'सरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श

सरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जेव्हापासून माणसाने तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती करण्यास सुरवात केली, तेव्हापासूनच पृथ्वीतलावरील निसर्गाचा ऱ्हास होण्यास सुरवात झाली. मानवाने आपल्या गरजेनुसार आपल्या फायद्यासाठी प्रगतीच्या नावावर बेछूट जंगलतोड केली. आतापर्यंत जगातील कितीतरी जंगलांचा ऱ्हास होऊन त्याजागी आता आता मोठ-मोठी शहरं, इमारती, कंपन्या उभ्या झाल्या आहेत. पण, हे सर्व होत असताना आपण आपलं किती नुकसान करून घेतोय हे आपल्या लक्षातच आलं नाही.

जेव्हा ग्लोबल-वार्मिंगची समस्या डोक वर काढू लागली तेव्हा कुठे मानवाला जाग आली आणि मग जंगल वाचवा, निसर्गाची रक्षा करा, झाडे लावा-झाडे जगवा, यांसारख्या पर्यावरणपूरक गोष्टी घडू लागल्या. आता तुम्ही म्हणालं की हे एवढं लेक्चर कशाकरिता हे तर आम्हाला माहितच आहे… तर मंडळी या सर्वांची आठवण याकरिता कारण आजच्या आपल्या लेखाचा विषयचं निसर्गाशी निगडीत आहे.

आज आपण एका अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपलं पूर्ण आयुष्य हे निसर्गाच्या संवर्धनासाठी अर्पण केलं. एक अशी व्यक्ती जीने कुठल्याही शासकीय अथवा संस्थेच्या आर्थिक मदतीशिवाय तसेच कुठलीही मशिनरी न वापरता चक्क १३६० एकर जागेवर हिरवगार जंगल निर्माण केलं. विश्वास नाही बसत ना… पण हे सत्य आहे. हा व्यक्ती म्हणजे जादव मोलाई पायेंग.

 

jadavpayeng06-marathipizza
sevendiary.com

जादव मोलाई पायेंग हे आसामच्या जोरहट येथील एका गावातील रहिवासी आहेत. भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली ब्रह्मपुत्रा नदी इथूनचं वाहते. जादव हे लहानपणीपासूनच निसर्गप्रेमी होते. त्यांना झाडं, जीव-जंतू, प्राणी-पक्षी खूप आवडायचे. ते १६ वर्षांचे असताना त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या गावाच्या परिसरातील प्राण्यांची संख्या कमी होत आहे. जेव्हा याचं  कारण त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले कि जंगलतोड याचं  मुख्य कारण आहे. एका दिवशी जादव यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या नापीक टापूवर अनेक साप मृत अवस्थेत आढळले. त्या टापूवर एकही झाडं  नसल्या कारणाने त्या शेकडो सापांचा मृत्यू झाला होता. हे बघून ते अतिशय दुःखी झाले. मग त्यांनी वनविभागातील कर्मचाऱ्यांना विनंती केली की, इथे काही झाडं लावा…झाडं नसल्याने इथल्या जीवांचा मृत्यू होतोय…पण वनविभागवाल्यांनी ही एक नापीक जमीन आहे इथे काहीच नाही उगवू शकत, हवे असल्यास तुम्ही तिथे बांबूची झाडं लावून बघू शकता…असं सांगून त्यांचं म्हणणं टाळलं. पण जादव यांनी ही गोष्ट गंभरतेने घेतली.

 

jadavpayeng02-marathipizza
thisiscolossal.com

त्यानंतर जादव यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या त्या टापूवर वीस बांबूची झाडं लावून सुरवात केली. तब्बल ३७ वर्षांपर्यंत त्यांनी रोज एक रोप  त्या टापूवर लावलं. रोज सकाळी ते त्या टापूवर जात आणि एक बांबूचं  रोपटं लावून येत. रोप लावण्यापर्यंत ठीक होत पण एवढ्या साऱ्या रोपांना पाणी देणं एकट्या व्यक्तीकडून जमणार नव्हत. पण जादव यांनी यातूनही मार्ग काढला, त्यांनी प्रत्येक झाडावर बांबूपासून तयार केलेली फळी बांधली आणि त्यावर छोटी मडकी ठेवली त्या मडकींना छिद्र केली आणि त्यात पाणी भरून ठेवले. यामुळे जी नवीन रोपे होती त्यांना एका आठवड्यापर्यंत थेंब-थेंब पाणी मिळत राहिलं. याप्रकारे त्यांना सर्व रोपांची देखरेख करणं सोपं झालं.  १९७९ सालापासून ते निरंतर न थकता न थांबता हे काम करत आहेत.

१९८० मध्ये वन विभागातर्फे तेथे वृक्षारोपणाची योजना राबविण्यात आली, जादवही या योजनेत सामील झाले. यादरम्यान ते एखाद्या मजूराप्रमाणे काम करत राहिले. ही योजना ५ वर्षांपर्यंत चालली. ५ वर्षांनंतर जेव्हा ही योजना संपली त्यानंतर इतर सर्व कर्मचारी तिथून निघून गेले पण जादव पायेंग यांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं. ते नवीन रोप लावत राहिले आणि झाडांची देखरेख करत राहिले. तब्ब्ल ३७ वर्षांच्या प्रयत्नानंतर त्या नापीक जमिनीवर एक हिरवंगार जंगल तयार झालं. १३६० एकर जागेवर पसरलेलं हे जंगल न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्कपेक्षाही मोठं आहे.

 

Jadav Payeng05-marathipizza
nelive.in

महत्वाचं म्हणजे जादव पायेंग याच जंगलात आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत एका झोपडीत राहतात. गायीचं दुध विकून ते आपला उदरनिर्वाह करतात.

जादव यांच्या अथक प्रयत्नांतून त्या नापीक जमिनीवर हे जंगल उभं राहिलं होतं, त्यामुळे त्यांच्या नावावर या जंगलाचे नाव “मोलाईफॉरेस्ट” म्हणून ठेवण्यात आले आहे. इथे जवळजवळ ३०० एकरात बांबूचं जंगल आहे आणि इतर भागात वेगवेगळ्या प्रजातींची झाडं आहेत. या जंगलात आता बेंगॉल टायगर्स, भारतीय गेंडे, हरीण, वेगवेगळ्या प्रजातीची माकडं, ससा, वेगवेगळे पक्षी वास्तव्य करतात, तसेच बरेचदा इथे हत्तीचा कळपही बघायला मिळतो. जादव यांच्यामुळे कित्येक प्राणी आणि पक्ष्यांना इथे त्यांचं घर मिळालं.

 

jadavpayeng04-marathipizza
diary.ru

जादव पायेंग यांना त्यांच्या या अद्भुत कामगिरीसाठी २०१२ साली जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आलं, तसेच २०१३ साली इंडिअन इंस्टिट्यूट आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट तर्फे त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. एवढच नाही तर २०१५ साली त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.

असे हे जादव मोलाई पायेंग ज्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एक अख्ख जंगल उभं केलंय. त्यांच्याकडून आपणही काही शिकायला हवं, भलेही आपण जंगल उगवू नाही शकत पण आहेत त्यांचे संवर्धन नक्की करू शकतो, कारण ते आपल्या जीवनाचा एक मूलभूत आधार आहेत…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?