' भारतमाते... तुझ्यातला इंडिया चिरायू होवो..!

भारतमाते… तुझ्यातला इंडिया चिरायू होवो..!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक: डॉ. अभिराम दीक्षित

===

भारत आणि इंडिया असे दोन वेगळे देश या भूमीत वसतात. सहसा इंडिया हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायची फॅशन आहे. डावे, उजवे, हिंदू-मुसलमान या सगळ्यांकडून इंडियाच्या वाट्याला फक्त द्वेष आलेला आहे .

बलात्कार हे भारतात नाही तर इंडियात होतात असे म्हणत हिंदुत्ववाद्यांनी इंडियाला सर्व पापाचा धनी मानले आहे. आधुनिक पाश्चात्य मूल्ये, पाश्चात्य विज्ञान, इंग्रजी औषधे, युरोपियन कायदे आणि अमेरिकन कुटुंबपद्धतीपेक्षा सकस आणि अस्सल असे काही भारतात आहे. असा त्यांचा दावा आहे. इंडिया ने युरोपियन बनण्याची खाज सोडून द्यावी असा आग्रह आहे. भारतीयत्वाचा पुरस्कार आणि इंडियाचा धिक्कार ही राष्ट्रवादाची उजवी बाजू झाली.

पण डावी बाजू इंडियाचा द्वेष करण्यात किंचितही कमी नाही. खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण यातून गेल्या वीस वर्षात इंडिया निर्माण झाला आणि हा इंडिया भारताचा शोषक आहे असे डावे मानतात. उजवे भगवे आणि लाल डावे या दोघांचा सामायिक शत्रू “इंडिया” आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे. भांडवलशाही, इंग्रजी भाषिक, नवश्रीमंत, मध्यमवर्गीय हे सारे कम्युनिस्ट विचारानुसार दुष्ट बुर्रज्वा कॅटेगरीत येत असतात. चंगळवाद असो की धरणे बांधून केलेला विकास, या नव्या इंडियाला डावे, कम्युनिस्ट, समाजवादी या साऱ्यांचा विरोध आहे.

indepnedence-marathipizza03
4.bp.blogspot.com

या डाव्या उजव्यांच्यामध्ये काँग्रेस किंवा अल्पसंख्य पुरोगामी येतील. डावे उजवे कट्टर असल्याने ते इंडियाचा द्वेष करतील. मधलेही इंडियावर फारसे प्रेम करत नाहीत. ‘आयडिया ऑफ इंडिया’ ही संकल्पना पंडित नेहरूंच्या जवळची असली तरी आजच्या काँग्रेसशी त्याचा काहीही संबंध नाही. आजची काँग्रेस ही हायरारकी असलेली पितृसंस्था आहे. ज्यात ग्रामीण अर्थसत्ता ताब्यात ठेवल्या जातात. काँग्रेस नावाची समृद्ध अडगळ कुणाचा द्वेष करत नाही, पण कुणावर प्रेमही करत नाही. तेव्हढी तिची पात्रताही नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील हे काँग्रेसी सरंजामदार बदलत्या इंडियाला समजू शकत नाहीत, मग प्रेम करणे फार दूर राहिले.

इस्लामवादी तर इंडियाचे पूर्ण द्वेष्टे. समलिंगी लोकांना विरोध करायला आणि जहन्नुममध्ये धाडायला इस्लमियांनी हिंदूत्व वाद्याच्या सुरात सूर मिसळला होता. आधुनिक कायदा, आधुनिक कपडे, आहार आणि विचाराचे स्वातंत्र्य इंडियाला हवे असते. इस्लामीयांचा नेमका डूख या विचाराच्या स्वातंत्र्यावर आहे .

भारत म्हणजे विषमता. याला आपण लाडाने विविधता म्हणतो. खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण हे नव्या इंडिया चे बाहू आहेत. आणि हेच बाहू विषमतेचा किल्ला फोडू शकतात. इंडिया राजकीय पक्षनिष्ठेत रमत नाही. इंडिया धर्म आणि सण याचे रूप बदलतो. इंडिया सतत बदलत राहतो. इंडिया आयडियॉलॉजीच्या पल्याड आहे .

इंडिया ला युरोप अमेरिकेशी नाळ जोडायची आहे. इंडियाला स्वच्छ राज्यकारभार हवा आहे. इंडिया क्रिकेट आणि बॉलिवूडला धर्म मानतो .

indepnedence-marathipizza04
omgstory.net

इंडिया मेणबत्ती वाल्यांचा आहे. इंडिया दिल्लीतल्या आंदोलनाचा आहे. इंडिया एकमताने लोकशाही प्रवाही ठेवतो. स्थिर सरकारे देतो. इंडिया वादग्रस्त मोदींची लाट उठवतो आणि काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारला बुडवून टाकतो. तोच इंडिया इतर पर्याय मिळाला तर दिल्लीत सगळ्या सिटा   “आप” च्या पारड्यात टाकतो. तेव्हा मोदी लाट हे चहाच्या कपातले वादळ बनलेले असते. इंडियाला सशक्त आणि स्वच्छ असा आधुनिक भारत हवा आहे. इंडिया आयडियॉलॉजीच्या पल्याड आहे .

भारत आणि इंडिया यातली दरी मिटवायची जवाबदारी इंडियावर आहे. एक नवा देश उभा करायची जवाबदारी इंडियावर आहे. इंडिया सगळ्यात जास्त आयकर भरतो. चंगळवादी गोष्टीवर असलेला जादाचा अप्रत्यक्ष कर सुद्धा भरतो. देशासाठी मरायचे दिवस संपले. सर्वसंसार परित्याग करून समाजसेवेत देशासाठीच जगायचे दिवस सुद्धा संपले असे इंडिया मानतो. इंडिया चंगळवादी आहे. पण त्यासाठी आधी श्रम करावे लागतात हेही तो जाणतो. आर्थिक-वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीतून नवा इंडिया गेली वीस वर्षात धडपडत उभा राहतो आहे. इंडियाला कोण हिंदुत्ववादी-कोण डाव उजवा कोण कसा ? यात रस नाही. इंडिया आयडियॉलॉजीच्या पल्याड आहे.

इंडिया म्हणजे मेणबत्ती मार्च. इंडिया म्हणजे लोकशाही लाट. इंडिया म्हणजे व्हिसाची रांग. इंडिया म्हणजे अमेरिकेची आस. इंडिया म्हणजे बॉलिवूडचा थाट. इंडिया फेसबुक वर नांदतो. ट्विटर वर चिडतो. इंडिया उघडपणे मुक्त लैंगिकता चाहतो. काहीही म्हणा विचाराच्या बाबतीत इंडिया कितीतरी स्वतंत्र आहे.

शेवटी इंडिया हे भारताचेच पिल्लू आहे. जातीवाद-धार्मिकता आणि पुरुषी भावनिकते सकट भारताचे गुण आणि अवगुण इंडियात आहेत. त्याचे प्रमाण कमी आहे आणि मुख्य म्हणजे इंडियात स्वतःला बदलायची शक्ती आहे. इच्छाशक्ती आहे. स्वतंत्र विचारशक्ती आहे. इंडियात खूप काही दोष आहेत. इंडिया काही सर्वगुणसंपन्न नाही. आदर्श नाही. इंडिया आशावाद आहे. त्याला कोणी समजून घेत नाही. त्यावर कोणी प्रेम करत नाही.

independence-day-rare-photos-marathipizza000

आता इंडियाचा पुन्हा भारत होणे नाही. भारत बदलणार आहे. इथल्या दोन देशातली विषमता इंडिया मिटवू शकेल अशी आशा “रायला वाव आहे. इंडिया आशावाद आहे.

भारतमाते, तुझ्यातला इंडिया सर्व पूर्वग्रहांपासून स्वतंत्र होवो. सर्व पूर्वसंचितापासून स्वतंत्र होवो. भारतमाते, तुझ्यातला तो बदलता इंडिया चिरायू होवो .. वंदे मातरम” !

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?