माझ्या विरोधात जाऊ शकत नाहीत.

“सरकार देखील माझ्या खिशात आहे. पंजाब आणि हरयाणाचे मुख्यमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री देखील माझा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. राजकारणी आमच्याकडून मदत घेतात. ते माझ्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाहीत.”

मी तुझ्या घरच्यांना सरकारी नोकरीमधून बाद करेन आणि नंतर माझ्या सेवकांकडून त्यांचा जीव घेईन. त्यांच्या हत्येचा कोणताही पुरावा आम्ही मागे ठेवणार नाही. तुलाही माहित असेलच की पूर्वी देखील आम्ही डेरा व्यवस्थापक फकीर चंद याचा गुंड्यांकरवी खून केला होता. आजही त्याच्या हत्येचा कोणीही छडा लावू शकलेलं नाही. डेराचे दरोरोजचे उत्पन्नच १ करोड रुपयांच्या आसपास आहे, ज्या माध्यमातून आम्ही नेत्यांना, पोलिसांना एवढंच काय तर न्यायाधीशांना देखील विकत घेऊ शकतो.

यानंतर महाराजांनी माझ्यावर बलात्कार केला. गेल्या तीन वर्षांपासून महाराजा माझ्यावर वारंवार अत्याचार करीत आहेत. दर २५-३० दिवसांनी मला या नरकयातना भोगाव्या लागतात. आता मला कळून चुकले आहे की महाराजांनी माझ्या पूर्वी ज्यांना ज्यांना त्यांच्याजवळ येण्याचा आदेश दिला होता त्या डेरातील सर्व तरुणींवर ते बलात्कार करीत आहेत. या सर्व तरुणी ३५ ते ४० वयोगटातील आहेत आणि त्यांचे लग्नाचे वय उलटून गेले आहे. डेरा मध्येच जीवन व्यतीत करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.

rape-molestation-women-marathipizza

येथील बहुतेक तरुणी या पदवीधर आहेत – बी.ए., एम.ए., बी.ए. पण डेरामध्ये त्या नरकासारखे जीवन जगत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या घरच्यांचा महाराजांवर आंधळा विश्वास आहेत. आम्ही सफेद कपडे घालतो, डोक्यावर स्कार्फ बांधतो आणि महाराजांच्या आदेशावरून आम्हाला इतर पुरुषांकडे पाहण्याची परवानगी देखील नाही आणि पर पुरूषाशी बोलताना ५-१० फुटांचे अंतर राखूनच बोलावे लागते. येथे येणारे लोक आम्हाला देवी समजतात. पण आम्ही तर वेश्यांसारखे जगत आहोत.

यावेळेस मी माझ्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की डेरा मध्ये सारं काही आलबेल नाही, पण त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून डेरा शिवाय दुसरी कोणतीही सुरक्षित जागा नसल्याचे म्हटले, कारण महाराजांसोबत राहण्यास भाग्य असावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते मी माझ्या मनात डेरा विषयी चुकीचा समज करून घेतला आहे आणि तो दूर करण्यासाठी मी सदगुरुच्या नावाचा जप केला पाहिजे. मी येथे असहाय्य आहे कारण मला महाराजांची प्रत्येक आज्ञा निमूटपणे पाळावी लागते. महाराजांच्या आदेशानुसार एका स्त्री ला दुसऱ्या स्त्री शी वार्तालाप करण्याची परवानगी नाही.

तरुणींना तर टेलीफोन वरून देखील त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्याची मुभा नाही. जर एखादी तरुणी डेरा मध्ये जे काही वाईट कामे सुरु आहेत त्याबद्दल कोठेही वाच्यता करताना आढळून आली तर तिला महाराजांच्या आज्ञेनुसार शिक्षा दिली जाते.

काही काळापूर्वी भटिंडा मधील एका तरुणीने महाराजांची कुकर्मे उघड केली होती, आणि त्यावरून सर्वच महिला शिष्यांनी तिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तिच्या पाठीचा कणा मोडला आणि ती आता पूर्णपणे अपंग झाली आहे. तिच्या वडिलांनी डेरा मधील सेवेचा त्याग केला आणि ते घरी परतले. महाराजांच्या भयामुळे आणि स्वत:ची नाचक्की होईल या भीतीने ते याबद्दल कोणालाही काही सांगत नाहीत.

त्याचप्रकारे कुरुक्षेत्र मधील एका तरुणीने डेरातून पळ काढला आणि ती आपल्या घरी गेली. जेव्हा तिने आपल्या घरच्यांना डेरा मध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविषयी सांगितले, तेव्हा डेरामध्येच सेवा करणाऱ्या तिच्या भावाने सेवा सोडली. अजून एका संगरुर मध्ये राहणाऱ्या तरुणीने डेरा सोडला आणि तिने घरी जाऊन आपली करूण कहाणी घरच्यांना कथन केली, तेव्हा डेरामधील सशस्त्र सेवादार त्या मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी तिला मारून टाकण्याची धमकी दिली आणि डेरा बद्दल ब्र ही न काढण्याची ताकीद दिली.

rape-girl-woman-molestation-marathipizza

अश्याच प्रकारे मनसा, फिरोझपूर, पटियाला आणि लुधियाना जिल्ह्यातील अनेक तरुणींचे आयुष्य डेरामध्ये उध्वस्त झाले आहे. पण भीतीने त्या याबद्दलच्या गोष्टी उघड करत नाही आहेत. त्या आता डेरा मध्ये सेवा करत नाहीत, पण तरीही जीवाच्या भीतीने गोष्टी उघड करण्याची त्यांची हिंमत होत नाही. डेरामधील प्रत्येक तरुणीने या यातना सहन केल्या आहेत. सिरसा, हिस्सार, फतेहबाद, हनुमान गड आणि मेरठ येथील तरुणींनी देखिल आपली आपबिती कथन केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

जर मी माझे नाव उघड केले तर मला आणि माझ्या कुटुंबाला मारून टाकले जाईल. लोकांच्या भल्यासाठी मला हे सत्य उजेडात आणायचे आहे, कारण आता मात्र मी हा ताण आणि हे शोषण सहन करू शकत नाही. माझे जीवन धोक्यात आहे. जर मिडिया किंवा सरकारकडून डेरा मधील या सर्व कुकर्मांची चौकशी केली गेली, तर डेरामध्ये सध्या राहणाऱ्या ४० ते ५० तरुणी स्वत:हून पुढे येऊन साक्ष देतील. पुरावे हवे असतील तर आमची वैद्यकीय तपासणी करून देखील याचा छडा लावला जाऊ शकतो की आमचे अजूनही शोषण होते किंवा नाही. जर आम्ही अजूनही कुमारिका नसू तर मात्र आमचे जीवन उध्वस्त करणाऱ्याचा शोध घेतला गेलाच पाहिजे.

आणि सत्य हेच बाहेर येईल की सच्चा सौदा चे महाराज गुरमीत राम रहीम सिंग हेच आमच्या उध्वस्त जीवनासाठी जबाबदार आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “वाचा – बाबा राम रहीमला ज्या निनावी पत्रामुळे शिक्षा झाली – ते संपूर्ण पत्र

  • August 26, 2017 at 9:18 pm
    Permalink

    In depth enquiry must b initiated against deta jutha sorry sudhha souda, till the enquiry panel finishes the task and come to any conclusion all the activities of the deta must b banned ,
    All the centres must be closed and the sadhwis must be release d and be allowed to return to their home with full security ,,

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?