' इसिस चा झेंडा जाळला तर मुस्लिम बांधवांना राग का येतो? खरं कारण जाणून घ्या. – InMarathi

इसिस चा झेंडा जाळला तर मुस्लिम बांधवांना राग का येतो? खरं कारण जाणून घ्या.

सदर लेखावर आपलं मत आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर मेसेज करा. निवडक व अभ्यासपूर्ण मतांना प्रसिद्धी देण्यात येईल.

===

विरोध सुद्धा कसा करायचा हे कळावं लागतं हो. शत्रूच्या सगळ्या खाचाखोचा माहिती असल्यावर विरोध करावा, इतकं सुद्धा डोकं या इस्लामी कट्टरवादाचा विरोध करणाऱ्यांना दिलेलं नाही. इस्लामिक कट्टरतावादी हे शत्रू आहेत असं मानलं तर किमान त्यांचा विरोध करताना त्यांचा अभ्यास करून करावा.

तिकडे काश्मीरमध्ये विश्व हिंदू परिषदेने ‘इस्लामिक स्टेट’चा काळा झेंडा जाळला. स्वाभाविकपणे काश्मीर घाटीत वातावरण तंग झालं आहे.

तो अर्धवट परिषदेचा कार्यकर्ता तोंड वरून सांगतो कि त्या झेंड्यावर काय लिहिलंय ते आम्हाला माहिती नाही, तो इस्लामिक स्टेटचा होता म्हणून आम्ही जाळला. (किमान आपलं अज्ञान चारचौघात सांगू तरी नये!)

 

isis-marathipizzza
extracapsa.wordpress.com

मागे औरंगाबादमध्ये ‘इस्लामिक स्टेटचे अर्थकारण’ या विषयावर लेख आला होता. लोकमतच्या मंथनने लेआउट लावताना पिगीबँक वर तो इस्लामिक स्टेटचा झेंडा लावला आणि लेखाला तो वापरला. इस्लामिक स्टेटचा काळा झेंडा ही त्यांची आयडेंटिटी आहे.

त्यामुळे पिगी बँक वर इस्लामिक स्टेटची आयडेंटिटी लावणे, ही खरं म्हणजे क्रिएटिव्ह कल्पना होती. पण परिणाम असा झाला कि औरंगाबाद लोकमतच्या ऑफिसवर हल्ला झाला, हाणामारी झाली आणि शेवटी लोकमत पेपरला माफी मागावी लागली.

केव्हा तरी समजून घ्या राजेहो, कि नेमकं त्या झेंड्यावर आहे काय?!

त्यासाठी “मुस्लिम असणं” म्हणजे काय, हे नीट समजून घ्यायला हवं.

मुसलमान असण्यासाठी पाच श्रद्धा मानाव्या लागतात.

श्रद्धा – इस्लाम धर्माची पाच सर्वात महत्वाची आणि मूलभूत तत्व आहेत. त्यामध्ये श्रद्धा हे सर्वात महत्वाचे आणि पहिले तत्व आहे. ‘एकूण पाच बाबींवर श्रद्धा ठेवणे’ असे या शब्दाचा अर्थ आहे. त्या पाच बाबी कोणत्या कोणत्या हे आता आपण पाहूया.

पहिली – एकमेव अल्लाहवर श्रद्धा

दुसरी – स्वर्गात वास्तव्य असणाऱ्या अल्लाहकडून अल्लाहचा सत्य धर्माचा संदेश पृथ्वीवर आणणाऱ्या देवदूतांवर श्रद्धा

तिसरी – अल्लाहकडून देवदूतांच्या मार्फत संदेश मानवाला देण्यासाठी निवडलेल्या प्रेषितावर आणि त्याच्या प्रेषितत्वावर श्रद्धा

चौथी – अल्लाहने प्रेषितांच्या मार्फत मानवासाठी दिलेल्या संदेशावर म्हणजे ‘कुराण’ या ईश्वरी ग्रंथावर श्रद्धा आणि

पाचवी – अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा.

काळाच्या एका टप्प्यावर गेल्यावर जगाचा नाश होणार आहे. त्यादिवशी सर्व मृत जीव पुन्हा जिवंत होतील. त्यावेळी कोण कोणत्या पद्धतीने जीवन जगले याच्या निकषावर अल्लाह स्वतः पाप पुण्याचा निवाडा करणार आहे.

 

Jihad-in-Islam-inmarathi
urdumania.net

जे इस्लामच्या आदर्श तत्त्वांनुसार जीवन जगले आहे अशांना स्वर्ग आणि जे इस्लामच्या तत्त्वांनुसार जीवन जगले नाहीत अशांना नरक मिळेल. यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंतिम निर्णय दिना’वर श्रद्धा ठेवणे होय.

या पाचही श्रद्धा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. यातल्या एकावरजरी श्रद्धा ठेवली तरी इतर चारांवर श्रद्धा आपोआप ठेवली जाते. एकावर जरी श्रद्धा ठेवली नाही तरी संपूर्ण श्रद्धेचा डोलारा कोसळून जातो.

या पाचही बाबींवर श्रद्धा ठेवणारा इस्लामी परिभाषेत ‘श्रद्धावान’ ठरतो, जो श्रद्धा ठेवत नाही तो ‘श्रद्धाहीन’ ठरतो.

जर एखादा माणूस म्हंटला कि, ‘माझी इतर चार गोष्टींवर श्रद्धा आहे, पण देवदूतांवर नाही’ तर देवदूतांच्या शिवाय अल्लाहचा संदेश प्रेषितापर्यंत कसा पोहोचला याला गूढत्व प्राप्त होते. अल्लाह आणि माणूस यांच्यातला दुवा नाहीसा होतो.

एखादा म्हणाला कि, ‘प्रेशितांवर किंवा कुराणावर श्रद्धा नाही’ याचा अर्थ संदेश कोणी पाठवला याच्यावरही विश्वास नाही असा होतो.

‘अंतिम निर्णय दिनावर’ श्रद्धा नसेल तर अल्लाहची आणि नरकाची भीती संपून जाऊन शुद्ध धर्माचे पालन होणार नाही. त्यामुळे वर एकमेव अल्लाहवर श्रद्धा, देवदूतांवर श्रद्धा, प्रेषित पैगंबर यांच्याबर श्रद्धा, कुराण या दिव्य ग्रंथावर श्रद्धा आणि अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा ह्या मूलभूत पूर्व अटी आहेत. या पाचही श्रद्धा एका वाक्यात एकत्र करण्यात आल्या आहेत. ते वाक्य आहे –

ला इलाहइल्लाल्लाह मुहंमद रसुल्लल्लाह

याचा अर्थ ‘ईश्वर एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे, मुहंमद हे त्याचे शेवटचे प्रेषित’. या वाक्याला ‘कलिमा’ म्हणतात. ‘कलिमा’चा उच्चार करताक्षणी माणूस मुसलमान होतो. अर्थात त्याचा अर्थ मनापासून पटायला हवा!

इस्लाम धर्म स्वीकारायचा असेल तर हे वाक्य उच्चारावं लागतं. अर्थात ते मान्य व्हावं लागतं. हे मान्य नसेल तर ,माणूस मुसलमान राहत नाही. ते मान्य असेल तर माणूस मुसलमान होतो.

इस्लामचं हेच सर्वात बेसिक तत्व लिहिलेला तो झेंडा आहे…! त्याच्यावर इस्लामचे सर्वश्रेष्ठ प्रेषित मुहंमद पैगंबर यांचे नाव आहे. इस्लामचे पहिले चार आदर्श समजले जाणारे खलिफा यांच्यापैकी दुसरा खलिफा उमर यांच्या काळात सिरीया जिंकून घेण्यासाठी सैन्याच्या मोहिमा सुरु होत्या त्या काळात खलिफा उमर यांनी हा ‘काळा युद्धध्वज’ तयार करून सेनापतीला दिला होता.

आणि त्याच्यावर इस्लामचे सर्वात बेसिक तत्व लिहिण्यात आले होते. ते तत्व काळ्या झेंड्यावर पांढऱ्या रंगात लिहिण्यात आले होते. आज इस्लामिक स्टेट वापरतो तो झेंडा प्रथम ६३८ ते ६४० या काळात केव्हातरी तयार केला गेलेला आहे.

 

isis-in-pakistan-marathipizza
en.europe-israel.org

झेंड्याचा अपमान करणे म्हणजे इस्लामच्या सर्वात बेसिक तत्वाचा अपमान आहे असे मुसलमान मानतात. झेंडा जाळला जातो तेव्हा इस्लामचे बेसिक तत्व जाळले जाते, असे ते मानतात. इस्लामचे बेसिक तत्व ‘पिग’च्या चेहेऱ्यावर दाखवणे हा ते प्रेषित आणि इस्लामचा अपमान मानतात. हिंदूंनी याला येड्यात काढू नये.

हिंदूंच्या सुद्धा येड्यात काढता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. मुद्दा काय आहे, तर किमान समजून तर घ्या कि, नेमका आपण कशाचा विरोध करतो आहोत.

आंधळेपणानी विरोध करत राहाल तर त्याने केवळ शत्रुत्व वाढणार आहे, आणि प्रश्न जास्त चिघळवून तो सुटत नसतो.

===

सदर लेखावर आपलं मत आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर मेसेज करा. निवडक व अभ्यासपूर्ण मतांना प्रसिद्धी देण्यात येईल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?