' गुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत – InMarathi

गुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मध्यंतरी एका बातमीने धुमाकुळ घातला होता,

हर्षित शर्मा नामक १२ वी च्या विद्यार्थ्याने रचला इतिहास, गुगलकडून त्याला १.४ करोड रुपयांचं पॅकेज ऑफर केलं गेलं

अगदी बड्या बड्या वृत्तपत्रांनी, मिडिया हाऊसेजनी त्याची ही बातमी लावून धरली. अगदी सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण २ दिवसांनी जे सत्य बाहेर आलं ते हैराण करणार होतं. चला जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण, आणि सध्या त्याचे काय परिणाम भोगतोय हा मुलगा!

harshitsharma-marathipizza01
c.tribune.com.pk

कुरुक्षेत्रामध्ये राहणारा हर्षित शर्मा हा १२ वी चा विद्यार्थी नुकताच उत्तीर्ण झाला होता. २९ जुलै रोजी चंदीगड प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले की, गुगलने हर्षितला प्रशिक्षणार्थी म्हणून दरमहा ४ लाख रुपयांच्या पगारासह ग्राफिक डिजाईनिंगच्या टीममध्ये नोकरी ऑफर केली आहे. झालं, थेट चंदीगड प्रशासनाकडून बातमी येते म्हटल्यावर सोशल मिडीयावर डोळे  झाकून ही बातमी लाखोंनी शेअर केली, ही बातमी इतकी शेअर झाली की थेट गुगलला या बातमीची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी स्वत:हून पुढे येत ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले. हर्षित शर्मा नामक कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला आपण नोकरची ऑफर न दिल्याचे गुगलने स्पष्ट केले.

झालं आता चंदीगड प्रशासन आणि संपूर्ण भारतीय सोशल मिडिया तोंडघशी पडलं. चंडीगड प्रशासनाने सारवासारव करताना स्पष्ट केले की,

आम्हाला शाळेकडून हर्षित शर्माच्या या कामगिरीची दखल घेण्याचे शिफारस पत्र आले, त्यामुळे आम्ही सदर बातमी जाहीर केली.

google-marathipizza
adaptus.com

शेवटी कळून चुकले की हा हर्षितने रचलेला बनाव होता. एक गंमत करावी म्हणून त्याने स्वत:बद्दल ही अफवा पसरवली आणि लोकांना खरे वाटावे म्हणून एक अपॉइंटमेंट लेटर, गुगलने घेतलेल्या ऑनलाईन इंटरव्ह्यूची लिंक आणि त्याचे अभिनंदन करणारे स्थानिक राजकारणी यांचे फोटो या गोष्टी पुरावा म्हणून सादर केल्या. याच गोष्टींमुळे शाळेचा देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.

आता सगळं सत्य प्रकाशझोतात आल्यावर मात्र चहूकडून होणारी टीका, त्याची उडवली जाणारी खिल्ली, घरच्यांचा ओरडा यांमुळे हर्षितला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आपली गंमत संपूर्ण देशभरात ब्रेकिंग न्यूज बनेल आणि एक खोटारडा म्हणून आपली प्रतिमा लोकांसमोर येईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. आपलं बिंग फुटल्यापासून घाबरलेल्या हर्षितने ३-४ दिवस जेवणही घेतलेलं नाही. परिणामी त्याला हॉस्पिटलमाध्ये दाखल करण्यात आलं असून अजूनही तो तणावात असल्याने डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

Fake-offermarathipizza
boomlive.in

तर मंडळी असं होतं हे सगळं प्रकरण.

चूक हर्षितची होतीच, पण सोबतच चूक त्याच्या शाळेची आणि राज्य प्रशासनाची देखील होती. त्यांनी थेट गुगलकडून या बातमीची पुष्टी करून घेतली असती तर आज ही गंमत हर्षितच्या एवढी अंगाशी आली नसती. सोशल मिडीयाने गंमत म्हणून हर्षितने निर्माण केलेल्या ठिणगीचा फुंकर मारून वणवा पेटवला.

विचार करा हीच गोष्ट जर ५-१० वर्षांपूर्वी तुम्ही-आम्ही गंमत म्हणून केली असती, तर ती घरच्यांपर्यंत वा शाळेपर्यंत मर्यादित राहिली असती. घरच्यांचा ओरडा खाऊन त्यावर पडदा देखील पडला असता, पण सध्याची स्थिती वेगळी आहे.

हर्षितचं हे प्रकरण दाखवून देतंय की, आज सोशल मिडिया आणि व्हायरॅलिटी यांचे मिश्रण इतके प्रभावी झाले आहे की व्यक्तीची छोटीशी गंमत  देखील त्याच्या जीवावर बेतू शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?