' “गाडीवाला आया घरसे कचरा निकाल” : अफलातून गाण्याच्या जन्माची तितकीच अफलातून गोष्ट! – InMarathi

“गाडीवाला आया घरसे कचरा निकाल” : अफलातून गाण्याच्या जन्माची तितकीच अफलातून गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वच्छ भारत अभियान हे बहुतेक गावोगावी राबवले जात आहे. पूर्वी असलेली कचऱ्याची कोंडाळी आता जाऊन तिथे घंटागाडी येते आणि आपल्या ओला सुका कचरा घेऊन जाते.

या घंटागाडीची पण गंमत अशी होती की, पूर्वी या कचरागाडीला मोठी घंटा लावलेली असायची. तिच्या आवाजाने लोक कचरा घेऊन येत असत, पण आता जर तुम्ही बघितलं तर या घंटागाडीबरोबर एक गाणं ऐकू येतं. गंमत म्हणता म्हणता ते लोकांना पाठपण झालं.

मजेमजेत फेसबुकवर या गाण्याच्या ओळी घेऊन गमतीदार पोस्ट पण लिहिल्या गेल्या. हे साधंसोपं गाणं आहे गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…कुणी लिहिलं आहे हे गाणं?

 

kachara gadi im

 

हे सुटसुटीत गाणं लिहिलं आहे मध्यप्रदेश येथील प्राथमिक शिक्षक श्याम बैरागी यांनी. सगळ्यात अवघड काय असतं? तर सोपं साधं लिहिणं हेच अवघड काम असतं. आणि जे सोपं साधं लिखाण असतं तेच लोकांना सहज उमगतं, आवडतं. म्हणून तर जाहिरातींची जिंगल्स कमी आणि सोप्या शब्दात मोठा आशय सांगत असतात आणि ती आवडतात, लक्षात पण राहतात.

कविता, कथा लिहिणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही. त्यातही प्रत्येकाची आपली आपली शैली असते. आपला आपला लेखनाचा बाज असतो. आणि प्रतिभा कुणाला वरदान देईल हे आपल्याला सांगता येत नाही. तिथे माणूस झोपडीत राहतो की महालात, पदवीधारक आहे का? श्रीमंत आहे की गरीब या गोष्टी येतच नाहीत. सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. ती कुणावरही प्रसन्न होते. तशीच ती श्याम बैरागी यांच्यावर प्रसन्न झाली.

अतिशय दुर्गम भगात राहणारे श्याम बैरागी , मध्यप्रदेशात मंडला जिल्ह्यातील कान्हाकीसली या गावाजवळ बेहारी नावाचं एक खेडेगाव आहे. या गावात जन्मलेले श्याम बैरागी यांनी लिहिलेलं हे साधंस गाणं.

या गाण्याच्या जन्माची कथा पण मजेशीर आहे. नुकतीच ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली होती. लोकांना जागृत करणे हे जितके आवश्यक होते तितकेच आव्हानात्मक पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, ज्याने त्याने आपल्या आपल्या कुवतीनुसार या अभियानासाठी शक्य असेल ते करणे गरजेचे आहे.

श्याम बैरागी त्या वाक्याने प्रभावित झाले. श्याम बैरागी हे शिक्षक म्हणून काम करतात, गेली तीस वर्षे ते लेखन करतात. विवध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांना एक गोष्ट लक्षात आली, लोकांना यासाठी उद्युक्त करणारे एखादे गीत लिहिले तर? त्याचवेळी त्यांना मंडला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यानी भेटायला बोलावले. त्यांना पण ही कल्पना आवडली.

साध्या हाकांपेक्षा गाण्याचे शब्द जास्त प्रभावी ठरतील असं मंडला नगरपालिकेचे मुख्याधिकारी आर.पी.सोनी यांनी मत व्यक्त केलं.

त्यांच्या कल्पनेनुसार एखादं असं गाणं हवं जे कचरा गाडीसोबत लावता येईल, जे ऐकून लोक प्रभावित होतील, त्यांना कचरा आणा अशा हाका माराव्या लागणार नाहीत. त्या गाण्याचा मुखडा असा हवा, की लोक स्वत:हून कचरा आणून टाकतील. त्यांनी हा विचार सांगितला. मग श्याम बैरागी यांनी कविता एका दिवसात लिहिली.

 

shyam bairagi im

 

एखादी कविता जोवर चाल, संगीत यांच्या संपर्कात येत नाही तोवर ती कविताच असते, पण चाल, संगीत आले की तिचं गाणं होतं. श्याम बैरागी यांनी स्वत: त्या कवितेला चाल लावली. मग काय झालं हे गाणं तयार. आकाशदीप याने त्यांचा व्हिडिओ तयार केला.

मंडलामध्ये जेव्हा हे गाणं वाजू लागलं तेव्हा लोकांनी ते सोशल मिडीयावर शेअर केलं. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवलं. असं होत होत या गाण्याची व्याप्ती इतकी वाढली, की हे गाणं केवळ मध्यप्रदेशपुरतेच मर्यादित नाही राहिले, तर छत्तीसगड,राजस्थान,बिहार, उत्तरप्रदेश, गोवा, महाराष्ट्र या राज्यात पण सर्रास वापरले जाऊ लागले.

रोज सकाळी याच गाण्याच्या तालावर लोक कचरा टाकायला लागले. इतकंच नाहे तर २२ देशातील लोकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं. जवळपास ६ मिलियन व्ह्यूज या गाण्याला मिळाले, पण श्याम बैरागी यांच्याकडे कॉपी राईट नसल्यामुळे बऱ्याच चॅनेलवर हे गाणे लावले गेले. कुणी कुणी तर या गाण्याचे कवी म्हणून श्रेय पण घेऊन मोकळे झाले.

लोक म्हणतात, श्याम बैरागी यांनी शासनाकडे यासाठी सन्मान मिळावा म्हणून अर्ज करावा, पण अर्ज करून मिळालेला सन्मान हा सन्मान असतो का? हा श्याम बैरागी यांचा प्रश्न आहे.

ते म्हणतात, लोकांमध्ये जागृती झाली अजून काय पाहिजे? देशासाठी काम करताना सन्मान पैसा या गोष्टी गरजेच्या नसतात. उलट ते म्हणतात, असे कितीतरी ग्रामीण भागातील लोक आहेत जे कसल्याही सरकारी मदतीशिवाय देशासाठी काही ना काही करत असतात. सरकारने त्यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा.

या गाण्याची दखल सरकाने घेतली, एका सिनेसाप्तहीकाने त्यांचा सत्कार केला. कनोजमध्येही त्यांचा सत्कार झाला.जनतेने दिलेलं प्रेम हाच माझा सन्मान आहे असं श्याम बैरागी म्हणतात.

आजकाल सन्मानासाठी हपापलेल्या लोकांच्या गर्दीत श्याम बैरागी यांची ही मते दुर्मिळच म्हणावी लागतील. जरी ते म्हणाले तरीही या गाण्याने ग्राम स्वच्छता अभियानामध्ये फार मोठे योगदान दिले आहे आणि याची जाणीव ठेवून शासनाने खरोखर त्यांचा सन्मान केला पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?