' प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करणाऱ्या आजी – InMarathi

प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करणाऱ्या आजी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अनय जोगळेकर

===

ताजी घटना आहे.

भाजी आणायला गेलो होतो. भाजी आणायला म्हणजे, बायको भाजी आणायला गावदेवी मार्केटमध्ये गेली होती…मी ड्रायव्हर म्हणून बाहेर मोटारसायकलवर वाट बघत उभा होतो.

उन्हामुळे घामाघूम व्हायला झालं होतं. गावदेवी मार्केटच्या बारक्या गल्लीतून रिक्षा, मोटारी आणि माणसांची वर्दळ असल्याने रस्त्याच्या कडेला, भिंतीपासून कसेबसे फूटभरच अंतर सोडून उभा होतो.

अशातच एक आजी मोटारसायकल आणि भिंतीच्यामधील जागेत शिरायचा प्रयत्न करताना दिसल्या.

 

grandma collecting plastic bags marathipizza

 

वय साधारण ७० असावे. कृश अंगकाठी. काय झाले म्हणून मी विचारले तर म्हणाल्या की, “पिशवी शोधत्ये.”

माझ्या पायाखाली पॉलिथिलिनची एक पिशवी होती पण ती कोणीतरी फेकून दिलेली होती. ती तशीच ठेऊन आजी पुढे सरकल्या.

पण त्या पुढे जात असताना, त्यांच्या उजव्या हातात पॉलिथिलिनच्या दोन पिशव्या आणि खांद्याला लावलेल्या शबनममधून प्लॅस्टिकच्या पिशव्या बाहेर आलेल्या दिसल्या. म्हणून कुतुहलाने मी त्यांच्याकडे लक्ष ठेऊन उभा राहिलो.

५०-६० फूट पुढे गेल्यावर रस्यादिच्या कडेला त्या पुन्हा काहीतरी गोळा करायला वाकल्या. न राहवून मी गाडी सुरू केली आणि त्यांना गाठले. तिथेही, रस्त्यावर भाजी विकायला बसलेल्या एका बाईसमोर पडलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्या गोळा करत होत्या.

मी पुढे होऊन विचारले, “आजी काय करताय?” तेव्हा त्या म्हणाल्या, “प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करत्ये.”

मी विचारले, “कशासाठी?” तेव्हा त्या म्हणाल्या, “वेड लागलयं म्हणून.”

मी म्हटले, माझा तसा उद्देश नव्हता. मला जाणवले होते की, तुम्ही कचऱ्यातील पिशव्या गोळा करताय ते. कौतुक वाटले, म्हणून मी विचारायला पुढे आलो.

तेव्हा त्या म्हणाल्या की, (भाजी मार्केटसमोर) लोकं मनात आले की, प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देतात, म्हणून मी त्या गोळा करते.

मी त्यांना म्हटले की, “स्वच्छ भारत” वगैरे प्रत्यक्षात यायचे तर तुम्ही जे काम करताय, ते लाखो लोकांनी करावे लागेल. मी पत्रकार (ऑनलाइन/सोशल मिडियावरील) आहे. मी तुमचा फोटो काढून तुम्ही करत असलेले काम शेअर करू का? तेव्हा त्या नको म्हणाल्या.

मग मीही लाजेस्तव त्यांच्याबरोबर १/२ पिशव्या गोळा केल्या. पण बायको भाजी घेऊन बाहेर आली असेल आणि हा कुठे कडमडला असा विचार करत असेल याची जाणीव झाली आणि मी माघारी वळलो.

आजींनी मला नाव विचारले. त्यांचे नावही सांगितले. पण ते मी शेअर करत नाहीये कारण प्रत्येकाला आपली प्रायव्हसी महत्त्वाची आहे. पण या आजी जे काम करत आहेत ते आपणा शिकल्या-सवरलेल्या पांढरपेशीय/मध्यमवर्गीय लोकांना अंतर्मुख करणारे आहे.

ता.क. : फोटो त्या आजींचा नाही…गुगल सर्च करून उचलला आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?