'इंडिया की भारत? वंदे मातरम की हिंदुस्तान झिंदाबाद? - हा लेख वाचा, योग्य उत्तर सापडेल.

इंडिया की भारत? वंदे मातरम की हिंदुस्तान झिंदाबाद? – हा लेख वाचा, योग्य उत्तर सापडेल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – सौरभ गणपत्ये 

===

इतिहासात रमायला या देशातल्या बहुतेकांना खूप आवडतं. त्याची विविध कारणं असतात. एक तर शाळेच्या पुस्तकांमधला इतिहास हाच आणि एवढाच इतिहास असा प्रत्येकाचा ठाम समज असतो.

तो जर माहित असेल तर इतरांना अजिबात माहित नाही असा गंड का कुणास ठाऊक पण उगीच अनेकांना येत असतो. आणि इतरांकडे जे नाही ते आपल्याकडे असेल तर सद्भावनेने समोरच्याला भरभरून देण्याची खास भारतीय वृत्ती आपोआप इतिहासाच्या चर्चेला एक प्रणोदन (प्रॉपल्शन) लावत असते.

ही झाली सामान्यातल्या सामान्य माणसाची गोष्ट. परंतु आपल्या समाजात विचारांनी डावे असणाऱ्यांची कमतरता नाही. डाव्या विचारवंतांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये (डावे, विचारवंत आणि अभ्यासक हे एकच असतात तेंव्हा त्रिरूक्तीबद्दल क्षमा असावी) सुद्धा प्रत्येक गोष्ट इतिहासाच्या वळचणीला नेण्याची वृत्ती असते.

त्यामुळे इतिहास हा कायमच आपल्या समाजाच्या वर्तमानाचा भाग असतो.

ज्याला आपला इतिहास माहित नसतो त्याला भविष्य नसतं हे काही प्रमाणात खरं असलं तरी “इतिहासात अडकणारे आपल्या देशातले सर्वजण भविष्य कसं घडवणार” हा चिंतेचा विषयही कोणाला शिवत नाही ही आपली वर्तमान ऐतिहासिक शोकांतिका आहे.

 

praying muslim vandemataram hindustan zindabad marathipizza

 

याच मालिकेत सध्या ‘जन गण मन’ या आपल्या राष्ट्रगीताचा कीस पडायला लागला आहे.

आपल्या देशातले अति डावे आणि अति उजवे यांच्यात जन गण मन बद्दल एक समान भावना आहे. दोघांनाही जन गण मन हे नकोसं आहे.

अति डावे म्हणजे ‘देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती’ ह्या स्पिरिटलाच नाकं मुरडणारे असतात. ह्या तिन्ही गोष्टी डाव्यांच्या तत्वज्ञानात बसत नसल्याने त्यांना या जन गण मन आवडत नाही.

दुसऱ्या बाजूला बिनडोक अति उजवे. यांना हे राष्ट्रगीत म्हणून मुळात नकोच आहे. कारण त्यांच्यामते हे गीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी मुळात पाचव्या जॉर्जसाठी लिहिलं होतं.

त्यामुळे त्या गाण्याची राष्ट्रगीत व्हायची लायकी नाही. आणि पंचम जॉर्जसाठी लिहिलेलं गाणं जर राष्ट्रगीत असेल तर याचा अर्थ अजून आपण स्वतंत्रच झालेलो नाही असा अर्थ हे लोक काढतात.

थोडक्यात अति डावे अन अति उजवे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हेच मानत नाहीत. आणि जी बहुसंख्य भाबडी जनता सहज मानते आणि आनंदाने हा दिवस साजरा करते, ती जनता यांच्या दृष्टीने मूर्ख असते.

जन गण मन म्हणावं की नाही यावर वाद होतो त्याहीपेक्षा “वंदे मातरम म्हणावं की नाही” यावर होत असतो. सगळ्यात मोठा भंपकपणा हा असतो की म्हणे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जर म्हटलं तरच म्हणे त्याचा सन्मान राखला जातो.

राष्ट्रगीताचा किंवा राष्ट्रगायनाचा मान राखायला ते प्रत्येकाकडून म्हटलं जावं ही संकल्पनाच अत्यंत बाष्कळ आहे. प्रत्येकाने स्वतःला विचारून पहा, सामूहिकरीत्या म्हटलं जात असताना खरोखरीच किती लोक ते मन लावून म्हणत असतात? फार कमी.

उलट अनेक लोक ते म्हणताना चुपचाप असतात. का? कारण ते ऐकायलाच फार सुंदर वाटतं. ती धून त्यातले ते आरोह आणि अवरोह फार सुंदर, तरीही आटोपशीर आहेत.

त्याचवेळी वंदेमातरम तर अत्यंत सुंदर आहे. संगीताचा एखादा भोक्ता असेल तर तर त्याच्यासाठी देस राग असलेलं वंदे मातरम सुंदर तर आहेच. आणि सगळ्यात लाजवाब तर चार कडव्यांचं वंदे मातरम आहे.

 

indepnedence-marathipizza00

 

बंगालच्या प्रांतात संथाळ नावाच्या जमातीने राज्यकर्त्यांविरुद्ध केलेल्या उठावापासून प्रेरणा घेऊन बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहिली. त्यात वीरश्री देणाऱ्या दुर्गेसाठी वंदे मातरम लिहिलं गेलं.

निव्वळ अफाट गाणं आहे. तानसेन किती असतील माहित नाही पण या देशात कानसेनांची कमी नाही. सुरात म्हटलेलं चार कडव्यांचं हे गाणं ऐकून अंगावर काटा येतो. आणि ती ऐकण्याची ज्याची इच्छा आहे त्याला ते गाण्याची इच्छा अजिबात होणार नाही.

कारण ऐकणं ही फार दैवी कला आहे. ऐकताना तुम्ही एका इंद्रियाने उपभोग घेत असता. आणि भारतीय संस्कृतीत श्रवण क्रियेचं पुण्य अधिक आहेत.

उगीच नाही एकाने गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यावर इतर पन्नास लोकांनी ऐकलं तर एक्कावन्न आवर्तनं मोजली जातात. भसाड्या आवाजातल्या एखाद्याने बेसूर वंदेमातरम म्हटलं तर तो देशाचा सन्मान आणि एखाद्याने न म्हणता नुसतं ऐकलं तर तो अपमान धरायचा काय?

अमुक एकाने वंदे मातरमचा अपमान केला म्हणजे नेमकं काय केलं? नुसतं वंदे मातरम म्हणणार नाही म्हणून सांगितलं की बाकी लोक ते म्हणत असताना मोबाईलवर गेम खेळत होता?

गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात कारण “इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा” ही वृत्ती चुकीची तर आहेच आणि शिवाय ह्या मुद्द्याची वेळ बरोब्बर टोमॅटोच्या महागाईबद्दल जोक्स फिरण्याची आहे. सरकारचं अपयश लपवायला सरकारकडून किंवा सरकारचं मोठं यश लपवायलाही विरोधकांकडून या क्लृप्तीचा वापर होऊ शकतो.

सगळ्यात भंपक असतात ती संपादक मंडळी. याबाबतीत मला कुमार केतकरांचा एक प्रसंग छान आठवतो.

आमच्या एका मैत्रिणीच्या लग्नात केतकर आले होते. सगळ्याच पत्रकारांचा गराडा पडणार हे साहजिकच होतं. एका मित्राने केतकरांना कौतुकाने दाखवायला म्हणून आपल्या मुलीला हाक मारली.

“अगं लवकर ये, बघ कोण आलंय”. जेम तेम अडीच वर्षांची ती चिमुरडी तोंड फिरवून निघून गेली. केतकर गमतीत पटकन म्हणाले –

“होणार होणार, ही पत्रकार होणार, जगाकडे तुच्छ नजरेने बघायची सवय असली की उत्तम पत्रकार होता येतं.”

आजच्या बहुतेक नामवंत संपादकांची आणि पत्रकारांची अवस्था काय आहे? वंदे मातरम म्हणे निव्वळ बंगालचं कौतुक करणारं गाणं? मग निव्वळ बंगालची गोडवी गाणारं गाणं असेल तर या गाण्याला राष्ट्रगानाचा दर्जा देणारी मंडळी मूर्ख ठरवायची यांची हिंमत आहे काय?

म्हणजे वंदे मातरम म्हटलंच पाहिजे असा आग्रह करणारे एका बाजूला आणि वंदे मातरमला आदर दाखवणारे लोक मूर्ख असतात असं म्हणणारे दुसऱ्या बाजूला हीच आपली आजची शोकांतिका आहे.

सगळ्यात कहर केला तो एका वकिलीण बाईंनी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणे भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा करून देशद्रोह केलेला आहे. अनेक मोदी विरोधक एवढे बिथरले आहेत की ते करता करता आपलं माकड कधी झालं हेच यांना समजलं नाही.

नरेंद्र मोदींनी जर हिंदुस्तान म्हणणं हा देशद्रोह असेल तर असादुद्दीन ओवेसीसुद्धा हिंदूस्तान म्हणतात. वर ‘हिंदुस्थान झिंदाबादचे’ नारे लगवतात. म्हणजे “भारतमाता की जय” म्हणणाऱ्यांना “हिंदुस्थान झिंदाबाद” ऐकूनही समाधान मिळत नाही.

या देशाचं नाव भारत च आहे असं वाटणाऱ्यांना हिंदुस्थान झिंदाबाद देशद्रोही वाटतं. आज जर हिंदुस्तान शब्द नावात ‘हिंदू’ असल्याने कोणाला खटकत असेल तर “हिंदुस्थान झिंदाबाद नाही वंदे मातरम म्हणा” म्हणणारे, आणि हिंदुस्तान म्हणणं हा देशद्रोह मानणारे एकाच पारड्यात आले नाही का?

एकाला हा देश भारत वाटतोय आणि एकाला भारतमाता, हाच काय तो फरक. म्हणजे हिंदुत्वाचा जागर करणारे आणि हिंदुत्वाचा द्वेष करणारे एकाच बाजूला झाले. आपण ज्याचा द्वेष करतो, त्याच्याच सारखे बनत असतो, हेच सिद्ध झालं.

खरंतर मोदी सरकार आल्यानंतर मला काही परिचितांच्या विनंत्या येऊ लागल्या. “आपल्या देशाला हिंदुस्तान म्हणा”. या देशाचे नाव इंडिया ऐवजी हिंदुस्तान असे करण्यासाठी आपण आवाज उठवायला हवा असे त्यांचे म्हणणे होते.

लोकशाहीत लोकांच्या मताचा आदर करायला हवा. पण गोंधळलेल्या मतांचा निचरा सुद्धा व्हायला हवा.

इंडिया हे नाव वर फोटोत दाखवलेल्या सिंधु नदीच्या इंडस या शब्दाचा अपभ्रंश झालेल्या उच्च्रावरून आले आहे. हे नाव ग्रीकांनी ठेवले. इंडस नदीच्या पल्याड राहणारे म्हणजे इंडियन.

पुढे पर्शियन आक्रमकांनी सिंधू या नावाचा अपभ्रंश केला इंदू आणि पुढे हिंदू. किंवा हिंदी. आणि त्यांनी नाव आपल्याला दिले ते म्हणेज हिंदुस्तानी.

कारण आपण इंदू नदीच्या पल्याड हिंद या प्रदेशात राहत होतो. अजूनही हाडाचे पाकिस्तानी हिंदुस्तानचा उच्चार हिंदस्तान असाच करतात. कारण मुळच्या त्यांच्या पर्शियन भाषेत ‘उ’ हा उच्चार कमकुवत आहे.

त्यामुळे इंडिया किंवा हिंदुस्तान हे धर्मावर नव्हे तर नदीवर आणि संस्कृतीवर आधारित शब्द आहेत. आणि यातली गंमत गोष्ट म्हणजे “हिंदुस्तान म्हणा” असा टाहो फोडणाऱ्या लोकांना हिंदुस्तान हे इस्लामी संकृतीने ठेवलेले नाव चालते.

यांचा इंडिया या ग्रीक नावाला विरोध असतो. आणि ज्या जगभरातल्या नागरिकांना हिंदू या धर्माबद्दल माहित नाही त्यांना पाकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तझिकिस्तन, हिंदुस्तान, अफगणिस्तान, हे एकाच धर्माचे नाही वाटणार नाही का?

त्यापेक्षा एक काम नाही का करता येणार? पाकिस्तान, अफगणिस्तान, नेपाल, भूतान, बांगलादेश, आणि आमचा देश यांचे मिळून जे भारतवर्ष बनते त्यावरून बेतलेले “भारत” हे अधिकृत नाव काय वाईट आहे? तेवढाच शेजाऱ्यांना कॉम्प्लेक्स…!

तसंही संविधानात भारतच आहे की. सगळाच विचार करून हे केलं गेलं होतं. आपण मात्र घटनाकारांपेक्षा स्वतःला पुढचं मानायचं आणि विश्लेषणाच्या नावाखाली इतिहासातच रमायचं.

भविष्य कोणी ठरवायचं?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?