' प्राचीन भारतीय विद्वत्तेची साक्ष देणारं, १४०० वर्ष जुनं ‘सूर्य घड्याळ’! – InMarathi

प्राचीन भारतीय विद्वत्तेची साक्ष देणारं, १४०० वर्ष जुनं ‘सूर्य घड्याळ’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात घड्याळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मनुष्य सध्या घड्याळ्याच्या काट्यांवर धावतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

अगदी सकाळी उठण्यापासून घड्याळाची सुरुवात होते, असं तुम्हाला वाटत असेल, पण उद्या सकाळी किती वाजता उठायचं याचं प्लॅनिंग करून आदल्या दिवशीच घड्याळावर आलार्म लावला जातो, म्हणजे रात्रीपासूनच घड्याळ आपल्या सोबतीला असतं.

मग सकाळची कामं, धावतपळत ऑफिसला पोहोचण्याची वेळ इथपासून ते थेट जेवणापर्यंत सारं काही घड्याळाच्या वेळापत्रकावर अवलंबून असतं.

 

alarm clock-inmarathi

 

पण तुम्ही कधी विचार केलाय का, पूर्वीच्या काळी तर लोकांकडे घड्याळे नसायाची, मग ते आपली कामे वेळेवर कसे काय पूर्ण करायचे? तर मंडळी जेव्हा घड्याळाचा शोध लागला नव्हता, तेव्हा विविध प्रकारे वेळ पाहिली जायची.

त्यापैकी एक होते सूर्य घड्याळ, चला तर आज याच अनोख्या सूर्य घड्याळाबद्दल माहिती जाणून घेऊया!

 

sun-clock-marathipizza01

भारतीय इतिहासातील तांत्रिक ज्ञानाची साक्ष देणारं हे ऐतिहासिक उपकरण तामिळनाडूत आहे.

 तंजावुर जिल्ह्यापासून जवळपास १२ किलोमीटर लांब असलेल्या तिरुविसानालुरच्या शिवोगीनाथर मंदिराच्या ३५ फूट उंच भिंतीवर हे घड्याळ आहे.

तब्बल १४०० वर्षांपूर्वी निर्माण केलेलं हे सूर्य घड्याळ म्हणजे तामिळनाडू मधील एकमेव ‘भिंतीचे घड्याळ’ आहे. हे ऐतिहासिक उपकरण म्हणजे चोल राजवटीतील वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक आहे.

म्हणून मंदिराच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक वारसा असलेले हे घड्याळ परत सुरु करून त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.

चोल राजवंशातील सम्राट राजा परातंक याच्या शासन काळा दरम्यान तयार करण्यात आलेल्या या भिंतीच्या घड्याळाला बॅटरी किंवा विजेची आवश्यकता नसायची.

एका अर्धगोलाप्रमाणे या घड्याळाला आकार दिला गेला आहे आणि ग्रॅनाईटने त्यावर कोरीव काम केले गेले आहे. यामध्ये ३ इंच लांब पितळेची सळी आहे जी क्षितिजाला समांतर रेषेच्या केंद्रामध्ये लावण्यात आली आहे.

 

sun inmarathi

 

जशी सूर्याची किरणे घड्याळावर पडतात, तशी लगेच  सळीची पडणारी सावली योग्य वेळ दाखवते. मंदिराचे कामकाज सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या सूर्य घड्याळ्याकडे पाहूनच सुरु असते.

 

sun-clock-marathipizza02

 

जोपर्यंत या घड्याळावर सूर्याची किरणे पडतात, तोपर्यंत हे घड्याळ अचूक वेळ दाखवते, पण पितळेची सळी हळूहळू ग्रॅनाईटच्या पृष्ठभागावर अस्पष्ट दिसू लागल्यानंतर मात्र वेळ फारशी कळत नसल्याचे निरिक्षणातून सिद्ध झाले.

 ब्रिटिशांनी देखील ही ऐतिहासिक वास्तू  वापरास सोयीची ठरावी, म्हणून त्यावर इंग्रजी क्रमांक कोरले होते. जे आपल्याला अजूनही पहावयास मिळतात.

सध्या या मंदिराला आणि घड्याळालाही नवीन रूप देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या मंदिराबद्द्दल पंचक्रोशीतील भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे. या मंदिरात भगवान शिवयोगीनाथर हे आपली पत्नी सौंदर्यायकी सोबत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत. असे म्हणतात की –

आठ शिव योगी मुक्ती प्राप्त करून लिंगगम मध्ये विलीन झाले होते. त्यामुळे शंकर देवांचे नाव शिवयोगीनाथर पडले आहे. अशी देखील श्रद्धा आहे की, हे सूर्य घड्याळ भगवान शंकरांच्या प्रभावाने चालते.

 

sun-clock-marathipizza03

 

हे घड्याळ आणि त्याचे तंत्र पाहून, त्या काळातील विद्वानांची स्तुती करावी तेवढी कमी आहे.

अर्थात, अश्या उदाहरणांवरून आपण ‘आमचे पूर्वज फार फार थोर होते’ असं म्हणून फक्त अभिमान बाळगायचा की त्यापासून प्रेरणा घेऊन, आधुनिक जगातील आधुनिक तंत्रज्ञानात मोलाची भर घालायची, हे आजच्या आपल्या भारतीय तरुण पिढीनेच ठरवायचं आहे!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?