' जाणून घ्या 'नेमकं' कारण ज्यांमुळे विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ पदाला रामराम केला!

जाणून घ्या ‘नेमकं’ कारण ज्यांमुळे विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ पदाला रामराम केला!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काल शेअर मार्केट जोराने गडगडला आणि त्याला कारणीभूत ठरला इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा राजीनामा! कित्येक महिन्यांपासून इन्फोसिसमध्ये धुमसत असलेली नाराजीनाट्याची आग अखेर पेटली आणि त्यात गुंतवणूकदारांचे तब्बल करोडो रुपये खाक झाले.

vishal-sikka-marathipizza01
२०१७ मधील भारताच्या सर्वात ५० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या विशाल सिक्का यांची अशी काय नाराजी होती? असे नेमके काय घडेल की जगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या सीईओ पदाला त्यांनी तिलांजली दिली? आज या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूयाच, पण तत्पूर्वी विशाल सिक्का यांची पार्श्वभूमी देखील जाणून घेऊया.

मध्यप्रदेशच्या शाजापूर या छोट्याश्या शहरातून आलेल्या या व्यक्तीने स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्यूटर सायन्समध्ये पी.एच.डी. मिळवली. इतरांप्रमाणे स्वत:ची कंपनी सुरु करण्याचे स्वप्न असलेल्या विशाल यांनी प्रथम आपल्या भावासोबत iBrain नावाची कंपनी सुरू केली, पण पुढे ही कंपनी PatternRX यांनी विकत घेतली. त्यानंतर विशाल यांनी Bodha.com या नावाने नवीन व्यवसाय सुरु केला. २००२ मध्ये SAP जॉईन केल्यावर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख अजूनच चढत गेला. त्यांच्या मेहनतीने २००७ च्या CEO Henning Kagermann प्रोग्राम अंतर्गत ते SAP चे पहिले वहिले CTO म्हणून विराजमान झाले. पण दैवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते म्हणून २०१४ साली त्यांनी SAP ला रामराम ठोकला.

त्यानंतर नव्याने त्यांना संधी मिळाली ती थेट इन्फोसिसमध्ये. इन्फोसिसने आपले नवे सीईओ आणि एमडी म्हणून विशाल सिक्का यांना नियुक्त केले. या पदावर असताना त्यांना पगार होता वर्षाला ६० लाख डॉलर्स म्हणजेच ३,८४,५,४०,००० रुपये! आणि सोबत त्यांच्या नावावर होते ५० लाख डॉलर्सचे शेअर्स देखील!

एवढं असून देखील आज ३ वर्षांनी विशाल सिक्का यांनी राजीनामा का दिला असेल बरं?

vishal-sikka-marathipizza02
wittyfeed.com

राजीनामापत्रामध्ये विशाल सिक्का आपले म्हणणे मांडताना म्हणतात,

माझ्यासाठी इन्फोसिसमधला हा प्रवास खरंच कठीण होता आणि तो सोपा असणार नाही याची मलाही खात्री होती. या कंपनीबद्दल माझ्या मनात तेव्हाही प्रेम होते आणि आजही आहे, परंतु काही असे प्रसंग घडतात तेव्हा आपल्याला असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, जे कंपनीच्या आणि आपल्याही भल्याचे असतात.

काय घडले होते असे प्रसंग?

कंपनीमधील काही विश्वासार्ह सूत्रांच्या बातमीनुसार, कंपनीचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती आणि विशाल सिक्का यांच्यामध्ये वाद होता. नारायणमूर्ती यांचे म्हणणे होते की विशाल सिक्का हे सीईओ पदापेक्षा सीटीओ पदासाठी जास्त पात्र आहेत.

तसेच आपण ज्या हेतूने कंपनीच्या सीईओ आणि एमडी पदावर बसलो ते हेतू काही साध्य होत नव्हते. वारंवार होणारे आरोप, दुर्लक्षित काम, कंपनीमधील पॉलिटीक्स यांमुळे माझ्या कामावर परिणाम होत होता.

असे मत विशाल सिक्का यांनी मांडले.

vishal-sikka-marathipizza03
indianexpress.com

विशाल सिक्का यांनी जरी सीईओ पदाचा राजीनामा दिला असला तरी कंपनीतून काही त्यांची अजूनही हकालपट्टी झालेली नाही. इन्फोसिसचे executive vice-chairman म्हणून ते काम पाहणारच आहेत. या पदावर असताना आता ते केवळ strategic initiatives, key customer relationships and technology development. याच कामांमध्ये लक्ष केंद्रित करतील.

नारायणमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार जरी विशाल सिक्का हे सीईओ पदासाठी लायक नसतील तरी काही अंशी विशाल सिक्का यांनी त्यांना चुकीचे ठरवले आहे. विशाल सिक्का यांच्या ३ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये इन्फोसिसचा महसूल २.१३ बिलियन डॉलर्स वरून २.६५ बिलियन डॉलर्स वर जाणून पोहोचले आहे. त्यांच्या कारकीर्दीमध्ये कंपनीच्या लिक्विड अॅसेट्समध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. विशाल सिक्का सीईओ असताना इन्फोसिसने २३ नव्या सर्विसेस लॉन्च केल्या, ज्यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये ८.३ टक्क्यांनी वाढ झाली.

पण शेवटी नाराजीचा ताण असह्य झाल्याने विशाल सिक्का यांना हे पाऊल उचलावे लागले. अर्थात त्यांच्या या कृतीमुळे कंपनीला आणि गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलेला आहे आणि त्याबद्दल कंपनीचे सर्वेसर्वा काय निर्णय घेतात हे येणाऱ्या २-३ दिवसांमध्ये कळेलच!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?