' दाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१ – InMarathi

दाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

रामभटांनी सांगितल्याप्रमाणे आबाला शोधून आणण्यास नारायण बाहेर पडला. त्याने ठरविले, आधी देवळे पाहावी. कुठेतरी निवांत बसला असेल. मात्र, सगळी देवळे पाहून झाली तरी आबा काही सापडला नाही. शेवटी, नारायणच कंटाळून एका मंदिराबाहेर पारावर बसला. काही वेळ गेला आणि रामभटाकडे दूध घालणारा गवळी तेथे आला. नमस्कार चमत्कार झाले आणि नारायणाने आबाला शोधीत इकडे आल्याचे त्याला सांगितले. गवळी म्हणाला,

तिकडं पाहा. ती लांबवर झाडे दिसताहेत ना? तिकडे जात्यात ते रोज. मला माहीत आहे! मी फिरत असतो ना इकडे!

गवळ्याचे आभार मानून नारायण त्या बागेकडे निघाला. लांबून जवळ वाटली खरी पण ती बरीच लांब होती आणि रस्ताही काही सुखाचा नव्हता. तेथे गेल्यावर मात्र नारायणाला आपण एका फारच विशेष ठिकाणी आल्यासारखे वाटले. तो सारा परिसर रम्य होता. एक छोटा ओढा कुठूनसा वाहात येत होता आणि नदीला मिळत होता. कुणीतरी तेथे एक शंकराची छोटीशी पिंड करून त्यावरून पाणी वाहील अशी व्यवस्था केली होती. इतकेच काय, बेलाची पानेही आपोआप वाहून तेथे येत होती. मानवी वस्ती दूर असल्याने निसर्गाची मजा लुटण्यासारखेच ते ठिकाण होते, आबाची निवड अगदी योग्य होती, साधनेसाठी अशीच शांत जागा हवी. ज्ञानदेवांनी सहाव्या अध्यायात साधनेसाठी छानसे स्थान शोधावे असे म्हटलेच आहे…

तैसे एक लागेल । स्थान पाहावें ।।

जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे ।

वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ।।

असे स्थान पाहावे की समाधानाच्या इच्छेने ते केवळ पाहिल्यानेच वैराग्याची ओढ द्विगुणीत व्हावी, तेथे एकदा बसल्यावर तेथून उठायची इच्छाच होऊ नये! इतकेच काय,

जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखंडियाही आस्था । समूळ होय ।।
स्वभावे वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचिता । तरी सकामही परी माघौता । निघो विसरे ।।

चुकूनमाकून एखादा पाखंडी तिथे आला तर त्यालाही ते स्थान पाहून साधनेची समूळ इच्छा व्हावी! एखादा सकाम तेथे अवचित येऊन ठाकला तर आपल्याला परतायचे आहे हेच तो विसरून जावा!

हा आतपाही अळुमाळ । जाणिजे तरी शीतळ । पवन अति निश्चळ । मंद झुळके ।।

तेथे उन्ह असावे पण कसे? तर ते ही शीतल भासेल असे! वारा असावा, कसा? असून निश्चल वाटावा असा, मंद झुळकणारा! आणि साधकाने अशा एक दोन जागा हेरून,

दोहींमाजी आवडे तें । जें मानवलें ते चित्तें । बहुतकरूनी एकांतें । बैसिजे गा ।।

त्यांत आवडेल ती, आपल्या चित्ताला जी बहुतकरून भावेल अशी निवडून, तेथे एकांतात साधनेस बसावे!

आबाला अशीच जागा सापडली होती. नारायणाची दृष्टी त्याच्यावर पडली आणि नारायणाची पावले थबकली! पद्मासनात हाताची दुमड घालून बसलेला आबा, मान खाली, डोळे अर्धोन्मीलित म्हणावे असे आणि श्वास मंद चाललेला – एकूण भाव असा की ह्या अखिल विश्वात तो जणू एकटाच आहे!

नारायण त्याचे हे रूप पाहून मुग्ध होऊन गेला. त्याचे पाऊल पुढेही सरके ना आणि मागेही हटे ना! थोड्या वेळाने त्याला भान आले. आपण ह्याला घेऊन जायला आलो आहो. पण त्याची तंद्री मोडावी कशी? मोडावी की नाही? तो रंगलाय. त्याचा रसभंग होईल. ते नको. आपण हलक्या पावली परत जावे हे बरे.

आबाची निश्चल मूर्ती डोळ्यात साठवीत नारायण मागे फिरला. तो चालताना वाळक्या पानांचा आवाज झाला, एक पक्षीही तितक्यातच ओरडत गेला, आबाची समाधी भंगली नाही. कुणी आपल्या आसपास येऊन गेले हे त्याला जाणवलेही नाही. जरा मागे फिरल्यावर नारायणाला वाटले, आपण त्याला एक हलक्या आवाजात हांक मारायला काय हरकत आहे?

मग तो पुन्हा आबाकडे पाहात जरा दूरवर उभा राहिला व त्याने छोटा आवाज दिला,

आबा…..

पण नाही, आबाला तो आवाज, ती हांक ऐकू गेली नाही. त्याच्या चेहेऱ्यावरची सुरकुतीही बिघडली नाही. ते पाहून नारायण भारावला आणि तशाच अवस्थेत रामभटांकडे येऊन त्याने सारी हकीगत कथन केली.

नारायणाचे कथन ऐकून रामभट स्तब्ध झाले. म्हणाले,

असा विद्यार्थी माझ्याकडे पाठवून तुकोबा माझी परीक्षा पाहात आहेत यात आता मला शंका नाही. नारायणा, तू ही भाग्यवान की की तुला असा जोडीदार मिळाला. त्याला तू हलविले नाहीस हे योग्यच केलेस. त्याला त्याच्या वेळी येऊ दे. पण आज संध्याकाळी मात्र आपण नक्कीच अभ्यासाला बसू.

नारायणाने मान डोलावली. दुपारी जेवणाच्या वेळी आबा आला. नारायणाने वा रामभटांनी सकाळी झालेल्या घडामोडींची ओळख दिली नाही. जेवणे झाल्यावर मात्र रामभटांनी आबाला हळूच हांक मारली. ती काही आबाला ऐकू गेली नाही! जणू त्यांचे कान बंदच झाले होते! शेवटी त्याच्या खांद्यावर नारायणाने थोपटले आणि हाताने रामभटांकडे निर्देश केला. मग मात्र तो हात जोडून रामभटांसमोर येऊन उभा राहिला.
रामभट म्हणाले,

आबा, छान चाललंय तुमचं. आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात करू. थोडावेळ वामकुक्षी घ्या, बाहेर जाऊ नका. हांक मारली की या.

जरा उन्हे उतरली तशी रामभटांनी दोघांना बोलावून घेतले व प्रेमाने आबाकडे पाहात ते म्हणाले,

आबा, तुम्ही आलात त्या क्षणी वाटले त्याच्या फार पुढे तुम्ही थोड्या काळात गेलात. अशी प्रगती चालू ठेवाल तर तुकोबांचे मोठे समाधान कराल. तुमची ही अवस्था पाहून मला तुकोबांचा एक अभंग आठवतो.

 

 

दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ।।
आतां काय उरलें वाचे । पुढे शब्द बोलायाचे ।।
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळें ।।
तुका ह्मणे नाद । अवघा झाला गोविंद ।।

 

 

आबा, तुम्हाला हा नाद लागला, आता माझे खरे तर काही काम राहिलेले नाही. दाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे. अर्थ असा की तो नारायण तुमच्या अंतरात आहे. तोच दाता होणार आणि तोच भोगणाराही होणार. तो देणार काय तर आनंद आणि भोगणार काय तर आनंदच. जे द्यायचे तेच घ्यायचे असेल तर त्या देवघेवीला अर्थच काय राहिला असे कुणीही विचारेल. याचे उत्तर, आबा, तुमच्यात होणारा बदल देतो. ह्या साधनेला लागायच्या आधी तुम्ही होतात तसे आता नाही आहात. तुमचे बोलणे थांबले, तुमचे जगाचे भान गेले याचा अर्थ तुम्ही निद्रिस्त झालात असा झाला नाही. उलट असे झाले की तुम्ही अंतर्यामी अधिक जागृत होत चाललात. तुमचा नारायण जणू निद्रिस्त होता, तो देऊ लागला आणि तुमचे आधी त्याच्याकडे लक्षच नव्हते तर तुम्ही आता घेऊ लागलात. आजची स्थिती खरे तर अशी आहे की तो देत आहे आणि तुम्ही भोगत आहा. एक दिवस असा येईल की, तुकोबा म्हणतात तसे, आतां काय उरलें वाचे । पुढे शब्द बोलायाचे ।। अशी स्थिती होईल! तुम्हीच देणारे आणि तुम्हीच घेणारे असे होईल. तुम्हाला दिसेल की जिकडे तिकडे आनंदच आहे आणि तोच आनंद दृष्टीस पडत आहे. आपण आनंद आहो वा आपण गोविंद आहो! अर्थ एकच. दिसतोय तो आनंद आहे, ऐकतोय तो आनंद आहे, आपण आनंद आहो, आनंदाचेच रूप सर्वत्र खेळते आहे! तुका ह्मणे नाद । अवघा झाला गोविंद ।। याचा अर्थ असा, आबा. जो तुम्ही अनुभवीत आहात!

रामभटांचे हे बोलणे ऐकून आबाच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. तो पुढे सरकला आणि त्याने त्याच्या ह्या गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवले. रामभटांनी त्याच्या पाठीवर थोपटले आणि म्हणाले,

आबा, शांत व्हा. तुमच्या मनस्थितीची मला कल्पना करता येते. वास्तविक तुमची छान ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे आणि ती मोडण्याचे काम आता माझ्याकडून व्हायचे आहे. मी असे का बरे करीत आहे? अंतरीचा आनंद लुटण्याची जरा तुमची आत्ता कुठे सुरुवात झाली तर मी तुम्हाला शाब्दिक पातळीवरचे तत्त्वज्ञान का बरे सांगणार आहे? याचे उत्तर असे की ही अवस्था अक्षय व्हायची तर तिचा नेमका अर्थ तुम्हाला लागला पाहिजे आणि ती अवस्था तुम्ही जाणीवपूर्वक स्वीकारून दृढ केली पाहिजे. तुकोबा म्हणतात,

 

अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ।।
पाया पडिला खोले ठायी । तेथे पुढे चाली नाही ।।
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ।।
तुका ह्मणे बोली । पुढे कंठीत चि जाली ।।

 

तुमची आत्ताची अवस्था अशी पराकोटीला पोहोचू दे की जे रचले ते कधीही, कोणत्याही आघाताने मोडू नये, ते अक्षय होऊ दे. अंतरात तुम्ही इतके खोलवर पोहोचा की आता पुढे चालता येऊ नये. हे सारे आनंदाचे विखुरलेले कण एकत्र होऊन अवघा आनंदीआनंद होऊन आपण आनंदस्वरूपच आहोत असा पडताळा तुम्हाला येऊ दे. आबा, आज तुम्ही ठरवून मौनाची साधना करीत आहात. तुकोबांनी वर्णिलेल्या त्या अवस्थेत तुमचे बोलणे आपोआप कुंठीत होऊ दे! तुमची ही वाटचाल अभ्यासपूर्ण व्हावी म्हणून तुकोबांनी माझी नियुक्ती केलेली आहे. आज थोडी सुरुवात केली, उद्या पुढे चालू.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?