' “विकासाच्या” पोलादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२) – InMarathi

“विकासाच्या” पोलादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक – सौरभ गणपत्ये

मागील भागाची लिंक : चिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय? (१)

चीनबद्दल मनात एक आदर न वाटता बहुतेकांच्या मनात एक भीतीयुक्त तिरस्कार दाटून आलेला असतो. त्याला १९६२ मधला आपला पराभव कारणीभूत असतोच. शिवाय चिनी कार्यक्षमता, ऊर्जा, धडाडी यांच्या आसपासही भारतीय पोहोचू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे.

त्याला भारतीय समाजमानसशास्त्रात जाऊन अभ्यासता येईल, पण ती ही जागा नव्हे. चीन म्हटलं की महाकाय असं काहीतरी डोळ्यासमोर उभं राहतं. आपल्याकडे अश्या अनेक कंपन्या आहेत ज्यांचं नाव सर्वतोमुखी असतं पण त्यांचे दहा प्रॉडक्ट सांगा म्हटलं तर येणार नाहीत. मात्र चीन या देशाची कथा पूर्णपणे वेगळी.

गेल्या लेखात चीनने लाल भांडवलशाही कशी अंगिकारली हे बघता आलं. चीनच्या निर्यात मालाबद्दल एक गमतीशीर वाक्प्रचार आहे. “चले तो चाँदतक और, न चले तो शामतक”.

 

made in china InMarathi

चीनचा माल म्हणजे कोणतीही हमी नसलेला यावर सर्वच गिऱ्हाईकं एका पट्टीत बोलतील. तरीही गणेशोत्सवात आपल्या घराघरात पोहोचणारा माल चीनी असतो. हा माल हमी नसलेला असेल म्हणून समग्र चीनी निर्मिती क्षेत्राला कमी लेखून चालणार नाही.

आपल्याला तो नोकिया मोबाईल आठवतो का? येस तोच तो, निर्लज्ज मोबाईल. कितीही आदळापट केली तरी काहीच न होणारा हा मोबाईल चीनी होता. नोकिया कंपनी मागे पडण्यामागे हे असले वर्षानुवर्षे टिकणारे आणि नड भागवणारे मजबूत मोबाईल होते. हे सर्व मेड इन चायना असत.

 

nokia mobile phone InMarathi

स्टीव जॉब्सची APPLE कंपनी केवळ कार्यक्रम प्रणाली बनवणारी होती. पण तिचे सगळे प्रोडक्ट्स चायनीज मेड असायचे. म्हणजे स्वस्त आणि टिकाऊ मालही चीनमध्ये बनत असे.

 

apple iphone InMarathi

 

आज तर उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार भागात चालणाऱ्या जन्माष्टमी आणि रामलीला खेळात लागणारे मुखवटे चीनी असतात. गोष्टी अश्याच रहिल्या तर एक दिवस आपल्या घरी येणारा गणपती बाप्पाही मंगोलियन वंशाचा असेल हे निश्चित.

 

made in china 1 InMarathi

 

चीनच्या निर्मिती क्षेत्राची व्याप्ती किती महाप्रचंड होती (अर्थात महाप्रचंड हा शब्दही कमी वाटावा) यासाठी एकच उदाहरण पुरे आहे. २००८ साली बीजिंग ऑलिम्पिक भरवण्यासाठी चीनने अफाट आणि निव्वळ अफाट बांधणी क्षेत्र निर्माण केलं. त्याचा परिणाम म्हणूनच आधीची काही वर्षे जगभरात पोलादाची कमतरता जाणवत होती असे अनेक तज्ञ मानतात.

मुळच्या कम्युनिस्ट विचारसरणीचा अजूनही राहिलेला पोलादी पडदा आणि त्याबरोबर बांधणी क्षेत्रात घेतलेली झेप यावर चीनचा ड्रॅगन अक्षरश: आग ओकू लागला. आपल्या या धडाडीने चीनने महासत्ता होण्यापर्यंत झेप घेतली. जगभरच्या विद्वानांना चीनची भुरळ पडली ती तेव्हापासून. या आधीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे, कोणताही विधिनिषेध न बाळगता अर्थात अनेकदा विवेकशून्य पद्धतीने. यासाठीसुद्धा एक उदाहरण पुरेसे आहे.

अभिनव बिंद्राने नेमबाजीत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं. अभिनवचा चेहरा अगदी शांत होता. जणू मोहावर विजय मिळवलेल्या साधूसारखा. पण ज्या चीनी खेळाडूला रौप्यपदक मिळालं तो अक्षरश: हमसून हमसून रडत होता.

सुवर्णपदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूपेक्षा याची शो बाजीच अधिक वाटत होती. त्यावेळी तिकडच्या चीनमध्ये तळ ठोकलेल्या काही पत्रकारांनी काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या.

 

abhinav bindra gold medal InMarathi

 

वय वर्षे पाचपेक्षाही खाली असताना चीनमध्ये मुले आणि मुली निवडली जातात. त्यांना ऑलिम्पिक पदकासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाते. ती मुले इतकी लहान असतात की त्यांना देश, खेळ आणि ऑलिम्पिक यांच्याशी काहीच देणे-घेणे नसते. त्यामुळे प्रेरणा वगैरे तर सोडूनच द्या. तर या मुलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे होतात. या काळात या मुलांना आईवडिलांकडे राहताही येत नाही. संपूर्ण जबाबदारी सरकारची. आयुष्यात मिशन एकाच. सुवर्ण पदक.

प्रत्येक भागात अधिकाऱ्यांना टार्गेट्स दिलेली असतात. मुले निवडून प्रशिक्षित करायची आणि शक्यतो मेडल मिळवायचे. यापायी अनेकदा मुलांना हाल सोसावेच लागतात. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तर अनेक चीनी खेळाडू इतर खेळाडूंपेक्षा वयाने लहान कळत होते.

त्यांचा वावर १३ किंवा १४ वर्षांच्या मुलांसारखा होता अन त्यांची वये १८ आणि १९ दाखवली गेली होती. शरीरयष्टीने ही मुले मोठी वाटत होती . त्यांना वेगवेगळी इंजेक्शने देऊन कृत्रिमरीत्या वाढवल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. आयुष्यात असलेले सुवर्णपदकाचे मिशन जर पूर्ण झाले नाही तर त्या खेळाडूचे काय होते हे स्पष्ट होत नाही.

 

chiana chaild InMarathi

 

अभिनव बिंद्राचा प्रतिस्पर्धी कदाचित याच भीतीपोटी रडत असावा.

एकदा एखादं लक्ष्य ठरवलं की काहीही करून ते गाठायचं हा चीनचा राष्ट्रीय स्वभाव आहे. मग ते लक्ष्य ऑलिम्पिक सुवर्णपदकांमध्ये क्रमांक एक मिळवणे असो अथवा निर्यात वाढ करून जगाचं निर्मिती क्षेत्र बनणे. हे आपण गेल्या लेखात वाचलं होतं. मग त्याची ही किंमत असते.

या राक्षसी महात्वाकांक्षेपायी अनेक लहान मुलांची लहानपण कोमेजली जातात. त्यांना आयुष्य मिळतं पण जीवन मिळत नाही. यापेक्षा आपली ढिली व्यवस्था परवडली.

china-marathipizza02
uscnpm.org

नको मला ऑलिम्पिक मेडल! पण माझ्या लहानग्याने उन्हातानात धुळीत मनमुराद खेळलं पाहिजे!

– असा आपला पालकवर्ग विचार करतो. जीवनात आनंद नसून भीती आणि सक्ती असेल तर ते जीवन मातीमोल असतं. चीनबद्दल आणि तिकडच्या प्रगतीबद्दल प्रश्न उठत होते खरे. पण त्याकडे कोणीच कधीही लक्ष दिलं नाही.

चीनचे अधिकारी सर्रास महिलांवर अत्याचार करत फिरत होते तेव्हा चीन मात्र भारताच्या राजधानीतल्या बलात्काराच्या कहाण्या रंगवून सागत लोकशाही काही कुचकामी व्यवस्था आहे हे लोकांवर बिंबवत होता.

तिअननमेन चौकात चीनने राक्षसीपणे लोकशाहीवादी लोकांना कंठस्नान घातले होते. आज चीन हॉंगकॉंग विरोधात तेच करू शकतो. अर्थात ते तितकंसं सोपं नाही हेही खरंच.

राष्ट्राच्या प्रगतीपुढे तत्वे बित्वे गुंडाळून ठेवायचा आव चीनने ने आणला खरा. परंतु प्रगती म्हणजे काय यावर भल्या भल्या विचारवंतांमध्ये अजून एकमत झालेलं नाही. पण विचारवंतांमध्ये चर्चा व्हायला किमान लोकशाही असावी लागते. चीन मध्ये तिचा मागमूस नाही.

शांघाय, नानकिंग, बीजिंग, ल्हासा, हॉंगकॉंग, गॉन्गझौ वगळता संपूर्ण चीनचा व्हिसा मिळत नाही. आपल्या लोकशाहीवर कायमच नाकं मुराडणारा चीन स्वत:चे ढोल वाजवतो खरा, पण चीनमध्ये सरासरी आयुर्मान किती, संपूर्ण चीनमध्ये पर्यावरणाची अवस्था काय? साक्षरता किती, महिलांची स्थिती कशी?

किती घरांमध्ये संडास आहेत, किती मुले शाळेत, कॉलेजमध्ये किंवा संशोधनात आहेत, किती घरांमध्ये टीव्ही, फ्रीज अथवा एसी आहेत, किती लोक गाड्या वापरतात, किती महिलांची प्रसूती इस्पितळात होते, इस्पितळे, दवाखाने सुसज्ज असतात की नसतात यापैकी कशावरच चीनमध्ये चर्वितचर्वण होऊ शकत नाही.

 

chaina micro aartments InMarathi

 

कारण विकासाचे तथाकथित मापदंड वापरत आपल्या केवळ बाह्य व्यापाराने जगाचे डोळे दिपवत चीनने मोठी मजल मारली खरी. पण तो भ्रम होता की काय असा प्रश्न पडू लागला आहे. भारतातल्या सर्वच डोळे दिपलेल्या विचारवंतांचे डोळे उघडतील अशी अशा बाळगायला हरकत नाही.

‘वन चाईल्ड नॉर्म’ वापरत चीनने आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणलं म्हणून अनेकांना कौतुक वाटतं. प्रत्यक्षात ह्या एक मूल होण्यामुळे अफाट समस्या चीनला मिळाल्या. अनेक ठिकाणी मुली झाल्यावर नोंद लपवली गेली. चीनने मुलगी झाल्यास अजून एक चान्स घेण्याची मुभा जोडप्यांना दिली.

ONECHILD-InMarathi

 

परंतू त्याचा गैरफायदा उचलत मुलगा झाल्यावरही ‘मुलगी झाली’ अशी नोंद अनेक ठिकाणी दाम्पत्यांनी करून दिली. परिणामी चीनमध्ये मुलांचं आणि मुलींचं गुणोत्तर अधिकृत नाही. चीनमध्ये म्हाताऱ्यांची संख्या जोमात वाढली त्याप्रमाणात तरुण मुलं वाढली नाहीत.

आई बाप मिळून एक मूल वाढवतात. परंतू त्याच अपत्याचं मोठेपणी लग्न झालं की त्याच्यावर स्वतःच्या अपत्याची आणि शिवाय चार वयस्कर आईबापांची जबाबदारी पडते हे चायनीज सत्य आहे. लग्न झालेल्या मुलामुलींचे आजोबा सर्रास जिवंत असतात. त्यामुळे एक तरुण अपत्य आठ जणांना सांभाळतंय हे दृश्य अगदीच शक्य.

विकासाच्या हॅलोजनने डोळे दिपावले की समस्यांचा अंधार अनोळखी होतो. चीन महासत्ता बनला ते आर्थिक घोडदौडीवर. ही घोडदौड तरी सक्षम होती काय? चीनची आर्थिक दौड तरी सक्षम होती का? या बद्दल चर्चा पुढील लेखात.

भेटूया पुढच्या लेखात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?