दुष्काळ नियोजन : आपण काय काय करू शकतो?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

गेले ३ वर्ष झाले महाराष्ट्रात पाऊस खूप कमी झाला. याचा परिणाम प्रथमतः शेतीवर आणि कालांतराने औद्योगिक क्षेत्रांवर आणि आज आपल्या वैयक्तिक जीवनावर देखील होऊ लागला आहे.

यंदाचा दुष्काळ खरोखरंच आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत आला आहे. मराठवाड्यात, विदर्भात पाण्याची अक्षरशः मारामार झाली आहे. लातूरचा दुष्काळ तर एवढा तीव्र झाला लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला.

 

latur water marathipizza

 

पाण्याच्या या भीषण परिस्थितीचा आढावा घेत पुढील उन्हाळ्यासाठी आपल्याला गंभीरतेने काही उपाय करणं आवश्यक आहे.

ज्या ज्या वेळी मुबलक प्रमाणात पाऊस पडला, धरणे भरली कि आपण लगेच हवेत जातो. राजकारणी “पाण्याचा प्रश्न सुटला बाबा एकदाचा!” अशा थाटात आपलं रेग्यूलर राजकारण करायला सुरु करतात. आपणही एकदा रोज नळाला पाणी येऊ लागलं की बिनधास्त पाय पसरून बसायला लागतो.

पण हाच निष्काळजीपणा आपल्याला उन्हाळ्यात भोवतो. म्हणून “पाणी” या गोष्टीला आता आपण गंभीरतेने घेणं आवश्यक आहे.

गंभीरतेने घेणं म्हणजे काय ?

आय.बी.एन. लोकमत, ए.बी.पी. माझा इत्यादी channels वर हाताची घडी घालून गंभीर चेहरे करून आपलं ‘मत’ मांडणारे (की रेटणारे?) – यांना ऐकत बसायचं ? फेसबुकवर सरकारच्या नावानी बोंब मारत रहायची ? याच्यानी काहीही होणार नाही. पुढचा उन्हाळा तुमची वाट पाहतोय आणि तो त्याच्या तयारीने येत आहे. म्हणून आपण आपली लढाई लढायला हवी.

१) आजची परिस्थिती:

• आज मराठवाडा, विदर्भ यांसह महाराष्ट्रातल्या इतर अनेक भागात लोकांना घराच्या वापरासाठी, शेतीसाठी पाणी मिळत नाहीये.

शहरी भागातला अनुभव असा की, लोक नगरपालिकेच्या नळाला सरळ १ HP चे पाण्याचे पंप बसवत आहेत. एकानी मोटार बसवली कि त्याच्या पुढच्या घरात पाणी येत नाही, किंवा कमी येतं. त्यामुळे तो देखील अशीच पाण्याची मोटार बसवतो. असं करत करत जवळ जवळ प्रत्येकानी पाण्याच्या मोटारी सरळ नगरपालिकेच्या नळाच्या कनेक्शनला जोडल्या आहेत. परिणामी फक्त काही लोकांनाच भरपूर प्रमाणात पाणी मिळते आणि बाकीच्यांकडे बिलकुल पाणी येत नाही. अशा डायरेक्ट नळाच्या पाईपलाईनला सरळ मोटार लावणं बेकायदेशीर आहे.

• मराठवाड्यात नगरपालिकांनी या दुष्काळाच्या काळात बोअरवेल खोदण्यास बंदी केली आहे. २०० फुटांपेक्षा खोल बोअर पाडल्यास पोलिसी कारवाई करण्यात येणार आहे.

• काही ठिकाणी मोठे डेझर्ट कुलर लावण्यास देखील मज्जाव केला गेला आहे असं ऐकण्यात आलंय.

• अशा प्रकारे पाणी मिळत नसल्याने tanker द्वारे पाणी आणावे लागत आहे. त्यात tanker वाले देखील दादागिरी करून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. ५००० लिटरच्या tanker साठी ७०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत.

• शेतांमध्ये विहिरी आटल्या आहेत. लोकांना हाता तोंडाशी आलेले पिकं पाण्याअभावी सोडून द्यावे लागत आहेत. लोकांनी १० महिने जागवलेल्या उभ्या केळी पाण्याअभावी सोडून दिल्या आहेत. १० ते १२ फुट वाढलेले केळीचे निसवलेले (केळींचे घड लागलेले) झाडं आपल्या डोळ्यांसमोर उन्हात वाळताना पाहावे लागत आहेत.

ही आजची परिस्थिती आहे.

२) यावर उपाय –

आपण जर पाऊस पडल्यावर दर वर्षी प्रमाणे दुर्लक्ष केलं तर ही दुष्काळी परिस्थिती पुढच्या उन्हाळ्यात अधिक भीषण होणार! त्यासाठी प्रशासनाला आणि आपल्या वयक्तिक पातळीवर काही उपाय योजना करणं अनिवार्य आहे.

यावर काय उपाय केले जाऊ शकतात ?

अ) भूजल पातळी वाढवणे – भूजल पातळी वाढवणे हे आपल्या सर्वांना शक्य आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली तर पुढच्यावेळी आपण आपले बोअरवेल्स आटण्यापासून वाचावू शकतो.
भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करावे ?
गुगलवर Rainwater Harvesting सर्च केल्यास आपणास भरपूर उपायांबद्दल माहिती मिळेल.
काही बेसिक उपाय:

प्रत्येक घरात, Flat System, बंगला इत्यादी ठिकाणी शोषखड्डा (Water percolation tank) बनवणे.

आपल्या घराच्या अंगणात, किंवा मागच्या बाजूला ६ बाय ५ फुटाचा ८ ते १२ फुट खोल खड्डा खणायचा. साधारण जमिनीत मुरूम लागेपर्यंत हा खड्डा खोल असावा. त्यात आतील बाजूस तेवढ्याच मापाचे सिमेंट विटांचे, किंवा दगडाचे बांधकाम करून घ्या. जेणेकरून पाण्यामुळे खड्ड्याच्या भिंती ढासळणार नाहीत. हा खड्डा खणल्यावर त्यात अर्ध्या खोलीपर्यंत डबर भरा. या खड्ड्याला आपल्या घराच्या, गच्चीच्या छतावरून येणाऱ्या पाण्याच्या पाइपचे कनेक्शन द्या. घराची गच्ची, अंगण व इतर अशा जागा जिथून पाऊस पडल्यावर पाणी वाहून जाण्यास पाईप लावला आहे अशा सर्व जागांवरचे पाणी या खड्ड्यात येऊन पडावे अशी अरेंजमेंट करा. हे पाणी खड्ड्यापाशी आणल्यावर खड्ड्याच्या बाजूला एक छोटं चेंबर बनवा. चेंबरला वरून येणाऱ्या पाईपचे कनेक्शन द्या आणि खड्ड्याकडे जाणाऱ्या पाइपच्या तोंडाला एक जाळी बसावा. यामुळे खड्ड्यात कचरा, बेडूक, साप इत्यादी गोष्टी जाणार नाही. या नंतर त्या खड्ड्यावर Slab टाकून खड्डा झाकून घ्या. म्हणजे तुमची तेवढी जागा वाया जाणार नाही.

हा खड्डा बनवायला खूप मोठा खर्च येत नाही व खूप वेळ पण लागत नाही. आठवड्याभरात हे काम पूर्ण होऊ शकतं.

हे शोषखड्ड्याचं मॉडेल अगदी बेसिक आहे. जाणकार लोकांशी चर्चा केल्यास आपणास याहून अधिक सक्षम मॉडेल मिळू शकेल. शोषखड्ड्याची साईझ देखील आपणास कमी करता येईल.

येणारा पावसाळा सुरु होण्याआधी एका भागातील किमान २० लोकांनी जरी असा शोषखड्डा बनवला तर पाण्याच्या पातळीत पडणारा फरक तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल.
तसेच शोषखड्डा बनवणाऱ्या लोकांना शासन Income Tax मध्ये ३ वर्षांसाठी ५ टक्के सूट देणार आहे.

यात अजून एक गोष्ट करता येऊ शकते. घराच्या छतावर पडणारं पाणी तुम्ही एका जमिनीखाली बनवलेल्या हौदात जमा करून ते पाणी गाडी धुणे, झाडांना पाणी टाकणे अशा कामांसाठी वापरू शकता.

ब) प्रत्येक घराच्या अंगणात जमिनीखाली हौद बनवणे –

हे काम प्रशासन पातळीवर केलं जाऊ शकतं. मी जसं वर म्हणालो, तसं लोक नगरपालिकेच्या नळाच्या पाईपलाईनला १ HP ची मोटार जोडत आहेत, या गोष्टींना नगरपालिकांनी चाप बसवला पाहिजे. अशा प्रकारे मोटार जोडणी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.

नगरपालिकेने प्रत्येक घरात किमान १००० ते १५०० लिटर पाण्याच्या हौदाची सक्ती करणे आवश्यक आहे. नळाला येणारे पाणी आधी हौदात पडू द्यावे आणि ते पाणी नंतर मोटारीने तुमच्या घराच्या वरच्या टाकीत न्यावे.

ज्या नागरिकांकडे हौद नाहीत, शोषखड्डा नाही त्यांना पाण्याची जोडणी देऊ नये. त्यांनी सार्वजनिक नळाच्या कनेक्शनचा वापर करावा.

ज्यांच्याकडे शोषखड्डे बनवण्यासाठी जागा नाही असे घर मुळातच बेकायदेशीर बांधलेले असतात. कारण तुम्ही नियमात दिलेल्या FSI पेक्षा जास्त भागात घर बांधले आहे. वाढीव FSI देताना देखील शोषखड्डा व पाण्याचा हौद यांच्यासाठी राखीव जागा ठेवावी.
नवीन घर, इमारती बांधताना हे शोषखड्डा व पाण्याचा हौद बांधण्याची सक्ती करावी.

क) शेतीसाठी काही उपाय योजना

१] शेतात प्रत्येक जमिनीच्या तुकड्याच्या बाजूला चर (मोठी नाली) खणलेला असतो. या चरातून शेतात पडलेल्या पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाते. या चरांतून जाणारे पाणी मोकळ्या जागेत बंधारे बांधून साठवले जाऊ शकते.

२] शेतात चरांमधून वाहणारे पाणी विहिरीकडे वळवता येऊ शकते. हे पाणी विहिरीत सोडल्यास या पाण्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण हे पाणी गढूळ असल्याने जशास तसे विहिरीत सोडता येत नाही. त्यासाठी थोडी जागा करून वाळू, दगड यांचं स्टेप फिल्टर तयार करावं लागतं. म्हणजे गढूळ पाणी विहिरीत पडणार नाही.

३] कृत्रिम तळे – तुमच्या शेतात तुम्हाला तुमचं स्वतःचं छोटं तळं बनवता येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला एक जागा करून तिथे तुमच्या गरजे प्रमाणे मोठा खड्डा करावा लागेल. समजा तुम्ही १५ बाय १५ फुटाचा, ५ फुट खोल खड्डा केलात तर त्यातून निघालेल्या मातीचा खड्ड्याच्या बाजूनी गोठ करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्यातून किमान अजून १ ते २ फुट जास्त खोली मिळेल. खड्ड्याच्या भिंती गरज पाडल्यास दगड रचून अजून पक्क्या केल्या जाऊ शकतात. बाजारात अशा प्रकारे पाणी साठवण्यासाठी खास ताडपत्री मिळते. ही ताडपत्री तुम्हाला पाहिजे त्या मापाची बनवून मिळते. अशी ताडपत्री खरेदी करून तिला तुम्ही बनवलेल्या मोठ्या खड्ड्यात अंथरून घ्या. ताडपत्री व्यवस्थित बांधून घ्या. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते पाणी या तुमच्या कृत्रिम तळ्यात जमा होईल. या तळ्यात तुम्ही पाण्याचा पंप बसवून ते पाणी पिकांना देऊ शकाल.

तसेच या तळ्यात मत्स्यपालन देखील होऊ शकते.

सर्वसामान्य लोकांना, राजकीय Activists ना दुष्काळ नियोजनासाठी उपाय सुचवणे हा या लेखाचा मुख्य हेतू आहे. वरील लेखात सुचवलेले उपाय आपण आपली कल्पकता वापरून, नवीन माहिती मिळवून, नवीन मोडेल्स बनवून अजून effective बनवू शकाल.

आशा करतो कि आपण ‘पाणी’ या गोष्टीला सिरीयसली घ्याल आणि वर सुचवलेल्या उपायांवर विचार कराल. आपण जर हे उपाय केले नाहीत तर पुढच्या उन्हाळ्यात आपल्याला अजून भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

तेव्हा ह्याच महिन्यात आपण आपल्या घराच्या अंगणात, बिल्डींगच्या अंगणात एक शोषखड्डा ( Water percolation tank ) तरी बनवावा म्हणजे येत्या पावसाळ्यात भूजल पातळी वाढवण्यास मदत होईल.

: दिग्विजय निलेकर

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 193 posts and counting.See all posts by omkar

One thought on “दुष्काळ नियोजन : आपण काय काय करू शकतो?

 • May 10, 2019 at 12:16 am
  Permalink

  नमस्कार मी एक सोशल वर्कर आहे!
  मला वॉटर मॅनेजमेंट मध्ये तज्ञशी बोलता येईल का?
  संपर्क करावा!
  9637175517

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?