' गोलंदाजीतला दुर्लक्षित सचिन, म्हणजे हा डावखुरा वेगवान भेदक गोलंदाज!  – InMarathi

गोलंदाजीतला दुर्लक्षित सचिन, म्हणजे हा डावखुरा वेगवान भेदक गोलंदाज! 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सौरभ गणपत्ये

===

२००० साल संपताना आयसीसी नॉक आउट स्पर्धा चालू होती. भक्तिभावाने टीव्हीसमोर बसलेले आम्ही आता केनियाचा संघसुद्धा इज्जत लुटतो की काय या अशा प्रश्नात पडलो होतो.

अनिल कुंबळेचा कोटा संपला होता. मॉरीस ओडम्बेची विकेट वेंकटेश प्रसादने काढून दिली. तरीही केनियाचा संघ २२५ मारेल अशीच परिस्थिती होती.

अचानक एक गोष्ट अशी घडली जी आजपर्यंत मनावर कोरली गेली. यॉर्कर हा भारतीय गोलंदाज टाकूच शकत नाही हे आम्ही मनाशी पक्कं केलेलं होतं.

गेल्या किमान पंधरा वर्षांत भारताकडून कोणी फलंदाजाला उभं सुद्धा राहू न देणारा यॉर्कर टाकल्याचं ऐकूसुद्धा आलं नव्हतं.

 

fast bowlers inmarathi

 

मनोज प्रभाकर गोलंदाजी म्हणजे नेमकं काय करतो ही माझ्या आकलनापलीकडची गोष्टं होती. कपिलदेवने यॉर्कर आणि उसळत्या चेंडूंना केंव्हाच तिलांजली दिली.

(कारण त्यामुळे शक्ती खर्च होते. मग विश्वविक्रम कोण करणार? आणि म्हणे सचिनने गुणवत्ता वापरली नाही). श्रीनाथ वेगवान होता. पण बरीच वर्षे नुसता वेगवान.

अचानक एक तरणाबांड तगडा गोलंदाज आला. बघता बघत धाड धाड दोन चेंडू थेट यष्ट्यांच्या मुळाशी. दोन घरटी उध्वस्त. तिथून जी केनियाच्या संघाने बसकण मारली ती मारली.

पुढच्या सामन्यात असाच एक चेंडू स्टीव्ह वॉला काढून गेला. त्या मालिकेत झहीर खानने आपल्याला खऱ्या अर्थाने अंतिम फेरीत आणलं.

 

zahir khan-marathipizza01
p.imgci.com

 

झहीरने भारतीय क्रिकेटसाठी सगळं दिलं. फलंदाजापेक्षा गोलंदाज आणि झेलच सामने जिंकून देत असतात. (आणि हरल्यावर तेच मार खात असतात). झहीर आपला श्रीकृष्ण होता.

बाहेर कुठेही दौरा असला की वेगवान गोलंदाजांची आठवण येते. भारतीय क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांचं स्मशान असतं आणि इथल्या खेळपट्ट्या त्यांच्यासाठी चिता असतात.

जिथे वेगवान गोलंदाज होणं हा मूर्खपणा आहे तिकडे कपिलदेव ४०० आणि झहीरखान ३०० बळी ओलांडतात म्हणजे ही मर्त्य माणसे नाहीत.

ऑस्ट्रेलिया असो, इंग्लंड असो की दक्षिण आफ्रिका, झहीरखानने कधीच निराश केलं नाही. किंबहुना हातात बॉल घेऊन धावत यायला लागल्यावर आता हा काही करू शकेल असे वाटणारा झहीर खान हा एकमेव गोलंदाज होता.

 

zaheer khan inmarathi
the quint

 

२००२ साली न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाचं वस्त्रहरण झालं तेव्हा त्यात झहीरच उठून दिसला होता.

त्यानंतर ताबडतोब विश्वचषक आला आणि जागा झालेल्या कुंभकर्णासारखा भारतीय संघ अंतिम फेरीत गेला. (आणि पुन्हा झोपला. म्हणून कुंभकर्ण).

त्यावेळेस जवागल श्रीनाथ हा आपल्या त्रिशुळाचं मधलं टोक होता आणि झहीर आणि आशिष नेहरा इतर दोन टोकं. श्रीनाथ अकाली निवृत्त झाल्यावर त्याची जागा झहीरने घेतली आणि अनेक वर्षं सांभाळली.

२०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या एका दौऱ्यावर झहीर तंदुरुस्त नव्हता.

पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव वाट्याला आला.

डेल स्टेन, मोर्केल यांच्यासमोर भारतीय गोलंदाज नक्की कशाला आलेत असा प्रश्न पडायला लागला आणि भारतीय फलंदाजांना कशी उसळती वेगवान गोलंदाजी खेळता येत नाही अशी उपहासात्मक चर्चा होऊ लागली.

दुसऱ्या कसोटीसाठी झहीर खान संघात आला. त्याने आणि हरभजनसिंगने मिळून आफ्रिकेची मस्त भंबेरी उडवली. त्या मालिकेतलं सुनील गावस्करचं एक विधान फार सुंदर होतं.

 

zaheer khan bowling inmarathi
ndtv sports

 

उसळती वेगवान गोलंदाजी ही आव्हानात्मक असते. आणि जर ती अचूक असेल तर कोणीही फलंदाज नीट खेळू शकत नाहीत. भारतीय फलंदाज एकटेच वाईट खेळत नाहीत हेच आफ्रिकेनं सिद्ध केलं.

२०११ चा विश्वचषक जर कोणी ‘काढून’ दिला असेल तर तो निव्वळ झहीरने. हा आपला ऑक्सिजन सिलेंडर होता. समोरच्या टीमच्या खेळीमुळे आपली अवस्था बिकट झाली की हा विकेट काढून द्यायचा.

त्यावेळेस एक अत्यंत मार्मिक प्रश्न शेखर गुप्तांनी झहीरला विचारला होता,

पहिल्या षटकांत बळी घेतोस. मग थोड्या जुन्या बॉलवर घेतोस. अगदी जुन्या बॉलवर घेतोस आणि कसोटी असेल तर पुढे पुन्हा नवीन बॉलवरसुद्धा. कसं जमतं तुला?

तोपर्यंत सुलतान ऑफ स्विंग झालेल्या झहीरने मग रिव्हर्स स्विंगची गम्मत उलगडून सांगितली.

बॉलची सीमकडची (म्हणजेच शिवणीकडची) एक बाजू कायमच चकचकीत ठेवावी लागते. म्हणजेच दुसरी बाजू मळकट होते. त्यामुळे बॉलच्या एका भागाचं वजन जास्त होतं.

त्याचाच वापर करून टप्पा पडायचा आधी बॉल हवेत फिरवता येतो. अगदी सेट झालेल्या फलंदाजाला सुद्धा अस्थिर करून विकेट काढता येते.

 

 

cricket ball inmarathi

 

हा एरोडायनामिकचा शोध मूळचा पाकिस्तानी सर्फराज नवाजचा आणि त्याला आयाम दिला वासिम अक्रमने. पण भारतीय गोलंदाज वेगवान नसतील पण त्यांच्यासारखी सीम गोलंदाजीसुद्धा कोणी करू शकत नाही हा संदेश दिला झहीर खानने.

विश्वचषकात तर कधीच त्याने कधीच निराश केलं नाही. अर्थात त्याच्यामागे गेरी कर्स्टनचीसुद्धा मेहनत होती. कसोटीत दिवस दिवस गोलंदाजी टाकल्यावर कर्स्टन त्याला बर्फाने अंघोळ घालायचा.

जगातल्या खूप कमी (आणि त्यातूनही वेगवान) गोलंदाजांना विश्वचषकाची अंतिम फेरी दोनदा मिळते आणि आठ वर्षांच्या अंतराने असेल तर तुम्ही महानच असावे लागते.

उदा: एन्डी रोबर्ट्स, ग्लेन मेकग्रा, वासिम अक्रम आणि त्याच पंक्तीत झहीर खान. मुख्य म्हणजे त्याने २००३ च्या चुका २०११ ला सुधारल्या.

म्हणूनच पुढे महेंद्रसिंग धोनीला एका पत्रकार परिषदेत बोलावं लागलं. झहीरबद्दल बोलताना जरा जपून. तो आपला गोलंदाजांमधला सचिन तेंडूलकर आहे. त्याला मान तेवढाच मिळायला हवा.

सचिन तेंडूलकर, हरभजनसिंग, युवराजसिंग आणि झहीर खान हे एकमेकांचे जिगरी दोस्त. भारतीय संघ हॉटेलमध्ये असताना हे चौघे एकमेकांच्या शेजारी किंवा कायमच कोणातरी एकाच्या खोलीत असायचे.

 

cricket stars inmarathi
the asian age

 

यांचे बरेचसे फोटोही एकत्र. २०११ चा विश्वचषक यांचा शेवटचा. त्यातली उत्तम कामगिरीही कारकिर्दीतली शेवटची.

सचिन निवृत्त झाला पाठोपाठ यांचीही कहाणी जवळपास संपुष्टात आली. सचिनकडून प्रेरणा घेऊन यांनी लग्नाचा निर्णय घेतला असता तर कदाचित चित्र अजून छान दिसले असते.

युवराज सिंगची डिस्टर्बड असलेली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि झहीर हरभजनची थोडी कर्मठ पार्श्वभूमी यामुळे यांना वैयक्तिक निर्णय घेता आले नाहीत!

आणि त्याचा नाही म्हटलं तरी फटका बसला. आता तो हातात बॉल घेऊन रणगाड्यासारखा धावत येणारा झहीर दिसणार नाही.

ती उंच उडी, ते भरदार आणि कमालीचं देखणं व्यक्तिमत्व आणि तरीही चेहऱ्यावर निरागस लहान मुलासारखं ओसंडून वाहणारं हसू कधीच समोर येणार नाही.

 

zahir khan-marathipizza03
toptenspeople.com

 

श्रीरामपूरचा हा मराठी मुलगा विशेष कशाचा पाठींबा नसताना क्रिकेटमध्ये आला. भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, मैदाने आणि क्षेत्ररक्षण यांच्या उदासीनतेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशेहून अधिक बळी मिळवून गेला.

झहीरभाईची निवृत्ती झाल्यानंतर कुठेच विशेष दखल नाही. चर्चा नाहीत. पुढे चारच दिवस नंतर वीरेंद्र सेहवाग निवृत्त झाला.

क्रिकेटविश्वात जणू पोकळीच निर्माण झाली. क्रिकेट हा खेळ गोलंदाजाचा नाहीच याची ही साक्ष. म्हणूनच हा माणूस डबल ग्रेट. माझा सर्वात आवडता डावखुरा भारतीय!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 32 posts and counting.See all posts by sourabh

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?