“ओम पर्वत” आणि भारतातील शेवटचे शहर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन वाद हा उफाळून येतोय, तर भारत-पाक वाद आपल्याला काही नवीन नाही. त्यामुळे बॉर्डर म्हटल की आपल्याला ते तारेच कुंपण, बंदूक हातात घेऊन देशाची सुरक्षा करणारे जवानच डोळ्यासमोर येतात.
पण आज आम्ही आपल्याला एका अशा बॉर्डरबद्दल सांगणार आहोत जिथे ना तारांचे कुंपण आहे ना सुरक्षा जवान आहे.
तिथे आहे फक्त शांतता आणि मैत्री… ती बॉर्डर म्हणजे भारत-नेपाळ बॉर्डर… भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्री आपल्या सर्वांनाच माहित आहे.
या दोन देशांना जोडणारी सीमारेषा एक नदी आहे. हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि याच दोन देशांच्या बॉर्डरवर वसले आहे एक शहर. ज्याचे दोन भाग आहेत.
एक भाग आहे भारतात ज्याला भारतीय नागरिक धारचुला म्हणून ओळखतात तर दुसरा भाग आहे नेपाळमध्ये ज्याला ते लोक दारचूला म्हणून ओळखतात. भारत आणि नेपाल सीमेवरील भारताचे शेवटचे शहर असणाऱ्या याच धारचुलाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

हिमालयाच्या कुशीत वसलेलं धारचुला हे उत्तराखंडच्या पिथोरगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असं एक शहर आहे. धारचुला एक छोटसं शहर आहे, हिमालयातून जाणारा प्राचीन व्यापार-मार्ग याच शहरातून जातो.
हे शहर चारी बाजूंनी हिमालयातील डोंगरांनी वेढलेलं आहे, ज्यामुळे या शहराची सुंदरता आणखीच वाढते.
भारतातील धारचुला आणि नेपाल येथील दारचुला ही दोन्ही शहरे जवळपास एक सारखीच आहेत. काली नदी ही धारचुला आणि दारचुला यांना विभागते. ही नदी भारत आणि नेपाल यांची सीमारेषा देखील आहे.
धारचुला येथील रहिवासी पहाडांपलीकडच्या दारचुला शहरातील रहिवाश्यांसारखेच आहेत.
धारचुला, या गावाला हे नाव का देण्यात आले, हे आपण आता जाणून घेऊ… धारचुला हे नाव दोन शब्दांना जोडून बनले आहे. यातला पहिला शब्द ‘धार’, धार म्हणजे पहाड आणि दुसरा शब्द ‘चुला’ म्हणजे चूल.

येथील घाटी ही चुलीसारखी दिसते म्हणून या शहराला ‘धारचुला’ हे नाव देण्यात आले. समुद्रातळापासून १९५ मीटर उंचीवर असणाऱ्या या शहराला नैसर्गिक समृद्धीचा वारसा लाभला आहे. पण, ही जागा पर्यटकांमध्ये प्रचलित नसल्याने इथे पर्यटकांची गर्दी दिसत नाही.
धारचुला येथे पर्यटनासाठी अनेक ठिकाण आहेत. मोठमोठ्या पहाडी, नद्या यांमुळे या परिसरात निसर्गाचा अनन्यसाधारण असा देखावा पाहायला मिळतो.
धारचुलाला लागुनच काली नावाची एक नदी वाहते, या नदीला महाकाली किंवा शारदा नदी असेही म्हणतात. ही नदी नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमेसारखेही काम करते.

या परिसरातील ‘जौलजीबी’ हे ठिकाण गौरी आणि काली या दोन नद्यांचं संगम स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय, येथे प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये मेळा आयोजित केला जातो, जो संपूर्ण भारतातील तसेच नेपाळमधील लोकांना देखील आपल्याकडे आकर्षित करतो.

धारचुलापासून केवळ २० किमीवर चिरकीला हे धरण आहे. हे धरण काली नदीवर बांधलेले आहे. नैसर्गिक सौंदर्यांव्यतिरिक्त काही दिवसांमध्ये येथे शासनातर्फे जल क्रीडा सुविधाही सुरू करण्यात येणार आहेत.

ओम पर्वत ही पहाडी कैलाश, बाबा कैलाश, कामिल कैलाश इत्यादी नावाने ओळखले जाते. या पर्वताची विशेषता म्हणजे येथील बर्फात ‘ओम’ शब्दाचं पॅटर्न दिसत, म्हणूनच या पर्वताला ओम पर्वत आणिहे नाव पडलंय. हिंदू धर्मा व्यतिरिक्त या पर्वताचे बौद्ध आणि जैन धर्मातही विशेष महत्व आहे. ओम पर्वताजवळच पार्वती सरोवर आणि जोंगलिंगकोंग सरोवर देखील आहे.

धारचुला येथील नारायण आश्रम हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे आश्रम १९३६ मध्ये नारायण स्वामी यांनी बनवले असून हे समुद्रतळापासून २७३४ मीटरच्या उंचीवर आहे. येथे ४० लोकांच्या राहण्याची सुविधा आहे. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या हिमवर्षावमुळे हे ठिकाण थंडीच्या मोसमात बंद ठेवण्यात येते.

अस्कोट मस्क हरीण अभयारण्य हे विविध प्रजातींच्या प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे, हे अभयारण्य कस्तुरी हरणाच्या संवर्धनासाठी उभारण्यात आले आहे. तसेच इथे विविध प्रजातींचे प्राणीही आढळतात. ज्यात बिबट्या, जंगली मांजर, बीव्हर, पंधरा अस्वल, हिमालयी चिता इत्यादी आढळतात.
धारचुला येथे मार्च ते जुन आणि सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ पर्यटनासाठी योग्य मानला जातो…
धारचुलाचं सौंदर्य अनुभवायाला मिळणं म्हणजे सुख आणि शांती अनुभवणं होय …
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.