'दादाने, लॉर्ड्सवर "टी शर्ट काढून" साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा...

दादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

तेव्हा विजयाशी टीम इंडियाचं काय बिनसलं होतं देव जाणे! यापूर्वीच्या तब्बल ९ फायनल सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पहावा लागला होता.

१३ जुलै २००२ रोजी  सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली ‘मेन इन ब्लू’ पराभवाची मालिका खंडित करण्याच्या इराद्याने अजून एक फायनल खेळण्यासाठी सज्ज होते.

ही दहावी फायनल होती बलाढ्य इंग्लंड संघा समवेत! नॅटवेस्ट मालिकेचा हा अंतिम सामना होता.

भारतीय संघाच्या प्रतिष्ठेसाठी या सामन्यात विजय मिळवणे खूप महत्त्वाचे होते. संपूर्ण भारताचे डोळे या सामन्याकडे लागून होते, पण या सामन्यात सुद्धा एक वेळ अशी आली होती जिथे हा सामनाही भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले.

 

cricket-marathipizza01
thelallantop.com

ट्रेस्कोथिक आणि नासीर हुसैन यांनी १८५ धावांची भागीदारी करून इंग्लंडला ३२५ धावांचा डोंगर रचण्यास मदत केली आणि एका मजबूत स्थितीमध्ये इंग्लंडला नेऊन ठेवले.

त्यावेळी नासीर हुसैन याने इंग्लंडसाठी शतकी खेळी रचली. सामन्याआधी इयान बॉथम आणि बॉब विलीस सारखे दिग्गज सतत या गोष्टीवर चर्चा करत होते की,

नासीर हुसैन कोणत्याही परिस्थितीमध्ये नंबर तीनवर फलंदाजी करण्याच्या लायक नाही आहे.

त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या इराद्याने नासीर हुसैनने मनाशी ठरवले होते,

मी शंभर धावा बनवणार आणि शतक बनवल्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे तीन बोटे दाखवणार.

निक नाइट हा इंग्लंडचा भरवश्याचा फलंदाजाला लवकर माघारी गेला. झहीर खानने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नासीर हुसैन आणि ट्रेस्कोथिक यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७५ चेंडूमध्ये १८५ धावांची भागीदारी केली.

ही जोडी तोडणे भारतीय संघाला खूप कठीण झाले होते. गांगुलीने स्वतः सकट एकूण सात गोलंदाजांचा वापर केला. शेवटी कुंबळेने संकटमोचक बनून ट्रेस्कोथिकचा त्रिफळा उडवला.

शेवटची १३ षटके बाकी असताना फ्लिंटॉफ आला. त्याने पटापट ३२ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्याचा देखील झहीर खानने त्रिफळा उडवला. त्यानंतर विकेट पडत राहिल्या, तरीसुद्धा इंग्लंडने ३२५ धावांपर्यंत मजल मारली.

इंनिंग्स ब्रेकमध्ये गांगुली आपल्या संघासोबत घेऊन ड्रेसिंग रुममध्ये आला. गांगुलीच्या मनात फक्त राग भरला होता.

त्याचबरोबर निराशा सुद्धा होती. निराशा यासाठी होती की, इंग्लंडला २५० ते २७० धावांपर्यंत रोखायचे ठरले होते आणि राग यासाठी की त्यांना अजून एक पराभव समोर दिसत होता. दरम्यान भारताच्या संघामध्ये शीत युद्ध सुरु होते. हा संघर्ष कोच जॉन राइट आणि कर्णधार सौरव गांगुली यांच्यामध्ये होता.

 

Sourav Ganguly-John Wright-marathipizza
khelnama.com

दोघेही खूप चांगले मित्र होते, परंतु अगदी याच सामन्याच्या अगोदर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. त्यामुळे इंनिंग्स ब्रेकमध्ये सुद्धा त्यांनी पुढची रणनीती काय आखावी यावर चर्चा केली नाही. सर्व खेळाडू चुपचाप जेवण करत होते. कदाचित सगळ्यांना पराभव एकदम साफ दिसत होता.

भारताचा डाव सुरु झाला आणि सगळ्या भारतीयांच्या मनात हुरहूर सुरु झाली. डावाची सुरुवात सेहवाग आणि गांगुलीने केली. मैदानात उतरताना दादाने सेहवागला सांगितले की,

आपल्या दोघांना पंधराव्या षटकापर्यंत खेळायचे आहे आणि या १५ षटकांमध्ये शंभर धावा बनवायच्या आहेत.

त्या दोघांनी १४ व्या षटकापर्यंत १०० धावांची भागीदारी केली. १५ व्या षटकात दादाची विकेट पडली आणि संपूर्ण डावाचे चित्र पालटले. त्यानंतर विकेट पटापट पडल्या. भारताच्या पुढील चार विकेट लवकरच आटोपल्या. १४६ धावांमध्ये भारताने ५ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर खेळण्यासाठी मोहम्मद कैफ मैदानात उतरला.

इंग्लंड संघाला आपला विजय समोर दिसत होता. शतक ठोकल्याच्या धुंदीमध्ये असणाऱ्या नासीर हुसैनने पवेलियनमधून येणाऱ्या कैफला टोमणा मारत आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत म्हटले,

चला मित्रांनो! त्यांनी बस ड्रायवरला पाठवले आहे. आता तर आपण नक्की जिंकणार.

नासीर त्या बसची वार्ता करत होता, ज्या बसमध्ये बसून भारतीय संघ माघारी जाणार आहे आणि त्या बसचा कैफ ड्रायव्हर असेल असा टोमणा त्याने मारला.

पण अजूनही भारताने आशा सोडली नव्हती. युवराज आणि कैफच्या जोडीने चांगला जम धरला होता. बॉल रिवर्स स्विंग होऊ लागला, तरीही त्या वाईट परिस्थितीतून युवराज आणि कैफ यांनी मार्ग काढला. त्या दोघांनी ८० चेंडूमध्ये १२१ धावांची भागीदारी केली.

 

kaif-marathipizza
youtube.com

युवराज त्याच्या अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्यानंतर खरंच कैफने ड्रायवरची सीट पकडली, पण तो हि बस माघारी नाही तर भारतीय संघाच्या विजयाच्या दिशेने घेऊन चालला होता. कैफला हिणवणाऱ्या नासीरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

कैफने एक बाजू पकडून धरली पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. भारताच्या ८ विकेट पडल्या होत्या. १३ चेंडूत १२ धावांची गरज असताना भारताचा आठवा गडी बाद झाला.

शेवटून दुसऱ्या षटकात कैफने उत्तम फटके लगावत सामना भारताच्या बाजूने केला, पण अजूनही भीती होती, कारण हातात विकेट्स नव्हत्या. शेवटच्या षटकामध्ये भारताला ६ चेंडूमध्ये २ धावा हव्या होत्या. स्ट्राईकला होता झहीर खान. शेवटच षटक टाकणार होता फ्लिंटॉफ.

फ्लिंटॉफला पाहून पवेलीयनमध्ये अस्वस्थ बसलेल्या गांगुलीला वानखेडे मध्ये झालेला ३ फ्रेब्रुवारी २००२ चा सामना आठवला, ज्यामध्ये भारताला विजयासाठी १० धावा पाहिजे होत्या आणि दोनच विकेट उरल्या होत्या.

फ्लिंटॉफने त्यावेळी दोन्ही विकेट घेऊन सामना इंग्लंडला जिंकून दिला होता. हा सामना जिंकून दिल्यानंतर फ्लिंटॉफ पूर्ण मैदानात टी-शर्ट काढून धावला होता.

फ्लिंटॉफने पहिला चेंडू टाकला, त्या चेंडूवर झहीर खानला एकही धाव काढता आली नाही. आता ५ चेंडूत २ धावा हव्या होत्या. फ्लिंटॉफने दुसरा चेंडू टाकला हा चेंडू लेग साइडला जात होता पण हा चेंडू अम्पायरने वाइड दिला नाही.

या वादग्रस्त निर्णयाने पवेलियन मध्ये बसलेल्या गांगुलीला भयंकर राग आला, त्याने अम्पायरवर चांगलेच तोंडसुख घेतले. फ्लिंटॉफने तिसरा चेंडू टाकला हा चेंडू मात्र झहीरने फुलटॉस घेऊन मारला आणि या चेंडूवर भारताला ओवरथ्रोमुळे अतिरिक्त धाव मिळाली आणि भारताने सामना जिंकला.

 

kaif-marathipizza01
thelallantop.com

ज्याला बस ड्रायवर म्हणून हिणवले गेले त्या मोहम्मद कैफने विजयाची बस सुखरूप पोचवली. हा आकस्मिक चमत्कार पाहून इंग्लंडचे खेळाडू हताश झाले, पण भारतीय खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही.

फ्लिंटॉफने मुंबई मध्ये भरवलेल्या पराभवाच्या घासाची त्याला लॉर्ड्सवर परतफेड केली म्हणून आनंद साजरा करताना, गांगुलीने आपला टी-शर्ट काढून हवेत फिरवला आणि भारतीय टीमची दादागिरी सिद्ध केली.

 

ganguly=maarathipizza
indianexpress.com

असा आहे हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय किस्सा!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?