' माझ्या जीवनाला कलाटणी देणारे – अब्दुल कलाम सर – InMarathi

माझ्या जीवनाला कलाटणी देणारे – अब्दुल कलाम सर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक -ओंकार दाभाडकर

कलामांना जाऊन आज ६ वर्ष झाली.

ऑफिसमधून परतत असताना ते गेल्याची बातमी कळाली आणि जागच्याजागी थांबलो होतो. खळ्ळकन पाणी आलं होतं डोळ्यात. पुढे रात्रभर येतच राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच लेक्चर घ्यायला जायचं होतं…जावंसं वाटत नव्हतं अजिबात. पण खुद्द कलामांनाच ते आवडलं नसतं…म्हणून गेलो आणि लेक्चर सुरू करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल जरा बोललो. काहीही नं ठरवता, आधी विचार नं करता जे जे बोललो ते नंतर त्याच दिवशी फेसबुकवर लिहिलं होतं.

===

कलाम…अख्खी पिढी घडवणारं विलक्षण रसायन

रात्रभरात ४ दा डोळे टिपून झालेत. आज सकाळी क्लासमध्ये कलाम सरांबद्दल बोलताना आवंढा गिळला. ३-४ वेळा पाणी प्यालो. ऑफिसमध्ये अक्खा दिवस घातला – तरी हलकं वाटत नाहीये.

आमचं नातंच असं होतं.

माझी कलाम सरांशी ओळख झाली तेव्हा मी ८वी-९वीत असेन. नुकताच “कहो ना प्यार है” आला होता. ह्रतिकने जाम वेड लावलं होतं. माझी उंचीसुद्धा ह्रतिक इतकीच पाहिजे असं वाटायचं (उंची फुकट मिळते. त्याच्यासारखं शरीर कमवायला कष्ट पडतात, म्हणून तो विचार मनाला शिवला नाही!). ते वय, तो काळच एखाद्या माणसावर जीवापाड प्रेम करण्याचा होता. Role model ठरवण्याचा होता.

तेव्हा “शास्त्रज्ञ” होण्याची पण खूप स्वप्नं बघायचो. विविध शास्त्रज्ञांची चरित्र वाचायचो, जयंत नारळीकरांना पत्र पाठवायचो, त्यांचं उत्तर आलं की रात्र रात्र ती अक्षरं अधाशीपणे डोळ्यांनी प्यायचो. त्याच खटाटोपात अब्दुल कलाम नावाच्या “रॉकेट सायंटिस्ट” बद्दल कळालं. तेव्हा गुगल करायला internet cafe वर जावं लागायचं. घरून ३० रुपये घेऊन, दोन आठवड्यातून एका शनिवारी संध्याकाळी १ तास इंटरनेट वापरायचो.

एका शनिवारी google केलं “abdul kalam” . माझ्या जीवनाला कलाटणी देणारा search होता तो.

कलामांची, त्यांच्या चाहत्यांनी तयार केलेली एक वेबसाईट सापडली. त्यावर सरांचे २-३ speeches होते. १ तास वाचण्यात घालवणं परवडणार नाही म्हणून कॉपी-पेस्ट-प्रिंट केलं. घरी येऊन ते स्पीच वाचले आणि मी काय वाचून बसलोय कळेच ना. काहीतरी वेगळंच होतं ते.

apj-abdul-kalam-marathipizza
zeenews.india.com

विज्ञान-तंत्रज्ञान-अपंग माणूस — ह्यांचा संबंद जोडणारा माणूस, भारत भविष्यात नक्की मोठ्ठा होणार – हे सांगणारा माणूस, एका बेटावरून अनेकांच्या मदतीने शिकलेला माणूस…कोण आहे हा माणूस? त्या नंतर कित्येक दिवस स्पीच वाचत राहिलो. घरी पाहुणे आले की त्यांना स्पीचची फोटो-कॉपी भेट म्हणून द्यायचो. शास्त्रज्ञ होवो नं होवो – हा आशावाद प्रत्यक्ष उतरवण्यात मी सहभाग नक्की घेणार, हे तेव्हाच ठरवलं.

एका कुमारवयीन मुलाच्या जीवनात राष्ट्रभक्ती आणि आशा पेरल्या गेली होती. ह्रतिकच्या जागी अब्दुल कलाम स्थापित झाले होते.

असेच अनेक तरुण स्वतःच्या हृदयात कलामांना स्थापित करत होते. आशावादाचं, आत्मविश्वासाचं नातं बनत होतं.

पुढे अग्निपंख वाचलं. Ignited Minds वाचलं. राजकारण आणि ब्युरोक्रसीच्या वातावरणात काम केलेला माणूस एवढा प्रचंड आशावादी कसा काय असू शकतो ह्याचं अजूनही आश्चर्य वाटतं. त्यांच्या आशावादावर माझ्या अख्ख्या पिढीची स्वप्नं पोसल्या गेली आहेत. कित्येक तरुणांना भारावून सोडलं आहे त्यांनी! मी व्यक्तीशः २ तरुणांना ओळखतो जे कलाम सरांच्या Vision-2020 वर प्रत्यक्ष मेहनत घेत आहेत. अप्रत्यक्ष काम करणारे अनेक आहेतच.

काल अनेक मान्यवरांच्या टिप्पणी ऐकल्या. प्रत्येकजण म्हणत होता की “कलाम हे फक्त राष्ट्रपती नाही, तर एक… … …होते”.

भारताचा राष्ट्रपती होण्याचा, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याचा बहुमान मिळालेला माणूस describe करताना, भारतातील सर्वोच्च पदाचा आणि मानाचा केवळ उल्लेख करून “ते ह्याहून अधिक होते” हे प्रत्येक जण म्हणत होता. किती मोठ्या व्यक्तींबद्दल आपण हे म्हणू शकतो?

अब्दुल कलाम ह्या अजब रसायनानी सर्वच भारतीयांवर, विशेषतः तरुणांवर, अनाकलनीय मानसिक प्रक्रीया घडवून आणली.

त्यांच्या यशोगाथेत एकाहून एक सरस नोंदी आहेत.

आम्हा भारतीय तरुणांच्या हताश मेंदुंमध्ये “Ignited Minds” पेरून, आपल्या देशाला “Vision2020” कडे घेऊन जाण्यासाठी आशावादाच्या “Wings of Fire”चं आंदण देणं — हे त्यांचं सर्वोत्तम यश आहे.

कलामांनी आमची पिढी घडवली आहे. आम्ही त्यांना असं जाऊ देणार नाही.

हा आशावाद, ही प्रज्वलित मनं आणि हे अग्निपंख – ह्यांच्यातून कलामांना आम्ही नेहेमी जिवंत ठेऊ.

We won’t let you die, Kalam Sir!

तुम्ही प्रज्वलित केलेलं एक मन

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?