' डीएसके – आपला मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय? जाणून घ्या खरं कारण! – InMarathi

डीएसके – आपला मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय? जाणून घ्या खरं कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

डी एस के. “घराला घरपण” देणारा हा यशस्वी उद्योजक, माझ्यासारख्या अनेक मराठी तरूणांच्या स्वप्नांना पंख देणारा आहे. “डी एस के विश्व” ची जाहिरात बघत बघत लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या अनेकांचे रोल मॉडेल झालेले डी एस कुलकर्णी आम्हाला सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रेरणा देत राहिलेत. अश्या उद्योजकाने अचानक मोठ्या आर्थिक संकटात सापडणं आणि त्याची माध्यमांतून चर्चा होत रहाणं फार त्रासदायक वाटतं.

अर्थात, व्यवसाय म्हटल्यावर अडीअडचणी येणारच. डीएसके ह्यांनी अश्या अनेक अडचणींशी दोन हात करून विजय मिळवलेला आहेच. त्यामुळे ह्यातूनही ते सहीसलामत बाहेर पडतील ह्यावर विश्वास आहे.

 

परंतु एवढ्या मोठ्या दिग्गजाने आर्थिक विवंचनेत सापडणं आश्चरकारक आहे. हे असं का घडलं असावं, नेमकं कुठे आणि काय चुकलं त्यांचं – असे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले होते.

 

dsk group d s kulkarni marathipizza

 

श्री संजीव चांदोरकर सरांनी त्यांच्या फेसबुकवर ह्या प्रश्नांची सुंदर उकल करून दिली होती. ती पोस्ट इंग्रजीत होती…तिचा अनुवाद पुढे देत आहे –

हे ही वाचा –

===

ठराविक व्यक्तीचे नशीब वा कंपनीच्या मालकाचे नशीब कधीही कंपनीचा ब्रँड संकटात आणत नाही. या सर्वाला एकच गोष्ट कारणीभूत असते, ती म्हणजे तुमच्याकडे नेमकं कोणत्या प्रकारचं भांडवल आहे. भांडवलदाराचं चारित्र्य हे त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलावर अवलंबून असतं.

डीएसके सोबत जे काही झालं त्यात कंपनीच्या सर्वेसर्वाचा काही दोष नव्हता. “असं कसं?” म्हणून विचारताय – तर एका उदाहरणासह हे जाणून घेऊ.

एखाद्या कमर्शियल बँकेचा मॅनेजर

एलआयसी सारख्या पब्लिक सेक्टर मधील इंश्युरन्स कंपनीचा मॅनेजर

एखाद्या प्रायवेट सेक्टर मधील म्युच्युअल फंडचा मॅनेजर किंवा वॉल स्ट्रीट मधील हेड्ज फंड मॅनेजर

हे सर्व फंड मॅनेजर्स आहेत.

म्हणजेच कॅपिटल अर्थात “भांडवल” या गोष्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी ते बांधील आहेत. बरोबर ना…? पण या बाबतीत एक गोष्ट तुम्ही ही नाकारणार नाही की व्यवसायामधील त्या प्रत्येक मॅनेजरचे विचार, कल्पना, मुल्ये ही एकमेकांपेक्षा अतिशय वेगळी असतील.

 

 

Indian-Stock-Market-Tips-marathipizza02

 

त्यात त्या ठराविक मॅनेजर्सचा काही दोष नाही. खरतरं तो तुमच्या आमच्यासारखा एक निष्णात व्यावसायिक असेल जो एक बँक मॅनेजर म्हणून आपले करियर सुरु करतो. त्यानंतर तो म्युच्युअल फंड मॅनेजर पदापर्यंत प्रगती करतो. त्यानंतर वयाच्या ४० व्या वर्षी तो हेड्ज फंड मॅनेजर म्हणून रुजू होतो.

तर या सर्व प्रवासात एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा इतरांपेक्षा वेगळा व्यक्ती म्हणून तो स्वत:ची छाप पाडतो. तसेच त्याचे आजवरचे सर्व व्यवहार आणि कृती या स्वच्छ आणि लाच मुक्त असतील – पण वरील सर्व प्रकारांत त्या एकाच माणसाचं वर्तन वेगवेगळं असणार. गुंतवणुकीचे प्राधान्य बदललेले असणार – आणि यालाच मी म्हणतो “भांडवलाच्या प्रकारानुसार बदलणारं वर्तन”!

ही गोष्ट तशी व्यक्तीनिष्ठ नाही. जर हेड्ज फंड मॅनेजर त्याच्या पदाला साजेसे काम करु शकला नाही किंवा त्याने काही चुकीचे काम केले तर त्याला आपली नोकरी गमवावी लागेल, तो कन्व्हेयर बेल्ट वरून बाहेर फेकला जाईल. (कन्व्हेयर बेल्ट? म्हणजे? काय संबंध? – पुढे कळेल.)

हे ही वाचा –

===

डीएसके रियल इस्टेटच्या सध्याच्या प्रकरणाची चर्चा ही मुख्यत: मराठी वाहिन्या किंवा मराठी फेसबुक पेजेसवर मोठ्या प्रमाणावर होत आहे, आणि त्याला कारणही तसचं आहे, कारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबासाठी डीएसके हे नेहमीच एक आयकॉन राहिले आहेत.

आणि म्हणूनच की काय, सध्या सुरु असलेल्या प्रकरणावरून डीएसकेला आणि विशेषकरून त्याचे सर्वेसर्वा असलेल्या डी एस कुलकर्णीना सहानुभूतीही मिळत आहे. एक मराठी माणूस असल्याने आणि एका गरीब कुटुंबातून या यशोशिखरावर पोचल्याने आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी डी एस कुलकर्णी हे एक आदर्श देखील आहेत. आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही.

मी डीएसकेची बॅलेन्स शीट वगैरे काही तपासलेली नाही. जर ती तपासली असती तर नक्की काय चुकलंय त्याचा अधिक खोलात जाऊन शोध घेता आला असता. पण मी सध्या जे निरीक्षण करतोय ते वस्तुनिष्ठ असून सर्वांनाच लागू होण्यासारखं आहे. म्हणजे कंपनीचा सर्वेसर्वा हा मराठी असो तेलगु असो व तमिळ असो सर्वांनाच ही गोष्ट लागू होते.

 

business-stress-marathipizza

 

जेव्हा कंपनी ही कॅपिटल मार्केट म्हणजेच पब्लिक इश्यू किंवा खाजगी इक्विटी फंड मधून पैसा उभा करते तेव्हा त्या कंपनीला स्वत:च ‘चारित्र्य’ बदलण्यास भाग पाडले जाते. या तडजोडीचा, कंपनीचा मालक मराठी आहे की अमराठी किंवा तो पूर्वी झोपडपट्टीमध्ये राहत होता की जुहू बीचवरील बंगल्यात वगैरे गोष्टीशी काही संबंध नसतो.

स्टॉक मार्केटमाध्ये असलेल्या शेअर्सच्या किंमती या अतिशय महत्त्वपूर्ण आणि एकहाती कामगिरी बजावतात. हा घटक इतर सर्व घटकांपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो. गुंतवणूकदार, भारतीय असोत वा विदेशी ते एकाच गोष्टीची अपेक्षा करत असतात की शेअरची किंमत ही नेहमीच समधानकारक (दुसऱ्या शब्दांत, वाढती!) असावी. तर शेअरची किंमत ही नेहमी अनुकूल राहावी यासाठी २ गोष्टी या सतत घडत राहिल्या पाहिजेत.

पहिली गोष्ट म्हणजे कंपनीची बाह्य वृद्धी, म्हणजेच विक्री महसूल हा वर्षानुवर्षे वाढत गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीची अंतर वृद्द्धी म्हणजेच कर वगैरे गोष्टी वजा होऊन मिळणाऱ्या नफ्यात वाढ होत राहिली पाहिजे.

 

share-market-marathipizza03

 

ह्यावरून हे स्पष्ट होतं की, शेअर मार्केटमध्ये वरच्या स्थानावर असणाऱ्या सर्वच कंपन्यांना त्यांची सातत्याने होणारी वाढ तारून नेत असते. हीच गोष्ट आहे जी आपल्या प्रश्नाचं उत्तर देते की –

सध्या जवळपास 25 पेक्षा जास्त प्रकल्प बांधकाम प्रविष्ट असताना, डीएसके ने “डीएसके ड्रीम प्रोजेक्ट” सारखा एक महाकाय प्रकल्प का हाती घेतला असावा…!

डीएसके कंपनी या क्षणाला स्वत:च्या वृद्धीचा वारू रोखू शकत नाही.

जर एखादा माणूस ट्रेडमिलवर किंवा कन्वेयर बेल्टवर चालत असेल, तर त्याला देखील कन्वेयर बेल्टची गती वाढल्यानंतर स्वत:ची गती वाढवणे भागच आहे. जर त्याने स्वत:ची गती कमी केली तर तो त्या कन्वेयर बेल्ट वरून सरळ फेकला जाईल.

या उदाहरणावरून मला हे सांगायचे आहे की व्यवसायातील कन्वेयर बेल्टची गती वाढवायची की कमी करायची हे सर्वस्वी बाह्य गुंतवणूकदारांवर अवलंबून असते. कृपया ही गोष्ट लक्षात घ्या की, आयपीओ आणि इतर इक्विटी टक्केवारीचा विचार करता कुलकर्णी यांच्याकडे डीएसकीचे ५० टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स आहेत.

कंपनीच्या पीपीटी वरून अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, गेल्या काही वर्षांत तब्बल २२३ टक्के इतक्या एकत्रित वार्षिक दर वाढीसह कर वगैरे गोष्टी वजा होऊन कंपनीला जो काही नफा मिळतो त्यात मोठी वाढ झाली आहे आणि ही गोष्ट नक्कीच साधी नाही…!

===

चांदोरकर सरांची पोस्ट सोप्या शब्दांत मांडायची झाली तर –

१ – शेअर्स चे भाव सतत वाढते / चांगल्या स्थितीत ठेवायचे असतील तर सतत “वाढ”, बिझनेस आणि प्रॉफिट ग्रोथ कायम ठेवावी लागते.

२ – ही वाढ होत रहावी म्हणून बांधकाम व्यावसायिकाला नवनवे प्रोजेक्ट्स सतत सुरू करावे लागते.

३ – नवे प्रोजेक्ट्स सुरू करताना “जुने पूर्ण होणे” आणि “ते विकले जाणे” हे व्यवस्थित घडत राहीलं तर पैसे सुटत जाऊन अडचण निर्माण होत नाही.

४ – ते घडलं नाही की समस्या उभी रहाते – जी डीएसकेंच्या बाबतीत उभी राहिली.

 

savings-marathipizza

 

सध्या तब्ब्ल २५ च्या जवळपास प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट फेज मध्ये असताना “वाढ” कायम ठेवण्यासाठी म्हणून डीएसके समूहाला “ड्रीम प्रोजेक्ट” सारखा महाकाय प्रकल्प सुरू करावा लागला. त्यातील खर्च – वाढलेलं कर्ज – जुन्या प्रोजेक्टमध्ये अडकलेले पैसे अश्या दुष्टचक्रामुळे डीएसके ग्रुप अडचणीत सापडला आहे.

इथे संजीव सरांनी ट्रेडमिल किंवा कन्व्हेयर बेल्टचं उदाहरण दिलं आहे.

जिम मध्ये जॉगिंग करण्यासाठी जे ट्रेडमिल चं उपकरण वापरतात – त्या ट्रेडमिलची गती जर वाढवली तर त्यावर चालणाऱ्याने आपली गती वाढवावी लागते. अन्यथा तो बाहेर फेकला जाईल. डीएसके ग्रुप ने बिझनेस ग्रोथ ची गती वाढवली आहे. आता त्यांना आपल्या विक्री-नफ्याच्या गती कडे लक्ष द्यावं लागणार.

डीएसके ग्रुप आणि डी एस कुलकर्णी ह्यांचं काय होईल ते भविष्यात कळेलच. पण आपण सर्वांनी हा घटनाक्रम एक बिझनेस केस स्टडी म्हणून लक्षात ठेवायला हवा.

===

हे ही वाचा –

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?