' सर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२)

सर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२)

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : सर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (१)

===

गेल्या भागात वैज्ञानिक पद्धतीने अंदाज तासण्याबद्दल चर्चा केली होती. ते अंदाज मान्य नाही असे एक पालक व प्रयोगशील शिक्षणात आस्था असलेला एक शिक्षक ह्यांच्यात होऊ शकेल असा एक संवाद खाली दिला आहे. ह्या पालकांच्या मुलाचे नाव चंदू आहे असे समजू. चंदू पाचवीतच आहे व पालकांच्या चिंतेचा विषय आहे. (आधीच कारटे हूड,त्यात धावे दुडदूड…)

पालक- मुलाला हवं ते शिकू द्या हा सगळा मूर्खपणा आहे. ह्या चंद्याला असा मोकळा सोडला तर गावभर उंडारत फिरेल.शिकणार काहीही नाही.

शिक्षक- शाळेत नीट शिकतोय का?

पालक- अहो, तेच तर सांगतोय. शाळेत शिकत नाही म्हणून क्लासला घातला. तरी गणितात काठावर पास होतो कसाबसा. अशात तुम्ही म्हणताय तसा मोकळा सोडला तर हात तरी लावेल काय गणिताला?

शिक्षक- बरोबर आहे. गणित तर शिकायला पाहिजेच. त्यावर थोडा वेळाने नक्की बोलूया. पण मगाशी तुम्ही म्हणालात की मोकळा सोडल्यावर उंडारत फिरेल म्हणून… म्हणजे कायकाय करेल?

पालक- काय वाटेल ते करेल. एकदा एका शेळीच्या मागे मागे हिंडत होता भर उन्हात. एकदा एका प्रेतयात्रेची तयारी होत होती तिथे उभा होता. एकदा कोणीतरी झाडाच्या फांद्या कापत होतं रस्त्याच्या कडेला ते बघत बसला आणि मग त्या फांद्या घरी घेऊन आला.

शिक्षक- काय केलं मग चंदूने त्या फांद्यांचं?

पालक- त्यातली एक फांदी लावली तर झाड तयार होईल का हे त्याला बघायचं होतं आणि दुसऱ्या फांदिची त्याने बेचकी बनवली.

शिक्षक- पण हे सगळं करताना शिकतोय ना तो काहितरी? तुम्हाला काय वाटतं ?

पालक- ठीक आहे. झाडाची फांदी तोडून बेचकी बनवायला शिकला असणार कोणाकडून तरी – पण ह्याचा परिक्षेत काय उपयोग? आणि पाचवीचं गणित कसा शिकेल हे सगळं करत बसला तर?

Stanley-marathipizza
livemint.com

‘शिकेल का नाही’ ह्यावरील सर्व चर्चा शेवटी गणित,इंग्रजी अशाच विषयांपर्यंत येतात. (मराठी हा विषय ‘घर की मुर्गी’ असतो.) पालकांना परिसर-अभ्यास वगैरे विषयांची फारशी चिंता वाटत नसते. आणि तसे पाहिले तर तोडलेल्या फांद्या घरी आणणाऱ्या आणि प्रेतयात्रेची तयारी बघणाऱ्या चंदूचा परिसर-अभ्यास तर जोरातच चालू आहे.

चंदू शाळेत न जाता उंडारत फिरला तर गणित कसा शिकेल हा पालकांनी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. आधीच्या उदाहरणातली मानसीसुद्धा शाळेबाहेर खूप काही शिकत होती पण नववीत गेल्यावर बीजगणित,भूमिती मात्र शिकत नव्हती. ह्या भानगडीबाबत आपण केलेला अंदाज काय आहे ते आठवतय का?

‘विषय अनेक पण शिकायची पद्धत साधारणपणे एकच असा शाळेतला प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धती वापरत हवं ते शिकणारा शाळेबाहेरचा मेंदू ह्यांचे जमत नाही.

‘मला हवं ते शिकू दे आणि ते शिकण्याची पद्धतही मलाच ठरवू दे अशी मेंदुची ठाम मागणीच आहे बहुतेक.’

‘ही मागणी पूर्ण झाली नाही तर मेंदू शिकत नसणार.’

आता ह्या अंदाजावर आधारित प्रयोग करायचा तर कायकाय करावे लागेल?

आपल्या अंदाजाचा एक भाग ‘मला हवं ते शिकू दे’ हा आहे. मग ह्यानुसार चंदूला विचारावे लागेल की शाळेत किंवा क्लासमध्ये जे गणित तुला शिकवतात ते तुला आता, ह्या महिन्याभरात शिकायचे आहे का?

मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून खरोखरच आनंदित झालेला माणूस मी कधीच पाहिला नाही अशा अर्थाचं पु.लं.च एक वाक्य आहे. ‘उंडारत फिरण्यापेक्षा’ शाळेत किंवा क्लासमद्ये गणित शिकूया असं आवडीने म्हणणारे मूलही फारसं कोणी पाहिलं नसेल.

म्हणजे गणित शिकायचं नाही असच बहुदा चंदू सांगेल. काहीही शिकायचं नाही असंही तो सांगेल. कदाचित त्याच्या त्यावेळच्या लहरीनुसार इतर काहीतरी बोलेल. तायक्वांडो/कराटे शिकायला आवडेल किंवा ट्रक चालवायला शिकायचं आहे असं तो म्हणेल. टिव्हीवरच्या मालिकेत काम करायचं आहे असेही कदाचित तो सांगेल. आपण सुरवात त्याच्या आवडीप्रमाणेच करायची आहे. त्याला हवं ते शिकू द्यायचं आहे.

“ठीक आहे. तू गणित शिकू नकोस, अभिनय शीक.” असे चंदूला सांगून हा ‘शिकण्याचा प्रयोग’ करून पहावा. (शाळा बुडवायची नसेल तर हा प्रयोग दिवाळीच्या किंवा मे महिन्याच्या सुटीत करावा. सुटीत अभ्यास न देणारी शाळा असेल तर उत्तम, नाहीतर सुटीतल्या गृहपाठासाठी थोडा वेळ काढून उरलेल्या वेळात हा प्रयोग करता येईल. )

टिव्हीवरच्या मालिकेत काम करायला शिकायचं ठरलंय अस समजू. समजा चंदूला शिक्षकांनी असं सांगितलं की टिव्हीवरील मालिकांमध्ये काम नाही मिळू शकणार पण एखाद्या एकांकिकेमध्ये मिळेल आणि गावातल्या एखाद्या साध्या रंगमंचावरून ती प्रेक्षकांसमोर सादरही करायला मिळेल . एवढी तडजोड स्विकारायला चंदू बहुतेक तयार होईल. एकांकिकेत फालतू छोट्या भूमिका नको आहेत, हिरोची भूमिकाच करायची आहे अशी अट मात्र तो घालेल ही शक्यता आहे. म्हणजे केवळ हवं ते शिकायला मिळतय असं नव्हे तर थोडी तडजोड करून को होईना चंदूला हव्या त्या प्रकारेही अभिनय शिकायला मिळतो आहे.

आपल्या ह्या प्रयोगात काय घडेल ह्याचं भाकित आधी केलं पाहिजे आणि मग ते तपासून पाहिलं पाहिजे. त्या भाकितानुसार घडलं नाही तर कदाचित आपला अंदाज चुकीचा होता असं मानून तो अंदाज दुरुस्त करायचा का ह्यावर विचार केला पाहिजे. नेमकं भाकित ठरवणं कठीण आहे पण प्रयत्न करूया. ह्या प्रयोगात काय घडेल?

चंदूला अभिनय शिकायचा आहे. त्याला हवं त्या प्रकारे अभिनय शिकू दिला तर त्यामुळेच तो गणितही शिकेल. हे विधान जरा विचित्रच वाटतय का? थोडा खुलासा करतो.

चंदुला हवं त्या प्रकारे अभिनय शिकू दिला तर व्यक्तिमत्त्व घडवणारे एक उपयुक्त कौशल्य तर तो शिकेलच पण अभिनय शिकत असतानाच गणित शिक्षणासाठी उपयुक्त असे काही नेमके अनुभवही मिळाले तर चंदू नकळत गणितही आवडीने शिकू लागेल, निदान त्याला गणित सोपे तरी वाटू लागेल.

पटतंय का हे ? शक्य आहे असं वाटतंय का?

अजिबातच पटत नसेल तर मी सुचवतोय त्या एका साध्या शक्यतेचा विचार करून बघा. शिकण्याच्या शंभर शक्यतांपैकी एक शक्यता मी सांगतोय. मुलांचा मेंदू जगता जगता, खेळता खेळता, रमत गमत शिकत असतो. नेमके काय घडेल हे प्रयोगातूनच समजेल पण गणित शिकायच्या शंभर शक्यतांपैकी अभिनयातून गणिताकडे जाणारी ही एक शक्यता पटते का बघा.

चंदूने एकांकिकेत काम करायचे ठरवले आहे. कोणत्या एकांकिका निवडायच्या हे ठरवणे सुरू आहे. इथे शिक्षक सुचवतो की बिरबलाच्या चातुर्यकथांवर एकांकिका करुया. हिरो म्हणजे बिरबल अर्थातच चंदू असेल.

शिक्षकाचा एक मित्रच इथे लेखक व दिग्दशर्काचे काम करणार आहे. त्याची चंदूबरोबर भेट होते. तो चंदुला म्हणतो,

”तू बिरबलाचे काम छानच करू शकशील पण त्यासाठी थोडी तयारी कर. बिरबलाची युक्ती काय होती, त्याने नेमकी काय आयडिया वापरली हे तुला नीट कळले नाही तर अभिनय करताना तुझ्या चेहऱ्यावर ते दिसणार नाही. अभिनय खरा,सहज वाटणार नाही. म्हणून बिरबलाच्या चार-पाच गोष्टी वाच. त्यातली बिरबलाची आयडिया नीट समजली का ते बघ. मग जी कोणती गोष्ट तुला आवडली असेल त्यावर आपण एकांकिका बसवूया.”

पुस्तकं वाचायची फारशी आवड नसलेला चंदू आता हिरो होण्यासाठी आणि त्यासाठी स्क्रिप्ट निवडण्यासाठी बिरबलाच्या चारपाच चातुर्यकथा वाचतो. अभिनय चांगला जमला पाहिजे म्हणून बिरबलाने केलेली ‘आयडिया’ आपल्याला नीट समजली आहे ना हे स्वतःच तपासून बघतो. हे सगळं ‘स्वतःलाच पडली आहे’ म्हणून झालेलं आहे. खूप उत्साहात, आपण हिरो झाल्याची स्वप्ने रंगवत घडलं आहे. चंदुचा मेंदू कसा शंभर पद्धतींपैकी बरोबर योग्य ती पद्धत वापरत शिकायला लागला आहे.

बिरबलाच्या किंवा तेनालीरामच्या किंवा पंचतंत्रातल्या गोष्टींमध्ये कोणकोणत्या ‘आयडिया’ असतात?

उदा. रेषेला हात न लावता रेषा लहानमोठी करण्याची गोष्ट घ्या. इथे रेषेची लांबी, लहानमोठेपणा आहेच पण मोठेपणाची सापेक्षताही आहे. अठरावा उंट ही गोष्ट तर नियमानुसार वाटप करणे आणि अपूर्णांक ह्या संकल्पनांवरच आधारित आहे. अशा प्रत्येक गोष्टीत तर्क आहे आणि तो कोणतीतरी समस्या सोडवायला वापरला आहे. समस्या सोडवणारा हिरो आहे आणि ही हिरोगिरी समजली तर नेमका विचार कसा केला ही गंमतही वाचकाला समजते आहे.

बिरबलाच्या गोष्टी वाचून उत्साहात अभिनयाची तयारी करतानाच चंदुची तर्काची समजही विकसित होऊ लागली आहे. आता गणिताचा गाव काही फार दूर राहिलेला नाही.

son-papa-marathipizza02
filmcompanion.in

वाचनाची आवड असती तर वाचता वाचताच हे घडू शकलं असतं. घरी गोष्टी सांगणारी आजी असती तर बिरबलाच्या गोष्टी ऐकता ऐकताही हे होऊ शकलं असतं. चंदुसारख्या काहीजणांच्या बाबत अभिनय करताना हे घडेल, इतर काहीजणांना सायकल दुरुस्त करताना विचार करून समस्या सोडवायची गंमत कळेल तर काहीजणांना गॅलरीतली शेती करताना गणित-विज्ञानाची समज येईल.

शंभर शक्यता असू शकतील. शाळेत शिकत नाही अशा एका मुलाबरोबर ह्यातली एक तरी शक्यता तपासणारा प्रयोग करणार का तुम्ही? असा काही प्रयोग आधीच केला आहे का? तर कळवा त्याबद्दल आम्हाला.

‘शिकण्याचे प्रयोग’ करुया. शिकण्याच्या ‘शंभर शक्यतांचा’ अनुभव घेऊया.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?